तक्रारदार : वकील श्री. वानखेडे
सामनेवाले : वकील श्री. प्रज्ञा लादे
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले ही बँकींग व्यवसाय करणारी कंपनी आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तीन क्रेडिट कार्ड त्यांच्या वापराकरीता दिले होते, व त्या तीन क्रेडिटकार्डचा वापर तक्रारदार आपल्या वैयक्तिक आर्थिक उपयोगाकरीता करीत असत.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक 11/02/2007 च्या देयकामध्ये चूकीने व्याजाबद्दल रुपये 7,710.05, तसेच सेवा कराबद्दल रुपये 943.71 असे तक्रारदारांच्या नांवे दाखविले. तक्रारदारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर सामनेवाले यांनी दिनांक 11/3/2007 रोजीच्या देयकामध्ये त्या रकमा कमी केल्या.
3. तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असे कथन आहे की, दिनांक 12/2/2007 रोजीच्या देयकामध्ये सामनेवाले यांनी जी चुकीने नांवे रक्कम टाकली होती, ती रक्कम रुपये 8,653.76 कमी करुन तक्रारदारांनी धनादेशाद्वारे रुपये 1,18,528/- व रुपये 11,619 असे एकूण रुपये 1,30,147/- सामनेवाले यांचेकडे धनादेशाद्वारे त्यांच्या पत्रपेटीमध्ये टाकून अदा केले. तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असे कथन आहे की, सामनेवाले यानी चूकीने नांवे टाकलेली व्याजाची व सेवा कराची रक्कम दिनांक 11/3/2007 च्या देयकामध्ये कमी केल्यानंतर देखील व्याजाची रक्कम रुपये 5,499.13 तक्रारदारांच्या नांवे टाकली व त्या रकमेवर सामनेवाले व्याज आकारीत राहीले. तक्रारदारांनी वादग्रस्त रक्कम वजा करुन नियमित रक्कम सामनेवाले यांना अदा केलेली आहे. तरी देखील सामनेवाले यांनी रुपये 1,39.019.10 तक्रारदारांच्या नांवे दाखविले व ती वसूल होण्याकामी तक्रारदारांना नोटीस दिली. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांना क्रेडिट कार्डची रक्कम वसूलीच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
3. सामनेवाले यांनी हजर होऊन प्रकरणात आपली कैफीयत दाखल केली, व व्याजाची आकारणी व सेवाकराची आकारणी नियमितपणे करण्यात आलेली आहे असे कथन केले. आपल्या कैफीयतीसोबत क्रेडिट कार्डच्या संदर्भात जे नियम लागू आहेत त्याची प्रत देखील दाखल केली.
4. दोन्ही बाजूंनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेले आहेत. दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदार व सामनेवाले यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद. तसेच सामनेवाले यांची कैफीयत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले त्यावरुन तक्रारीच्या न्यायनिर्णयाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना क्रेडिटकार्डच्या वसूलीच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर कली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | अंतीम आदेश? | तक्रार रद् करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तसेच लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केलेले आहे की, क्रेडिटकार्ड धारकाकडून क्रेडिटकार्ड व्यवहाराची रक्कम जमा होण्यास उशिर झाल्यास सामनेवाले बँकेस व्याज आकारण्याचा, तसेच सेवाकर वसूल करण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल क्रेडिटकार्डच्या नियमावलीमध्ये नियम देखील करण्यात आलेले आहेत.
7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत असे कथन केलेले आहे की, त्यांनी वादग्रस्त रक्कम जी व्याजाची वजा करता नियमित रक्कम सामनेवाले यांचेकडे दोन धनादेशाद्वारे एकूण रक्कम रुपये 1,130,147/- अदा केलेले आहेत. युक्तीवादाच्या दरम्यान तक्रारदाराच्या वकीलांकडे याबद्दल चौकशी केली असता त्यांनी तक्रारीचे परिच्छेद क्रमांक 6/क चा संदर्भ दिला. परंतु ते दोन धनादेश वटले आहेत अथवा नाहीत याबद्दल तक्रारदारांचे वकील मंचास माहिती देऊ शकले नाहीत. त्याकामी त्यांनी मुदत मागून घेतली होती. तक्रारदार उपस्थित राहीले नसल्याने या संदर्भात तक्रारदारांचे वकील आवश्यक ती माहिती मंचास देऊ शकले नाहीत.
8. या व्यतिरिक्त तक्रारदारांची तक्रार वर्ष 2007 मधील व्यवहाराबद्दल असल्याने व तक्रारदाराने वर्ष 2007, 2008 व जानेवारी 2009 मधील देयकांच्या प्रती दाखल केलेल्या असल्याने जानेवारी 2009 च्या परिस्थितीमध्ये व तक्रार प्रलंबित असतांना क्रेडिटकार्ड व्यवहाराबद्दलची परिस्थिती व सदरच्या एकूण देयकांपैकी अधिक माहिती मंचाला तक्रारदारांकडून प्राप्त करुन घ्यावयाची होती, परंतु तक्रारदार हजर राहीले नसल्याने त्याबद्दलच्या परिस्थितीची माहिती मंचास होऊ शकली नाही.
8. तक्रारदारांनी तक्रारीसोबत जी देयके दाखल केलेली आहेत त्याचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, तक्रारदारांनी दिनांक 10/07/2008 च्या देयकाप्रमाणे मागिल बाकी रुपये 88,448/- असतांना काहीच रक्कम जमा केली नाही, व त्यामध्ये व्याज व सेवा कर यांची रक्कम नांवे पडून एकूण रक्कम रुपये 92,497/- तक्रारदारांच्या नांवे दाखविण्यात आली. पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2008 चे देयक असे दर्शविते की, एकूण देय बाकी रुपये 92,497/- असतांना तक्रारदारांनी रुपये 4,500/- सामनेवाले यांचेकडे जमा केले तर त्याच महिन्यात ठाणावाला मोटर यांचेसोबत क्रेडिटकार्डद्वारे रुपये 2,79,552/- चा व्यवहार केला, व ती रक्कम तक्रारदारांच्या नांवे दाखविण्यात आली. ऑगस्ट 2010 च्या देयकामध्ये एकूण नावे रक्कम रुपये 3,82,457/- अशी दाखविण्यात आली असतांना देखील ऑैक्टोबर 2008 चे देयक असे दर्शविते की, तक्रारदारांनी त्या महिन्यात कुठलीच रक्कम जमा केली नाही, व एकूण देयक रक्कम रुपये 1,21,188/- दाखविण्यात आली. नोव्हेंबर 2008 नंतर तक्रारदारांनी क्रेडिटकार्डच्या खात्यामध्ये कुठलीही रक्कम जमा केलेली नाही.
9. वरील परिस्थितीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या क्रेडिटकार्ड व्यवहाराच्या संदर्भात चुकीने अथवा नियमबाहय नोंदी करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष काढण्यात येत नाही. सामनेवाले हे चूकीच्या पध्दतीने व्याजाची आकारणी करीत व नियमबाहय नोंदी करीत आहेत असे तक्रारदारांचे 2007 मध्ये कथन असतांना देखील 2008 मध्ये तक्रारदारांनी क्रेडिटकार्ड वर 2,79,000/- रुपयांचा व्यवहार केला. याप्रकारे तक्रारदार दरम्यान क्रेडिटकार्डचा उपयोग करीत होते असे देखील दिसून येते. एकूणच तक्रारदारांच्या कथनाबद्दल चित्र सुस्पष्ट नसल्याने तक्रारदारांनी मागितलेल्या प्रकारची दाद देणे योग्य व न्याय्य होणार नाही असे मंचाचे मत झाल्याने पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 250/2009 रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 02/01/2014
( शां. रा. सानप ) (ज.ल.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-