जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 35/2012 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 23/02/2012.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-05/10/2015.
श्री.देविदास अभिमन पाटील,
मु.निशाणे,पो.साळवे,ता.धरणगांव,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री.मॅनेजींग डायरेक्टर (एम डी)
सोनालीका इंटरनॅशनल ट्रॅक्टर लि, मु.पो.व्हीलेज चाक गुजरान,
पी.ओ.पीपनालवाला 22, जालंधर रोड, होशियारपुर,
पंजाब व ऑफीस मु.पो.पंकज प्लाझा, 1 प्लॉट नं.2,
कारकरदुम, कमुन्युटी सेंटर कमर्शियल कॉम्प्लेक्स,दिल्ली 92.
2. श्री.अजय एन्टरप्रायजेस,
सोनालीका ट्रॅक्टर, औजारे, सुटेभाग व सेवाचे अधिकृत विक्रेता,
मु.पो.गट नंबर 72/1, एरंडोल,जि.जळगांव व
ऑफीस पत्ता 32, ओमशांती नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर,
नॅशनल हायवे नं.6, जळगांव,ता.जि.जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.पी.एस.एरंडे वकील.
सामनेवाला क्र. 1 तर्फे श्री पंकज अ.अत्रे वकील.
सामनेवाला क्र. 2 तर्फे श्री.व्ही.आर.घोलप वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सदोष ट्रॅक्टरची विक्री करुन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे मौजे निशाणे,पो.साळवे,ता.धरणगांव, जि.जळगांव येथे राहतात. सामनेवाला क्र. 1 हे सोनालीका इंटरनॅशनल ट्रॅक्टर लि कंपनी आहे. सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 चे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 यांचेकडुन सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादीत केलेले सोनालीका ट्रॅक्टर डी.आर.आर.एक्स 60 दि.12/10/2010 रोजी रक्कम रु.5,81,000/- इतक्या रक्कमेस खरेदी केले. सदरील ट्रॅक्टर हे 60 हॉर्स पॉवरचे आहे. सदरील ट्रॅक्टर खरेदी करतेवेळेस सामनेवाला क्र. 2 यांनी गॅरंटी व वॉरंटी दिलेली होती व तसेच पुस्तकही दिलेले आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी ट्रॅक्टरचे सर्व पार्टस ची 18 महीन्यांची वॉरंटी दिली आहे. तक्रारदार यांनी ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर सुरुवातीपासुनच सदरील ट्रॅक्टरमध्ये दोष उत्पन्न होऊ लागले. ट्रॅक्टर घेतल्यानंतर लागलीच पंप खराब झाला. सामनेवाला क्र. 1 यांनी तो बदलुन दिला नाही. तक्रारदाराने तो स्वखर्चाने बदलुन घेतला. तसेच डिसेंबर,2010 मध्ये चाकाची बेअरींग अचानक तुटून खराब झाली. सामनेवाला क्र. 2 यांनी ते बदलुन दिले नाही. ट्रॅक्टरचे वॉरंटी कालावधीत रेग्युलेटर खबरा झाले ते तक्रारदाराने स्वखर्चाने बदलुन घेतले. तसेच ट्रॅक्टर मध्ये वेळोवेळी पार्टन खराब होत गेले ते बदलुन देण्यास सामनेवाला क्र. 1 यांनी नकार दिला. ट्रॅक्टरची बॅटरी खराब झाली तीही बदलुन देण्यास नकार दिला. तक्रारदार यांना ट्रॅक्टर बंद करुन ठेवावे लागले त्यामुळे तक्रारदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विक्री केलेले ट्रॅक्टर चे पार्टस हे अत्यंत खराब व खालच्या दर्जाचे वापरले आहेत. सदरील ट्रॅक्टर तक्रारदार यांना विक्री करुन सामनेवाला यांनी त्यांची फसवणुक केली आहे तसेच सदरील ट्रॅक्टरची वॉरंटी कालावधीत सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडुन सदरील ट्रॅक्टर बदलुन द्यावा अथा ट्रॅक्टरची किंमत रक्कम रु.5,81,000/- तक्रारदार यांना द्यावी तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.1,50,000/- व तक्रारीचा खर्च द्यावा अशी विनंती केली आहे.
3. सामनेवाला क्र.1 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा दाखल केला. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदाराच्या तक्रारीतील कथने चुकीची आहेत. तक्रारदार यांनी सदरील ट्रॅक्टर व्यवसाय करण्यासाठी घेतलेले आहे त्यामुळे सदरील तक्रार चालविण्याचे अधिकार मंचास नाहीत. सामनेवाला क्र. 1 यांचे प्रत्यक्ष ग्राहकांशी संबंध येत नाही. सामनेवाला क्र. 1 हे ट्रॅक्टरचे उत्पादन करणारे आहेत. ट्रॅक्टर विकत घेणा-या ग्राहकांना वॉरंटी दिली असते त्या वॉरंटी मध्ये ट्रॅक्टरचे कोणते पार्टस बदलुन देण्यात येतील व कोणते बदलुन देता येत नाहीत याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तक्रारदार यांनी फ्री सर्व्हीस उपलब्ध करुन घेतल्या नाहीत. तसेच तक्रारदार हे जेव्हा सामनेवाला यांचेकडे आले असता सामनेवाला यांना ट्रॅक्टर मध्ये कोणताही दोष आढळुन आला नाही. तसेच तक्रारदाराचे पुर्ण समाधान झाल्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर त्यांचे ताब्यात घेतला. सामनेवाला क्र. 2 चे सर्व्हीस सेंटर आहे त्यामध्ये सर्व सोई-सुविधा आहेत. तक्रारदार यांनी जेव्हा जेव्हा ट्रॅक्टर आणले त्या त्या वेळेस त्याच्या सर्व शंकाचे निरसन करुन देण्यात आलेले आहे. ट्रॅक्टर मध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही. ज्यावेळेस तक्रारदाराने ट्रॅक्टर दिले त्यावेळेस त्यामध्ये नवीन बॅटरी दिलेली असते. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कधीही कसुर केली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
4. सामनेवाला क्र. 2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी कैफीयत दाखल केली. सामनेवाला क्र. 2 चे कथन की, सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदार यांना विक्री केलेल्या ट्रॅक्टर मध्ये कोणत्याही प्रकारची उत्पादकीय खराबी नव्हती. तक्रारदाराचे ट्रॅक्टरचे पंप व रेग्युलेटरचे काम निघाले ते लगेच विनामोबदला करुन दिलेले आहे. बेअरींगचे काम कंपनीचे वॉरंटी पॉलीसीतुन वगळले असल्यामुळे ते तक्रारदार यांना करावे लागले आहे. इतर सर्व कामे तक्रारदार यांना सामनेवाला क्र. 2 यांनी विनामोबदला करुन दिलेली आहेत. वॉरंटी कालावधीमध्ये ट्रॅक्टरचे काही काम निघाल्यास ते सामनेवाला विनामोबदला करुन देण्यास तयार आहेत. बॅटरी बदलुन देण्याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर नाही. सदरील बॅटरी ही ज्या कंपनीची आहे त्या कंपनीचे डिलरकडे पाठविली होती परंतु सदरील बॅटरी वॉरंटी कालावधीचे पॉलीसीत बसत नसल्यामुळे ती तक्रारदार यांना बदलुन दिलेली नाही. तक्रारदार हे ज्या ज्या वेळेस ट्रॅक्ट घेऊन सामनेवाला क्र. 2 यांचेकडे आले त्या त्या वेळेस तक्रारदाराच्या शंकांचे निरसन करुन ट्रॅक्टर चे काम करुन दिले आहे. ट्रॅक्टर मध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही त्यामुळे सदरील ट्रॅक्टर बदलुन मागण्याची मागणी निरर्थक व बेकायदेशीर आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी आवश्यक ती सेवा पुरविली आहे त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
5. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, त्याची पोहोच पावती, वॉरंटी कार्ड, बॅटरी संबंधी केलेला पत्र व्यवहार, सामनेवाला क्र. 2 यांना दिलेले अर्ज, बिलांच्या पावत्या, विमा पॉलीसी, ट्रॅक्टरचे ऑपरेटर मॅन्युअल इत्यादी दस्त हजर केलेले आहेत. तक्रारदार यांना पुरेशा संधी देऊनही तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दिले नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र. 2 यांनी सामनेवाला क्र. 1 यांचे डिलरशिपबाबत दस्त दाखल केलेले आहेत. तक्रारदाराचे वकील युक्तीवादाचे वेळेस गैरहजर, सामनेवाला यांचे वकील हजर त्यांचा युक्तीवाद ऐकला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विक्री केलेल्या ट्रॅक्टर
मध्ये उत्पादकीय दोष आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत
केली आहे काय ? नाही.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रृटी
ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली
आहे काय ? नाही.
3) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहेत काय ? नाही.
4) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 4 ः
6. तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन लक्षात घेतले असता, तक्रारदार यांनी ढोबळमानाने असे कथन केलेले आहे की, त्यांनी ट्रॅक्टर विकत घेतल्यापासुन ट्रॅक्टर हे खराब व दोषयुक्त होते. ट्रॅक्टर घेतल्यानंतर लागलीच पंप खराब झाला. तो पंप बदलुन देण्यास सामनेवाला यांनी नकार दिला. चाकाचे बेअरींग अचानक तुटले ते बदलुन देण्यास सामनेवाला यांनी नकार दिला. रेग्युलेटर खराब झाले ते बदलुन देण्यास सामनेवाला यांनी नकार दिला. वारंवार ट्रॅक्टर मध्ये खराबी होऊ लागली. वॉरंटी कालावधी असतांनाही सामनेवाला यांनी ट्रॅक्टरचे काम करुन दिले नाही. सदरील ट्रॅक्टर मध्ये उत्पादकीय दोष आहे. तक्रारदार यांना ट्रॅक्टर बदलुन द्यावे किंवा त्याची किंमत तक्रारदार यांना परत द्यावी अशी मागणी केलेली आहे.
7. सामनेवाला क्र. 1 व 2 चे कथन व पुरावा लक्षात घेतला असता त्यांचे कथन की, तक्रारदार यांना वेळोवेळी योग्य ती सेवा पुरवली आहे. तक्रारदार यांनी ज्या ज्या वेळेस ट्रॅक्टर च्या दुरुस्त्या सांगीतल्या त्या त्या वेळेस त्या दुरुस्या विनामोबदला करुन दुरुस्त करुन दिलेल्या आहेत. बॅटरी ही बॅटरीचे उत्पादन करुन देणा-या कंपनीकडुन वॉरंटी नुसार मिळते त्यास सामनेवाला क्र. 1 व 2 हे जबाबदार नाहीत. तक्रारदाराने दाखल केलेल्या जॉब कार्डचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा प्रदान केल्याचे निर्दशनास येते.
8. सदरील ट्रॅक्टर मध्ये उत्पादकीय दोष आहे ही बाब ठरवण्यासाठी सदरील ट्रॅक्टर हे सक्षम अधिकृत शासनमान्य संस्थेकडुन तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी ट्रॅक्टर मध्ये कोणते दोष आहेत हे स्पष्टपणे तक्रारीमध्ये नमुद केलेले नाही. फक्त ट्रॅक्टर खराब होते असे नमुद केलेले आहे. हायड्रोलीक पंप हे ट्रॅक्टर वापरत असतांना ऑईलवर चालते त्यामुळे त्यात काही दोष होऊ शकतो तो दोष सामनेवाला यांनी वॉरंटी कालावधीमध्ये दुरुस्त करुन दिलेला आहे तसेच तक्रारदार यांनी ज्या ज्या वेळेस ट्रॅक्टर सर्व्हीसींगसाठी आणले आहे त्या त्या वेळेस ट्रॅक्टरची सर्व्हीसींग करुन दिलेली आहे. संपुर्ण पुराव्याचे अवलोकन केले असता असे निर्दशनास येते की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली नाही. तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. सबब मुद्या क्र. 1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्या क्र. 4 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 05/10/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.