निकालपत्र :- (दि. 20/11/2014)(द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये मोबाईल हॅन्डसेटची नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.प. यांनी हजर होऊन म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. वि.प. तर्फे वकील हजर.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
वि.प. नं. 1 ही सोनी इरिक्सन मोबाईल कंपनी असून वि.प. नं. 2 हे कोल्हापूर येथील सोनी मोबाईल कंपनीचे कस्टमर केअर सेंटर आहे. तसेच वि.प. नं. 3 हे कोल्हापूर येथील सोनी मोबाईल कंपनीचे विक्रेते आहेत. तक्रारदारांनी वि.प.नं. 3 कडून सोनी इरिक्सन ई-16 IMEA- No. 357737042536249 दि. 31-10-2011 रोजी रक्कम रु. 10,000/- बिल नं. 8341 ने खरेदी केला. तक्रारदारांनी मोबाईल खरेदी केलेनंतर काही दिवसांनी मोबाईलमध्ये तांत्रीक अडचण उदा. हँग होणे, बंद पडणे अशा तक्रारी येऊ लागल्याने वि.प. नं. 2 यांना मोबाईल हँन्डसेट दाखवला असता वि.प. नं. 2 यांनी हँन्डसेटमध्ये हार्डवेअर व सॉफटवेअरचा प्रॉब्लेम असलेने मोबाईलमधील प्रॉब्लेम दूर करुन देतो असे सांगून मोबाईल ठेवून घेतला. व त्याप्रमाणे तक्रारदार यांना जॉबशिट नं.एसई 31244110023 दि. 4-01-2012 रोजी दिले. सदर हँन्डसेट वि.प. यांनी रिपेअरी करुन दिला परंतु सदर हँन्डसेट पुन्हा वारंवार खराब होऊ लागलेने तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांचेकडे दि. 3-03-2012 रोजी जॉबशिट नं. एसई 31244110461 या जॉबशिटने रिपेअरीस दिला, त्यांनतर हँन्डसेटमध्ये हार्डवेअर व सॉफटवेअरचा वि.प. नं. 1 यांचा उत्पादित दोष असलेने त्यांनी मोबाईल हँन्डसेटचे मदरबोर्ड बदलून दिला. व त्यांनतर हँन्डसेटमध्ये वारंवार प्रॉब्लेम असलेने वि.प. नं. 2 यांनी वेळोवेळी मोबाईल हँन्डसेटमधील पार्टही बदलून दिले आहेत. वि.प.नं. 2 यांनी वारंवार हँन्डसेट रिपेअरी करुनही हँन्डसेटमधील दोष दूर झालेले नाहीत. हँन्डसेट अद्यापी रिपेअरी झालेला नाही, त्यामुळे तक्रारदारांना हँन्डसेट वापरता येत नाही. वि.प. नं. 2 यांचेकडे हँन्डसेट बदलून मागितला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वि.प. नं. 2 यांनी हँन्डसेट बदलून देणेस टाळाटाळ केली आहे. वि.प. नं. 2 यांनी तक्रारदारांना हँन्डसेट रिपेअरीबाबत योग्य ती सर्व्हिस दिलेली नाही, त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे. सबब, वि.प. यांचेकडून सोनी इरिक्सन कंपनीचा हँन्डसेटची रक्कम रु. 10,000/- व त्यावर द.सा.द.शे. 12 % प्रमाणे व्याजासह मिळावे. व तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी वि.प. कडून रक्कम रु. 20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
3) तक्रारदारांनी तक्रारीसोबत एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे तक्रारदाराने खरेदी केलेल्या मोबाईल हँन्डसेट बिल नं. 8341 दि. 31-10-2011, अ.क्र. तक्रारदाराने मोबाईल रिपेअरी केलेचे वि.प. नं. 2 ने दिलेला डाटा, अ.क्र. 3 कडे तक्रारदाराने पाठविलेली रजि.ए. डी. नोटीस दि. 16-07-2013, अ. क्र. 4 व 5 कडे वि. प. नं. 2 व 3 ला नोटीस पोहच झालेची पोहच, अ.क्र. 6 कडे वि.प. नं. 1 ला नोटीस पोहचलेची पोस्टाची इंटरनेटवरील प्रत दि. 19-03-2014 इत्यादी कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
4) वि.प. यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. वि.प. त्यांचे म्हणण्यामध्ये कथन करतात की तक्रारदाराची तक्रार खोटी व लबाडीची आहे. तक्रारदाराचे तक्रार न्यायोचित नाही. वि.प.नं. 1 हे बाजारपेठेत सोनी नावाने मोबाईल विक्री करतात. सदरचा मोबाईल हे तक्रारदाराने वि.प. चे नेमणुक केलेले अधिकृत डिलर यांचेकडून घेतला आहे. वि.प. क्र. 2 व 3 हे अधिकृत सर्व्हिस सेंटर व विक्रेते आहेत. वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेल्या वॉरंटी खालीलप्रमाणे- “Subject to the conditions of the Limited Warranty, Sony warranties the product to be free from defects in design, material and workmanship, at he time of its original purchase by a consumer. This Limited warranty will last for a period of one (1) year as from the original date of purchase of the product. If, during the warranty period, this product fails to operate under normal use and service, due to defects in design, materials or workmanship, Sony authorized distributors or service partners, will at their option, either repair, replace or refund the purchase price of the product in accordance with the terms and conditions stipulated herein”. सदरच्या वॉरंटीच्या अनुषंगाने वि.प. हे फक्त मोबाईल हँन्डसेट दुरुस्त करुन देणेची जबाबदारी आहे. तक्रारदारांना वेळोवेळी मोबाईल दुरुस्त करुन दिलेला आहे. ब-याच वेळा सदरचा मोबाईल हा व्यवस्थितपणे काम करीत होता. वि.प. क्र. 2 यांनी तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीचे वेळोवेळी समाधान करुन दिलेले आहे. तक्रारदारांना कळविणेत आले होते की, मोबाईल व्यवस्थित काम करीत नसणार त्याबाबतची कल्पना देऊन तक्रारदारांना कळविणेत आलेले होते. तसेच वि.प. असे नमूद करतात की, तक्रारदारांना रिफंडबाबत त्यांचे समाधान होण्यासाठी कळविले होते. परंतु तक्रारदारांनी त्याबाबत वि.प. यांना काहीही कळविलेले नाही. तदनंतर वि.प. यांनी फोनव्दारे कळविले परंतु तक्रारदाराचा मोबाईल बंद होता. तक्रारदारांना सेवा देण्यास वि.प. यांनी कसूर केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
5) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र व तक्रारदार यांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवेली आहे काय ? होय
2. तक्रारदार कोणता अनुतोष/नुकसानभरपाई
मिळणेस पात्र आहेत ? होय
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
तक्रारदार यांनी सोनी इरिक्सन ई-16 हा मोबाईल हँन्डसेट वि.प. नं. 3 कडून दि. 31-10-2011 रोजी रक्कम रु. 10,000/- इतक्या रक्कमेत खरेदी केला. त्याबाबतची बिलाची पावती अ.क्र.1 ला दाखल केली आहे. तक्रारदारांनी मोबाईल खरेदी केलेनंतर काही दिवसांनी मोबाईलमध्ये तांत्रीक अडचणी उदा. हँग होणे, बंद पडणे अशा तक्रारी येऊ लागल्याने वि.प. नं. 2 केअर सेंटर यांना मोबाईल हँन्डसेट दाखवला, वि.प. नं. 2 यांनी हँन्डसेटमध्ये हार्डवेअर व सॉफटवेअरचे त्रुटी (प्रॉब्लेम) आहेत. मोबाईलमधील सर्व त्रुटी (प्रॉब्लेम) दूर करुन देतो असे सांगून मोबाईल स्वत:जवळ ठेवून घेतला. व तक्रारदार यांना जॉबशिट नं.एसई 31244110023 दि. 4-01-2012 रोजी देऊन हॅन्डसेट ठेवला. सदरचा हँन्डसेट वि.प. क्र. 2 यांनी रिपेअरी करुन दिला. तदनंतर सदर हँन्डसेट वारंवार खराब होऊ लागलेने तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांचेकडे दि. 3-03-2012 रोजी जॉबशिट नं. एसई 31244110461 या जॉबशिटने दुरुस्तीस दिला. त्यांनतर हँन्डसेटमध्ये हार्डवेअर व सॉफटवेअरचा वि.प. नं. 1 यांचा उत्पादित दोष असलेने त्यांनी मोबाईल हँन्डसेटचा मदरबोर्ड ही बदलून दिला. वारंवार मोबाईलमध्ये दोष आलेने वि.प. नं. 2 यांनी वेळोवेळी मोबाईल हँन्डसेटमधील पार्टस बदलून दिले आहेत असे दिसून येते. वि.प.नं. 2 यांनी वारंवार हँन्डसेट रिपेअरी करुनही हँन्डसेटमधील उत्पादित दोष दूर झालेले नाहीत असे दिसून येते. तक्रारदाराचा हँन्डसेट अद्यापपावेतो दुरुस्ती झालेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना मोबाईल हँन्डसेटचा वापर करता येत नाही. त्यामुळे तक्रारदारांना अतोनात नुकसान सहन करावा लागले आहे. तक्रारदारांनी वि.प. नं. 2 यांचेकडे मोबाईल हँन्डसेट बदलून मागितला असता वि.प. यांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली. व कोणताही प्रतिसाद दिला नाही. किंवा मोबाईल हँन्डसेट बदलून दिला नाही. वि.प. क्र. 1 चे वि.प. नं. 2 अधिकृत सर्व्हिस सेंटर यांनी तक्रारदारांना मोबाईल हँन्डसेट दुरुस्तीबाबत योग्य सेवा दिलेली नाही. तसेच मोबाईल हँन्डसेटमधील उत्पादित दोष दुरु करुन देण्याची जबाबदारी असतानादेखील वि.प. क्र. 2 यांचेकडून पूर्ण होऊन मिळालेली नाही. तदनंतर तक्रारदारांनी दि. 16-07-2013 रोजी वकिलामार्फत रजि. नोटीस पाठवून दुरुस्तीस दिलेल्या मोबाईल हँन्डसेट रक्कमेची व नुकसानभरपाईची मागणी केली. तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीसीची प्रत याकामी दाखल आहे. वि.प. नं. 2 वि.प. नं. 1 कंपनीचे सर्व्हीस सेंटर अथवा उत्पादित कंपनीकडे मोबाईल हँन्डसेट दुरुस्तीबाबत पाठपुरावा करणे आवश्यक होते, तसे वि.प. यांनी केलेले नाही असे दिसून येते. वि.प. 2 यांनी तक्रारदारांना मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही अथवा बदलून दिला नाही. तक्रारदारांनी वि.प. यांना रजि. नोटीस पाठवून कळविले होते. परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त दिला नाही अथवा रक्कमही परत दिली नाही. या सर्व बाबीचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे, तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे, म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 : तक्रारदार यांनी सोनी इरिक्सन ई-16 हा मोबाईल हँन्डसेट दुरुस्तीसाठी वि.प. नं. 2 यांचेकडे दिला असताना मोबाईलच्या दुरुस्तीबाबत तक्रारदारांना काहीही कळविले नाही अथवा दुरुस्ती करुन परत दिला नाही. व रक्कमही परत केलेली नाही, त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. तक्रार अर्ज दाखल करणेस भाग पडले आहे, म्हणून तक्रारदार हे सोनी इरिक्सन ई-16 या मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु. 10,000/- व त्यावर तक्रार दाखल दि. 31-10-2013 रोजीपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे, म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र . 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. यांनी तक्रारदारास मोबाईल हॅन्डसेट सोनी इरिक्सन ई-16 मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अदा करावे व त्यावर तक्रार दाखल दि. 31-10-2013 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावेत.
3. वि.प. यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.