तक्रारदार : स्वतः
सामनेवाले क्र.1 ते 3 : एकतर्फा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर सदस्या ठिकाणः बांद्रा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणेः-
सामनेवाले क्र.1-हे भ्रमणध्वनी संच तयार करणारे –निर्माते असून सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 चे अधिकृत सेवा केंद्र आहे तर सामनेवाले क्र.3 हे विक्रेते आहेत.
2 तक्रारदारांनी सोनी इरीस्कन कंपनीचा भ्रमणध्वनी संच (W-205) सोनी इरीस्कन, पी टेलीकॉम, इंदौर येथून दि.21.10.2009 रोजी खरेदी केला.
3 तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीपासूनच ईअर स्पीकर व्हॉल्यूमबाबत दोष आढळून आले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, दि.03.07.2010 रोजी वॉरंटी कालावधी तक्रारदारांनी सामनेवाले यांचे अधिकृत सेवा केंद्राकडे सदर भ्रमणध्वनी संच दुरुस्ती करण्यासाठी दिला. सामनेवाले यांनी एक महिना भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी ठेवून घेतला. त्यानंतर, दुरुस्त करुन दि.16.08.2010 रोजी परत दिला परंतु त्यामध्ये दोष तसेच होते. पुन्हा दि.13.09.2010 रोजी सामनेवाले क्र.2 आधिकृत सेवा केद्राकडे भ्रमणध्वनी संच दिला व त्यांना संपूर्ण भ्रमणध्वनी संच बदलून द्यावे अशी विनंती केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष दिले व तक्रारदारांनी केलेल्या संपर्कास उत्तर दिले नाही.
4 तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांनी खरेदी केलेला सोनी इरीस्कन कंपनीचा भ्रमणध्वनी संचामध्ये प्रथम पासूनच ईअर स्पीकर व्हॉल्यूमबाबत दोष होते. तो वॉरंटी कालावधीमध्ये दुरुस्तीस दिला असता त्यामध्ये संपूर्ण तपशील (Data ) नाहीसे झाले. भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी कपंनीकडे दोनवेळा पाठविले तरीही तो संपूर्णपणे दुरुस्त झाला नाही. म्हणून जानेवारी, 2011 मध्ये भ्रमणध्वनी संचामध्ये पुन्हा दोष निर्माण झाले व त्यातील तपशील आपोआपच नाहीसे होत होते. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या धंद्यामध्ये खूप नुकसान झाले. तक्रारदारांनी पुन्हा अधिकृत सेवा केंद्राकडे भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी नेला असता, सामनेवाले यांनी त्यांना सॉफ्टवेअर बदलण्यासाठी सांगितले. यावेळेस भ्रमणध्वनी संचाचे वॉरंटी कालावधी संपलेला होता.
5 म्हणून तक्रारदारांनी ग्राहक मंचामध्ये प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करुन भ्रमणध्वनी संचाची किंमत रु.5,350/- व झालेल्या मानसिक त्रासासाठी रु.25,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- व धंद्यातील नुकसान रु.20,000/- अशी एकूण रु.60,350/- ची मागणी केली.
6 सामनेवाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस सामनेवाले यांना पाठविण्यात आली. सामनेवाले क्र.1 ते 3 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत, तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठविल्याचे शपथपत्र दाखल केले आहे. नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात आला.
7 तक्रार अर्ज, पुराव्याचे शपथपत्र व अनुषांगिक कागदपत्रांची पडताळणी करून पाहिली असता, निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे सामनेवाले यांनी सेवासुविधा पुरविण्यास कसुर केली हे सिध्द केले काय ? | होय |
2 | तक्रारदार तक्रार अर्जात केलेल्या मागणीनुसार मागणी करू शकतात काय ? | होय, अंशतः |
3 | आदेश ? | तक्रार अंशतः मान्य करण्यात येते. |
कारणमिमांसाः-
8 तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी सामनेवाले क्र.3 यांचेकडून रु.5,350/- एवढा मोबदला देऊन सोनी इरीस्कन कंपनीचा भ्रमणध्वनी संच (w-205) दि.21.10.2009 रोजी खरेदी केला. त्याबाबतची पोच पावती तक्रार अर्जासोबत पृष्ठ क्र.10 निशाणी क्र.1 वर दाखल आहे.
9 तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, भ्रमणध्वनी संचाचे ईअर स्पिकर सदोष होते. आवाज प्रथमपासूनच खूप कमी येत होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, दि.03.07.2010 रोजी या तक्रारीसाठी सामनेवाले यांचेकडे सदर भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी जमा केले. त्याबाबतचे जॉबशिट अभिलेखात पृष्ठ क्र.11 वर निशाणी क्र.-2 वर दाखल आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सदर भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी कंपनीकडे दोन वेळा पाठविण्यात आला. सामनेवाले यांनी दुरुस्तीसाठी दिड महिना भ्रमणध्वनी संच ठेवून घेतला. परंतु तरीही भ्रमणध्वनी संचातील दोष नाहीसे झाले नाहीत. त्याबाबतची नोंद तक्रारदारांनी दि.03.07.2010 च्या जॉबशिटवर दि.16.08.2010 रोजी केली आहे. तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, भ्रमणध्वनी संच दुरुस्त करताना त्यातील सर्व तपशील नाहीसे झाले. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊन धंद्याचे खूप नुकसान झाले. तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील वरील कथनास सामनेवाले यांनी हजर राहून उत्तर दिले नाही व तक्रारदाराचे म्हणणे नाकारले नाही. तसेच तक्रादारांनी दाखल केलल्या कागदपत्रांवरुन तक्रारदारांच्या म्हणण्यात काहीसे तथ्स असल्याचे दिसून येते. तक्रार अर्ज शपथपत्रांसह दाखल केलेले आहे.
10 तक्रारदारांनी भ्रमणध्वनी संचातील दोष वॉरंटी कालावधीमध्ये दोष उदभवले व ते दुरुस्ती नंतरही संपूर्णतः नष्ट झाले नाहीत. म्हणून तक्रारदारांनी भ्रमणध्वनी संचाची संपूर्ण किंमत रु.5,350/- सामनेवाले यांनी परत द्यावी अशी मागणी केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, भ्रमणध्वनी संचातील ईअर स्पिकरमधील दोष प्रथम पासून होते. जर तक्रारदाराचे हे म्हणणे खरे असते तर, तक्रारदारांनी भ्रमणध्वनी संच खरेदी केल्या नंतर लगेचच सामनेवाले यांचेकडे तक्रार नोंदवीली असती. परंतु तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील म्हणण्यानुसार व दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, भ्रमणध्वनी संच दि.21.10.2009 रोजी खरेदी केला व तक्रार दि.03.07.2010 रोजी करुन भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी सामनेवपाले क्र.2 यांना जमा केला. यावरुन तक्रारदारांनी नऊ महिने भ्रमणध्वनी संच विना तक्रार वापरला. म्हणून तक्रारदारांना भ्रमणध्वनी संचराची संपूर्ण किंमत रु.5,350/- असा आदेश देणे योग्य राहणार नाही. अशा परिस्थितीत, सामनेवाले यांनी तक्रारदाराचा भ्रमणध्वनी संच दुरुस्त करुन द्यावा असा आदेश देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचास वाटते.
11 तक्रारदारांनी भ्रमणध्वनी संच दुरूस्त करीत असताना त्यातील तपशील (data ) नाहीसे झाले. तक्रारदारांची गैरसोय झाली व त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला म्हणून झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून रु.25,000/- द्यावेत अशी मागणी केली. घेतलेला भ्रमणध्वनी संचामध्ये दोष उदभवल्यामुळे व तसेच त्यातील सर्व तपशील नाहीसे झाल्याने तक्रारदारांची गैरसोय झाली व त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला ही नाकारता येणार नाही परंतु झालेली गैरसोय किंवा मानसिक त्रास पैशात मोजता येत नाही. तसेच या गैरसोयीमुळे नुकसान किती झाले हेही आजमावता येत नाही, म्हणून यासाठी तक्रारदारांना सामनेवाले यांनी रु.2,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.1,000/- असे एकूण रु.3,000/- द्यावेत. असा आदेश देणे योग्य वाटते.
12 तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून भ्रमणध्वनी संचाच्या गैरसोयीमुळे धंद्यात झालेल्या नुकसानीपोटी रु.20,000/- ची मागणी केली आहे. परंतु तक्रारदारांनी भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी सामनेवाले यांचेकडे असताना व त्यातील तपशील नाहीसे झाल्याने तक्रारदाराने धंद्यात कशा प्रकारे व किती नुकसान झाले याचा काहीही तपशील दाखल केलेला नाही, म्हणून तक्रारदारांची ही मागणी अमान्य करण्यात येते.
वरील विवेचनावरुन, या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रार अर्ज क्र.126/2011 अंशतः मान्य करण्यात येतो.
(2) तक्रारदारांस सामनेवाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे जाहीर करण्यात येते.
(3) सामनेवाले यांनी तक्रारदारांचा सोनी ईरीस्कन भ्रमणध्वनी संच (W-605) पूर्णतः दुरुस्त करुन द्यावा.
(4) सामनेवाले यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनी संचातील दोषामुळे झालेल्या गैरसोयीमुळे मानासिक त्रासाबद्दल रु.2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चाबद्दल रु.1,000/- असे एकूण रु.3,000/- द्यावेत.
(5) सामनेवाले यांनी वरील आदेशाच्या प्रमाणित प्रतीं मिळाल्यापासून आदेशाची पूर्तता सहा आठवडयाच्या आत करावी अन्यथा विलंबापोटी दरमहा रु.500/- तक्रारदाराला द्यावेत.
(6) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यांत याव्यात.