(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 28 नोव्हेंबर 2014)
अर्जदार हीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हे डब्ल्यु.सी.एल.चंद्रपूर येथे नोकरीत असतांना आजपर्यंत गैरअर्जदार यांचेकडून जवळपास 25 विमा पॉलिसी काढल्या आहेत. अर्जदार हे सन 2011 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर गैरअर्जदाराकडून आजपर्यंत काढलेल्या विमा पॉलिसीची चौकशी केली असता, पॉलिसी क्र.975420259, 975420260, 975420237 या पॉलिसीमध्ये अफरातफर झाल्याचे दिसून आले. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे नियमित हप्त्याची रक्कम अदा केली असतांना सुध्दा गैरअर्जदार यांनी प्रिमियचा भरणा केला नाही. त्यानंतर, अर्जदार यांनी दि.20.3.2009 रोजी मुलांच्या नावानी तीन विमा पॉलिसी काढण्याकरीता रुपये 1,00,000/- नगदी दिले. गैरअर्जदाराने रुपये 30,000/- प्रमाणे केवळ दोन पॉलिसी काढल्या व उर्वरीत रक्कम अफरातफर केली. त्यानंतर अर्जदार यांनी परत दि.21.9.2007 रोजी नवीन पॉलिसी काढण्याकरीता रुपये 1,00,000/- दिले. परंतु, गैरअर्जदार यांनी केवळ रुपये 6,241/- व 6,220/- प्रतिवर्ष प्रमाणे दोन पॉलिसी काढल्या व उर्वरीत रक्कम अफरातफर केली. त्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे दि.24.10.2009 रोजी रुपये 1,00,000/- दिले. परंतु गैरअर्जदार यांनी सदर रकमेतून एकही पॉलिसी न काढता रक्कम गहाळ केली. अर्जदार यांनी दि.24.12.2009 ला उर्वरीत नवीन पॉलिसी काढण्याकरीता रुपये 50,000/- दिले. परंतु, गैरअर्जदार यांनी सदर रकमेतून एकही पॉलिसी न काढता रक्कम अफरातफर केली. गैरअर्जदाराकडून आजपर्यंत काढलेल्या विमा पॉलिसीची चौकशी केली असता, पॉलिसींमध्ये घोळ व अनियमितता दिसून आली. अर्जदाराचे जवळपास रुपये 2,55,000/- ची अफरातफर गैरअर्जदार यांनी केली. अर्जदार यांनी दि.20.5.2013 रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गैरअर्जदाराविरुध्द तक्रार केली. पोलीसांनी सदर गैरकृत्याची दखल घेतली नाही. त्यामुळे, अर्जदारास ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करावी लागली. अर्जदारास गैरअर्जदार कडून अफरातफर झालेली विमा पॉलिसीची रक्कम रुपये 2,55,000/- वसूल करुन मिळण्याचा आदेश पारीत व्हावा. अर्जदारास मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 10,000/- मिळावे व अर्जाचा संपूर्ण खर्च गैरअर्जदारावर लादण्यात यावा, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 9 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.16 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.17 नुसार 25 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.18 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.19 नुसार विमा पॉलिसीच्या 25 प्रती दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.16 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार यांनी पॉलिसी क्र.975420259, 975420260, 975420237 या तिन पॉलिसीमध्ये गैरअर्जदार क्र.1 यांनी पॉलिसी हप्त्याची रक्कम अदा केली असतांना सुध्दा प्रिमियमचा भरणा केला नाही हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. विमा धारक स्वतःच पॉलिसीच्या रकमेचा भरणा करीत होते व सर्व पॉलिसीच्या पावत्याही त्यांच्याकडेच आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणत्याही पॉलिसीत अफरातफर केली नाही. सदर पॉलिसी ही वार्षिक स्वरुपाची असल्याने कुठलाही विमा अभिकर्ता हा संपूर्ण प्रिमियम एकाच वेळेस घेत नाही. अर्जदाराचे दि.24.10.2009 ला गैरअर्जदार क्र.1 कडे रक्कम रुपये 1,00,000/- व दि.24.12.2009 ला रुपये 50,000/- पॉलिसी काढण्याकरीता दिले हे म्हणणे खोटे व तथ्यहीन आहे. गैरअर्जदार क्र. यांनी दि.24.3.2009 ला पॉलिसी क्र.976292226 व 976292227 या पॉलिसी काढल्यानंतर अर्जदाराकडे केव्हाही गेले नाही व कुठलिही पॉलिसी काढली नाही. अर्जदार यांनी दि.20.5.2013 ला पोलीस स्टेशन गडचिरोली येथे खोटी रिपोर्ट दिली. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ची समाजात व इतरञ नाहक बदनामी होऊन प्रतिष्ठा मलीन झाली. गैरअर्जदार क्र.1 ला अर्जदार यांनी रुपये 2,55,000/- कधीही दिले नाही, त्यामुळे सदर रक्कम अफरातफर करण्याचा प्रश्नच येत नाही. अर्जदार यांनी तक्रारीत केलेली मागणी खोटी असल्याने अर्ज खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.18 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदार क्र.2 कडे गैरअर्जदार क्र.1 ने 25 विमा पॉलिसी काढलेल्या होत्या. अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.2 चे कार्यालयात विमा पॉलिसीची रक्कम भरणा केल्याच्या पावत्या दिलेल्या आहेत. त्यापैकी, 16 पॉलिसी सिंगल प्रिमियमच्या व 9 विमा पॉलिसी वार्षीक प्रिमियमच्या काढल्या होत्या. अर्जदाराने तक्रारीत नमूद केलेल्या विमा पॉलिसीची रक्कम उचल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 ला अर्जदाराने किती रक्कम दिली व केंव्हा दिली याबाबत गैरअर्जदार क्र.2 ला माहिती नाही. गैरअर्जदार क्र.2 विरुध्दची तक्रार खोटया, बनावटी कथनावर आधारीत असल्याने खारीज होण्यास पाञ आहे.
5. अर्जदाराने नि.क्र.21 नुसार शपथपञ व नि.क्र.25 नुसार लेखी युक्तीवाद, दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.23 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने दाखल केलेले लेखी उत्तर हाच शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : नाही
2) अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 मध्ये ग्राहकवाद आहे काय ? : नाही
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. गैरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र.2 चे एजंट आहे याकरीता अर्जदाराने त्यांचे तक्रारीत लायसन्स कोड क्रमांक 2035188 असे नमूद केलेले आहे. अर्जदाराने नि.क्र.5 वर गैरअर्जदार क्र.2 ला पक्षकार म्हणून जोडण्याबाबत आवेदनावर गैरअर्जदार क्र.1 चे कोड नंबर 0082997 –C असे नमूद आहे. अर्जदाराने तक्रारीत पॉलिसी क्र.975420259, 975420260, 975420237 चा उल्लेख केलेला आहे. अर्जदाराने दाखल नि.क्र.4 व दस्त क्र.2, 3 व 4 याची पडताळणी करतांना असे दिसले की, वरील नमूद असलेले पॉलिसी अर्जदाराचे नावाने नाही आहे. तसेच, तक्रारीत नमूद असलेला एजंटचा कोड नंबर व वरील नमूद असलेली पॉलिसींमध्ये एजंट कोड मध्ये तफावत दिसून येते. तसेच, वरील नमूद असलेली पॉलिसीत अर्जदाराचे नांव नसल्याने व गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराकडून त्या पॉलिसी काढण्याबाबत कोणताही मोबदला घेतला नसून अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक नाही, असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द असे आरोप लावलेले आहे की, त्यांनी गैरअर्जदाराकडून जवळपास रुपये 2,55,000/- घेवून पॉलिसी काढले नाही व त्या रुपयाची गैरअर्जदार क्र.1 ने अफरातफर केली आहे. सदर कृत्य हा फौजदारी स्वरुपाचे असल्यामुळे व अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व अर्जदार मध्ये असलेला वाद हा ग्राहक वाद संज्ञा मध्ये मोडत नाही असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/11/2014