तक्रारकर्तीतर्फे वकील ः- श्री. एल.एन.चवरे
विरूध्द पक्ष क्र. 1,2 तर्फे वकील ः- श्रीमती. सुचिता देहाडरा
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 31/05/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. यांचे विरुध्द जिवन विम्याचा दावा नाकारल्यामूळे सदरची तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती श्री. विश्वनाथ सपकू डहाटे यांनी विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडून जिवन विमा रक्कम रू. 1,20,000/-,करीता दि. 28/04/2015 रोजी विमा उतरविलेला होता. परंतू दि. 17/08/2016 रोजी अचानकपणे आजारी पडून त्यांचा मृत्यु झाल्याकारणाने त्याची पत्नी श्रीमती. रत्ना विश्वनाथ डहाटे यांनी विम्याची रक्कम मिळण्याकरीता विरूध्द पक्षाकडे दावा केलेला असून, विरूध्द पक्ष यांनी त्यांचा दावा स्विकारला नसल्याने सदरची तक्रार दाखल करण्यास भाग पाडले आणि त्यांनी जिवन विम्याची रक्कम रू. 1,20,000/-, व्याजासह मिळावी तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी रू. 25,000/-,व तक्रारीचा खर्च रू. 10,000/-, मिळण्याची विनंती केली.
विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी या मंचात आपला लेखीजबाब दाखल करून जिवन विमा काढलेला आहे हे बाब स्विकारली परंतू दिड वर्षात विमाधारक यांचा मृत्यु झाल्यामूळे त्यांनी मृत्युच्या कारणाबद्दल चौकशी केल्याने त्यांना हे आढळून आले की, मयत श्री. विश्वनाथ एस. दहाटे यांनी आपली जन्म तारीख 06/05/1962 असे नोंदविले होते. आणि त्याकरीता भारत सरकार यांनी जारी केलेले आधार कार्ड क्र. 9931 8043 8550 हे त्याच्या नावाने जारी केलेले आहे. परंतू जेव्हा विरूध्द पक्षाने चौकशी केली तेव्हा हे माहित पडले की, विश्वनाथ सपकू डहाटे याची वय 66 वर्ष असे मतदान यादीमध्ये नोंदविली आहे आणि आधार कार्ड वेबसाईटवरून या आधार क्रमांकाची चौकशी केल्याने कोणताही नाव आलेला नाही परंतू वय 70 ते 80 दाखविली आहे असे दस्ताऐवज विरूध्द पक्षाने अभिलेखावर दाखल केलेले आहे. खोटी व बनावटी दस्ताऐवज दाखल करून, विमा करून घेणे हा कायदयाच्या विरूध्द असल्याकारणाने विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा दावा फेटाळला आहे. म्हणून विरूध्द पक्षाने कोणतीही सेवेत त्रृटी केली नसल्याने सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे
03. तक्रारकर्तीची तक्रार, तसेच त्यासोबत जोडलेले कागदपत्र, त्यांचे शपथपत्र व पुरावा तसेच लेखीयुक्तीवाद दाखल केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) व 2) यांनी सुध्दा लेखी उत्तर तसेच त्यासोबत जोडलेले कागदपत्रे व शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद या मंचात दाखल केलेले आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे विद्वान वकील श्री. एल.एन.चवरे आणि विरुध्दपक्ष क्र 1 व 2 तर्फे विद्वान वकील श्रीमती. सुचिता देहाडराय यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
04. सदरच्या तक्रारीत मृतक विश्वनाथ सापकु डहाटे यांनी विरूध्द पक्षाकडून जिवन विमा दि. 28/04/2015 पासून रक्कम रू. 1,20,000/-,करीता घेतले होते. दुर्देवाने अचानकपणे आजारी होऊन त्यांचा मृत्यु दि. 17/08/2016 रोजी झाला. या तक्रारीत संक्षिप्त प्रश्न एकच आहे की, मयत श्री. विश्वनाथ सापकु डहाटे यांनी खोटी व बनावटी दस्ताऐवजाच्या आधारे जिवन विमा उतरविला होता काय ?
तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्ताऐवज व विरूध्द पक्षकारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरून मंचाला मयत श्री. विश्वनाथ सापकु डहाटे यांची खरी जन्मतारीख कोणती आहे हे बघण्याकरीता युक्तीवादाच्या दरम्यान तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्याला त्यांचा जन्म प्रमाणपत्र दाखल करण्याकरीता आदेश मंचानी पारीत केला. त्या अनुषंगाने तक्रारकर्तीच्या अधिवक्तांनी या मंचात ग्रामपंचायत कार्यालय अर्जुनी पं.स. तिरोडा, जि.प. गोंदिया जन्म आणि मृत्यु नोंदवही अनुउलब्धता प्रमापणपत्र अभिलेखावर दाखल केले आहे जिथे असे नमूद आहे की, मयत श्री. विश्वनाथ सापकु डहाटे यांच्या जन्माच्या प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायत अर्जुनी (स्थानिक क्षेत्र) ता. तिरोडा जि. गोंदिया राज्य महारारूष्ट्र या नोंदिणी अभिलेखाचा शोध घेण्यात आला आणि असे दिसून आले की, सन 1952 या वर्षाच्या मूळ अभिलेखामध्ये जन्म घटनेची नोंद करण्यात आली नाही असे नोंदिविले आहे. तसेच त्यांनी मूळ आधार कार्ड या मंचात दि. 13/12/2018 रोजी अभिलेखावर दाखल केली आहे.
05. या मंचाने तक्रारकर्तीने दाखल केलेले मूळ आधार कार्डची चौकशी केल्याने दिसून आले की, तो मूळ आधार कार्ड नसून खोटा व बनावटी आहे. कारण की, यावरती जे फोटो लावले आहे ते कलर फोटोकॉफी करतांना फोटो ठेवून काढलेली आहे असे दिसून येते आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे आधार कार्डचा क्रमांक नाही. याचबरोबर जेव्हा या मंचाने आधार कार्ड वेबसाईड वरून आधार क्रमांक 9931 8043 8550 याचा शोध घेतल्याने कोणताही नाव दिसून आला नाही आणि वय 70 ते 80 वर्ष दाखविण्यात आले आहे विरूध्द पक्षानी दाखल केले दस्ताऐवजावरून ते तंतोतंत जुळत आहे. तसेच चिफ इलेक्ट्रोल ऑफिसर महाराष्ट्र मतदान यादी सन 2017 चे अवलोकन केल्याने यादी भाग क्र. 151/64 तिरोडा, विधानसभा मतदान संघाची यादी क्र. 693 डहाटे विश्वनाथ सापकु याचे वय - 66 वर्ष नोंदविले आहे. यावरून हे स्पष्ट व सिध्द होत आहे की, जिवन विमा घेण्याकरीता तक्रारकर्तीचे मयत पतीने खोटी व बनावटी आधार कार्डच्या आधारे जिवन विमा उतरविला होता. येथे “UBERRIMA FIDE” AND “UTMOST GOOD FAITH” या दोन तत्वाच्या आधारे विमा कंपन्या विमा उतरवितात आणि दोन्ही पक्षावरीत हे बांधनकारक आहे की, त्यांनी जे खरे आहे ते तसाच नोंदवायला पाहिजे होते. परंतू मयत श्री. विश्वनाथ सापकु डहाटे यांनी वरील दोनही तत्वाचा पालन केले नाही. म्हणून विरूध्द पक्ष विमा कंपनीला विम्याचा दावा फेटाळणे हे कायदेशीर असल्याकरणाने त्यांनी सेवा पुरविण्ण्यात कोणतीही कसुर केली नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. म्हणून सदरची तक्रार खारीज करण्यात यावी असे या मंचाचे मत आहे.
06. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(03) तक्रारकर्तीने दाखल केलेली मूळ आधार कार्डची प्रत अभिलेखामध्ये सुरक्षित ठेवण्यात यावी आणि ग्रा.सं.कायदयानूसार जर कोणतीही अपील किंवा रिव्हीजन पिटीशन चालु नसेल तर पाच वर्षानंतर रेकार्ड नष्ट करण्याच्या वेळी तक्रारकर्तीला पाठविण्यात यावे. मुदत संपेपर्यत तक्रारकर्तीला ते परत घेता येणार नाही व ओळखण्याकरीता निशाणी क्र. ‘X’ हे चिन्ह देण्यात येते व निशाणी क्र. ‘1’ सोबत लावण्यात येते.
(4) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(5) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.