निकालपत्र :- (दि.17.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस लागू झालेबाबतची पोच पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.2, कोल्हापूर महानगरपालिका हे आजरोजी वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी पुढील मुदत द्यावी असा अर्ज दिला. परंतु, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता तसेच सामनेवाला यांच्या मुदतीच्या अर्जाचा विचार करता सदर अर्जामध्ये मुदत देणेकरिता कोणतेही संयुक्तिक कारण नसल्याने सदरचा अर्ज स्वतंत्र आदेशान्वये फेटाळणेत आला. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांचे अॅड.सुनिल माणकामे व सामनेवाला क्र.2 यांचे अॅड.के.एस्.कोरगांवकर यांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.1 गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार संस्था ही कायद्यानुसार नोंदणीकृत स्वंयसेवी संस्था आहे. सामनेवाला क्र.1 ही मद्य (Liqour) उत्पादक लिमिटेड कंपनी आहे. सदर कंपनी नॉक-आऊट बिअर, हॅवर्डस 5000 बिअर, फॉस्टर्स बिअर, पेरोनी, रॉयल चॅलेंज बिअर इत्यादीचे उत्पादन करीत आहेत. (3) सामनेवाला क्र.1 कंपनीने सामनेवाला क्र.2-आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांचे परवानगीने कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळया ठिकाणी चुकीचे व दिशाभूल करणारे जाहिरातीचे डिजीटल बोर्ड लावलेले आहेत. सदर जाहिराती या कोल्हापूर शहरातील एस्.टी.स्टँडसमोरील हॉटेल सहयाद्री, कावळा नाका येथील हॉटेल आयोध्या, ताराबाई पार्क इत्यादी मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी लावलेल्या आहेत. सामनेवाला क्र.1 मद्य उत्पादक यांनी नॉक-आऊट बिअर, हॅवर्डस 5000 बिअर, फॉस्टर्स बिअर, पेरोनी, रॉयल चॅलेंज बिअर इत्यादी सदरच्या मद्याच्या (Liqour) जाहिराती या ‘सोडा’ या सदराखाली प्रसिध्द केल्या आहेत. सदर जाहिरातीत ‘बॉस यही है मेरा चॉईस’ असा उल्लेख केलेला आहे. तक्रारदार संस्थेने बाजारामधील अनेक मद्याच्या दुकानांमध्ये, मद्यालय (Permit Rooms) व हॉटेल्स इत्यादी ठिकाणी चौकशी केली असता त्यांना अशा प्रकारचा सोडा मिळून आलेला नाही. अशा प्रकारचा कोणताही नॉक-आऊट सोडा बाजारात विक्रीस उपलब्ध असलेचे आढळून आले नाही. नॉक-आऊट बिअर, हॅवर्डस 5000 बिअर, फॉस्टर्स बिअर, पेरोनी, रॉयल चॅलेंज बिअर या सोडयाचा जाहिराती नसून म़द्याच्या जाहिराती आहेत. बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट मधील तरतुदीन्वये मद्याच्या जाहिराती प्रतिबंधित केलेल्या आहे. मद्याच्या जाहिरातींचे होर्डिंग्ज सोडयाची जाहिरात म्हणून शहरातील गर्दीच्या ठिकाणी व महत्त्वाच्या ठिकाणी लावलेल्या आहेत. कोल्हापूर शहर श्री महालक्ष्मीचे पवित्र ठिकाण आहे. अशा पवित्र ठिकाणी सामनेवाला हे अशा प्रकारच्या जाहिराती लावून पापकर्म करीत आहेत. तक्रारदार संस्थेने सामनेवाला क्र.2 यांचेकडे सदरच्या जाहिराती काढून टाकाव्यात याबाबत विनंती केली असता सामनेवाला यांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे या मंचाने सामनेवाला हे दिशाभूल करीत असलेल्या सर्व जाहिराती काढून टाकणेबाबत आदेश व्हावेत. तसेच, सामनेवाला करीत असलेली अनुचित व्यापारी प्रथा थांबविणेबाबत व यापुढेही अनुचित व्यापारी प्रथा करु नये याबाबत आदेश व्हावेत. तसेच, सद्या लावलेले होर्डिंग्ज काढून सामनेवाला यांनी एक आठवडयात ‘शुध्द फळे, लिंबू पाणी, नारळ पाणी’ अशा प्रकारच्या जाहिरातींची होर्डिंग्ज लावावेत. तसेच, सामनेवाला क्र.2, आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांनी अशा प्रकारच्या जाहिरातींबाबत अनुचित व्यापारी प्रथा करु नये असे आदेश द्यावेत व तक्रारदारांच्या तक्रारीचा खर्च देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत जाहिरातीचे छायाचित्र व शपथपत्र दाखल केले आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकले. तक्रारदार संस्था ही शिक्षण प्रसारक व सेवाभावी संस्था आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(जी) व 2(1)(आर) यातील तरतुदींचा विचार करता तक्रारदार हे ग्राहक होत आहेत व ग्राहक या नात्याने त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. Society of Catalysts - vs. Star Plus TV & ors - ग्राहक तक्रार क्र.83/2007 यामध्ये मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी सदर तक्रारीमध्ये दि.11.09.2008 रोजी पारीत केलेला आदेश हा पूर्वाधार प्रस्तुत प्रकरणी लागू होत आहे. (6) तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवादाचेवेळेस कोल्हापूर शहारामध्ये श्री महालक्ष्मीचे पवित्र स्थान आहे. कोल्हापूर शहरात बाहेरुन येणारे लोक श्री महालक्ष्मीसाठी येत असतात. कोल्हापूरातील मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच एस्.स्टी.स्टॅण्ड, कावळा नाका, ताराबाई पार्क इत्यादी ठिकाणी लोकांची गर्दी असते, अशा ठिकाणी सामनेवाला क्र.1 मद्य निर्मिती करणा-या मद्य कंपनीने नॉक-आऊट बिअर, हॅवर्डस 5000 बिअर, फॉस्टर्स बिअर, पेरोनी, रॉयल चॅलेंज बिअर या मद्याच्या जाहिराती सोडयाच्या नांवाखाली प्रदर्शित केल्या आहेत. सदरची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे. सामनेवाला क्र.1 मद्य निर्मिती कंपनीच्या जाहिराती सामनेवाला क्र.2, महानगरपालिका यांच्या परवानगीने लावलेल्या आहेत, अशी वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिली आहे. सामनेवाला क्र.2 महानगरपालिकेच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवादाचेवेळेस अशा प्रकारच्या जाहिराती शहरात ठिकठिकाणी लावलेल्या आहे ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. (7) बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट मधील तरतुदींचा विचार करता मद्य उत्पादनाच्या कोणत्याही जाहिराती जनतेसमोर प्रसिध्द करणेस प्रतिबंध आहे. परंतु, अशा मद्य निर्मितीचे उत्पादन सोडा म्हणून मद्याची जाहिरात प्रसिध्द करतात ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिली व याबाबत तक्रारदारांच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवादाचेवेळेस तक्रारदार संस्थेने कोल्हापूर शहरातील विविध हॉटेल्स्, वाईन शॉप्स् इत्यादीमध्ये नॉक-आऊट, हॅवर्डस 5000, फॉस्टर्स, पेरोनी, रॉयल चॅलेंज या नांवांच्या सोडयाची मागणी केली असता अशा प्रकारचा सोडा विक्रीस नसल्याचे दिसून आले. सामनेवाला क्र.1 यांनी सोडयाऐवजी मद्य उत्पादनाच्या जाहिराती केल्या आहेत व अशा जाहिराती सामनेवाला क्र.2, आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या परवानगीशिवाय होवू शकत नाहीत या मुद्दयांकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. सामनेवाला क्र.2 महानगरपालिका यांच्या वकिलांनी अशा जाहिराती शहरामध्ये असल्याचे मान्य केले आहे. अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिध्द करुन व त्यास परवानगी देऊन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) स्थानिक संस्थेमध्ये कल्याणकारी असणारे व नागरिकांचे हिताचे प्रशासन असावे असे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत सामनेवाला महानगरपालिकेने सोडयाची जाहिरात आहे असे दर्शवून मद्याची जाहिरातीस परवानगी देणे, तसेच प्रोत्साहित करणे व अशा जाहिरातीपासून उत्पन्न घेणे या बाबी कल्याणकारी राज्य या संकल्पनेस हानीकारक आहे. अनुचित व्यापारी प्रथेपासून लाभ घेणे याची निश्चितच जबाबदारी सामनेवाला महानगरपालिकेवर येते. इत्यादी वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाला यांनी त्वरीत सामनेवाला क्र.1 कंपनीच्या अशा जाहिराती काढून टाकाव्यात व पुन्हा अशा जाहिराती प्रदर्शित करणेस परवानगी देवू नये. तसेच, सामनेवाला यांनी सदरचा आदेश मिळालेपासून एका आठवडयात ज्या-ज्या ठिकाणी सामनेवाला क्र.1 कंपनीच्या अशा जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत, त्या-त्या ठिकाणी फक्त ‘‘नैसर्गिक फळांचे रस, लिंबू पाणी, नारळ पाणी - यही है अपना अलग अंदाज’’ अशी होर्डिंग्ज स्वखर्चाने लावावीत. तसेच, प्रस्तुत प्रकरणाचा विचार करता सामनेवाला यांनी येथून पुढे असा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करु नये. तसेच, सामनेवाला क्र.1-मद्य उत्पादक कंपनीने तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- तक्रारदारांना द्यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. प्रस्तुत विवेचनास हे मंच खालील पूर्वाधाराचा आधार घेत आहे :- I (2007) CPJ 102 (NC) - United Breweries Limited vs. Mumbai Grahak Panchayat. Consumer Protection Act, 1986 - Sections 2(1)(g), 2(1)(r) and 14(1)(hc) - Bombay Prohibition Act, 1929 - Section 24 - Unfair Trade Practices - Advertisement - Misleading and surrogate - Prominent display of false, misleading and surrogate liquor advertisements on coaches of Westen Railway trains - Attempt to induce young generations of Railway Administration for commercial advertising prohibit advertisements of alcoholic drinks and various types of drugs - Railway Department contravened - its own guidelines - Contention of O.P. that ‘Soda’ not covered by said prohibitions and impugned advertisement not violative of any law - Rejected - Description made in advertisement matches with whisky and not Soda - Slogan “Ab cold drink out” certainly misleading, for soda could not be replacement of ordinary cold drinks - Adoption of unfair trade practices proved - O.P. who took advantage of wuch practices by publishing surrogate advertisement, not absolved of its liability to issue corrective advertisement to neutralise effect of misleading one - Order of State Commission upheld. (9) उपरोक्त विवेचन व पूर्वाधार यांचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. सामनेवाला यांनी सोडा किंवा तत्सम उत्पादन दर्शवून मद्याच्या प्रदर्शित केलेले होर्डिंग्ज त्वरीत काढून टाकावेत. तसेच, सदर ठिकाणी सामनेवाला यांनी स्वखर्चाने पुढीलप्रमाणे दिलेल्या घोषणेचे होर्डिंग्ज सदरचा आदेश मिळालेपासून एका आठवडयात ठळकपणे प्रदर्शित करावेत :- ‘‘तरुण पिढीने मद्यापासून दूर रहावे - नैसर्गिक फळांचे रस, लिंबू पाणी, नारळ पाणी - यही है अपना अलग अंदाज’’ 2. सामनेवाला यांनी येथून पुढे उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करु नये. 3. सामनेवाला क्र.1, मद्य उत्पादक कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |