नि. 27
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य – सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 143/2015
तक्रार नोंद तारीख : 26/06/2015
तक्रार दाखल तारीख : 04/07/2015
निकाल तारीख : 15/03/2016
श्री राहुल भिमराव जामदार
रा.विठ्ठल मंदिराशेजारी, सांगलीवाडी,
सांगली, ता.मिरज जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. सोनी इंडिया प्रा.लि. कंपनीतर्फे मॅनेजर,
पत्ता – ए-31, मोहन को-ऑपरेटीव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट,
मथुरा रोड, न्यू दिल्ली – 110 044
2. श्री साई गणेश इलेक्ट्रीकल केअर तर्फे मालक
पत्ता - 29/बी, जनता लाईट हाऊससमोर,
गणपती पेठ, सांगली
3. रिलायन्स रिटेल प्रा.लि. तर्फे मॅनेजर
पत्ता - एस.एफ.सी. मेगा मॉल, एस.जी.रोड,
स्टेशन रोड, सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.डी.भोसले
जाबदार क्र.1 तर्फे : अॅड श्री एस.एस.माने
जाबदार क्र.2 व 3 : म्हणणे नाह
- नि का ल प त्र -
द्वारा : मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली, जाबदारांनी त्यास दिलेल्या दूषित सेवेबद्दल दाखल केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने दि.11/10/14 रोजी जाबदार क्र.1 या उत्पादन कंपनीने उत्पादन केलेला सोनी कंपनीचा मोबाईल फोन मॉडेल नं.डी-2502, IMEI No. 355819061469221 रक्कम रु. 20,670/- या किंमतीस जाबदार क्र.3 कडून विकत घेतला. त्याबद्दल जाबदार क्र.3 ने मूळ बिल सही शिक्क्यानिशी दिले. सदर मोबाईलवर 1 वर्षाची वॉरंटी होती. सदर मोबाईल फोन विकत घेण्याकरिता तक्रारदाराने बजाज फायनान्स कंपनीकडून दि.31/10/14 रोजी रु.10,664/- चे कर्ज घेतले व उर्वरीत रक्कम रु.9,813/- ची रक्कम रोख स्वरुपात जाबदार क्र.3 यांना दिली. सदर कर्जाचा हप्ता दरमहा रु.1,300/- इतका होता.
3. तक्रारदाराचे कथनानुसार, सदरचा मोबाईल दोन महिने व्यवस्थित चालला व जानेवारी 2015 पासून सदर मोबाईल फोनचा कॅमेरा खराब झाला व त्यातून आलेले फोटो अंधूक, काळसर व धूसर येत असत. सदरचा मोबाईल जाबदार क्र.3 यांचेकडे दाखविला असता त्यांनी जाबदार क्र.2 या कंपनीच्या केअर सेंटरकडे जाण्यास तक्रारदारांस सांगितले व जानेवारी 2015 मध्ये सदरचा मोबाईल तक्रारदाराने जाबदार क्र.2 कडे दाखविला असता जाबदार क्र.2 यांनी सदर मोबाईलच्या कॅमे-याची तपासणी केली व कॅमे-याच्या सॉफ्टवेअरमध्ये दोष/तक्रार आहे, त्या सॉफ्टवेअरचे व्हर्जन आलेले नाही, अशा स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरे देवून सदरचा मोबाईल ठेवून घेण्यास व रिपेअर करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी जाबदार क्र.2 केअर सेंटरकडे सदर मोबाईल नेवून रिपेअर करुन देण्यासाठी विनंती केली असता जाबदार क्र.2 ने सदर मॉडेलच्या मोबाईलमध्ये कॅमे-याबाबत कंपनीकडूनच दोष आहे व सदरचा दोष हा उत्पादनाचा दोष आहे व त्याबाबत जाबदार क्र.2 काही करु शकत नाहीत असे सांगून सदरचा मोबाईल रिपेअरसाठी ठेवून घेण्यास नकार दिला. अशा त-हेने जाबदारांनी तक्रारदारास दूषित सेवा दिली आहे.
4. तक्रारदाराचे कथनानुसार सदर मोबाईलच्या या तक्रारीमुळे आणि जाबदारांनी हेतूपुरस्सर टाळाटाळ करुन मोबाईल रिपेअरींग न करुन दिल्यामुळे तसेच कर्जाचे हप्ते, यामुळे तक्रारदारांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. किमान 5-6 वेळा तक्रारदार जाबदार क.2 यांचेकडे सदरचा मोबाईल घेवून रिपेअर करुन घेण्यासाठी गेले असता जाबदार क्र.2 ने सदरचा मोबाईल रिपेअर होणार नाही, तो जाबदार क्र.1 यांचेकडून असलेला दोष आहे असे सांगून तक्रारदाराला जाबदार क्र.1 या कंपनीच्या ए.एस.एम. ला फोन करुन त्यांचा फोन नंबर दिला. तक्रारदाराने सदर ए.एस.एम. ला फोन केला असता व आपली मोबाईलची तक्रार सांगितली असता त्याने सदर मोबाईलच्या मॉडेलमध्ये सॉफ्टवेअरचा दोष आहे, नवीन व्हर्जन आलेले नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रारदारास कोणतेही सहकार्य केलेले नाही. अशा प्रकारे जाबदार क्र.1 यांनीही तक्रारदारास दुषित सेवा दिली आहे. सदरची घटना जाबदार क्र.2 व 3 यांस सांगितली असता त्यांनी तक्रारदारास, आम्ही काही करु शकत नाही, तुम्हांला काय करायचे ते करा, अशी उत्तरे दिली. त्यानंतर तक्रारदाराने जाबदार क्र.2 यांना पोलीसांत तुमच्या विरुध्द तक्रारी करु, अशी धमकी दिली असता जाबदार क्र.2 ने दि.5/5/15 रोजी सदर मोबाईल जमा करुन घेतला आहे व त्याचा जॉब नंबर W115050501806 असा आहे. जाबदारांनी सदरचा मोबाईल 2-3 दिवसानंतर रिपेअर करुन देतो असे सांगितले होते. त्यानुसार दि.12/5/15 रोजी तक्रारदाराने मोबाईलची मागणी केली असता जाबदार क्र.2 ने तक्रारदारास सदरच्या मोबाईल हँडसेट कॅमे-यामध्ये दोष आहे, नवीन व्हर्जन आल्यावर मोबाईल कॅमेरा रिपेअर होईल, असे पूर्वीप्रमाणेच सांगून तक्रारदारास मोबाईल रिपेअर न करुन एकप्रकारे दूषित सेवा दिली. तक्रारदारास दरमहा रक्कम रु.1,300/- इतके मोबाईल कर्जाचे हप्ते भरावे लागत असून मोबाईल रिपेअर होत नसल्यामुळे 6-7 महिन्यांपासून आजअखेर तक्रारदारांना सर्व जाबदारांनी दिलेला मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर मोबाईलला एक वर्षाची वॉरंटी असूनही जाबदारांनी सेवेत त्रुटी करुन नैतिक जबाबदारी पार पाडलेली नाही. अशा प्रकारे सर्व जाबदारांनी तक्रारदारास दूषित सेवा दिली आहे. तक्रारदारांनी दि.18/5/15 रोजी अॅड श्री भोसले यांचेमार्फत जाबदार क्र.1 ते 3 यांना नोटीसा पाठविल्या. सदरच्या नोटीसा जाबदार क्र.2 व 3 यांना दि.20/5/15 रोजी मिळून देखील त्यांनी सदर नोटीशीस उत्तर दिलेले नाही व अद्याप मोबाईल रिपेअर करुन दिलेला नाही. अशा कथनांवरुन तक्रारदाराने सदरची तक्रार मंजूर करुन त्यास दूषित मोबाईल बदलून नवीन मोबाईल देण्याचा आदेश व्हावा व त्यास झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.30,000/- देवविण्यात यावेत आणि तक्रार खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- त्यास जाबदारांनी देववावेत, असा हुकूम पारीत करावा, अशी मागणी केली आहे.
5. तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून त्यात त्याने तक्रारअर्जातील सर्व कथने शपथेवर उध्दृत केली आहेत. तसेच नि.4 या फेरिस्त सोबत तक्रारदाराने एकूण 7 कागदपत्रे या प्रकरणी हजर केली आहेत.
6. जाबदार यांनी नि.15 ला लेखी कैफियत दाखल केली असून त्याचे मथळयामध्ये, “ तक्रारदार यांचे तक्रारीस सामनेवालातर्फे म्हणणे ” असे नमूद केले आहे. परंतु सदरची कैफियत ही जाबदार क्र.1 तर्फे दाखल करण्यात आली असून सदरचे कैफियतीखाली फक्त जाबदार क्र.1 यांचे प्रतिनिधींनी सही केलेचे दिसून येते. त्यावर जाबदार क्र.2 व 3 यांची सही दिसून येत नाही. जाबदार क्र.1 यांनी नि.13 ला वकीलपत्र दाखल केले असून सदर वकीलपत्रावर देखील फक्त जाबदार क्र.1 यांचीच सही दिसून येते. जाबदार क्र.2 व 3 यांची सही सदरचे वकीलपत्रावर नाही. तसेच जाबदारतर्फे नि.16 सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये अ.क्र.1 वर जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 यांचे हक्कात अधिकारपत्र लिहून दिल्याचे दिसते. जाबदार क्र.3 हे याकामी हजर राहिलेले नाही. सदरची सर्व पार्श्वभूमी विचारात घेता जाबदार तर्फे दाखल नि.15 वरील लेखी कैफियत ही विधिवतरित्या केवळ जाबदार क्र.1 यांचीच गृहित धरावी लागेल. सबब, प्रस्तुतचे प्रकरण हे जाबदार क्र.2 व 3 यांच्या लेखी कैफियतीविना निर्णीत करण्यात येते.
7. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी कैफियतीमध्ये तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व तक्रारी व आरोप नाकारले आहेत. जाबदार क्र.1 यांचे कथनानुसार, तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केलेला मोबाईल हॅण्डसेट जाबदारांकडून विकत घेतल्याची व सदर मोबाईलला एक वर्षाची वॉरंटी असल्याची बाब जाबदारांनी मान्य केली आहे. सदर वॉरंटीच्या अटी व शर्तीनुसार वॉरंटी कालावधीमध्ये जर सदरचा हॅण्डसेट योग्य प्रकारे काम करीत नसेल तर, जाबदार क्र.1 कंपनी, तिचे अधिकृत वितरक किंवा सेवा भागीदार हे सदरचा हॅण्डसेट दुरुस्त अगर बदलून देतील. परंतु हॅण्डसेटच्या सामान्य वापरामुळे त्याची झीज झाली तर तिचा वॉरंटीमध्ये समावेश होत नाही. तसेच अपघातामुळे, हॅण्डसेटमध्ये सुधारणा केल्यामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा द्रवरुप पदार्थामुळे जर हॅण्डसेटमध्ये बिघाड झाला तर त्याचा वॉरंटीमध्ये समावेश होत नाही. जाबदार पुढे असे कथन करतात की, तक्रारदाराने सदरचा हॅण्डसेट हा सात महिने व्यवस्थितरित्या उपभोग घेतला व तदनंतर ते जाबदार यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये पहिल्यांदा दि.5/5/2015 रोजी कॅमे-याची तक्रार घेवून आले. सर्व्हिस सेंटरने हॅण्डसेटची पाहणी करुन त्याचे सॉफ्टवेअर बदलून दिले व तक्रारदार यांनी दि.6/5/15 रोजी हॅण्डसेट व्यवस्थित कार्यान्वित करुन परत घेतला. परंतु त्याच दिवशी तक्रारदाराने पुन्हा कॅमेरा क्लिअॅरिटीची तक्रार केली. परंतु अशी काहीही तक्रार आढळून न येवून सुध्दा जाबदार यांचे अधिका-यांनी पुन्हा मोबाईलचे सॉफ्टवेअर बदलून दिले. तदनंतर तक्रारदारांनी सदरचा मोबाईल दि.12/5/15 रोजी परत घेतला. जाबदारांनी तक्रारदाराचे मोबाईलमधील Kitkat हे सॉफ्टवेअर बदलून Android version चा Lollipop हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करुन दिले. परंतु तक्रारदारांनी खोटी तक्रार केली की, पूर्वीचे Kitkat हे सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत होते. जाबदारांनी सॉफ्टवेअर बदलल्यानंतरचे फोटो हे रेकॉर्डवर ठेवले असून त्याद्वारे मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित चालत होता हे स्पष्ट होते. जाबदार पुढे असे प्रतिपादन करतात की, अधिकृत सेंटरने तक्रारदारांना प्रात्यक्षिक दाखवून समजाविले की, तंत्रज्ञान गतीने विकसीत होत असून त्यामुळे मोबाईल व्यवस्थित चालण्यास मदतच होते. परंतु तक्रारदारांनी याकडे दुर्लक्ष करुन जाबदारांना नोटीस पाठविली. नोटीस मिळाल्यानंतर जाबदार यांनी तक्रारदारास भेटणेचा प्रयत्न केला परंतु तक्रारदाराने जाबदारविरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली. प्रत्येक वेळेला जाबदारांनी तक्रारदाराचे तक्रारीची दखल घेवून त्याच्या समाधानाइतपत तक्रारीचे निरसन केले आहे. परंतु जाबदारांना केवळ त्रास देणेसाठी तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. जाबदारांनी त्यांचे कैफियतीमध्ये वरिष्ठ न्यायालयांचे काही निवाडयांमधील न्यायालयांची निरिक्षणे उध्दृत केली आहेत. या व अशा कथनांवरुन तक्रारदारांची तक्रार खोटी, लबाडीची व बिनबुडाची असलेने ती खर्चासह फेटाळणेत यावी अशी मागणी जाबदार क्र.1 यांनी केली आहे.
8. जाबदार क्र.1 यांनी कैफियतीसोबत त्यांचे प्रतिनिधी प्रियंक चव्हाण यांचे शपथपत्र दाखल केले असून नि.16 सोबत जाबदार क्र.2 यांनी दिलेले संमतीपत्र, जाबदार क्र.1 यांचे ठरावाची प्रत, जाबदार क्र.1 कंपनीचे वॉरंटी कार्ड, जाबदार यांनी वादातील मोबाईलमधून काढलेले फोटो इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
9. तक्रारदारांनी नि.19 ला सरतपासाचे शपथपत्र दाखल केले असून नि.20 सोबत मोबाईलचे मूळ बिल व बजाज फायनान्स यांचेकडून घेतलेल्या कर्जासंबंधीचा तपशील दाखल केला आहे व नि.21 चे पुरसीसने आपला पुरावा संपविला आहे. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.22 ला दाखल केले असून नि.23 चे पुरसीसने आपला पुरावा संपविला आहे. तसेच नि.24 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदाराने नि.25 ला लेखी युक्तिवाद दाखल केला असून नि.27 सोबत वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे दाखल केले आहेत.
10. प्रस्तुत प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निर्णयासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक होतो काय ? होय.
2. तक्रारदारास दोषयुक्त मोबाईल विकून जाबदारांनी त्यास दूषित सेवा दिली
हे तक्रारदाराने शाबीत केले आहे काय ? होय.
3. तक्रारदाराने तक्रारअर्जात मागितलेल्या मागण्या मंजूर होय, परंतु केवळ जाबदार
होण्यास पात्र आहेत काय ? क्र.1 कडून अंशतः
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
11. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
मुद्दा क्र.1
12. वास्तविक पाहता, या प्रकरणामध्ये तक्रारदार आणि जाबदार यांचेमध्ये असलेले ग्राहक आणि सेवा देणार हे नाते कोणीही अमान्य केलेले नाही. वर नमूद केल्याप्रमाणे जाबदार क्र.1 ने हे स्पष्टपणे मान्य केले आहे की, तक्रारदाराने अर्जात नमूद केलेल्या वर्णनाचा जाबदार क्र.1 कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल हॅण्डसेट जाबदार क्र.3 कडून विकत घेतला ही बाब जाबदार क्र.1 ने स्पष्टपणे मान्य केली आहे. जाबदार क्र.2 व 3 यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे आपली लेखी कैफियत दाखल केलेली नाही आणि तक्रारदाराचे कोणतेही कथन अमान्य केलेले नाही. त्यामुळे जाबदार क्र.2 व 3 यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार आणि जाबदार क्र.1 व 3 यांच्यामध्ये ग्राहक आणि सेवा देणार हे नाते उभयपक्षी मान्य असल्याने मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल आणि तसे ते आम्ही दिले आहे.
मुद्दा क्र.2
13. जाबदार क्र.1 ने आपल्या लेखी कैफियतीमध्ये तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केलेला मोबाईल हॅण्डसेट विकत घेतलेचे व सदर मोबाईलला एक वर्षाची गॅरंटी असल्याची बाब मान्य केली आहे. जाबदार क्र.2 व 3 यांनी आपली लेखी कैफियत दाखल केली नसल्यामुळे आणि प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द लेखी कैफियतीविना चालविलेले गेले असल्याने तक्रारदाराची संपूर्ण कथने ही त्यांना मान्य आहेत, असे गृहित धरावे लागेल. तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जामध्ये आणि पुराव्यामध्ये सदरचा मोबाईल हॅण्डसेट विकत घेतल्यानंतर त्यात आढळून आलेल्या तक्रारींबाबत सदरचा मोबाईल जाबदार क्र.3 यांचेकडे दुरुस्तीकरिता दाखविला असता त्यांनी जाबदार क्र.2 या मोबाईल उत्पादन करणा-या कंपनीच्या केअर सेंटरकडे जाण्यास सांगितले व जानेवारी 2015 मध्ये तक्रारदाराने सदरचा मोबाईल जाबदार क्र.2 यांचेकडे दाखविला असता जाबदार क्र.2 ने सदर मोबाईलच्या कॅमे-याची तपासणी केली आणि त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये दोष आहेत असे सांगितले, असे स्पष्ट कथन केले आहे. तसेच जाबदार क्र.2 या केअर सेंटरकडे सदरचा मोबाईल वेळोवेळी नेऊन रिपेअर करुन देण्याची विनंती केली असता जाबदार क्र.2 ने सदर मॉडेलच्या मोबाईलमध्ये कॅमे-याबाबत कंपनीकडूनच दोष आहे आणि सदरचा दोष हा उत्पादनाचा दोष आहे व त्याबाबत जाबदार क्र.2 काही करु शकत नाही असे सांगून सदरचा मोबाईल् रिपेअरींगकरिता ठेवून घेण्यास नकार दिला असे देखील स्पष्ट कथन तक्रारदाराने केले आहे. सदरचे कथन जाबदार क्र.2 किंवा जाबदार क्र.3 यांनी आपली लेखी कैफियत दाखल करुन अमान्य केलेले नाही. त्यामुळे जाबदार क्र.2 व 3 विरुध्दचे सदरचे तक्रारदाराचे आरोप हे जाबदारांना मान्य आहेत असा त्यातून अर्थ निघतो. सबब, सदरची बाब आणि त्यातील तथ्य हे जाबदारांना मान्य असल्याने ही बाब तक्रारदाराने शाबीत केली आहे, असा या मंचाचा निष्कर्ष आहे. वास्तविक पाहता जाबदार क्र.1 ने देखील आपल्या लेखी कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदाराने सदरचा हॅण्डसेट हा 7 महिने व्यवस्थितरित्या वापरला आणि त्यानंतर पहिल्यांदा दि.5/5/15 रोजी कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर मध्ये (जाबदार क्र.2 कडे) सदरच्या मोबाईलच्या कॅमे-याची तक्रार घेवून तक्रारदार आला व सर्व्हिस सेंटरने हँडसेटची पाहणी करुन त्याला सॉफ्टवेअर बदलून दिले. परंतु पुन्हा त्याच दिवशी तक्रारदाराने पुन्हा कॅमे-याच्या क्लॅरिटीबद्दल तक्रार केली आणि पुन्हा जाबदारचे अधिका-यांनी सदर मोबाईलचे सॉफ्टवेअर बदलून दिले असे नमूद केले आहे. जाबदार क्र.1 ने असेही नमूद केले आहे की, तक्रारदाराने सदरचा मोबाईल दि.12/5/15 रोजी परत घेतला आणि त्यावेळेला जाबदाराने तक्रारदाराच्या मोबाईलमधील किटकॅट हे सॉफ्टवेअर बदलून Android version चे लॉलीपॉप हे सॉफ्टवेअर सदर मोबाईलमध्ये कार्यान्वित करुन दिले. जाबदार क्र.1 ने पुन्हा असे कथन केले आहे की, लॉलीपॉप हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करुन दिलेनंतर तक्रारदाराने पुन्हा अशी खोटी तक्रार केली की, पूर्वीचे किटकॅट सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत होते आणि नवीन बदलून दिलेले लॉलीपॉप हे सॉफ्टवेअर काम करीत नव्हते परंतु लॉलीपॉप या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तक्रारदाराचे मोबाईलमधील कॅमे-याने काढलेले फोटो हे स्पष्ट आहेत आणि ते फोटो जाबदारांनी याकामी दाखल केले आहेत. जाबदार क्र.1 ने पुढे असेही आपल्या लेखी कैफियतीमध्ये कथन केले आहे की, प्रत्येकवेळी जाबदारने तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेवून त्याचे समाधानाइतपत तक्रारीचे निरसन केले आहे. जाबदार क्र.1 च्या या पक्षकथनावरुन हे स्पष्टपणे शाबीत होते की, तक्रारदाराने जाबदार क्र.1 या मोबाईल उत्पादन करणा-या कंपनीने उत्पादित केलेल्या मोबाईल फोनमध्ये सॉफ्टवेअरचा दोष होता आणि त्या मोबाईलमधील कॅमे-याने स्पष्ट फोटो येत नाहीत ही तक्रारदाराची मुख्य तक्रार होती. जाबदार क्र.1 च्या या पक्षकथनावरुन तक्रारदाराच्या मोबाईलमध्ये असणा-या उत्पादनाच्या दोषांच्या शाबीतीकरणास इतर कोणताही तांत्रिक पुरावा असण्याची गरज या मंचाला वाटत नाही, कारण ही बाब जाबदार क्र.1 ने स्वतःच कबूल केली आहे. वर नमूद केलेप्रमाणे जाबदार क्र.2 आणि 3 यांनी तक्रारदाराचे विधान की, जाबदार क्र.2 या अधिकृत केअर सेंटरने तक्रारदाराच्या मोबाईलमध्ये उत्पादीत दोष आहे असे सांगितले होते, ही बाब नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचे सदरचे विधान आणि पक्षकथन या प्रकरणामध्ये पुरेपूर शाबीत झाले आहे असा या मंचाचा स्पट निष्कर्ष आहे. सदरचा दोष कॅमे-याच्या वॉरंटी पिरेडमध्ये निर्माण झालेला आहे आणि वॉरंटी पिरेडमध्येच तक्रारदाराने सदर दोषांबद्दल जाबदारकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, हे तक्रारदाराचे कथन जाबदारांनी अमान्य केलेले नाही. त्यामुळे हे स्पष्टपणे शाबीत झाले आहे की, सदरच्या मोबाईल फोनमध्ये उत्पादनाचा दोष वॉरंटी पिरेडमध्येच निर्माण झाला आहे.
14. आम्ही जाबदार क्र.1 ने दाखल केलेल्या पुराव्याच्या शपथपत्राचे (नि.22) अवलोकन केले. सदरचे शपथपत्र जाबदार क्र.1 तर्फे श्री प्रियंक चव्हाण यांनी दाखल केले आहे आणि सदरचे प्रियंक चव्हाण हा जाबदार क्र.1 चा अधिकृत इसम आहे. सदर साक्षीदाराने जाबदार क्र.1 च्या संचालक मंडळाने त्याच्या हक्कामध्ये दि.7/2/14 रोजी पारीत केलेल्या ठरावाची नक्कल याकामी दाखल केली असून त्याद्वारे हे स्पष्टपणे शाबीत होते की, सदर ठरावाने जाबदार कंपनीने तक्रारदारास आपले अधिकृत प्रतिनिधी म्हणून प्रस्तुतचे प्रकरण त्यांचे वतीने चालविण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यास आपल्या वतीने पुरावा देण्याचा अधिकार देखील दिलेला आहे. सबब, सदरचा पुरावा हा जाबदार क्र.1 कंपनीचा पुरावा म्हणून विचारात घेता येईल. सदरचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये जाबदार क्र.1 च्या लेखी कैफियतीतील मजकूर हा शपथेवर उध्दृत केल्यासारखा आहे. संपूर्ण शपथपत्रामध्ये कुठेही जाबदारकडून असा आरोप करण्यात आला नाही की, तक्रारदाराची तक्रार ही खोटी आहे आणि त्याचे मोबाईलमध्ये काही उत्पादनाचे दोष नव्हते. उलटपक्षी जाबदार क्र.1 ने हे स्पष्टपणे मान्य केले आहे की, वॉरंटीच्या काळाच्या दरम्यान तक्रारदार वारंवार जाबदारकडे सदर मोबाईल फोनमध्ये दोष असल्याची तक्रार घेवून येत होते आणि वारंवार जाबदार क्र.2 या केअर सेंटरला तक्रारदाराच्या कॅमे-यातील सॉफ्टवेअर बदलून दिलेले आहे. जाबदार क्र.1 ने तक्रारदाराच्या मोबाईल फोनवरुन सॉफ्टवेअर बदलून दिलेनंतर काढलेल्या काही फोटोंच्या झेरॉक्सप्रती या कामी नि.16 या फेरिस्त सोबत अ.क्र.4 ला दाखल केल्या आहेत. मूळ फोटो जाबदार क्र.1 ने दाखल केलेले नाहीत. सदरच्या झेरॉक्सप्रती या झेरॉक्स असल्याने त्या फोटोंमध्ये स्पष्टता आहे किंवा नाही हे स्पष्टपणे दिसून येत नाही. दुसरे असे की, सदरचे फोटो हे तक्रारदाराच्याच मोबाईलमधून काढलेले आहेत, याबद्दल कोणताही स्पष्ट पुरावा जाबदार क्र.1 ने दाखल केलेला नाही. उलटपक्षी जाबदारने या मंचासमोर सदर मोबाईल फोनमधील कॅमे-यातून काढलेल्या काही फोटोंचे प्रात्यक्षिक दाखविले आणि या फोटोंवरुन असे सिध्द झाले की, सदर मोबाईल फोनच्या कॅमे-यातून सुस्पष्ट चित्र/फोटो काढता येत नाही. हे फोटोग्राफ्स या मंचाने काढले आणि अवलोकीले. त्यावरुन हे स्पष्टपणे दृगोचर होते की, सदर फोटोग्राफ्समध्ये अस्पष्टता भरपूर आहे. सदरची छायाचित्रे मोबाईलमध्ये काढलेली असल्याने त्यांची हार्ड कॉपी/पॉझिटीव्ह प्रिंट घेता येवू शकत नव्हती. एकूणच जाबदार कंपनीने तक्रारदारास बदलून दिलेल्या सॉफ्टवेअरनंतर देखील तक्रारदाराच्या मोबाईलमधून सुस्पष्ट फोटो घेता येत नाही ही बाब शाबीत झालेली आहे असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे आणि सदरच्या मोबाईल फोनमध्ये उत्पादनाचे दोष आहेत असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे.
15. तक्रारदारतर्फे मा.छत्तीसगढ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या Krishnakumar Sahu Vs. Manager, Jai Electronics and Ors., 2010(1) CPR 149, मा.हिमाचल प्रदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या Deepak Kumar Vs. Sony Ericson Mobile Communication AB Co. and Anr. 2010(1) CPR 98, तसेच छत्तीसगढ राज्य आयोगाच्या Surendra Singh Parihar Vs. Imported Collection and Ors., 2008(4) CPR 37 या प्रकरणांतील निकालपत्रांवर भीस्त ठेवण्यात आली. या सर्व प्रकरणांमध्ये वरिष्ठ न्यायालयाने असा दंडक घालून दिला आहे की, जरी वॉरंटीच्या कालावधीमध्ये ग्राहकाने विकत घेतलेल्या मोबाईलमध्ये जर काही दोष निर्माण झाले तर ते दोष दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी ही उत्पादन करणा-या कंपनीवर असते. या प्रकरणामध्ये हे स्पष्टपणे शाबीत झाले आहे की, जाबदार क्र.1 या उत्पादन करणा-या कंपनीने उत्पादित केलेल्या मोबाईल फोनमध्ये त्याच्या वॉरंटी कालावधीमध्ये सॉफ्टवेअरची तक्रार निर्माण झाली होती आणि त्यायोगे तक्रारदाराच्या मोबाईलमध्ये असलेल्या कॅमे-याद्वारे सुस्पष्ट छायाचित्रे काढता येत नव्हती व नाहीत. जाबदार क्र.1 कंपनीच्या वतीने जाबदार क्र.2 ने सदर मोबाईलचे सॉफ्टवेअर बदलून देखील त्या मोबाईलमधील फोनच्या कॅमे-यामधून सुस्पष्ट छायाचित्रे येत नाहीत, ही बाब देखील स्पष्टपणे या प्रकरणात शाबीत झाली आहे. ज्याअर्थी सॉफ्टवेअर बदलून देखील सदर मोबाईलमधील कॅमे-यातून सुस्पष्ट छायाचित्रे घेता येत नाहीत, त्याअर्थी सदर कॅमे-यामध्येच काही दोष आहेत हे स्पष्टप्णे शाबीत होते. सबब, सदर मोबाईलमध्ये उत्पादनाचा दोष आहे या निष्कर्षाला हे मंच आले आहे व तो दोष जाबदार कंपनीने दूर करुन दिलेला नाही ही बाब देखील स्पष्टपणे शाबीत झाली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे होकारार्थी द्यावे लागेल असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे आणि म्हणून वर नमूद केलेला निष्कर्ष आम्ही काढला आहे.
मुद्दा क्र.3
16. तक्रारदाराने जाबदारांनी त्यास दिलेल्या दूषित सेवेमुळे त्यास झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.30,000/- ची मागणी केली असून या अर्जाचा खर्च, वकील फी, टायपिंग, झेरॉक्स, पोस्टल ऑर्डर, नोटीस खर्च इ. कलमाखाली रु.10,000/- खर्चाची मागणी सर्व जाबदारांकडून केली असून सदरचा मोबाईल रिपेअर होत नसल्याने दूषित मोबाईल बदलून द्यावा असा सर्व जाबदारांना आदेश करावा अशी मागणी केली आहे. तक्रारदाराचे कथनानुसार सदरचा मोबाईल घेण्याकरिता तक्रारदाराने बजाज फायनान्स कंपनीकडून रु.10,664/- चे कर्ज घेवून व उर्वरीत रक्कम रु.9,813/- रोख स्वरुपात स्वतःची रक्कम जाबदार क्र.3 ला देवून सदरचा मोबाईल रक्कम रु.20,677/- ला विकत घेतला होता व सदर कर्जाचे पोटी त्याला दरमहा रु.1,300/- चा हप्ता भरावा लागत असून सदरचा मोबाईल रिपेअर होत नसल्याने गेले 5/6 महिन्यापासून त्यास मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हे जरुर आहे की, कोणताही ग्राहक एखादी वस्तू विकत घेत असताना सदरची वस्तू ही उत्तम स्वरुपाची सेवा देईल अशी खात्री मनात बाळगून विकत घेत असतो आणि त्याची ही इच्छा आणि खात्री ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ज्या वेळेला विकत घेतलेली वस्तू ही उत्पादनाच्या दोषांसह विकत घेतली गेली आहे असे ग्राहकाचे निदर्शनास येते, त्यावेळेला अशा ग्राहकाला मानसिक त्रास होणे हे साहजिकच आहे. परंतु तक्रारदाराचे कथनानुसार त्यास नेमका काय आर्थिक, मानसिक त्रास झाला याबद्दलचे कोणतेही स्पष्टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही किंवा तसा कोणताही पुरावा देखील आणलेला नाही. तक्रारदाराने सदर नुकसानीपोटी जी रक्कम मागितली आहे, ती या प्रकरणातील मोबाईल फोनच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तक्रारदाराची रक्कम रु.30,000/- ची मागणी ही अवास्तव व अवाजवी वाटते. प्रस्तुत प्रकरणाचा एकूण सरासरी विचार करता तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- देण्यास जाबदारांना आदेश करणे योग्य राहील असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सबब, जाबदार क्र.1 हे तक्रारदारास मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- तक्रारदारास देण्यास जबाबदार आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
17. तक्रारदाराने जी कोर्ट खर्चाकरिता रु.10,000/- ची मागणी केली आहे, ती अत्यंत अवाजवी आणि अवास्तव आहे. ग्राहक तक्रारअर्ज दाखल करण्याकरिता जो एकूण खर्च येतो, तो पाहिला असता तक्रारदाराची सदरची मागणी ही अवास्तव आहे हे स्पष्टपणे आणि प्रथमदर्शनी दिसून येते. प्रस्तुत तक्रार चालविण्याकरिता नेमका काय खर्च आला याबद्दल तक्रारदाराने कोणताही पुरावा दिलेला नाही. केवळ मोघमपणे त्याने रु.10,000/- ची रक्कम कोर्ट खर्च म्हणून मागितली आहे. सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारास कोर्ट खर्चादाखल रु.1,000/- देण्यास जाबदार क्र.1 यांना आदेशीत करणे योग्य राहिल, असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
18. तक्रारदाराने विकत घेतलेल्या मोबाईलची एक वर्षाचे कालावधीची वॉरंटी होती आणि त्या वॉरंटीद्वारे तक्रारदाराने विकत घेतलेल्या मोबाईलमध्ये उत्पादनाचे दोष असतील तर सदरची वस्तू बदलून देण्यास जाबदार क्र.1 ने स्वतःस बांधून घेतले होते ही बाब जाबदर क्र.1 ते 3 यांनी स्पष्टपणे कबूल केली आहे. वॉरंटीच्या अटी व शर्ती जाबदार क्र.1 ने प्रस्तुत प्रकरणामध्ये दाखल केल्या आहेत. सदर वॉरंटीद्वारे जर जाबदार क्र.1 कंपनीने उत्पादन केलेला मोबाईल फोन सामान्यरित्या वापर करीत असताना जर योग्य ते काम करण्यस अक्षम ठरला तर सदरची कंपनी एकतर मोबाईल दुरुस्त करुन देईल किंवा बदलून देईल किंवा त्याची किंमत ग्राहकास परत करेल अशा स्वरुपाचे बंधन जाबदार क्र.1 कंपनीने स्वतःवर घालून घेतलेले आहे. जाबदार क्र.1 ने हे कुठेही शाबीत केलेले नाही की, तक्रारदाराच्या मोबाईलमधील असलेला दोष हा तक्रारदाराच्या अयोग्य हाताळणीमुळे किंवा काही तक्रारदाराच्या चुकीमुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे सदरच्या वॉरंटीतील अटी व शर्तीप्रमाणे सदरचा मोबाईल फोन बदलून देणे जाबदार क्र.1 वर बंधनकारक होते. सबब, तक्रारदार सदरचा दूषित मोबाईल हॅण्डसेट जाबदार क्र.1 या कंपनीकडून बदलून मिळण्यास पात्र आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
19. जाबदार क्र.1 कंपनीने वॉरंटीच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचे या प्रकरणी स्पष्टपणे आढळून येते. त्यामुळे जाबदार क्र.1 कंपनीच तक्रारदारास त्यास झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास आणि या तक्रारअर्जाचा खर्च देण्यास जबाबदार आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे. विकलेल्या वस्तूमध्ये जर उत्पादनाचे दोष असतील तर त्यास विक्रेता किंवा अधिकृत केअर सेंटर जबाबदार नसून केवळ उत्पादन करणारी कंपनीच जबाबदार असते अशी कायद्याची ठाम तरतूद आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणमध्ये जाबदार क्र.2 व 3 यांना जबाबदार धरता येणार नाही, ती पूर्ण जबाबदारी ही जाबदार क्र.1 या उत्पादन कंपनीवर टाकावी लागेल असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार ही जाबदार क्र.1 विरुध्द अंशतः मंजूर करावी लागेल. म्हणून मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी दिले आहे. सबब, आम्ही खालील आदेश पारीत करतो.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार ही केवळ जाबदार क्र.1 विरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 कंपनीने या निकालाच्या तारखेपासून 30 दिवसांचे आत अर्जात नमूद केलेल्या वर्णनाचा मोबाईल फोन परत करुन तक्रारदारास त्याच मॉडेलचा पूर्ण दोषरहित मोबाईल बदलून द्यावा आणि जर हे शक्य नसेल तर सदरचे मोबाईलची तक्रारदाराने अदा केलेली किंमत त्यास पूर्णपणे परत करावी.
3. जाबदार क्र.1 कंपनीने तक्रारदारास आर्थिक, शारिरिक व मानसिक नुकसानीकरिता नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- या निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांत द्यावी.
4. तसेच जाबदार क्र.1 ने तक्रारदारास या तक्रारअर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.1,000/- या निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांत द्यावी.
5. जर जाबदार क्र.1 ने विहीत मुदतीत तक्रारदारास मोबाईल फोन बदलून दिला नाहीतर किंवा त्याच्या किंमतीची रक्कम परत केली नाही तर सदर किंमतीच्या रकमेवर जाबदार क्र.1 ने प्रस्तुत तक्रार दाखल झाले तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे अदा हुकुम पारीत करण्यता येतो.
6. या आदेशाचे पालन विहीत मुदतीत झालेनंतर तक्रारदारास जाबदार क्र.1 कंपनीविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25(3) किंवा 27 खाली दाद मागण्याचा अधिकार राहील.
7. जाबदार क्र.2 व 3 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
8. प्रस्तुत निकालपत्रांच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क द्याव्यात व प्रकरण दफ्तर दाखल करावे.
सांगली
दि. 15/03/2016
सौ मनिषा कुलकर्णी ए.व्ही.देशपांडे
सदस्या अध्यक्ष