निकालपत्र :- (दि.30/01/2012) (व्दारा- सौ. वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.3 हे सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकणेत आला. अंतिम युक्तीवादाचे वेळेस सामनेवाला गैरहजर. सदरची तक्रार सामनेवालांनी मोबाईल खरेदी नंतर विक्रीपश्चात सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांचेकडून सामनेवाला क्र.1 कंपनीचा मोबाईल मॉडेल नं.W100i IMEI No.35551004-089856-0 दि.21/2/2011 रोजी खरेदी केला. काही दिवसांनी सदर मोबाईलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या उदा. मोबाईल हँग होणे, बंद होणे, अशा तक्रारी येऊ लागल्याने तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे मोबाईल रिपेअरीसाठी दिला. सामनेवाला क्र.2 यांनी सदर मोबाईल रिपेअरी करुन तक्रारदारास दिला. परंतु काही दिवसांनी पुन्हा त्याच तक्रारी सदर मोबाईलमध्ये 2 ते 3 वेळा उदभवल्याने तक्रारदार यांनी सदर मोबाईल हॅन्डसेट सामनेवाला क्र.2 यांचेकडे पुन्हा रिपेअरीसाठी दिला असता सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास सदर मोबाईल एक महिन्याने रिपेअरी करुन परत दिला व पुन्हा अशी अडचण येणार नाही असे आश्वासन दिले. तक्रारदार हे सदर मोबाईल दैनंदिन व नियमित वापरत असताना पुन्हा तीच अडचण आली असता सामनेवाला क्र.2 यांनी सदर मोबाईल बदलून देण्यासाठी घेतला व एक महिन्यानंतर तक्रारदारास दुसरा नवीन मोबाईल दिला. परंतु दुस-या बदलून दिलेल्या मोबाईलमध्येही तोच प्रॉब्लेम आल्याने सामनेवाला क्र.2 यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी उद्दट वर्तन केले व तुम्हाला मोबाईल वापरता येत नाही असा खोटा आरोप केला व उडवाउडवीची भाषा वापरू लागले. तक्रारदार यांनी सदर मोबाईल खरेदी केल्यानंतर तो वॉरंटी कालावधीत असतानाही सामनेवाला यांचेकडून विक्रीपश्चात सेवा मिळत नसलेने तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासा झालेने तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन मोबाईलची किंमत रु.4,900/- व्याजासह व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ मोबार्इलचे बील व जॉब कार्ड इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.3 यांनी दाखल केले लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार यांनी सदर सामनेवाला यांचेकडून दि.21/02/2011 रोजी मोबाईल खरेदी केलेला होता. परंतु सदर मोबाईल खरेदी केल्यानंतर त्यात आलेल्या तांत्रिक अडचणीबाबत तक्रारदाराने प्रस्तुत सामनेवाला यांना कधी कळवलेले नाही. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांचेकडे परस्पर गेले व तेथूनच त्यांनी मोबाईल हॅन्डसेट बदलून घेतला व बदलून घेतलेला हॅन्डसेटही खराब लागलेला आहे. सदर सामनेवाला यांनी विक्री केलेल्या मोबाईलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करणेची जबाबदारी सामनेवाला क्र.2 यांचेवर राहते व त्यास फक्त सामनेवाला क्र. 1 व 2 हेच जबाबदार असतात. सदर सामनेवाला यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्दची कोणतीही विनंती मान्य करणेतयेऊ नये अशी विनंती सामनेवाला क्र.3 यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला क्र. 1 व 2 यांना मंचामार्फत पाठविलेल्या नोटीस मिळूनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत तसेच त्यांनी लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.3 यांचे लेखी म्हणणे, तक्रारदारचा युक्तीवाद विचारात घेता खालील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -----होय. 2) काय आदेश ? -----शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र. 1 :- तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 यांचेकडून सामनेवाला क्र.1 कंपनीचा उत्पादित सोनी इरेक्सन मॉडेल नं.W100i IMEI No.35551004-089856-0 असलेला रक्कम रु.4,900/- ला दि.21/02/2011 रोजी खरेदी केला हे दाखल रोख पावती क्र.5334 वरुन निर्विवाद आहे. सदर हॅन्डसेटमध्ये दोष उदभवू लागल्याने तक्रारदाराने सामनेवाला कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे म्हणजे सामनेवाला क्र.2 कडे संपर्क साधला. मोबाईल हँग होणे, बंद होणे अशा तांत्रिक अडचणी उदभवू लागल्या. सदर मोबाईल सामनेवाला क्र.2 सर्व्हीस सेंटरमध्ये होता. तो दुरुस्त करुन दिला मात्र काही दिवसांनी पुन्हा तोच प्रॉब्लेम सदर मोबाईल हॅन्डसेटमध्ये येऊ लागल्याने तो उत्पादित दोषामुळे दुरुस्त होत नसल्याने त्यांनी सदर हॅन्डसेट बदलून दुसरा हॅन्डसेट दिला. मात्र सदर बदलून दिलेल्या मोबाईल हॅन्डसेटमध्ये पुन्हा तोच दोष उदभवला. सबब सदर हॅन्डसेटमध्ये उत्पादित दोष होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदारास दिलेल्या नमुद हॅन्डसेटमध्ये उत्पादित दोष होता व सदर उत्पादित दोष सामनेवाला कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला दुर करता आलेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास नवीन हॅन्डसेट दिलेला नाही अथवा रक्कम अदा केलेली नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे व यास सामनेवाला क्र. 1 ते 3 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र. 2 :- सामनेवाला यांनी केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराने रु.4,900/- इतकी रक्कम हॅन्डसेटला अदा करुनही त्याला सदर हॅन्डसेटचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. सामनेवालांनी 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीत नमुद केलेल्या मॉडेलचा नवीन दोषरहीत हॅन्डसेट दयावा अथवा सदर हॅन्डसेटची रक्कम रु.4,900/- त्वरीत अदा करावी. 3. तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) त्वरीत अदा करावेत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |