न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
यातील तक्रारदार हे कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. वि.प. नं. 1 ही मोबाईल हॅन्डसेट तयार करणारी कंपनी आहे तर वि.प. नं. 2 हे वि.प. नं. 1 चे कोल्हापूर येथील अधिकृत सर्व्हींसिंग सेंटर असून वि.प.नं. 3 हे विक्रेते आहेत. यातील तक्रारदार यांना मोबाईलची अत्यंत गरज होती. वि.प. नं. 3 कडून तक्रारदाराने वि.प. नं.1 कंपनीचा SONY XPERIA – C 3 (D2502) हा मोबाईल हॅन्डसेट रक्कम रु. 18,500/- या किंमतीस खरेदी केला. सदर मोबाईल घेतलेनंतर उत्पादित दोषांमुळे मोबाईलमधून घेतलेले फोटो व्यवस्थित येत नव्हते. तर अस्पष्ट व धूसर येत होते. दरम्यान डिसेंबर 2015 मध्ये त्यांचेकडून मोबाईल व्हर्जन अपडेट करुन घ्या असा मेसेज आला. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि. 30-12-2015 रोजी सदर मोबाईल अपडेट करणेसाठी व मोबाईल दुरुस्तीसाठी वि.प. नं. 2 यांचेकडे जमा केला. व त्यावेळी फोटोबाबत तक्रार केली त्यावेळी वि.प. नं. 2 ने सदर मोबाईल जमा करुन घेतला व नंतर मोबाईल दुरुस्त झालेचे सांगून तक्रारदाराला परत दिला. परंतु सदर मोबाईलमधील दोष दूर झालेला नव्हता. म्हणून पुन्हा दि. 25-04-2016 रोजी वि.प. नं. 2 कडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिला. तो मोबाईल वि.प. नं. 2 ने जमा करुन घेतला व सदर मोबाईल दुरुस्त झाला असून दोष दूर झाला आहे व अशी खात्री दिली व पुन्हा मोबाईलमध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेस मोबाईल बदलून देतो असे वि.प. ने तक्रारदाराला सांगितले. परंतु सदर मोबाईलमधील दोष दूर झालेला नव्हता. म्हणून पुन्हा दि. 2-05-2016 रोजी वि.प. नं. 2 कडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिला. त्यावेळी वि.प.न. 2 ने वि.प. नं. 1 कंपनीचे संबंधीत व्यक्तीशी बोलतो असे सांगितले. तदनंतर दि. 3-05-2016 रोजी वि.प. नं. 2 यांचेकडून तक्रारदाराला मोबाईल दुरुस्त झाला आहे असा मेसेज आला म्हणून तक्रारदार वि.प. नं. 2 कडे दि. 4-05-2016 रोजी गेले असता वि.प. नं. 2 यांचे प्रतिनिधीस फोटो काढून दाखवा अशी विनंती केली. वि.प. नं. 2 चे प्रतिनिधी फोटो काढले असता ते व्यवस्थित आले नाहीत. तक्रारदाराने दोष दूर झालेला नाही हे वि.प. नं. 2 चे प्रतिनिधीस सांगितले व मोबाईल दुरुस्त करुन दया अथवा बदलून दया असे वि.प. ला तक्रारदाराने सांगितले. त्यावेळी वि.प. नं. 2 ने उध्दटपणाने उत्तरे दिल. काय करायचे ते करा अशी धमकी दिली म्हणून वि.प. चे कॉल सेंटरला फोन केला व मोबाईल दुरुस्त करुन देणेची विनंती केली असता त्यांनी कोणतीही दाद दिली नाही. सदर बाब तक्रारदाराने वि.प. नं. 3 ला भेटून सांगितली असता विक्रीनंतर आमचा काहीही संबंध नाही असे सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने वि.प. यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली व मोबाईल दुरुस्त करुन दया अथवा बदलून दया तसेच मानसिक त्रास व नुकसानीपोटी रक्कम रु. 25,000/- ची मागणी केली परंतु सदर नोटीसीला वि.प. ने कोणतेही उत्तर दिलेले नाही. तक्रारदाराचा मोबाईल वि.प. चे ताब्यात आहे. नो वॉरंटीमध्ये दुरुस्त करुन देणेची वि.प. यांची जबाबदारी आहे परंतु तक्रारदाराचा मोबाईल वि.प. यांनी वॉरंटीमध्ये दुरुस्त करुन दिला नाही अथवा बदलून दिला नाही किंवा मोबाईलची किंमतही परत दिलेली नाही. अशाप्रकारे वि.प. ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब, तक्रारदाराने मोबाईलची किंमत व्याजासह परत मिळणेसाठी व नुकसान भरपाई मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2) प्रस्तुत कामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तिकरित्या वादातीत मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु. 18,500/- दि. 14-05-2015 रोजीपासून द.सा.द.शे. 12 % दराने होणा-या व्याजासह वसूल होऊन मिळावी, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- वि.प. यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तिकरित्या वसूल होऊन मिळावी व अर्जाचा खर्च रक्कम रु. 10,000/- वि.प. यांनी तक्रारदाराला देणेबाबत आदेश व्हावेत.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, कागद यादीसोबत मोबाईल खरेदीची पावती, वि.प. ने दिलेले जॉबशिट, वि.प. यांना पाठवलेली नोटीस, पुराव्याचे शपथपत्र, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
4) वि.प. नं. 1 व 3 यांनी त्यांचे म्हणणे/कैफियत, पुराव्याची शपथपत्र, लेखी युक्तीवाद व मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे या कामी दाखल केलेले आहेत.
वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जावरील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने पुढीलप्रमाणे तक्रार अर्जावर आक्षेप नोंदवलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील क्थने मान्य व कबूल नाहीत.
तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद मोबाईल हॅन्डसेट वि.प. नं. 3 कडून दि. 14-05-2015 रोजी खरेदी केला होता तसेच तक्रारदाराचे तो सदोष आहे म्हणून वि.प. कडे दुरुस्तीस दिला होता व वि.प. नं. 1 चे सुचनांप्रमाणे वि.प. 2 ने तक्रारदाराचा हॅन्डसेट दुरुस्त करुन दिला आहे तसेच दुरुस्तीसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही. तसेच वि.प. नं.1 ने उत्पादित केले वस्तुची दुरुस्ती ही वि.प. नं. 1 चे सुचनांनुसारच करावी लागते. तक्रारदाराचे मतानुसार नाही. त्यामुळे तक्रार अर्ज दाखल करणेस तक्रारदाराला कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही.
(ii) वि.प. ने तक्रारदाराला हॅन्डसेट बदलून देतो असे कधीही सांगितले नाही अथवा कोणतीही धमकी दिलेली नाही. तसेच वि.प. यांनी प्रस्तुत मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करणेसाठी तक्रारदाराने जमा केला त्यावेळी सदर मोबाईल वॉरंटी कालावधीत होता. त्यामुळे तक्रारदाराला विनामुल्य सेवा दिली आहे. तसेच हॅन्डसेटमध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही. सबब, प्रस्तुत हॅन्डसेटमध्ये उत्पादीत दोष असेलेचे तक्रारदाराचे कथन मान्य व कबूल नाही. तसेच वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा दिली हे वि.प. यांना मान्य व कबूल नाही.
(iii) तक्रारदाराने स्वत:च्या पसंतीनेच सदर हॅन्डसेट खरेदी केला आहे. प्रस्तुत हॅन्डसेटला कंपनीच्या वस्तु वैशिष्ठयाव्यतिरिक्त इतर कोणतीही अतिरिक्त ग्वाही दिलेली नाही. हॅन्डसेटमधील उत्पादित दोषामुळेच सदर हॅन्डसेटवर काढलेले फोटो धुसर येतात हे वि.प. यांना मान्य नाही. वास्तविक प्रस्तुत हॅन्डसेटमध्ये कोणताही उत्पादित दोष नाही. वि.प. ने तकक्रारदाराला हॅन्डसेट अदययावत करणेसाठी जमा करणेस सांगितला नसून तक्रारदाराने स्वत:हून दि. 30-12-2015 रोजी “धुसर कॅमेरा प्रतिमा व हँग” या लक्षणसाठी वि.प. नं. 2 शी संपर्क साधला आहे. तक्रारदाराला काम पूर्ण करणेचा क्रम W/115123003115 असा दिला आहे. व जरुर ती दुरुस्ती करुन तसेच सॉफ्टवेअर अदययावत करुन सदर हॅन्डसेट तक्रारदार यांना दि. 31-12-2015 रोजी परत दिलेला आहे. तक्रारदाराने पुन्हा दि. 25-04-2016 रोजी धुसर कॅमेरा प्रतिमा या लक्षणासाठी वि.प. नं. 2 कडे संपर्क साधला आहे. आणि तक्रारदाराला काम पुर्ण करणेचा क्रम W/116042502012 असा दिला आहे. व सॉफ्टवेअर अदययावत करुन तक्रारदाराने दि. 28-04-2016 रोजी परत नेला आहे. व तक्रारदाराला सदर हॅन्डसेटचे कॅमेरामध्ये दोष नसलेची ग्वाही दिली आहे. प्रस्तुत हॅन्डसेट दि. 2-05-2016 रोजी दुरुस्ती करता जमा केलेनंतर वि.प. नं. 2 यांचेकडून तक्रारदाराला दि. 3-05-2016 रोजी संदेश मिळाला व सदर हॅन्डसेट बदलून देणे संदर्भात वि.प. नं. 1 बरोबर सल्लामसलत करतील असे सांगितले तक्रारदाराचे कथन मान्य नाही. दि. 4-05-2016 रोजी वि.प. नं. 2 चे प्रतिनिधी यांनी हॅन्डसेट दुरुस्त झालेबद्दल व दोष नसलेबद्दल सिध्द करुन दिले आहे हे वि.प. ला मान्य असले तरीही सदर हॅन्डसेटने घेतलेले फोटो व्यवस्थित नाहीत हे तक्रारदाराचे कथन वि.प. यांना मान्य नाही. “फोटो असेच येतील याबाबत काही करु शकत नाही” असे वि.प. नं. 2 ने तक्रारदाराला सांगितलेचे मान्य व कबूल नाही उलट वि.प. नं. 2 ने प्रस्तुत हॅन्डसेटमध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही तर सदर हॅन्डसेट वि.प. नं. 2 च्या वस्तुवैशिष्टयानुसार काम करत असलेची माहिती तक्रारदाराला दिली आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना कोणतीही धमकी दिलेली नाही. व तक्रारदाराचा हॅन्डसेट योग्य हमीनुसार दुरुस्त केला आहे.
(iv) तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- देणेस वि.प. जबाबदार असलेचे तक्रारदाराचे म्हणणे वि.प.ला मान्य नाही. तक्रारदार यांनी हमी कालावधीमध्ये हॅन्डसेट वि.प. कडे दुरुस्तीसाठी दिला त्यावेळी वि.प. ने विनामुल्य दुरुस्त करुन दिला आहे. वि.प. ने तक्रारदाराला अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन कोणतीही सदोष सेवा पुरविलेली नाही. प्रस्तुत हॅन्डसेटमध्ये कोणताही दोष नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेस पात्र आहे. अशाप्रकारचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जावर नोंदवलेले आहेत.
5) वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदाराचे वादातीत हॅन्डसेटमध्ये उत्पादित दोष आहे काय ? | होय |
4 | तक्रारदार वि.प. यांचेकडून वादतीत मोबाईल हॅन्डसेट किंमत व्याजासह व नुकसानभरपाई वसुल होऊन मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
5 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 ते 4 –
6) वर नमूद मुद्दा क्र. 1 ते 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण प्रस्तुत तक्रारदारने वि.प. नं. 3 यांचेकडून वि.प. नं. 1 कंपनीचा SONY XPERIA – C 3 (D2502) हे मॉडेल मोबाईल हॅन्डसेट दि. 14-05-2015 रोजी रक्कम रु. 18,500/- या किंमतीस खरेदी केला. ही बाब वि.प. नं. 1 ते 3 यांनी मान्य व कबूल केली आहे. कागदयादीसोबत तक्रारदाराने सदर मोबाईल हॅन्डसेट खरेदीचे बील दाखल केले आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक असून वि.प. नं. 1 ते 3 हे तक्रारदाराचे सेवा पुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे सिध्द झालेली आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीच्या जॉबशिटवरुन तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्तीसाठी वि.प. कडे जमा केलेचे स्पष्ट होते. तसेच वि.प.ने त्यांचे म्हणण्यामध्येही तक्रारदाराचा हॅन्डसेट वारंवार दुरुस्तीस आलेची बाब मान्य व कबूल केली आहे. तसेच तक्रारदाराचे मोबाईल हॅन्डसेटमध्ये वॉरंटी कालावधीत दुरुस्तीस आला होता ही बाबही वि.प. ने मान्य केली आहे. सबब, तक्रारदाराचे नमूद मोबाईल हॅन्डसेटमध्ये वारंवार बिघाड निर्माण झालेने तसेच वारंवार वि.प. यांचेकडून दुरुस्त करुन घेऊनही तक्रारदाराचा मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त झालेला नाही. व त्यामध्ये असणारा कॅमेरा धुसर प्रतिमा म्हणजेच सदरचे मोबाईल हॅन्डसेटवरुन घेतलेले फोटो हे स्पष्ट येत नव्हते धूसर येत होते व मोबाईल वारंवार हँग होत होता ही बाब स्पष्टपणे शाबीत झाली आहे. याचा विचार करता तक्रारदाराने वि.प. कडून खरेदी केलेल्या वादातीत मोबाईल हॅन्डसेटमध्ये उत्पदित दोष होता व आहे ही बाब स्पष्टपणे शाबीत झालेली आहे. तसेच तक्रारदाराने वि.प. यांचेकडे वारंवार सदर मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीस देऊनही तो दोषमुक्त अथवा दुरुस्त झाला नाही. सबब, तक्रारदाराने त्यांचा मोबाईल हॅन्डसेट वॉरंटी कालावधीतच नादुरुस्त झालेला असलेने तो दुरुस्त होत नसलेने त्याबदल्यात नवीन मोबाईल हॅन्डसेट बदलून मिळावा अथवा सदर मोबाईल खरेदीची किंमत तक्रारदारला परत मिळावी अशी वि.प. कडे मागणी करुनही वि.प. ने मोबाईल व्यवस्थित दुरुस्त करुन दिला नाही अथवा बदलून मागितला असता बदलून दिला नाही. प्रस्तुत मोबाईल हॅन्डसेट वि.प. चे ताब्यात आहे असे तक्रारदाराने शपथेवर कथन केलेले आहे.
वरील सर्व बाबी तसेच दाखल कागदपत्रांचा उहापोह करता तक्रारदाराने त्यांची केस सबळ पुराव्यानिशी शाबीत केलेली आहे. याउलट वि.प. यांनी त्क्यांचे बचावात्मक आक्षेप सबळ पुराव्यासह सिध्द केलेले नाहीत. सबब, तक्रारदाराला वि.प. ने सदोष सेवा दिली असून उत्पादित दोष असलेला मोबाईल हॅन्डसेटची विक्री तक्रारदाराला केली असून तो वारंवार दुरुस्तीस देऊनही दुरुस्त/दोषमुक्त केला नाही. तसेच बदलूनही दिलेला नाही किंवा प्रस्तुत मोबाईल हॅन्डसेटची रक्कमही तक्रारदाराला परत दिलेली नाहीत या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराला वि.प. ने सदेाष सेवा दिलेचे सिध्द होते. व प्रस्तुत तक्रारदार वि.प. यांचेकडून SONY XPERIA – C 3 (D2502) मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु. 18,500/- (रक्कम रुपये अठरा हजार पाचशे मात्र) व्याजासह वसूल होऊन मिळणेस तसेच नुकसान भरपाई म्हणजेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 8,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- वसूल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. नं. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला SONY XPERIA – C 3 (D2502) वादातीत मोबाईल हॅन्डसेटची रक्कम रु. 18,500/- (रक्कम रुपये अठरा हजार पाचशे मात्र) अदा करावी. प्रस्तुत रक्कमेवर दि.14-05-2015 रोजीपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज वि.प. नं. 1 ते 3 ने वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदाराला अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 8,000/- (रक्कम रुपये आठ हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) वि.प. नं. 1 ते 3 ने वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदाराला अदा करावे.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.