(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असुन तक्रारीचा आशय थोडक्यात खालिल प्रमाणे..
1. तक्रारकर्ता हा गडचिरोली येथील रहीवासी असुन त्याचेकडे सुमो ग्रॅन्डी MH-33/A-2444 आहे. विरुध्द पक्ष हे चार चाकी वाहन दुरुस्ती करणारी तिरुपती ऑटोमोबाईल्स, टाटा मोटर्स अॅथोराईज्ड सर्व्हिस स्टेशनचे मालक आहेत. तक्रारकर्त्याने दि.03.02.2018 रोजी विरुध्द पक्षाकडे सदर वाहन दुरुस्तीकरीता दिले असता त्यांनी वाहनाची पाहणी करुन अंदाजीत खर्च रु.15,000/- येईल असे सांगितले. परंतु इंजीनमध्ये बिघाड असल्यामुळे वाहनास दुरुस्तीचा संपूर्ण खर्च रु.30,000/- येईल असे सांगितले. सदर दुरुस्ती करीता तक्रारकर्त्याने अनामत रक्कम म्हणून रु.25,000/- नगदी दिले मात्र सदरचा व्यवहार हा आपसी विश्वासावर असल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रु.25,000/- पावती दिली नाही.
2. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याचे शॉपमध्ये येऊन तुमची गाडी दुरुस्त झाली असुन तिला रु.76,135/- खर्च आला असुन त्यातून रु.25,000/- कमी करुन उर्वरित रक्कम देऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारकर्ता दुरुस्त झालेली गाडी बघण्याकरीता गेला असता त्याला उर्वरीत रक्कम रु.51,135/- दिल्यानंतरच गाडी नेता येईल असे सांगितले व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अवास्तव बिल लावल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याला दि.13.03.2018 रोजी गाडीची गरज असल्याने विरुध्द पक्षाला रु.45,000/- नगदी दिले त्यावेळी विरुध्द पक्षाने दुरुस्तीचे बिल उर्वरित रक्कम रु.5,000/- दिल्यावर देण्याचे कबुल केले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि.04.04.2018 रोजी उर्वरित रक्कम रु.5,000/- विरुध्द पक्षास देऊन बिलासोबत गाडीच्या जुन्या पार्टस् ची मागणी केली असता, विरुध्द पक्षाने अशोभनीय भाषेत बोलून गाडीचे सामान देत नाही, तुमचयाने काही बनत असेल ते करा अशी धमकी दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थीक नुकसान तसेच मानसिक, शारीरिक त्रास झाल्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीत विरुध्द पक्षाकडून खोटया बिलाची अवास्तव व गैरवाजवी रक्कम रु.45,000/- द.सा.द.शे.15% व्याजासह मिळावे. तसेच त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,500/- देण्याचे विरुध्द पक्षाला आदेशीत करावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यात आली असता विरुध्द पक्षाने तक्रारीत हजर होऊन आपले उत्तर सादर केले. त्यात त्यांनी चारचाकी गाडी दुरुस्ती करणा-या तिरुपती ऑटोमोबाईल्स, टाटा मोटर्स अॅथोराईज्ड सर्व्हिस स्टेशनचे मालक असल्याचे अमान्य केले तसेच दि.03.02.2018 रोजी गाडी दुरुस्तीकरीता आली असता तक्रारकर्त्याकडून रु.25,000/- व दि.13.03.2018 रोजी रु.45,000/- नगदी मिळाल्याचे मान्य केले आहे. विरुध्द पक्षाने आपल्या विशेष कथनात तक्रारकतर्याने इंजिनचे पूर्ण ओरॉलिंगला खर्च किती येईल असे विचारले असता सुटे भाग, मशिनिंग व लेबर चार्ज धरुन अंदाजे रु.65,000/- ते रु.90,000/- इतका खर्च येईल असे मौखिक व लेखी कळविल्याचे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्त्याला वर्क बोलावुन हेडबाबत चर्चा केली असता त्यांनी हेडचा एवढा मोठा खर्च जमणार नाही, तेव्हा त्यावर निकामी झालेल्या इंजिनचे चांगल्या स्थितीत असलेले जुने हेड कमी किंमतीत लावुन गाडी दुरुस्त करुन द्या असे मौखिक कळविले त्यामुळे रु.12,500/- चे जुने हेड लावण्यात आले असुन तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेले संपूर्ण आरोप हे खोटे असल्याचे नमुद केले. तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे गाडीचे दुरुस्तीचा खर्च कमीच असुन तो प्रत्यक्ष रु.76,160/- इतका असल्याचे मान्य केले आहे. तक्रारकर्त्यास गाडीचे दुरुस्तीचा खर्चाची उर्वरित रक्कम रु. 51,160/- द्यावायाची नसल्यामुळे त्यांनी सदरची तक्रार मंचात दाखल केली आहे त्यामुळे ती खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपत्र लेखी व तोंडी युक्तीवादाचे अवलोकन केले असता मंचसमक्ष खालील मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय.
2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती सेवेत त्रुटी अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसुन येते काय ? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- // कारण मिमांसा // –
6. मुद्दा क्र.1 बाबतः- दोन्ही पक्षांचा एकमेकाशी व्यवहार झाल्याचे तक्रारीत स्पष्ट होत असल्यामुळे व ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक होतो. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
7. मुद्दा क्र.2 बाबतः- तक्रारकर्त्याने स्वतःची गाडी विरुध्द पक्षाकडे बनविण्यासाठी दिली असता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास गाडीचे संपूर्ण दुरुस्तीचा खर्च रु.30,000/- सांगितले व तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास रु.25,000/- दिले. परंतु नंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रु.76,135/- चा खर्च दाखवुन उर्वरित रक्कम रु.51,135/- ची मागणी केली व तक्रारकर्त्याला गरज असल्यामुळे त्याने ती संपूर्ण रक्कम देऊन गाडी घेतली. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने बिलात लावलेले पार्टस् चंद्रपूर वरुन आणून लावले व ‘सदर बिल क्र.745 अनु क्र.9’ वर दाखल असल्याचे कथन केलेले आहे. परंतु सदर बिल दाखल नाही, तसेच तक्रारकर्त्याने गाडी विरुध्द पक्षाकडून घेतली असता तक्रारकर्त्याने कुठेही दुस-या वर्कशॉपमध्ये दाखवुन गाडीचे दुरुस्ती बाबतचा अहवाल सादर केलेला नाही किंवा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत स्वतःच्या किरायदाराचा उल्लेख केला परंतु त्यांचे कुठलेही शपथपत्र दाखल केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याने असे कथन केलेले आहे की, विरुध्द पक्षाने लावलेले स्पेअर पार्ट ज्या ठिकाणाहून खरेदी केले त्याचे बिल दिलेले नाही, हे तक्रारकर्त्याचे म्हणणे गृहीत धरता येत नाही. कारण कोणत्याही दुकानदाराला व्यापार करतांना ग्राहक हे म्हणू शकत नाही की, ‘आम्ही घेतलेली वस्तु तुम्ही कुठून आणली त्याचे बिल आम्हाला द्या’. तरीही सदर प्रकरणात विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरासोबत निशाणी क्र.6 नुसार तक्रारकर्ता मागीत असलेले खरेदी केलेले बिल दाखल केलेले आहे.
विरुध्द पक्षाने आपल्या विशेष कथनात गाडीचे दुरुस्तीबाबत जे कथन केलेले आहे की, जसे जायका मोटर्स, नागपूर इथे हेडबाबत विचारणा केली, देवा मोटर्स, गडचिरोली येथे विचारणा केली, चंद्रपूरचे बोरींग वर्कशॉप उज्वल इंजिनिअरींग येथे गाडीचे हेड, ब्लॉक व क्रँक दुरुस्तीसाठी नेले इ. या सर्व बाबींचे दस्तावेज नि.क्र. 6 नुसार दस्त क्र.6,7,8,9,10 व 11 वर दाखल आहे. सदर दस्तावेजांवरुन सिध्द होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे गाडीचे काम प्रामाणिकपणे केलेले आहे. तसेच विरुध्द पक्षाने निशाणी क्र.13 व 14 नुसार विरुध्द पक्षांचे हेड मेकॅनिक व देवा मोटर्स चे मालक यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे, ज्याला तक्रारकर्त्याने अमान्य केलेले नाही. तसेच विरुध्द पक्षांचा वर्कशॉप हा टाटा मोटर्स चा अधिकृत वर्कशॉप असल्यामुळे व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास त्रुटीपूर्ण सेवा दिली असल्याचे दिसुन येत नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत कुठेही गाडीत काही बिघाड असल्याबाबत मागणी केली नसल्याचे दिसुन येते.
एकंदरीत तक्रारकर्ता व विरुध्द पक्षांमध्ये झालेल्या लेखी/ तोंडी करारानुसार विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची गाडी दुरुस्त केलेली आहे, हे सिध्द होत असल्यामुळे व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची ही तक्रार खारिज होण्यास पात्र आहे. सबब मंच खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
- तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली तक्रार खारिज करण्यात येते.
- दोन्ही पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्यास तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.