नि का ल प त्र :- (दि.22-03-2016)(द्वारा- सौ. रुपाली डी. घाटगे,सदस्या)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.प. नं. 1 यांना नोटीसा लागू होऊन हजर झाले परंतु म्हणणे दाखल केलेले नाही त्यामुळे वि.प. नं. 1 विरुध्द दि. 4-03-2016 रोजी “नो-से” चे आदेश पारीत केले. व वि.प. नं. 2 यांना नोटीस लागू होऊन ते गैरहजर राहिलेने त्यांचेविरुध्द दि. 4-03-2016 रोजी “एकतर्फा” आदेश पारीत करणेत आले. तक्रारदार तर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. वि.प. गैरहजर. प्रस्तुतचा तक्रार अर्ज गुणदोषांवर निकाली करणेत येतो.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
वि.प. नं. 1 हे सोनी कंपनीचे ब्रँडेड वस्तुंचे वितरक आहेत. वि.प. नं. 2 हे कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे. यातील तक्रारदार यांनी ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून दि. 3-04-2015 रोजी वि.प. नं.1 उत्पादित कंपनीचा SONY Xperia–Z1 (C6902) (BLACK) IMEI No.359774050497939 स्मार्टफोन रक्कम रु.25,735/- खरेदी केला.
तक्रारदारांनी हॅन्डसेट हा अत्याधुनीक असून वॉटरप्रुफ असलेची क्षमता असलेने खरेदी केला होता. फोन खरेदी केलेनंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयामध्ये तक्रारदाराच्या खिश्यातून सदरचा स्मार्टफोन पाण्याच्या छोटया बादलीमध्ये पडला. तक्रारदारांनी काही सेकंदातच त्याला बाहेर काढला. हॅन्डसेट चालू अवस्थेत होता. परंतु दुस-या दिवशी डिस्प्ले बंद पडलेने तक्रारदाराने हॅन्डसेट वि.प. नं. 2 या कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये जमा केला.
त्यानंतर तक्रारदारांनी दि. 17-08-2015 रोजी हॅन्डसेटची चौकशी केली असता वि.प. नं. 2 यांनी रक्कम रु. 17,849/- इतका खर्च सांगितला. व जॉब शीट नं. W115081305669 सर्व्हिस चार्जेसचे इस्टीमेट तक्रारदारास दिले. सदरच्या इस्टीमेटमध्ये 10 बाबींचे दुरुस्तीचा तपशिल पाहून तक्रारदारांना धक्का बसला. तक्रारदारांनी सदरच्या हॅन्डसेट दि. 3-04-2015 रोजी खरेदी केला असून अद्याप वॉरंटी कालावधीमध्ये असताना हॅन्डसेटमध्ये निर्मिती दोष असताना तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सदरचे इस्टीमेट हे वि.प. नं. 1 कंपनीचे सर्व्हिस सेंटर वि.प. नं. 2 यांनी स्वत: बनविले असून त्याबाबत तक्रारदारांनी तीव्र हरकत घेतली. इस्टीमेट पाहता Customer Complaint - No Display, Others, Display in line, Display Blank show & other lines show problem असे नमूद केले आहे. तसेच ASC Comments - Display In line, Display Blank Show & only Lines show problem असे स्पष्टपणे नमूद आहे. तक्रारदाराचा हॅन्डसेट वॉरंटी कालावधीत असताना वि.प. नं. 1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.
वि.प. नं. 2 यांनी तक्रारदारास फोनमधील दोषाचे निवारण न करुन अथवा बदलून न देऊन अथवा त्याची किंमत परत न करुन सेवेत त्रुटी केली आहे. वि.प. नं. 2 यांनी दि. 31-08-2015 रोजी बील नं. 394 रक्कम रु. 120/- तक्रारदाराकडून टेस्टींगसाठी म्हणून वसुल केले. सदरचा हॅन्डसेट आजतागायत विनादुरुस्ती वि.प.नं. 2 कडे पडून आहे. तक्रारदारांनी खरेदी केल्यापासून हॅन्डसेटचा वापर करता आलेला नाही. तक्रारदार हे उच्चशिक्षित असून नोकरी करतात. वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना योग्य सेवा दिलेने तक्रारदारांना नाईलाजाने दुसरा फोन घेणे भाग पडले. त्यामुळे तक्रारदारांनी दि. 14-09-2015 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून रु. 25,735/- परत करावी व नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु वि.प. नं. 1 व 2 यांनी नोटीसीस उत्तर दिले नाही. तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत आहे. सबब, वि.प.नं. 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम रु. 25,735/- मोबाईल खरेदी केलेपासून द.सा.द.श. 18 टक्के व्याजाने द्यावी. व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- वि.प. नं. 1 व 2 यांचेकडून मिळावेत व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
3) तक्रारदारांनी तक्रारीसोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. मोबाईल हॅन्डसेटचे बिल, वि.प. कडील मुळ पाम्प्लेट, दुरुस्तीचे इस्टीमेट, टेस्टींग चार्जेस, वि.प. नं. 1 व 2 ला पाठविलेली वकिलांची नोटीस, व नोटीसीची पोहच पावती इत्यादी कागदपत्र दाखल केलेली आहेत. तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केलेले आहे.
4) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र व तक्रारदार यांचे वकिलांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवली आहे काय ? होय
2. तक्रारदार नुकसानभरपाई मिळणेस
पात्र आहेत ? होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम
मिळणेस पात्र आहेत काय ? होय
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून दि. 3-07-2015 रोजी SONY Xperia–Z (C6602) हा स्मार्टफोन रक्कम रु. 25,735/- इतक्या किंमतीस ऑनलाईन खरेदी केला. सदरचा स्मार्ट फोन अत्याधुनिक असून वॉटरप्रुफ असलेची क्षमता लक्षात घेऊन खरेदी केला. तथापि, ऑगस्टचे पहिले आठवडयात पाण्याच्या छोटया बादलीमध्ये सदरचा स्मार्टफोन पडला. तदनंतर चालू अवस्थेत होता परंतु दुसरे दिवशी डिस्पले बंद पडलेने सदरचा स्मार्टफोन वि.प.नं. 2 यांचेकडे जमा केला असता वि.प. नं. 2 यांनी त्यास रक्कम रु. 17,844/- इतका खर्च येईल असे सांगितले. त्याकारणाने सदरचा स्मार्टफोन अद्याप वॉरंटी पिरीएडमध्ये असतानादेखील, No Display, Others, Display in line, Display Blank show & other lines show problem इत्यादी दुरुस्तीचे निवारण न करता व भरीव रक्कमेचे इस्टीमेट तयार करुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो त्या अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अ. क्र. 1 ला Invoice – 112 दाखल असून Xperia Z1 हा स्मार्टफोन तक्रारदाराने रक्कम रु. 25,735/- इतके रक्कमेस खरेदी केलेची पावती दाखल आहे. अ.क्र. 2 ला वि.प. नं. 1 यांचे नावाचे Xperia चे पॉम्प्लेट दाखल असून त्यावर सदर स्मार्टफोनचे वर्णन नमूद आहे. वि.प. नं. 2 यांचेकडील दुरुस्तीकडील इस्टीमेट दाखल असून
Warranty Category – Void,
Condition of Set - Scratched, back panel scratches
Handset is water damage all litmas is red.
Comments – Display in line, display blank show
And only lines show problem.
Unit dead - No.
Total estimated value – Rs.17,849.74
वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून सदरचा स्मार्टफोन खरेदी केलेला होता. तथापि, सदरचे स्मार्टफोन Water Damage मुळे नादुरुस्त झालेला होता. Warranty void होत होती त्यामुळे वि.प. यांनी सदरचे स्मार्ट फोन दुरुस्तीसाठी रक्कम रु. 17,849-74 इतक्या रक्कमेची मागणी केलेची दिसून येते.
प्रस्तुत प्रकरणी वि.प. यांना म्हणणे देणेस संधी दिली असताना देखील त्यांनी मुदतीत म्हणणे दाखल केलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदरचा स्मार्टफोन पाण्याच्या छोटया बादलीत ऑगस्ट महिन्यात पडलेचे मान्य केले आहे परंतु सदरचा फोन हा अत्याधुनिक असून वॉटरप्रुफ असलेची क्षमता लक्षात घेऊन सदरचा स्मार्टफोन खरेदी केलेला आहे. त्या कारणाने सदरचा स्मार्टफोन पाण्यात पडून Water damage झाला असतानाही सदरचे स्मार्टफोनमध्ये निर्माण झालेले दोष हे दुरुस्त करुन देणे वि.प. यांची जबाबदारी होती. सदरचा स्मार्टफोन Unit dead – No म्हणजेच बंद पडलेल्या अवस्थेत नसून वि.प. यांचेकडेच अद्याप असलेचा तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. त्या कारणाने कोणत्याही उत्पादनाची विक्रीपश्चात उत्पादीत कंपनीने कोणत्याही उत्पादनाची विक्री पश्चात असणारी सेवा देण्याची जबाबदारी प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रक्ट(Privity of Contract) या तत्वानुसार उत्पादित कंपनी व त्याचे विक्रेत्याची असते. तसेच सदरची जबाबदारी ही केवळ उत्पादन विक्री करण्यापुरती मर्यादित नसून विक्रीपश्चात सेवा देणेची असते. वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदारांच्या स्मार्टफोनमध्ये निर्माण झालेल्या दोषांचे निवारण करणेची पूर्णपणे जबाबदारी वि.प. यांचेवर असताना देखील सदरच्या दोषांचे निवारण न करता, सदरचा स्मार्ट फोन हा वि.प. यांनी स्वत:चे ताब्यात ठेवून सदर स्मार्टफोन दुरुस्तीकरिता भरघोस रक्कमेची मागणी करुन वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 व 3 -
उपरोक्त मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केलेने वि.प.नं. 1 व 2 यांनी तक्रारदारास सदर कंपनीचा नवीन स्मार्ट फोन बदलून द्यावा किंवा SONY Xperia–Z (C6602) ची रक्कम रु. 25,735/- इतकी रक्कम व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि. 2-12-2015 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज सदरची रक्कम संपूर्ण मिळोपावेतो अदा करावी.
वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळणेस तक्रारदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 4 - सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत. सबब, आदेश.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. नं. 1 व 2 यांनी सदर कंपनीचा नवीन स्मार्ट फोन बदलून द्यावा किंवा SONY Xperia–Z (C6602) ची रक्कम रु. 25,735/- अक्षरी रुपये पंचवीस सातशे पस्तीस फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि. 2-12-2015 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज सदरची रक्कम संपूर्ण मिळोपावेतो अदा करावी.
3. वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 2000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.