निकालपत्र : (दिनांक: 23-09-2014 ) (व्दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
1. तक्रारदार यांनी सामनेवाले, श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या, रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या पतसंस्थेत मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमेची मागणी करुनही परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे एकाच कुटूंबातील असून तक्रारदार यांनी सामनेवाले श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या, रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (यापुढे संक्षिप्तेसाठी “पतसंस्था” असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते स्वरुपात रक्कमा गुंतविलेल्या होत्या त्याचा तपशील खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख | ठेवीचा व्याज दर % |
1 | 0746 | 20,000/- | 03-03-1994 | 03-03-1999 | दामदुप्पट |
2 | 519 | 24,544/- | 08-08-2002 | 08-08-2003 | 11 |
3 | 522 | 55,104/- | 08-08-2002 | 08-08-2003 | 11 |
4 | 518 | 18,310/- | 08-08-2002 | 08-08-2003 | 11 |
5 | 521 | 32,675/- | 08-08-2002 | 08-08-2003 | 11 |
6 | सेव्हिंग्ज खाते नं. 188 | 3,907/- | 31-03-2002 | - | 6 |
3. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1 पतसंस्थेकडे मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते स्वरुपात गुंतविलेली ठेवींची रक्कमेची मुदत संपलेनंतर रक्कमेची मागणी व्याजासह केली असता पतसंस्थेने रक्कमा दिल्या नाहीत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदार ठेवींची कुटूंबियासाठी अडी अडचणीकरिता व कौटुंबिक गरजाकरिता तरतूद यासाठी रक्कम ठेवलेली होती. तक्रारदारांना ठेवींच्या रक्कमांची अत्यंत गरज असताना रक्कमा दिल्या नाहीत. तेव्हा तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्कमांची मागणी केली असता, सामनेवाले पतसंस्था यांनी तक्रारदार यांना ठेवीची रक्कमा दिलेल्या नाहीत. तथापि तक्रारदारांनी ठेवीची रक्कम मागणी करुनही रक्कम देण्यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून ठेव पावतीची रक्कम तसेच त्यावरील व्याजाची मागणी केली. तक्रारदारांनी त्यांचे वर नमूद परिच्छेद कलम-2 नुसार आज अखेर होणारी एकूण रक्कम + व्याज तसेच त्यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रार खर्च रु. 5,000/-, अशी एकुण ठेव पावत्या आणि मानसिक व शारिरीक त्रासासाठी झालेल्या रक्कमा तक्रारदारांना वसुल होऊन मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे.
4. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीसोबत अ.क्र. 1 ते 4 कडे तक्रारदाराने ठेवींच्या छायापती पावत्या, सेव्हिंग्ज खाते नं. 188, अ.क्र. 5 कडे शिवाप्पा भाऊ बिरनाळेंचा मृत्यू दाखला दि. 28-06-2001, अ.क्र. 6 कडे मयत वारस कल्लाप्पा बिरनाळे यांचे मे. कार्यकारी दंडाधिकारी, ता. हातकणंगले, यांचेसमोरील प्रतिज्ञापत्र दि. 6-11-2001, अ. क्र. 7 कडे तक्रारदार कुटुंबाचे रेशनकार्ड दि. 24-02-2003 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारीत शपथपत्र दाखल केले आहे.
5. वि.प. यांना मंचाची नोटीस नोटीस लागू होऊन ते गैरहजर राहिलेने त्यांचेविरुध्द दि. 21-06-2014 रोजी “एकतर्फा” आदेश पारीत करणेत आला.
6. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच अनुषांगिक कागदपत्रे व तसेच तक्रारदार तर्फे वकिलांचे युक्तीवादचा विचार करता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
4 | आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर |
विवेचन-
मुद्दा क्र. 1 - तक्रारदार यांनी मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते स्वरुपात गुंतविलेली रक्कमेच्या पावतीची छायांकित प्रत सादर केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची ठेव स्वरुपात भरलेल्या रक्कमा नाकारलेली नाही. मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमाचा विचार करता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्हणुन मुद्दा क्र. 1 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 - प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांनी पतसंस्थेत मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमा ठेवलेल्या आहेत ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमा परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतु मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे, म्हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्तर मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 –
तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव रक्कमेवर व्याजासह होणारी रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्था यांच्याकडून वर कलम 2 मध्ये नमूद मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खाते ठरलेप्रमाणे नमूद व्याजासह रक्कमा द्याव्यात व त्यानंतर द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याजासह मिळोपावेतो परत देण्यास सामनेवाले पतसंस्था हे जबाबदार आहे असे या मंचाचे मत आहे.
तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खात्यातील रक्कमा न दिल्याने सेवेत त्रुटी केली आहे, त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्यामुळे सामनेवाले पतसंस्था यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रु. 2,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
मुद्दा क्र. 4 - सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 . तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 . सामनेवाले पतसंस्था यांनी तक्रारदार यांना न्यायनिर्णयातील परिच्छेद कलम- 2 मध्ये नमुद असलेल्या मुदतबंद, दामदुप्पट ठेवीं व सेव्हिंग्ज खातेमधील रक्कम ठरलेप्रमाणे अदा करावी व मुदतीनंतर द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे संपूर्ण रक्कम व्याजासह मिळोपावेतो अदा करावी.
3. सामनेवाले पतसंस्था यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
4. वर नमूद आदेश क्र. 2 मधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज अदा केले असल्यास अथवा त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.