तक्रारदार - स्वतः
सामनेवालेतर्फे वकील श्री. - वृषभ पारेख. (विनाकैफियत)
आदेश - मा. शां. रा. सानप, सदस्य. ठिकाणः बांद्रा (पू.)
निकालपत्र
(दिनांक 13/04/2016 रोजी घोषित)
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचा आरोप करून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थेाडक्यात खालीलप्रमाणे आहे.
3. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारानी ग्रा.सं.कायदा 1986, कलम 12 अन्वये मंचात दाखल केली आहे.
4. प्रस्तुतच्या तक्रारीतील सामनेवाले हे लॉपटॉपचे उत्पादक आहेत. सदरचा लॉपटॉप हा तक्रारदारांनी जम्बो इलेक्ट्रॉनीक्स कारर्पोशेन प्रा.लि इनआर्बिट मॉल सेक्टर 30-ए, वाशी नवी मुंबई यांचेकडून दि. 25/12/2013 रोजी रू. 40,811/-,अदा करून विकत घेतला होता.(पृ.क्र 9)
5. तक्रारदार व सामनेवाले हे तक्रारीतील पत्यावर वास्तव्यास असून व व्यवसाय करतात. सामनेवाले हे लॉपटॉपचे उत्पादक आहेत.
6. तक्रारदारानी दि.25/12/2013 रोजी सोनी इंडिया प्रा.लि. या कंपनीचा लॉपटॉप मॉडेल क्र. एस.व्ही.एफ 15215एस.एन/बी अनुक्रमांक 9822 हा जम्बो इलेक्ट्रॉनीक्स कारर्पोशेन प्रा.लि इनआर्बिट मॉल सेक्टर 30-ए, वाशी नवी मुंबई यांचेकडून खरेदी केला होता. त्यानंतर, दोन महिन्याच्या आतच सदरच्या लॉपटॉपची बॅटरी खराब होणे, हळू चालणे, हॅंग होणे व आपोआप काम बंद करणे इ. त्रृटी तक्रारदारांच्या निदर्शनास आल्या. त्यानूसार, तक्रारदारांनी दि. 28/02/2014 रोजी सामनेवाले यांचे सर्व्हिस सेंटरमध्ये तक्रार अनुक्रमांक 17993465 नोंदविली. त्यानूसार, सामनेवाले यांच्या सर्व्हिस सेंटरचे इंजिनीअर यांनी तक्रारदारांच्या घरी येऊन सदर लॉपटॉपची तपासणी केली व तक्रारदाराना सांगीतले की, सदर लॉपटॉप उत्पादित मालीकेतील सर्व लॉपटॉपमध्ये हा बिघाड आहे. त्यानूसार, सदर इंजिनिअरने तो लॉपटॉप तक्रारदारांकडून वापस घेतला व त्यांच्या सेानी सर्व्हिस सेंटरमध्ये दुरूस्त करून दि. 20/03/2014 रोजी तक्रारदाराना परत करून आश्वस्त केले की, सदर लॉपटॉप उत्पादित मालीकामध्ये हा अंतर्भूत दोष आहे. तरीही, आम्ही त्या बिघाडाची सोडवणूक केली आहे. म्हणून तुम्हाला तो लॉपटॉप पुन्हा त्रास देणार नाही व सदर लॉपटॉप व्यवस्थित चालेल असे कथन केले. तरीही, सदर लॉपटॉप हा परत मालफक्शनींग करू लागला. म्हणून, तक्रारदारानी पुन्हा सोनी इंडिया यांना दि. 08/08/2014 रोजी कम्पलेट नं. 20365556 अन्वये तक्रार दाखल करून सदर बाब पुन्हा सामनेवाले यांच्या निदर्शनास आणली. परंतू, सदर बाबीकडे सामनेवाले यांनी दुर्लक्ष केले. तरीही, सामनेवाले यांनी सदर लॉपटॉप वारंवार त्यांच्या सर्व्हिस सेंटर मध्ये नेऊन शेवटी तक्रारदाराना कळविले की, सदर लॉपटॉपचा मदरबोर्ड, कि-बोर्ड व बॅटरी बदलावी लागेल व त्याला कमीतकमी 1 महिन्याचा अवधी लागेल असे तक्रारदाराना कळविले. त्यानूसार, तक्रारदारांनी पुन्हा सदर लॉपटॉप सामनेवाले यांच्याकडे देऊन, सामनेवाले यांनी त्यामध्ये उपरोक्त बाबी बदलवून तो तक्रारदाराना दि. 10/09/2014 रोजी परत केला. त्यानंतर, सदर लॉपटॉपमध्ये पुन्हा बिघाड झाला व सदर बाब ही तक्रारदारानी पुन्हा सोनी इंडिया यांना कम्लेंट नं. 022643094 अन्वये निदर्शनास आणुन दिली. त्यानंतर, सामनेवाले यांच्या इंजिनीअरने पुन्हा दुसरीच बाब तक्रारदारांच्या निदर्शनास आणुन दिली की, सदर लॉपटॉपच्या हार्ड-डिक्स खराब झाली आहे. ती परदेशातुन मागवावी लागेल व मागविल्यानंतर ती आम्ही बदलवून देऊ. त्यानूसार, सामनेवाले यांनी सदर लॉपटॉपची हार्ड-डिक्सही बदलवून दिली व सदर लॉपटॉप सामनेवाले यांनी तक्रारदाराना दि. 25/12/2014 रोजी परत केला. म्हणजेच, तांत्रीक दृष्टया लॉपटॉपमधील महत्वाचे सर्वच पार्ट सामनेवाले यांनी बदलले, फक्त चार्जर व स्क्रिन सोडून. व हे पार्ट बदलण्यासाठी सामनेवाले यांनी जवळजवळ 3 महिने खर्ची घातले. तरीही, सदर लॉपटॉप पुन्हा दि. 13/01/2015 रोजी नादुरूस्त होऊन त्याची बॅटरी 100 टक्के आपोआप डिस्चार्ज होऊ लागली व लॉपटॉप हळुहळु काम करू लागला व बंद पडू लागला. म्हणजेच, सामनेवाले यांनी सदरचा लॉपटॉप 4 वेळेस दुरूस्त करूनही व सदरच्या लॉपटॉपमधील महत्वाचे पार्ट बदलवूनही त्यातील बिघाड हा कायमच राहिला आहे.
7. तक्रारदारांचे पुढे असेही कथन आहे की, त्यांनी सामनेवाले यांना वारंवार कळवूनही त्यांनी सदरचा लॉपटॉप व्यवस्थित दुरूस्त करून दिला नाही व त्यांच्या तक्रारीकडे कायम दुर्लक्ष केले म्हणजेच, सदर लॉपटॉप मधील बिघाड हा कायमच आहे हे तक्रारदारानी सामनेवाले यांच्या निदर्शनास आणुन दिले. तरीही, सामनेवाले यांनी सदर लॉपटॉप व्यवस्थीत दुरूस्त करून दिलेला नाही. किंवा तो बदलीही करून दिली नाही. या बाबतीत तक्रारदारानी सामनेवाले यांना दि. 14/08/2014 रोजी सविस्तरही कळविले होते. परंतू, सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या म्हणण्याकडे सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे, कंटाळून तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि.18/12/2014 रोजी त्यांच्या वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व त्या नोटीसीस सामनेवाले यांनी उत्तर देऊन कळविले की, हया बाबतीत आम्ही आता काही करू शकत नाही.
8. तक्रारदारांचे पुढे असेही कथन आहे की, सोनी सर्व्हिस सेंटर यांनी सदर लॉपटॉपचे जवळजवळ सर्वच पार्ट, चार्जर व स्क्रिन सोडून बदलले तरीही सदर लॉपटॉप आपले काम व्यवस्थीत करीत नाही असे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. म्हणजेच, सामनेवाले यांच्या सर्व्हिस इंजिनीअरच्या कथनानूसार सदर लॉपटॉप, उत्पादित मालीकेतील सर्व लॉपटॉपमध्ये हा उत्पादनातील दोष आहे असे सांगीतले होते. तरीही, सामनेवाले यांनी सदर बाबीकडे सतत दुर्लक्ष केले होते. म्हणजेच, सदर लॉपटॉपमध्ये मूळताच उत्पादनातील दोष आहे हे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच, ज्या कामासाठी तक्रारदारानी सदरचा लॉपटॉप खरेदी केला होता त्या कामासाठी त्याचा उपयोग होऊ शकला नाही. त्यामूळे, तक्रारदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.
9. तक्रारदारांचे पुढे असेही कथन आहे की, सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराना उत्पादनातच मूळ दोष असलेला लॉपटॉप विकुन तक्रारदारांची फसवणुक केली आहे व सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली आहे. म्हणून तक्रारदारानी सदरची तक्रार मंचात दाखल करून मानसिक त्रासाबद्दल एकुण रू. 75,000/,नुकसान भरपाई तसेच लॉपटॉपची किंमत रू. 40,000/-,ही द.सा.द.शे 18 टक्के व्याजासह व तक्रार खर्चाबद्दल रू. 5,000/-,मिळावेत अशा विविध मागण्या करून सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदारांची फसवणुक केली आहे व सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली आहे असे जाहीर करावे. अशी विनंती तक्रारदारानी आपल्या प्रार्थना कलमात करून मंचास विनंती केली.
10. सामनेवाले यांना तक्रारीची नोटीस मिळून सुध्दा सामनेवाले हे मंचासमोर वेळेत हजर झाले नाही व आपली लेखीकैफियतही दाखल करण्याचे त्यांनी टाळले, त्यामुळे सामनेवाले यांचेविरूध्द विनाकैफियत आदेश दि. 31/07/2015 रोजी पारीत करण्यात येऊन सदरची तक्रार विनाकैफियत चालविण्याचे ठरविण्यात आले. तसेच, तक्रारदारांनी दि. 26/11/2015 रोजी मंचापुढे पुराव्याचे शपथपत्र दाखल करून मंचापुढे निवेदन केले की, त्यांना आपला लेखीयुक्तीवाद दाखल करावयाचा नाही. त्यांची विनंती मान्य करता आली व प्रकरण उभयपक्षकारांच्या तोंडीयुक्तीवादाकामी दि. 08/02/2016 रोजी नेमण्यात येऊन, उभयपक्षकारांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला व प्रकरण न्यायनिर्णयकामी नेमण्यात आले.
11. प्रस्तुत मंचाने तक्रारदाराची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, ई-मेल, खरेदी पावती, वॉरंटी कार्ड इन्स्टालेशन व डेमो सर्व्हिस कुपन, कागदपत्रे, नोटीस व सामनेवाले यांचे पत्र यांचे वाचन व अवलोकन केले. तसेच तक्रारदारानी मंचापुढे असे कथन केले की, त्यांची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र हाच त्यांचा लेखीयुक्तीवाद समजण्यात यावा अशीही विनंती तक्रारदारानी मंचापुढे केली. त्यांची विनंती मान्य करण्यात आली. त्यानुसार, तक्रार विनाकैफियत निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे | निष्कर्ष |
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदारानी सिध्द केले आहे काय ? | होकारार्थी |
2. मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत काय ? | अंशतः होकारार्थी |
3. काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2
12. तक्रारदारानी सदरील लॉपटॉप दि.25/12/2013 रोजी खरेदी केला व त्यानंतर थोडयाच कालावधीत तक्रारदाराच्या असे लक्षात आले की, सदर लॉपटॉपच्या बॅटरीमध्ये बिघाड झाला आहे, तसेच सदर लॉपटॉप हँगही होत आहे, व तो हळुहळु आपले काम करीत आहे व काही वेळानंतर आपोआप बंद पडत आहे. म्हणून, तक्रारदारानी सदरचा लॉपटॉप हा सामनेवाले यांचेकडे दि. 28/02/2014, 08/08/2014, 29/10/2014 व 13/01/2015 रोजी दुरूस्तीसाठी देऊनही, व सामनेवाले यांच्या सांगण्यानूसार सदर लॉपटॉपचा मदरबोर्ड, कि-बोर्ड, बॅटरी, व हार्डडिक्स बदलूनही सदरचा लॉपटॉपमधील बिघाड सामनेवाले हे दुरूस्त करून देऊ शकले नाही. तसेच, सामनेवाले यांच्या इंजिनीअरने सांगीतल्याप्रमाणे सदर लॉपटॉपच्या मालीकेतील सर्व लॉपटॉपमध्ये मूळ उत्पादनातीलच दोष आहे यावरून मंचाच्या स्पष्टपणे असे निदर्शनास आले आहे की, सदर लॉपटॉपमध्ये मूळताच दोष होता व नियमानूसार सामनेवाले यांनी सदर लॉपटॉप मालीकेतील सर्व विक्री केलेले लॉपटॉप बाजारातुन परत मागविणे आवश्यक असतांनाही सामनेवाले यांनी तेच लॉपटॉप तक्रारदारांच्या माथी मारून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराना सदर लॉपटॉपची विक्री केल्याचे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे व सदर बाब सामनेवाले यांच्या सर्व्हिस इंजिनीअरनेही मान्य केली आहे. हेही मंचाच्या निदर्शनास आले आहे. सबब, सामनेवाले यांनी मूळताच उत्पादनातील दोष असणारा लॉपटॉप तक्रारदाराना विकला यात आता कोणताही वाद नाही व मंचाच्या मनातही शंका नाही. ही एकप्रकारे सेवेतील मोठी त्रृटीच आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच, सदरच्या लॉपटॉपमधील बिघाड हा उत्पादनातीलच दोष (MANUFACTURING DEFECT) असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. तसेच, तक्रारदारानी सामनेवाले यांच्याकडे सदरचा लॉपटॉप वारंवार दुरूस्त करण्यासाठी दिला असतांनाही सामनेवाले यांना सदरच्या लॉपटॉपमधील दोष निवारण्यास अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच, तक्रारदाराना लॉपटॉपची किंमत रू. 40,000/-,चा परतावा केला नाही. ही एकप्रकारे सेवेतील त्रृटीच आहे याबाबत मंचाच्या मनात कोणतीही शंका नाही.
13. मंचाने खरेदी पावती व तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये ई-मेलद्वारे झालेला पत्रव्यवहार याचे अवलोकन केले असता, मंचाच्या असे निदर्शनास आले की, सदर लॉपटॉपमध्ये पूर्वीपासूनच बिघाड होता व तो उत्पादनाच्याच वेळेचाच बिघाड झालेला लॉपटॉप तक्रारदारांना विकलेला दिसून येतो व सदरचा बिघाड तक्रारदारानी सामनेवाले यांचेकडे वारंटी कालावधीमध्येच निदर्शनास आणून दिला होता. तरीही सामनेवाले यांनी सदर लॉपटॉप व्यवस्थीत दुरुस्त करुन दिला नाही व लॉपटॉपच्या किंमतीचा परतावाही केला नाही. तसेच, सदर लॉपटॉप दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन देऊनही ते सामनेवाले यांनी पाळले नाही. ही बाब मंचाच्या, म्हणजेच सा.वाले यांनी तक्रारदाराचा लॉपटॉप न दुरुस्त करुन व लॉपटॉपच्या किंमतीचा परतावा न करुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा सुविधा पुरविण्यास कसूर केली आहे हे स्पष्टपणे मंचाचे निदर्शनास आले आहे. सबब, सदरील मंच हया निष्कर्षापर्यंत आला आहे की, सामनेवाले यांनी निश्चीतच सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली आहे. याबाबत मंचाच्या मनात आता कोणतीही शंका नाही.
14. सामनेवाले यांना नोटीस मिळून सुध्दा त्यांनी मंचात आपली कैफियत दाखल केली नाही व त्यांना ती दाखल करण्याची संधीही देण्यात आली होती ती त्यांनी टाळली असल्यामुळे, त्यांचेविरूध्द तक्रार विनाकैफियत चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांची तक्रारीतील कथने “ अबाधित“ राहतात. अतएव, सामनेवाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसूर केली असल्याचे तक्रारदार सिध्द करतात.
15. सबब, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून सदरील लॉपटॉपची किंमत, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पात्र आहेत याबाबत मंचात कोणतेही दुमत नाही. अतएव, मुद्दा क्र.1 यांचे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. व मुद्दा क्र.2 याचे उत्तर अंशतः होकारार्थी नोंदविण्यात येते.
16. वरील सविस्तर चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्रमांक 41/2015 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली असे मंच जाहीर करीत आहे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदाराना लॉपटॉपची किंमत रु.40,000/- ही द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह दि.25/12/2013 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत याप्रमाणे अदा करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- अदा करावे. तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- तक्रारदाराना आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत अदा करावी. नुकसान भरपाईची रक्कम 30 दिवसाच्या आत अदा न केल्यास सामनेवाले हे तक्रारदाराना द.सा.द.शे. 12 टक्के व्याज तक्रार दाखल दिनांकापासून देण्यास जबाबदार राहतील.
5. मा.राज्य आयोगाच्या आदेशानूसार आदेशाची पूर्तता/नापूर्तता बाबतचे शपथपत्र उभयपक्षकारांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाच्या आत मंचात दाखल करावे.
6. सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
npk/-