पारित द्वारा – मा. सरिता बी. रायपुरे, सदस्या
1. तक्रारकर्त्याने स्वत:च्या लग्नासाठी सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी विरूध्द पक्षाकडे रक्कम जमा करूनही वेळेवर दागिने न मिळाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 35 अन्वये सदर तक्रार आयोगात दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने दिनांक 22 फेब्रवारी 2020 रोजी विरूध्द पक्ष गणेश ज्वेलर्स यांच्याकडे स्वत:च्या लग्नासाठी सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी रक्कम रू. 2,00,000/- एवढी रक्कम विरूध्द पक्षाच्या आय.डी. बी. आय. बॅंकेतील खाता क्रमांक 0514653800000055, IFSC Code IBKL0000514 वर online जमा केली होती. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षासोबत चर्चा केल्यानंतर स्वतःच्या पंसतीचे डिझाईन दिनांक 11 मार्च 2022 रोजी संगणकीय प्रणाली द्वारे (online) व्हॉट्स ऍप वर पाठविले होते. सदर डिझाईन नुसार दागीने लग्नाच्या 15 दिवस अगोदर तक्रारकर्त्यास देण्यास विरूध्द पक्षकाराने मान्य केले होते. तक्रारकर्त्याने दागिन्याचे डिझाईन विरूध्द पक्षाला पाठविल्यानंतर विरूध्द पक्षाने स्विकारलेल्या विहित मुदतीत व त्यानंतरही सोन्याचे दागिने तक्रारकर्त्यास न दिल्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यांनतर तक्रारकर्त्याने दिनांक 14/05/2022 रोजी रजिस्टर्ड पोष्टाने दागिने / रक्कम देण्याबाबत विरूध्द पक्षाला नोटिस पाठविली. पंरतु विरूध्द पक्षाने सदर नोटिस घेण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर तक्रार आयोगात दाखल करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. करिता तकारकर्त्याने सदर तक्रार दाखल करून विरूध्द पक्षाकडे मागणी केली. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रू. 2,00,000/- द. सा. द. शे. 15% व्याजासह रक्कम परत करावी. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरिक व आथिक त्रासापोटी रू. 50,000/- व तक्रारीच्या खर्चासाठी रू. 25,000/- द्यावे अशी मागणी तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान आयोगाने दिनांक 29/06/2022 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्षाला आयोगामार्फत नोटीस बजावण्यात आली. पंरतु विरूध्द पक्षाने नोटिस घेण्यास नकार दिला अशा आशयाचा शेरा दिनांक 07/07/2022 रोजी दिला. त्यामुळे विरूध्द पक्षाने नोटिस घेण्यास नकार देणे हे विरूध्द पक्षाला नोटीस मिळाली आहे असे ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम 65 मध्ये नमुद आहे. करिता दिनांक 24/08/2022 रोजी न्यायाच्या दृष्टीने व कोणताही विलंब न करता विरूध्द पक्षाविरूध्द निशानी क्रमांक 1 वर “एकतर्फा” आदेश पारित केला.
4. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली पुराव्याचे कागदपत्रे, तसेच तक्रारकर्त्याने स्वतः केलेला मौखीक युक्तीवाद व सादर केलेले कागदपत्राचे अवलोकन केल्यानंतर त्यावरील आमचे निष्कर्ष कारणासहित खालीलप्रमाणे आहेत.
निष्कर्ष
5. सदर तक्रार व तक्रारीत दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी आयोगाच्या असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने स्वतःच्या विवाहासाठी सोन्याचे दागीने बनविण्यासाठी विरूध्द पक्ष गणेश ज्वेलर्स गोंदिया याच्याशी संपर्क करून दागीने तयार करण्याची ऑर्डर दिली आणि दागिन्यासाठी लागणारी रक्कम रू. 2,00,000/- दिनांक 22/02/2022 आणि 23/02/2022 रोजी विरूध्द पक्षाच्या आय. डी. बी. आय. खाता क्रमांक 0514653800000055, मध्ये रक्कम संगणकीय प्रणाली द्वारे जमा केली हे तक्रारीत दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवज क्रमांक 1 विरूध्द पक्षाच्या बॅक खात्यात रक्कम जमा केल्याची पावती तसेच दस्तऐवज क्रमांक 2 तक्रारकर्त्याच्या बॅंक खात्याचे विवरण यावरून स्पषटपणे निदर्शनास येते.
तक्रारकर्त्याचा विवाह दिनांक 17/04/2022 रोजी आयोजीत झाला असल्याने तक्रारकर्त्याने स्वतःच्या पंसतीचे दागिन्याचे डिझाईन दिनांक 11 मार्च 2022 रोजी संगणकीय प्रणाली द्वारे विरूध्द पक्षाच्या व्हाट्स ऍप वर पाठविले होते. विरूध्द पक्षाने विवाहाच्या 15 दिवस अगोदर दागिने बनवून देण्याचे मान्य केले होते. पंरतु विरूध्द पक्षकाराने तक्रारकर्त्यास ठरलेल्या विहित मुदतीत व त्यांनतरही दागिने बनवुन दिले नाही. अशाप्रकारे विरूध्द पक्षाने आश्वासन दिल्याप्रमाणे आपली जबाबदारी योग्य रित्या पार न पाडून तक्रारकर्त्यास सेवा प्रदान करण्यात त्रुटी केली हे दिसुन येते. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास ठरलेल्या मुदतीत दागिने बनवून न दिल्याने तक्रारकर्त्यास मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास दागिने बनवून न दिल्यामुळे रक्कम परत करण्याविषयी नोटीस पाठविली. पंरतु त्या नोटीसला उत्तर सुध्दा दिले नाही तसेच तक्रारकर्त्याने माननीय आयोगात तक्रार दाखल केल्यानंतर आयोगाद्वारे नोटिस पाठविली ती नोटीस घेण्यास नकार दिला. अशाप्रकारे विरूध्द पक्ष तक्रारकर्त्याकडुन रक्कम घेतली व दागिने बनवून देण्याचे मान्य केले परंतु पंधरा दिवसाच्या विहित मुदतीत दागिने दिले नाही तसेच तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली रक्कम परत केली नाही यातच विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सेवा देण्यात त्रुटी केली आहे असे स्पष्ट दिसून येते. तक्रारकर्त्यास विहित मुदतीत दागिने न मिळाल्याने जो मानसिक त्रास सहन करावा लागला तो कदापि भरून निघणार नाही कारण विवाह हा क्षण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय व उत्साहाचा क्षण असतो. त्यामुळे मनासारखे दागिने घालून विवाह पार पाडावा ही प्रत्येकाची इच्छा आकांक्षा असते. पंरतु विरूध्द पक्षाने ठरल्याप्रमाणे वेळेवर दागिने बनवून दिले नाही तसेच दागिने बनविण्यासाठी रक्कम रू. 2,00,000/- घेतली ती रक्कम परत न देऊन तक्रारकर्त्यास सेवा देण्यात त्रुटी केली आहे असे आयोगाच्या निदर्शनास येते. करिता विरूध्द पक्षाविरूध्द खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
6. वरील चर्चेनुरूप व निःष्कर्षावरून मा. आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून दागिने बनवून देण्यासाठी स्विकारलेली रक्कम रू. 2,00,000/- खात्यात जमा झालेल्या दिनांकापासुन 12% व्याजासह परत तक्रारकर्त्याला परत करावी.
3. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विहित मुदतीच्या आत दागिने बनवून न दिल्याने झालेल्या मानसिक, शारिरिक व आथिक त्रासापोटी रू. 25,000/- व तक्रारीच्या खर्चासाठी रू. 2000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
4. निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यांत याव्यात.
5. प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्त्याला परत करण्यांत याव्यात.