नि का ल प त्र :- (मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष) (दि .19-08-2014)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदाराचे पती अशोक लक्ष्मण पोवार जेसीबी भाडयाने देण्याचा व्यवसाय करत होते. तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दि. 4-06-2011 रोजी झालेला आहे. जेसीबी च्या भाडयातून ते आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून जेसीबी नं. एम.एच.09-एक्यू 8279 घेतलेला आहे. सदर वाहनासाठी वि.प. कडून रक्कम रु. 5,00,000/- कर्ज घेतले होते त्या कर्जाची मुदत दि. 5-11-2010 ते 5-10-2013 अशी होती. तक्रारदारांनी वि.प. कडे आतापर्यंत जमा केलेली रक्कम रु. 74,000/- आहे. व पॉलिसीने जमा झालेली रक्कम रु. 5,00,000/- अशी एकूण रक्कम रु. 5,74,000/- अशी आहे. तक्रारदार यांचे पतीना जेसीबी व्यवसायाकरिता वि.प. फायनान्स कंपनीने रक्कम रु. 5,00,000/- चा अर्थपुरवठा मंजूर करुन तक्रारदार यांना वाहन नं. एम.एच.09-एक्यू 8279 दिलेला होता. सदर कर्जाची मुदत दि. 5-11-2010 ते 5-10-2013 अशी होती. तक्रारदाराचे पती दि. 4-06-2012 रोजी मयत झाले असून तक्रारदारांचे पतीचे नावे रक्कम रु. 5,00,000/- ची पॉलिसी होती. सदर पॉलिसी कर्ज रक्कमेत जमा होऊन तक्रारदारांचे कर्जाचे खात्यावर एकूण रक्कम रु. 5,74,000/- इतकी रक्कम जमा झालेली असताना तक्रारदार यांना वि.प. फायनान्स कंपनीने रक्कम रु. 75,603/- जमा करणेबाबत दि. 13-05-2011 रोजी नोटीस पाठविली होती.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात तक्रारदार या आडाणी, आबाल, विधवा महिला असलेने त्यांचे पतीने घेतलेले कर्जाची माहिती व कागदपत्रे उपलब्ध नसलेने वि.प. फायनान्स कंपनीने दि. 18-06-2012 रोजी लेखी अर्ज करुन कर्जाची माहिती व खाते उतारा ची मागणी केली. त्यानंतर दि. 3-07-2012 रोजी वि.प. कंपनीने तक्रारदारांना रक्कम रु. 2,32,824/- थकबाकीची नोटीस पाठविली. तक्रारदाराचे पती यांनी फक्त रक्कम रु. 5,00,000/- कर्ज घेतलेले होते. व विमा रक्कम रु. 5,00,000/- तक्रारदाराचे मयत पती यांचे नावे सदर कर्जात जमा झालेली असताना व कर्ज बाकी नसताना तक्रारदारांना थकबाकी रक्कम रु. 2,32,824/- असलेबाबत कळविले सोबत खाते उतारा दिला. व खाते उता-यावर अॅग्रीमेंट व्हॅल्यु हप्त्याची रक्कम याची संपूर्ण माहिती कळविलेली नाही. सदर खाते उतारा-यावर मयत पतीची यांचे विम्याची रक्कम दर्शविलेली नाही. तक्रारदारांना खाते उतारा न समजणारा असलेने कर्जाची माहिती व थकबाकी तक्रारदार यांना व्यवस्थितरित्या मिळालेली नाही. व सदर नोटीसीत तक्रारदाराचे वाहन जप्त करुन विक्री करणार अशी धमकी दिली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी संपूर्ण कर्जाची माहिती असणारा खाते उतारा व वाहनाची एन.ओ.सी. ची मागणी केली असता तक्रारदारांना वि.प. यांनी कर्जाची व थकबाकी रक्कमेची माहिती दिलेली नाही. व तक्रारदार यांचे वाहन जप्त करुन विक्री करणार अशी धमकी दिलेने तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदाराचे वाहन जप्त केलेस तक्रारदारांचे कौटुंबिक व आर्थिक नुकसान होणारे असून तक्रारदारांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. सबब, वि.प. कंपनीने तक्रारदाराचे जेसीबी वाहन जबरदस्तीने बेकायदेशीरपणे अनाधिकाराने स्वत: किंवा इसमामार्फत निकालपावेतो ओढून नेऊ नये अशी मनाई व्हावी असा अंतरिम अर्ज तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. वि.प. कंपनीकडून योग्य खाते उतारा अॅग्रीमेंट कॉपी, कर्ज मागणी अर्ज इत्यादी कागदपत्रे मिळावीत. व तक्रारदाराचे वाहनाचे एन.ओ.सी. ना हरकत प्रमाणपत्र मिळावे व कर्ज रक्कमेपेक्षा जास्त असलेली रक्कम परत मिळावी व तक्रार खर्च व नुकसानभरपाई म्हणून वि.प. कडून रक्कम रु. 25,000/- मिळावी अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 11 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र. 1 कडे तक्रारदाराचे पतीचा मयत दाखला दि. 4-06-2011, अ.क्र. 2 कडे तक्रारदारांचे कडे आलेली वि.प. यांची नोटीस दि. 13-05-2011, अ.क्र. 3 कडे तक्रारदार यांनी वि.प. कडे दिलेला अर्ज दि. 18-06-2012, अ.क्र. 4 कडे रजि. ए.डी. पोहच दि. 22-06-2012, अ.क्र.5 कडे तक्रारदार यांना वि.प. कंपनीने दिलेले पत्र दि. 5-07-012, अ.क्र. 6 कडे दि. 7-12-2011 रोजीचे वि.प. कडून तक्रारदारांनी विमा रक्कम मिळालेबाबत पत्र दि. 7-12-‘2011, अ.क्र. 7 कडे जमा रक्कम पावती रु.6,000/- दि. 25-03-2011, पावती रक्कम रु. 20,000/- दि. 28-02-2011, पावती क्र. 8,000/- दि. 22-02-2012 व पावती क्र. रु. 8,000/- दि. 8-11-2011 व पावती रक्कम रु. 20,000/- दि. 27-12-2011 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दि. 5-12-2012 रोजी वि. प. कंपनीने पाठविलेली तक्रारदारास नोटीस दि. 7-12-2012, व वि.प. कंपनीचा खाते उतारा दि. 23-09-2012 दाखल केलेला आहे तसेच दि. 16-07-2004 रोजीचे तक्रारदारांचे पतीचे वाहन परवाना (driving licence) दाखल केलेला आहे.
(4) प्रस्तुत कामी वि.प. विमा कंपनी यांनी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांची तक्रार परिशिष्ट निहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांची तक्रार चालणेस पात्र नाही. वि.प. यांचे नाते ग्राहक व सेवा देणारेनाही त्यामुळे तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार व नमूद वाहन अशोक लक्ष्मण पोवार यांच्या नावाने कर्जाने घेण्यात आले होते. तक्रारदार यांचा सदर वाहनासंदर्भात कोणताही हितसंबंध येत नाही. तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणेस बाधा येते. तक्रारदारानी वि.प. कडे कोणताही अर्ज केलेला नव्हता. तक्रारदाराचे पती अशोक लक्ष्मण पोवार यांनी कर्ज मागणीकरिता अर्ज दिला होता. तो दि. 23-09-2010 रोजी मंजूर करण्यात आला होता. त्याप्रमाणे अशोक लक्ष्मण पोवार यांना कर्ज म्हणून रक्कम रु. 5,00,000/- करार क्र. के.एल.पी. आर. 0009200040 लोन कम हायपोथिकेशन कराराने तक्रारदार यांचे पतीने 15-20 फलॅट रेटने रक्कम रु. 5,00,000/- व त्यावर होणारे व्याज देणेचे आहे. सदर कर्जाची रक्कम 36 हप्यात रु. 24,826 चा एक हप्ता व रक्कम रु. 20,222/- प्रमाणे 35 हप्ते देणेचे होते. वि.प. यांनी तक्रारदारास कर्ज अदा केल्यानंतर रु. 74,000/- इतकी रक्कम जमा केली होती. त्यांचे थकीत हप्ते नऊ होते. त्याकरिता त्यांनी रक्कम रु. 1,86,602/- इतकी होती. त्यातून त्यांनी भरलेली रक्कम वजा करता रु. 1,12,602/- इतकी रक्कम येणेबाकी 9 हप्त्यांमध्ये होती. तक्रारदाराचे पती दि. 4-06-2011 रोजी मयत झालेले आहेत. त्याप्रमाणे इन्शुरन्स् पॉलिसी अंतर्गत पुढील हप्त्यांची रक्कम रु. 4,13,065/- इतकी रक्कम दि. 13-07-2011 रोजी अदा करण्यात आली. तरी देखील त्यांच्या मागील थकबाकीपोटी रु. 1,12,602/- व सदर वाहनावर उतरविल्या विम्याची रक्कम रु. 1,12,602/- या रक्कमेकरिता व्याज तक्रारदारा यांचे पतीने भरण्याचे होते ते भरलेले नाही. तक्रारदारांना इन्शुरन्स पेपर व तक्रारदाराचे पती मृत्यूपश्यात सेटल केलेली माहिती तक्रारदार यांना रितसर पाठविलेली आहे. तरीदेखील थकबाकी असल्याने सदर वाहनाकरिता मागील बाकी असल्याने नोटीस पाठवावी लागली आहे. वि.प. यांनी तक्रारदारांचे पतीस सेवा देण्यात कोणतीही त्रुटी केलेली नाही. पॉलिसी व पॉलिसीची कव्हर नोट व इतर सर्व कागदपत्रे या अगोदरच देण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी मागणी केलेली माहिती व तपशिल चुकीचा आहे. वि.प. यांनी विमा व त्यातील अटी व सर्व माहितीची पुरवणी मयत अशोक लक्ष्मण पोवार यांना देण्यात आली होती. व मयताच्या घरी देखील सेटलमेंटची नोंद पाठविण्यात आली होती. व ती नोंद मयताने वाचलेली आहे. व तक्रारदारांचे मृत्यूपश्चात वि.प. यांचे कार्यालयातून मिळालेल्या माहितीपत्रकावरुन कळविण्यात आलेली होती. मयताच्या पॉलिसी अंतर्गत रक्कम रु. 4,13,065/- इतकी रक्कम कर्ज खात्यावर जमा करण्यात येते. तक्रारदारांची तक्रार ही दिशाभूल करणारी आहे. तक्रारदारांनी 9 हप्यांची रक्कम भरण्यास त्यांना ना हरकत दाखल व इतर कागदपत्रे वि. प. देण्यास तयार आहेत. तक्रारदारांचे पतीने वि.प. यांना करार लिहून दिलेला आहे. त्याअंतर्गत करार कलम 15 अन्वये आरबीट्रेशन अॅन्ड कॉन्स्लिेशन अॅक्ट 1996 ची बाधा येते. करार कलम 15-1 प्रमाणे मंचास अधिकारक्षेत्राबाबत बाधा येते. सदरचा वाद हा लवाद कायदा 1996 अंतर्गत येत असून त्याची बाध येते. सबब, सदरची तक्रार फेटाळण्यात यावी. व तक्रारदारांकडून वि.प. यांना रु. 500/- दंड करणेत यावा. तक्रारदारांनी दि. 29-01-2013 रोजी तक्रार दाखल केली असून वि.प. यांनी त्यांचे वाहन जप्त केलेले नाही अशी विनंती वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यात केली आहे. वि.प. यांनी दि. 22-08-2013 रोजी विमा पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे.
(5) वि.प. यांनी दि. 22-08-2013 रोजी विमा पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे. तसेच दि. 29-01-2013 रोजी दि. 8-09-2010 रोजीचे अॅग्रीमेंट (Loan Cum Hypothecation Agreement) व दि. 29-11-2013 रोजीचा कर्जाचा उतारा (Loan A/c. Extract) दाखल केलेला आहे.
(6) तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.पक्ष कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय.
2. तक्रारदार हे तक्रार अर्जाचे खर्चापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम निर्णयाप्रमाणे.
वि वे च न :-
मुद्दा क्र. 1 :
तक्रारदाराचे मयत पती अशोक लक्ष्मण पोवार यांनी जेसीबी नं. एम.एच.09-एक्यू 8279 घेतला. त्यासाठी वि.प. कंपनी यांचेकडून रक्कम रु. 5,00,000/- इतके कर्ज घेतले होते. त्या कर्जाची मुदत दि. 5-11-2010 ते 5-10-2013 अशी होती. कर्ज घेतल्यानंतर अशोक लक्ष्मण पोवार यांचा आठ महिन्यात म्हणजे दि. 4-06-2011 रोजी मृत्यू झाला. तक्रारदाराचे पतीचे मृत्यू होण्यापूर्वी रक्कम रु. 74,000/- इतकी रक्कम वि.प. कंपनी यांना वेळोवेळी दिलेली आहे. दि. 25-03-2011 रोजी रु. 6,000/-, दि. 20-02-2011 रोजी रु. 20,000/-, दि. 22-02-2011 रोजी रु. 8,000/- व दि. 31-01-2011 रोजी रु. 20,000/- व दि. 27-12-2010 रोजी रु. 20,000/- अशी एकूण रक्कम रु. 74,000/- व पॉलिसीव्दारे जमा झालेली रक्कम रु. 5,00,000/- अशी एकूण रक्कम रु. 5,74,000/- एवढी रक्कम वि.प. कंपनी यांना प्राप्त झालेली आहे. या कामी SHEDULE (EMI) चे अवलोकन केले असता पहिला हप्ता रक्कम रु. 24,826/- इतका आहेत उर्वरीत रक्कम रु. 20,222/- व शेवटचा हप्ता रु. 20,230/- आहे. तक्रारदाराचे मयत पती दि. 4-06-2011 रोजी मयत झाले. तदनंतर वि.प. कंपनी यांना पॉलिसीने रक्कम रु. 5,00,000/- इतकी रक्कम मिळालेली आहे. SHEDULE (EMI) तक्रारदाराचे मयत पती यांनी 7 हप्त्यांची रक्कम रु. 1,46,158/- इतकी रक्कम देय लागत होती, त्यांनी त्यापैकी रक्कम रु. 74,000/- इतका भरणा केलेला आहे. त्यांचे मृत्यूपश्चात पॉलिसीव्दारे रक्कम रु. 5,00,000/- इतकी रक्कम वि.प. कंपनी यांना मिळाली आहे. तक्रारदारानी दाखल केले कागदपत्रे यावरुन असे दिसून येते की, उर्वरीत सात हप्त्यांची रक्कम रु. 72,158/- व व्याज तक्रारदार हे देय लागत होते. वि.प. यांनी दि. 13-05-2011 रोजी नोटीस पाठवून रक्कम रु. 75,603/- इतकी रक्कमेची तक्रारदारांकडे मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने दि. 18-06-2012 रोजी जेसीबी नं. एम.एच.09-एक्यू 8279 या वाहनाचे खाते उतारा, हिशोब, व एन.ओ.सी. मिळण्याबाबत तक्रारदारांने वि.प. कंपनीशी पत्रव्यवहार केला. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारांच्या दि. 18-06-2012 रोजीच्या पत्राला उत्तर देऊन तक्रारदार यांचेकडे रक्कम रु. 2,32,824/- इतकी थकबाकीची मागणी केली. तथापि SHEDULE (EMI) प्रमाणे तक्रारदाराचे मयत पती यांनी 7 हप्त्यांची रक्कम रु. 1,46,158/- इतकी रक्कम देय लागत होती, त्यांनी त्यापैकी रक्कम रु. 74,000/- इतका भरणा केलेला आहे वास्तविक तक्रारदाराला एकूण 7 हप्त्याची रक्कम रु. 1,46,158/- त्यातून रु. 74,000/- वजा जाता रक्कम रु. 72,158/- अधिक व्याज एवढी रक्कम तक्रारदार हे वि.प. कंपनीस देय लागत आहेत. तक्रारदाराचे पती दि. 4-06-2011 रोजी मयत झाले आहेत. त्यामुळे सदर थकबाकी रक्कम रु. 72,158/- वरती सदर दि. 4-06-2011 पासून तक्रारदाराने वि.प. व्याज अदा करावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वि.प. कंपनी यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु. 72,158/- व त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 % प्रमाणे दि. 04-06-2011 व्याज स्विकारुन तक्रारदाराला जेसीबी नं. एम.एच.09-एक्यू 8279 वाहनाचे (एन.ओ.सी.) ना हरकत प्रमाणपत्र द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र .2 :-
वर कलम 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत अशंत: त्रुटी केल्याने तक्रारदार तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. तक्रारदारांनी वि.प. कंपनी यांना रक्कम रु. 72,158/- (अक्षरी रुपये बहात्त्र हजार एकशे अठठावन्न फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 04-06-2011 पासून संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज द्यावे. त्यानंतर वि.प. यांनी तक्रारदारांना जेसीबी नं. एम.एच.09-एक्यू 8279 वाहनाचे (एन.ओ.सी.) नाहरकत प्रमाणपत्र द्यावे.
3. वि.प. कंपनीने तक्रारदारास व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.