न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे जयसिंगपूर येथे सि.स.नं. 53, क्षेत्र 9575.05 चौ.फूटची मिळकत असून सदर मिळकतीमध्ये तळमजला 900 चौ.फूट व प्रथम मजला 400 चौ.फूट आर.सी.सी. इमारत बांधकाम करण्याचे ठरले होते. त्यासाठी तक्रारदार यांनी वि.प. यांची ठेकेदार म्हणून नेमणूक केली. उभयतांमध्ये तसा तोंडी करारही झाला होता. सदरचा करार दि. 5/01/2016 रोजी झालेला होता. त्यानुसार संपूर्ण काम दि.01/09/2016 पर्यंत पूर्तता करुन देण्याची जबाबदारी वि.प. यांनी स्वीकारली होती. सदर कामासाठी तक्रारदार यांनी दि. 15/2/16 रोजी रक्कम रु.5,00,000/-, दि. 23/2/16 रोजी रक्कम रु.4,50,000/- व दि. 27/2/16 रोजी रक्कम रु.50,000/- वि.प. यांना दिलेली आहे. करारात ठरल्याप्रमाणे वि.प. यांनी प्रत्यक्ष काम सुरु केले. म्हणून तक्रारदार यांनी उर्वरीत रक्कम रु. 2,50,000/- जून 2016 मध्ये वि.प. यांना दिले. परंतु सदरची रक्कम मिळालेनंतर वि.प. हे तक्रारदार यांचे काम अर्धवट सोडून निघून गेले. अशा रितीने वि.प. यांनी कराराचा भंग करुन तक्रारदार यांची ग्राहक म्हणून फसवणूक केली आहे. वि.प. हे बांधकाम विहीत मुदतीत पूर्ण करुन देणार नाहीत याची खात्री झालेनंतर तक्रारदार यांनी स्वतः उर्वरीत अपूर्ण बांधकाम अन्य कामगारांच्या मार्फत पूर्ण करुन घेतले आहे. तदनंतर तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये एकूण रकमेबाबत हिशोब झाला. त्याप्रमाणे तक्रारदार यांना देय असलेली रक्कम रु.2 लाख वि.प. हे देणे लागतात. सदरची रक्कम देण्याबाबत वि.प. यांनी दोन साक्षीदार श्रीमंत तांबे व निरंजन पवार यांचेसमक्ष ता. 9/11/2016 रोजी हमीपत्र लिहून दिले. परंतु सदरची रक्कम वि.प. यांनी आजअखेर परतफेड केलेली नाही. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 11/2//17 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली परंतु तरीही वि.प. यांनी रक्कम परत केली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास वि.प. यांचेकडून रक्कम रु.2,00,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत प्रॉपटी उतारा, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेला करार, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोहोच, मिळकतीचे फोटो, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेल्या रकमेची पावती, तक्रारदार यांनी दिलेले वटमुखत्यारपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही त्यांनी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प. यांचेविरुध्द नो से आदेश करण्यात आला.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांचे जयसिंगपूर येथे सि.स.नं. 53, क्षेत्र 9575.05 चौ.फूटची मिळकत असून सदर मिळकतीमध्ये तळमजला 900 चौ.फूट व प्रथम मजला 400 चौ.फूट आर.सी.सी. इमारत बांधकाम करण्याचे ठरले होते. वि.प. हे इंजिनियर आहेत. म्हणून त्यांची सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमणूक केली. उभयतांमध्ये ता. 5/1/2016 रोजी तोंडी करार झाला. तक्रारदार यांनी वि.प. यांना बांधकामपोटी करारपत्राप्रमाणे खाते क्र. 60072045281 व 60174075221 या दोन्ही खातेवर दि. 15/2/2016 रोजी रु. 5 लाख तर ता.23/2/2016 रोजी रक्कम रु.4,50,000/- व ता. 27/2/2016 रोजी रोखीने रु.50,000/- वि.प. यांना दिले होते. तसेच जून 2016 मध्ये रु.2,50,000/- अदा केली. तथापि सदरची रक्कम मिळालेनंतर वि.प. यांनी तक्रारदारयरंचे काम अर्धवट सोडून दिले व करारपत्राप्रमाणे बांधकामाची पूर्तता केलेली नाही. वि.प. यांनी ठरलेप्रमाणे बांधकाम विहीत मुदतीत करुन न दिलेने तक्रारदार यांनी स्वतः उर्वरीत अपूर्ण बांधकाम अन्य कामगारामार्फत पूर्ण करुन घेतले. वि.प. यांनी तक्रारदारांची हिशेबाअंती देय असलेली रक्कम रु.2,00,000/- साक्षीदारांसमक्ष मान्य कली. तथापि वि.प. यांनी सदरची हिशोबाअंती रक्कम तक्रारदार यांना आजतागायत न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.1 ला प्रॉपटी कार्डचा उतारा दाखल केलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी वकीलामार्फत वि.प. यांना पाठविलेली नोटीस व दावा मिळकतीचे फोटो दाखल केलेले आहेत. तसेच तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 15/2/2016 रोजी रक्कम रु.5,00,000/- व ता. 25/2/16 रोजी रक्कम रु.4,50,000/- अदा केलेचे बँक ऑफ महाराष्ट्रचे पावत्या दाखल केलेल्या आहेत. सदरच्या पावत्या/ काऊंटर स्लीप वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. तसेच तक्रारदार यांनी ता. 2/7/2018 रोजी आयोगामध्ये वि.प. यांना महाराष्ट्र बँकेमधून वि.प. यांचे खातेवर रकमा अनुक्रमे रु. 50,000/- व रु. 4,50,000/- दिलेल्या आहेत. त्याकरिता संबंधीत बँक अधिका-यांना ता. 15/2/2016 व 25/2/2016 रोजी खाते क्र. 60072045281/60174075721 खातेवर जमा आहेत. त्या संबंधीत खातेचे स्टेटमेंट, पे स्लीप व अन्य संबंधीत कागदपत्रे घेवून साक्षीस हजर राहणेकरिता साक्षी समन्स अर्ज दिला. सदरचा अर्ज आयोगाने मंजूर करुन संबंधीत बँकेचे अधिकारी यांनी अर्जात नमूद कागदपत्रे आयोगात दाखल केली. सदरचे कागदपत्रांचे अवलोकन करता वि.प. यांचे खातेवर सदरच्या रक्कम रु.5,00,000/- व रु. 4,50,000/- व रु. 50,000/- जमा आहेत. त्याप्रमाणे सदर रकमा वि.प. यांचे खातेवर जमा केलेल्या पे स्लीप दाखल आहेत. सबब, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र व दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 15/2/16 व 25/2/16 रोजी अनुक्रमे रु. 5,00,000/- व 4,50,000/- दिलेचे शाबीत होते. तसेच तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रामध्ये उभयतांमध्ये ठरलेप्रमाणे वि.प. यांनी प्रत्यक्ष बांधकाम करुन देणे, गिलावा करणे, फिनीशींग इ. पूर्तता करुन देणे ठरले होते. ठरलेप्रमाणे वि.प. यांनी प्रत्यक्ष कामकाज केल होते. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास संपादन केलेला होता. त्या कारणाने तक्रारदार यांनी उर्वरीत रक्कम रु. 2,50,000/- जून 2016 मध्ये वि.प. यांना दिले. सदरची कथने तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रावर आयोगामध्ये दाखल केली आहेत. वि.प. यांना प्रस्तुतकामी म्हणणे देणेची संधी असताना देखील वि.प. यांनी तक्रारदारांनी कथने पुराव्यानिशी नाकारलेली नाहीत. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी तक्रारीसोबत अ.क्र.2 ला तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये रक्कम रु. 100/- चे स्टँपपेपरवर करारपत्र दखल केलेल आहे. सदरचे करारपत्र हे तकारदार व वि.प. यांचे दरम्यान ता. 9/11/2016 रोजी झालेले असून सदरचे करारपत्राचे अवलोकन करता
मी जयसिंगपूर येथील घरइमारतीचे सुभाषराव वसंतराव भोसले यांच्या मालकीचे बांधकाम घेतले होते. ते काही अडचणीमुळे पूर्ण होवू शकलेले नाही. मी त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेपैकी माझ्या अंगावर रु.2,00,000/- (रुपये दोन लाख) फक्त जादा निघतात. ते मी आज दि. 9 नोव्हेंबर 2016 पासून दोन महिन्यांचे आत श्री सुभाषराव भोसले यांना परत करत आहे. माझ्या परत देण्याच्या रु. दोन लाख रकमेला श्री श्रीमंत तांबे व श्री निरंजन पवार जबाबदार राहतील.
असे नमूद असून त्यावर साक्षीदार म्हणून श्री श्रीमंत तांबे व निरंजन पवार यांचे सहया आहेत. तसेच लिहून देणार म्हणून वि.प. यांची सही व लिहून घेणार म्हणून तक्रारदार यांची सही आहे. सदरचे करारपत्र वि.प. यांनी आयोगात हजर राहून नाकारलेली नाही. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये वि.प. यांनी तक्रारदारांची देय रक्कम रु. 2,00,000/- आजअखेर परतफेड केलेली नाही. तसेच तक्रारदारांनी ता. 11/2/17 रोजी वि.प. यांना सदर रकमेची नोटीसीद्वारे मागणी केली असता वि.प. यांनी आजअखेर सदरची रक्कम दिलेली नाही. सदरची नोटीस, सदरचे नोटीसीची पोहोच पावती तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदारांचे बांधकाम अपूर्ण ठेवून तसेच ता. 9/11/2016 रोजी हमीपत्राप्रमाणे तक्रारदारांना हिशोबाअंती देय असणारी रक्कम आजतागायत अदा न करुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वि.प. यांनी दिलेल्या हमीपत्राप्रमाणे रक्कम रु. 2,00,000/- ची मागणी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे सदरची रक्कम रु.2,00,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 28/4/2017 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
7. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.2,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 18/4/17 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|