मा. अध्यक्ष, श्री. विजय सी. प्रेमचंदानी यांच्या आदेशान्वये
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ता क्रं. 2 दि. 18.10.2015 रोजी विरुध्द पक्ष 1 च्या मालकीचा असलेला Restaurant मध्ये रात्रीच्या जेवणासाठी मित्रा सोबंत स्वतः च्या Wagon-R Car द्वारे गेले होते. विरुध्द पक्षा तर्फे Valet Parking ची सुविधा होती. विरुध्द पक्षाच्या ड्रायव्हरने तक्रारकर्तीची Wagon-R Car Valet Parking साठी नेली असतांना त्यांने व्यवस्थती (Parking) पार्किंग केली नसल्याने कार दुर्घटनाग्रस्त झाली व वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर दि.21.10.2015 रोजी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्ती करुन देण्यास समंती दर्शविली. त्यानंतर त्याने दुरुस्ती करुन देण्यास नाकारले व तक्रारकर्त्याला धमकी दिली म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द सिताबर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला. दि.26.10.2015रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली व नुकसान भरपाईची मागणी केली. विरुध्द पक्षाने त्यावर कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने अशी मागणी केलेली आहे की, तक्रारकर्त्याच्या झालेल्या Wagon-R Car ची नुकसान भरपाई रुपये 1,51,208/-, तसेच गॅरेज मध्ये वाहन ठेवल्याचा खर्च प्रति दिवस रुपये 750/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्याचा आदेश पारित करण्यात आला. नि.क्रं. 8 वर लेखी उत्तर दाखल केले. विरुध्द पक्षाने आपल्या लेखी उत्तरात असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले सर्व आरोप नाकारले आहे. तसेच विरुध्द पक्ष हे Valet Parkingची सुविधा त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करुन देत नाही. म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचे ग्राहक नाही, याच कारणाने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्ता क्रं. 2 चे वाहन दुर्घटनाग्रस्त झाले याचे कारण तक्रारकर्ता क्रं. 2 स्वतः आहे. तक्रारकर्ता क्रं. 2 यांनी बेसमेंट (खालचा मजला) मध्ये स्वतः त्याचे वाहन पार्किंग केले होते. त्यात विरुध्द पक्षाच्या कर्मचारी किंवा वाहन चालकाची कोणताही सहभाग नव्हता. तक्रारकर्ता क्रं. 2 यांनी त्यांच्या मित्रा सोबत मद्यपान सेवन केले असल्याने त्यांनी स्वतः अपघाताची माहिती पोलिसांना दिली नाही. कारण त्यांचे वैद्यकीय तपास होण्याची शक्यता होती. तसेच पार्किंगमध्ये बिल्डींगला झालेल्या नुकसानीबद्दल तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला त्याची नुकसान भरपाई देण्याची संमती दिली होती. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दुस-या दिवशी बिल्डींगला झालेली नुकसान भरपाई देण्यास बोलाविले होते व तक्रारकर्त्याने त्या संदर्भात झालेल्या दुर्घटनाची क्षमा विरुध्द पक्षाकडून मागितली होती. सदर कार गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी टाकल्यानंतर जास्त खर्च येणार म्हणून दि. 21.10.2015 रोजी तक्रारकर्ता 5-6 लोकांसोबत विरुध्द पक्षाच्या Restaurant मध्ये आले व कारला झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली व विरुध्द पक्षाचे Restaurant मध्ये तोडफोड व मारहाण करण्याची धमकी दिली. म्हणून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्या विरुध्द दि.21.10.2015 रोजी रात्री सुमारे 8.00 वाजता पोलिसांत तक्रार नोंदविली व त्यानंतर पोलिसांनी तक्रारकर्त्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. म्हणून तक्रारकर्त्याने खोटी तक्रार विरुध्द पक्षा विरुध्द दाखल केली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारी नंतर एक तासानंतर तक्रार नोंदविली असून ती खोटी आहे. तक्रारकर्त्याने खोटया उद्देशाने सदर तक्रार दाखल केलेली असून ती खारीज होण्यास पात्र आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्या प्रति कोणतीही न्यूनतम सेवा दर्शविलेली नाही व Valet Parking ची सुविधा उपलब्ध केलेली नसल्याने फक्त वाहनाचे झालेले नुकसान बेकायदेशीर रीतीने घेण्याकरिता सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हणून तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
4 तक्रारकर्त्याची दाखल तक्रार, दस्ताऐवज, विरुध्द पक्षाने दाखल केलेला लेखी जबाब, उभय पक्षांचे लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद करण्यात येते.
अ.क्रं. मुद्दे उत्तर
1 तक्रारकर्ता क्रं. 1 हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? नाही .
2 तक्रारकर्ती क्रं. 2 ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय? होय.
3 विरुध्द पक्षाने तक्रारकर्ती क्रं.2 प्रति न्यूनतम सेवा दर्शविली आहे काय ? होय.
4 आदेश अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
- मुद्दा क्रमांक 1 –.तक्रारकर्ता क्रं. 1 हे विरुध्द पक्षाच्या Restaurant मध्ये जेवनासाठी गेले नसल्याने त्यांच्याकडून कोणतीही सेवा घेतलेली नसल्याने तक्रारकर्ता क्रं. 1 हा विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्रमांक 2 - तक्रारकर्ता क्रं. 2 विरुध्द पक्षाच्या Restaurant मध्ये त्याच्या मित्रां सोबत रात्रीच्या जेवणासाठी गेले होते, ही बाब उभय पक्षांना मान्य असल्यामुळे तक्रारकर्ता क्रं. 2 हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्रमांक 3 – तक्रारकर्ता क्रं. 2 ने नि.क्रं. 10 वर दस्तऐवज क्रं.अ Valet Parking रिसीदवरुन सिध्द होते की, विरुध्द पक्षाकडे Valet Parking ची सुविधा होती व तक्रारकर्ता क्रं.2 यांनी वादाच्या दिवशी Valet Parking च्या सुविधाचा उपयोग करुन विरुध्द पक्षाच्या ड्रायव्हर द्वारे स्वतःची कार पार्क करुन घेतली होती. तसेच नि.क्रं. 10 अ दस्तऐवज क्रं. 2 हसन गॅरेज यांनी दिलेल्या पावतीवरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता क्रं. 2 ने त्याच्या वाहनाच्या दुरुस्तीकरिता खर्च केलेला होता.
विरुध्द पक्षाने त्याच्या बचाव पक्षात असे कथन केले की, तक्रारकर्ता क्रं. 2 ने स्वतः कार पार्किंग केली होती व त्यांनी मद्यपानाचे सेवन केलेले होते. परंतु विरुध्द पक्षाने त्या संदर्भात कोणतेही दस्तऐवज पुरावा दाखल केलेला नाही, म्हणून ही बाब ग्राहय धरता येत नाही.
विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता क्रं. 2 च्या विरुध्द पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती, परंतु ती सिध्द करण्याकरिता त्याने विरुध्द पक्षाच्या कोणत्याही कर्मचा-याचे शपथपत्र पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. म्हणून विरुध्द पक्षाने नि.क्रं. 10 वर दाखल दस्तऐवज क्रं. 1 सिध्द होऊ शकले नाही. सबब विरुध्द पक्षाने घेतलेल्या बचावातील तथ्य ग्राहय धरता येत नाही. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता क्रं. 2 ला Valet Parking ची सुविधा देऊन त्यानंतर तक्रारकर्त्याचे वाहन दुर्घटनाग्रस्त केले. यात विरुध्द पक्षाच्या ड्रायव्हरचा सहभाग आहे असे तक्रारकर्तीची तक्रारीतील शपथपत्रावरुन सिध्द होते. सबब तक्रारकर्त्याच्या प्रति विरुध्द पक्षाने न्यूनतम सेवा दर्शविलेली आहे असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्रमांक 4 – तक्रारकर्ती क्रं. 2 ही कारची मालक नाही ही बाब ग्राहय धरुन व मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येते.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता क्रं. 1 ची तक्रार खारीज करण्यात येते.
- तक्रारकर्ता क्रं.2 ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्ती क्रं. 2 ला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,500/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी. 6 तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.