जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 361/2015.
तक्रार दाखल दिनांक : 08/10/2015.
तक्रार आदेश दिनांक : 13/01/2017. निकाल कालावधी: 01 वर्षे 3 महिने 05 दिवस
मोहन शिवाजी हटगाळे, वय 60 वर्षे, व्यवसाय : काही नाही,
रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) श्री. एस.जे. धाबेकर, शहर अभियंता, म.रा.वि.वि.कं., तुळजापूर.
(2) श्री. विष्णू रा. ढाकणे, कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं., तुळजापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : यू.सी. देशमुख
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांनी राहत्या घरामध्ये विरुध्द पक्ष यांच्याकडून घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 593350168924 आहे. विरुध्द पक्ष यांनी दि.15/6/2014 ते 15/7/2014 कालावधीकरिता चालु महिन्याचे रु.382/- व एकूण रु.3,050/- देयकाची आकारणी केली. त्याबाबत तक्रार केली असता दि.15/7/2014 ते 15/8/2014 कालावधीकरिता वीज देयक रु.59,830/- व एकूण रु.62,890/- देयक दिले. त्यानंतर दि.15/8/2014 ते 15/9/2014 कालावधीयकरिता एकूण रु.67,270/- चे देयक देण्यात आले. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीनंतर पुन्हा दि.15/9/2014 ते 15/10/2014 कालावधीकरिता रु.4,714/- व वाढीव चुकीचे देयक कमी करुन रु.36,270/- असे आकारले. तक्रारकर्ता यांचे पुढे असे वादकथन आहे की, दि.5/8/2014 रोजी प्रत्यक्ष रिडींग घेतली. तक्रारकर्ता यांनी पुन्हा तक्रार केली असता विरुध्द पक्ष यांनी दि.30/7/2015 ते 31/8/2015 कालावधीकरिता रु.5,416/- व एकूण रु.72,970/- चे देयक आकारणी केले असून जे चुकीचे आहे. तक्रारकर्ता यांचे नवीन बसलेले मीटरही सदोष आहे. तक्रारकर्ता यांना मोघम स्वरुपात वीज आकार देयके देण्यात येत असून ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विरुध्द पक्ष यांनी दि.10/9/2015 च्या नोटीसद्वारे रु.67,551/- वीज देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, असे कळवले. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी वीज देयक दुरुस्त करण्यासह त्यांचा वीज पुरवठा बेकायदेशीररित्या खंडीत न करण्याचा व मानसिक व आर्थिक नुकसानीकरिता रु.50,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. तक्रारकर्ता यांनी तक्रारीसोबत वीज आकार देयके व विरुध्द पक्ष यांनी पाठवलेली नोटीस दाखल केली आहे.
3. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी तक्रारीत नमुद केलेला ग्राहक क्रमांक व तक्रारकर्ता यांना तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिलेली देयके योग्य आहेत. तक्रारकर्ता यांचा प्रतिमहा विद्युत वापर जास्त युनीटचा असताना प्रत्यक्ष वापराचे युनीट न मिळाल्यामुळे सरासरी युनीट दर्शवून तक्रारकर्ता यांना बील देण्यात आले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या मीटरची प्रत्यक्ष पाहणी केली असता ऑग्स्ट 2014 मध्ये त्यांचा वापर 4627 दिसून आला. त्यामुळे तक्रारकर्ता यांना दि.30/7/2015 ते 31/8/2015 कालावधीचे दिलेले रु.72,967/- चे देयक योग्य आहे. तक्रारकर्ता यांचे तक्रारीनंतर वापरलेल्या युनीटची विभागणी करुन मार्च 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीमध्ये विभागणी करुन ऑक्टोंबर 2014 महिन्यात जास्त लागलेले बील कमी करुन दंड व व्याज न लावता वापरलेल्या युनीटचे रु.36,270/- बील दिले होते. तक्रारकर्ता यांनी मागील वापरलेल्या युनीटचा विचार केला असता तक्रारकर्ता यांचा दरमहा सरासरी 257 युनीट वापर दिसून आला. तक्रारकर्ता यांनी जानेवारी 2014 पासून थकबाकी भरलेली नाही. तक्रारकर्ता यांना दुरुस्त देयक दिल्यामुळे नुकसान भरपाई मागण्याचा त्यांना हक्क नाही. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर तक्रारकर्ता यांचा कंझ्युमर पर्सनल लेजरचा उतारा दाखल केला आहे.
5. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच उभय विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
6. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्याने घरगुती वापरासाठी विरुध्द पक्षाकडून वीज कनेक्शन घेतले, याबद्दल वाद नाही. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने दि.15/7/2014 ते 15/8/2014 या कालावधीकरिता रु.62,890/- चे बील दिले. ज्यामध्ये त्या महिन्याचे रु.59830/- बील होते. तसेच पुढील महिन्याचे रु.67,270/- बील दिले. ज्यामध्ये त्या महिन्याचे रु.3,184/- बील दिले. दि.15/9/2014 ते 15/10/2014 चे रु.4,714/- व वाढीव बील कमी करुन रु.36,270/- चे बील दिले. मात्र दि.30/7/2015 ते 31/8/2015 या कालावधीकरिता रु.5,416/- व एकूण रु.72,970/- बील दिले; ते चुकीचे असल्यामुळे दुरुस्त होण्यास पात्र आहे. मात्र विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, पूर्वी सरासरी युनीट दाखवून तक्रारकर्त्याला बिले दिली होती. दि.31/8/2015 अखेरचे बील प्रत्यक्ष रिडींग घेऊन देण्यात आले आहे; ते बरोबर आहे.
7. तक्रारकर्त्याने ऑक्टोंबर 2013 पासून ऑगस्ट 2015 पर्यंतच्या नोंदलेल्या वीज वापराचे आकडे दिलेले आहेत. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा जानेवारी 2014 पासून सप्टेंबर 2015 पर्यंतचा पर्सनल लेजरचा अकाऊंट उतारा हजर केलेला आहे. तक्रारकर्त्याने जुलै 2014 चे बील हजर केले असून त्यामधील मागील रिडींग 7321, चालू रिडींग 7398, वापर 77 युनीट व बील रु.382/- चे आहे. थकबाकी रु.2,670/- असल्याची नोंद आहे. त्यामागील 11 महिन्यातील वीज वापर दाखवला, तो युनीटमध्ये 56, 15, 51, 59, 264, 64, 66, 78, 62, 80 व 95 असा दाखवलेला आहे. ऑगस्ट 2014 मध्ये मागील रिडींग 1, चालू रिडींग 4628 दाखवलेली आहे व वापर 4627 युनीट व मागणी रु.59,830/- झाली. सप्टेंबर 2014 मध्ये नोंदलेला वीज वापर 409 युनीट, ऑक्टोंबर 2014 मध्ये नोंदलेला वीज वापर 527 युनीट, नोव्हेंबरमध्ये 471 युनीट, डिसेंबरमध्ये 333 युनीट, जानेवारी 2015 मध्ये 271 युनीट, फेब्रुवारी 2015 मध्ये 467 युनीट, मार्च 2015 मध्ये 464 युनीट, एप्रिलमध्ये 296 युनीट, मेमध्ये 411 युनीट, जुनमध्ये 198 युनीट, जुलैमध्ये 223 युनीट तर ऑगस्ट 2015 मध्ये 486 युनीट असा वीज वापर नोंदल्याचे दिसते.
8. कंझ्युमर पर्सनल लेजरप्रमाणे जानेवारी 2014 मध्ये मीटर रिडींग 6874 पासून पुढे गेले. जुलै 2014 मध्ये ते 7098 पर्यंत गेलेले होते. ऑगस्ट 2014 मध्ये मागील रिडींग 1 व चालू रिडींग 4628 व वापर 4627 का दाखवला, याचा काहीही खुलासा होत नाही. मीटर केव्हा बदलले किंवा ते बदलले होते काय, याबद्दल विरुध्द पक्षाने मौन बाळगले आहे. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, ऑक्टोंबर 2013 पासून कमी युनीटचा वीज वापर दाखवून तक्रारकर्त्याला बिले देण्यात आली. याचा अर्थ विरुध्द पक्षाच्या कर्मचा-यांनी कामात कुचराई केली असा होतो. ऑगस्ट 2014 मध्ये एका महिन्यात 4627 युनीट वीज वापर कसा झाला, यावर विरुध्द पक्ष प्रकाश टाकू शकले नाहीत. मात्र विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, अर्जदार याचा दरमहा सरासरी वापर 257 युनीटचा दिसून आला आहे. मात्र ऑक्टोंबर 2014 पासून 300 युनीटच्या वरच वीज वापर नोंदवल्याचे दाखवले आहे.
9. तक्रारकर्ता हा तुळजापूर शहराचा रहिवाशी असून त्याचा धंदा काहीही नाही. तो 60 वर्षे वयाचा असल्यामुळे निवृत्तीचे जीवन जगत असेल. मात्र विद्युत कनेक्शन हे त्याचे घरगुती कनेक्शन आहे, याबद्दल काहीही वाद नाही. जुलै 2014 पूर्वी त्याचा वीज वापर दरमहा 100 युनीटच्या वर सहसा जात नव्हता, अशी नोंद दिसून येते. त्यानंतर अचानक वीज वापर कसा काय वाढला, यावर विरुध्द पक्ष याने काहीही प्रकाश टाकलेला नाही. जर तक्रारकर्ता व्यापारी कारणासाठी वीज वापर करीत नसेल तर एकदम चौपट वीज वापर वाढण्याचे कारण दिसून येते नाही. विरुध्द पक्षातर्फे तक्रारकर्त्याच्या घराचे निरीक्षण करण्यात आल्याचे दिसून येत नाही. शिवाय पूर्वी जर कमी युनीटचा वीज वापर नोंदला गेला असेल तर त्याला पूर्णपणे विरुध्द पक्षाचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्याच प्रमाणे अचानक ऑगस्ट 2014 मध्ये मागील रिडींग 1 व चालू रिडींग 4628 व वीज वापर 4627 असा का नोंदला गेला, याचा विरुध्द पक्षाला खुलासा करता आलेला नाही. हे खरे आहे की, त्या बिलावर मीटर नंबर बदललेला दिसून येतो. पण मीटर केव्हा बदलले, हे सांगण्यास विरुध्द पक्ष असमर्थ ठरले आहेत. ही बाब विरुध्द पक्षाच्याच प्रत्यक्ष माहितीतील आहे.
10. क्षणभर असे मानले की, ऑगस्ट 2014 पूर्वी खुप आधी विरुध्द पक्षाने मीटर बदलले होते. मात्र पूर्वीच्या मीटर रिडींगमध्ये काही भर घालून दर महिन्याचा वीज वापर दाखवून तक्रारकर्त्याला बील देण्यात येत होते. तथापि अचानक ऑगस्ट 2014 मध्ये एवढा वीज वापर नोंदण्याचे कारण काय, हे कळून येत नाही. विरुध्द पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे मार्च 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत जादा बिलाचे समायोजन करण्यात आलेले आहे. पण तसे का गेले, याचे समर्थन विरुध्द पक्ष करु शकलेला नाही. म्हणजेच ऑगस्ट 2014 मध्ये विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला अवास्तव वीज बील दिले, हे उघड होत आहे. त्यामुळे ते बील रद्द होण्यास पात्र आहे. म्हणून आम्ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
ग्राहक तक्रार क्र.361/2015.
आदेश
(1) विरुद पक्षाने तक्रारकर्त्याला दिलेले ऑगस्ट 2014 चे बील रद्द करण्यात येते. त्याऐवजी त्या पूर्वीच्या 3 वर्षातील मासिक सरासरी वीज वापराप्रमाणे तक्रारकर्त्याला त्या महिन्याचे बील देण्यात यावे. तसेच विरुध्द पक्षाने दुरुस्त देयकावर कोणतेही दंड व व्याज आकारणी करु नयेत.
(2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या प्रत्यक्ष वीज वापराची पाहणी करावी व प्रत्यक्ष वीज वापर काढून त्याप्रमाणे ऑगस्ट 2014 नंतरची बिले तक्रारकर्त्याल द्यावीत.
(3) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- द्यावेत.
(4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-