निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- 1. तक्रारदार यांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून सोनीईरीक्सन कंपनीचा भ्रमणध्वनी संच दिनांक 18 जानेवारी, 2009 रोजी रु.12,600/- देवून विकत घेतला. त्यास वॉरंटी कालावधी एक वर्षाचा होता. 2. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, खरेदी केलेला भ्रमणध्वनी संच विकत घेतल्यापासून 7 महिने व्यवस्थित चालला व नंतर त्यात वारंवार तक्रारी उदभवऊ लागल्या. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, वॉरंटी कालावधीत वारंवार बिघाड झाल्यामुळे तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांच्याकडे भ्रमणध्वनी संच दिला व नविन भ्रमणध्वनी संच बदलून द्यावा अशी मागणी केली. परंतु सा.वाले यांनी ती नाकारली म्हणून तक्रारदारांना मानसिक त्रास झाला. म्हणून तक्रारदारांनी या ग्राहक मंचापुढे तक्रार नोंदवून खालील मागण्या केल्या आहेत. 1) भ्रमणध्वनी संच बदलून द्यावा किंवा बाजारभावाप्रमाणे तेवढीच किंमत परत द्यावी. 2) नुकसान भरपाई म्हणून सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.20,000/- द्यावेत. 3) तक्रार अर्ज खर्च रु.500/- द्यावा. 3. तक्रार अर्ज, शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रासह दाखल केलेले आहेत. 4. सा.वाले क्र.1,2 व 3 यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडून पाठविण्यात आली. सा.वाले क्र. 1 ते 3 यांना मिळाली. नोटीस मिळाल्याची पोच पावती अभिलेखावर दाखल केलेले आहेत. सा.वाले क्र.1 व 3 नोटीस मिळूनही हजर राहीले नाहीत व तक्रार अर्जास उत्तर दाखल केले नाही. म्हणून सा.वाले 1 व 3 यांचे विरुध्द तक्रारअर्ज एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश दि.9.7.2010 रोजी मंचाकडून पारीत करण्यात आला. व सा.वाले क्र.2 नोटीस मिळाल्यानंतर हजर राहून कैफियत दाखल केली. 5. सा.वाले क्र.2 यांना तक्रारदार यांनी त्यांच्या दुकानातून भ्रमणध्वनी संच क्र.1901 विकत घेतला हे मान्य आहे. परंतु तो भ्रमणध्वनी संच 7 व्यवस्थित चालला व त्यानंतर त्यात तक्रारी निर्माण झाल्या हे त्यांना माहित नाही. कारण तक्रारदार हे भ्रमणध्वनीसंच खरेदी केल्यानंतर कधीही त्यांचे दुकानात कोणत्याही कारणासाठी आले नाहीत. सा.वाले यांचे म्हणण्यानुसार सा.वाले यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनीसंच हा पूर्णपणे बंदिस्त असलेल्या खोक्यामध्ये दिला. तसेच तक्रारदारानी भ्रमणध्वनी संच खरेदी करण्यापूर्वी भ्रमणध्वनी संचाची पूर्णपणे पारख करुन घेतली होती. 6. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, सा.वाले क्र.2 यांची कैफियत व अनुषंगीक कागदपत्र यांची पडताळणी करुन पाहीली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | तक्रारदार सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | होय. | 2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून भ्रमणध्वनीसंच परत बदली करुन मागू शकतात काय किंवा चालु बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत मागू शकतात काय ? | होय. भ्रमणध्वनीसंच बदलून द्यावा शक्य नसेल तर चालु बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत परत करावी. | 3 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई म्हणून रु.20,000/- मागू शकतात काय ? | होय. रु.5000/- फक्त. | 4. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्ज खर्च रु.500/- मागू शकतात काय ? | होय. रु.500/- | | आदेश ? | आदेशा प्रमाणे. |
कारण मिमांसा 7. सा.वाला क्र 1 हे संचाचे निर्माते असून सा.वाला क्र.2 हे विक्रेते आहेत व सा.वाला क्र.3 हे सा.वाला क्र.1 चे अधिकृत सेवा केंद्र आहे. 8. तक्रारदारांचे म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून सोनीइरीक्सन कंपनीचा भ्रमणध्वनी संच दिनांक 18 जानेवारी, 2009 रोजी रु.12,600/- देवून विकत घेतला. त्यास वॉरंटी कालावधी एक वर्षाचा होता. त्या बद्दलची पोच पावती तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्ठ क्र.25 वर दाखल कली आहे. पहीले 7 महिने हा भ्रमणध्वनी संच व्यवस्थित चालला परंतु त्यानंतर वॉरंटी कालावधीमध्ये त्यात वारंवार खालील प्रमाणे तक्रारी उदभऊ लागल्या. अ.क्र. | तक्रार उदभवल्याची तारीख | तक्रारीचे स्वरुप | भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी देण्यात आलेले सेवा क्रेदांची यादी. | भ्रमणध्वनी संच दुरुस्त करुन परत मिळाल्याची तारीख. | 1 | 15.8.09 | खातेमध्ये मेमरीकार्ड बसविता येत नाही. | एक्सेल फ्रन्टलाईन मोबाईल सेवाकेंद्र. | एक महिन्यानंतर. | 2. | 23.10.09 | आपोआपच लॉक अन लॉक होत होतेव क्रीनवर काहीच दिसत नव्हते(ब्लॉक) | मोबाईल टक्नॉलॉजी सर्विस सेंटर. | 24.11.09 | 3. | 14.12.09 | परतक्रीनवर काहीच दिसत नव्हते(ब्लॉक) | मोबाईल टक्नॉलॉजी सर्विस सेंटर. | 17.12.09 | 4 | 20.12.09 | परतक्रीनवर काहीच दिसत नव्हते(ब्लॉक) | मोबाईल टक्नॉलॉजी सर्विस सेंटर. | 20.1.2010 | 5 | 20.1.2010 | परतक्रीनवर काहीच दिसत नव्हते(ब्लॉक) | मोबाईल टक्नॉलॉजी सर्विस सेंटर. | 3.2.2010 | 6 | 5.2.2010 | परतक्रीनवर काहीच दिसत नव्हते(ब्लॉक) | मोबाईल टक्नॉलॉजी सर्विस सेंटर. | तक्रारदार यांची भ्रमणध्वनी संच मोबाईल टक्नॉलॉजी सर्विस यांचे कडे देवून आले व परत घेतला नाही. |
तक्रारदार यांनी भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी दिलेले सर्व जॉबकार्ड पृष्ठ क्र.26 ते 31 वर जोडले आहेत. प्रत्येक वेळा सामनेवाले क्र.3 हे भ्रमणध्वनी संचामध्ये तात्पुरर्ती दुरुस्ती करुन भ्रमणध्वनीसंच तक्रारदारांना परत दिले. परंतु त्यात पुन्हा पुन्हा बिघाड होत होते. म्हणून तक्रारदार यांनी 5.2.2010 रोजी भ्रमणध्वनीसंच सा.वाला क्र.3 यांच्याकडे जमा करुन नवीन भ्रमणध्वनीसंच बदलून द्यावा अशी मागणी केली. परंतू ती सा.क्र..3 यांनी ती नाकारली. 9. यावर सा.वाले क्र.1 व 3 हजर राहून तक्रारदारांचे म्हणणे खोडले नाही. सा.वाले क्र.2 यांचे म्हणण्यानुसार तक्रारदार भ्रमणध्वनीसंच खरेदी केल्यानंतर पुन्हा कधीही तक्रार नोंदविण्यासाठी सा.वाले क्र.2 यांचेकडे आले नाहीत व तक्रार नोंदविली नाही. 10. तक्रार अर्ज हा शपथपत्रासोबत दाखल केला आहे व तसेच तक्रारदारांचे म्हणणे अनुषंगीक कागदपत्रावरुन सिध्द होते. म्हणून सोनीइरीक्सन कंपनीचा भ्रमणध्वनी संच हा विकत घेतल्यानंतर त्याच्या वॉरंटी कालावधीमध्ये अनेक वेळा त्याच्यामध्ये तक्रारी उदभवल्या हे सिध्द होते. यावरुन भ्रमणध्वनी संचामध्ये निर्मितीदोष आहे/किंवा त्यामध्ये निकृष्ट प्रतीचे भाग ( पार्टस ) वापरले हे सिध्द होते. वारंवार दुरुस्त करुनही ते दुरुस्त झाले नाही. यावरुन सा.वाले क्र. 1 व 3 यांच्या सेवेतील त्रृटी दिसून येतात. सा.वाले क्र.2 यांची जबाबदारी सा.वाले क्र.1 यांनी निर्मिती केलेला माल विकणे येवढीच जबाबदारी असल्याने त्यांचे सेवेतील कमतरता दिसून येत नाही. परंतु सा.वाला क्र.2 हे विक्रेते आसल्यामुळे भ्रमणध्वनी संचाचा मोबदला सा.वाले क्र.2 यांनी स्विकारला आहे. म्हणून सा.वाले क्र.2 हे जबाबदार पक्ष आहे. 11. सा.वाले क्र.1 ते 3 यांच्या सेवेतील कमतरतेमुळे सामनेवाले तक्रारदार यांना भ्रमणध्वनीसंच त्याच त्याच मॉडेल कंमांकाचा नविन संच नविन वॉरंटीसह बदलून देण्यास जबाबदार असतील. जर हे शक्य नसेल तर सा.वाले यांनी भ्रमणध्वनी संचाची किंमत बाजारभावाप्रमाणे परत द्यावी. 12. सा.वाले यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला ही गोष्ट नाकारता येत नाही. तक्रारदारांनी मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.20,000/- ची मागणी केली आहे. परंतू मंचास ही मागणी अवास्तव वाटते. सा.वाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- नुकसान भरपाई देणे हे न्यायीकदृष्टया योग्य वाटते. 13. सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रु.500/- देण्यास जबाबदार राहातील. 14. वरील विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 87/2010 अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांस त्याच मॉडेल क्रमांकचा नवीन भमणध्वनी संच नविन वॉरंटीसह बदलून द्यावा किंवा शक्य नसेल तर बाजारभावाप्रमाणे भ्रमणध्वनी संचाची किंमत परत द्यावी. 3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- द्यावेत. 4. सामनेवाले 1 ते 3 यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून रु.500/- द्यावेत. 5. वरील आदेशाची पूर्तता सामनेवाले नं. 1 ते 3 यांनी वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयाच्या आत करावी. अन्यथा विलंबापोटी दंडात्मक रक्कम म्हणून दरमहा रु.500/- तक्रारदारांना द्यावे. 6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| | [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |