न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी आपले उदरनिवार्हाकरिता “सुर्योदय इंडस्ट्रीज या नावाने आपला व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. सदर व्यवसायाकरिता तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून पी.व्ही.सी. पाईप बेंन्डींग मशिन व त्यास आवश्यक असणारे अॅक्सेसरीज घेणेचे ठरविले. सदर मशिनची किंमत रक्कम रु.5,70,000/- तक्रारदार यांनी अदा केली. परंतु ठरलेल्या मुदतीत वि.प. यांनी मशिन दिले नाही. तदनंतर दि. 7/11/2018 रोजी मॉडेल SI-BEND-19-25-300-400 1/2 “ to 1” (25 mm) PVC pipe Bending हे मशिन दिले. परंतु सदरचे उत्पादन हे डिफेक्टीव्ह होते. म्हणून तक्रारदार यांनी वि.प. यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली. तदनंतर वि.प. यांनी सदर मशिन दुरुस्त केले. परंतु तरीही पूर्वीचे दोष दूर झाले नाहीत. तदनंतर सदरचे मशिनची किंमत कमी झाली आहे असे सांगून वि.प. यांनी रक्कम रु. 4 लाखला खरेदी करण्याचे ठरविले. परंतु सदरची रक्कम वेळेत दिली नाही. म्हणून तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे. वि.प. क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत. सबब, त्यांचेविरुध्द “एकतर्फा आदेश” करण्यात आला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी आपले उदरनिवार्हाकरिता “सुर्योदय इंडस्ट्रीज या नावाने आपला व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. सदर व्यवसायाकरिता तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून पी.व्ही.सी. पाईप बेंन्डींग मशिन व त्यास आवश्यक असणारे अॅक्सेसरीज घेणेचे ठरविले. सदर मशिनची किंमत रक्कम रु.5,70,000/- वि.प. यांनी सांगितली. त्यापैकी रु.1,00,000/- वि.प.क्र.1 यांचे नावे जमा करण्यास सांगितले व उर्वरीत रक्कम वि.प.क्र.2 यांचे नावे जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी दि. 3/09/2018 रोजी रक्कम रु.1,00,000/- व उर्वरीत रक्कम रु. 4,70,000/- इंडसइंड बँक शाखा चोकाक यांच्याकडील सेव्हिंग्ज खातेवर जमा केलेली आहे. सदरची रक्कम मिळाल्यानंतर वर नमूद मशिन 2 महिन्यामध्ये पोहोच करत आहे असे अभिवचन वि.प. यांनी दिले. परंतु ठरलेल्या मुदतीत वि.प. यांनी मशिन दिले नाही. तदनंतर दि. 7/11/2018 रोजी मॉडेल SI-BEND-19-25-300-400 1/2 “ to 1” (25 mm) PVC pipe Bending हे मशिन दिले. तक्रारदार यांनी सदरचे मशिन सुरु करुन सदर मशिनवर 25 mm Bend चे उत्पादन सुरु केले. परंतु सदरचे उत्पादन हे डिफेक्टीव्ह होते. याबाबत वि.प. यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवरच सूचना देवून सूचनेप्रमाणे मशिन सुरु करण्यास सांगितले. त्यानंतर देखील मशिन व्यवस्थित काम करत नव्हते. मशिन सुरु केलेनंतर अर्धा तासानंतर बेंड पंक्चर होणे, बेंडची कॉलर अनबॅलन्स होणे, बेंडवरती स्क्रॅचेस पडणे, पाईप गरम झालेनंतर त्याचा कलर बदलणे, कंट्रोल पॅनेल गरम होणे, वारंवार हिटर खराब होणे असे दोष येवू लागले. त्यामुळे वि.प. यांनी दिलेले मशिन हे सदोष आहे असे दिसून आले. म्हणून तक्रारदार यांनी वि.प. यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली. तदनंतर वि.प. यांनी सदर मशिन दुरुस्त केले. परंतु तरीही पूर्वीचे दोष दूर झाले नाहीत. दि. 14/2/2019 रोजी वि.प. यांनी मशिन दुरुस्त करणेकरिता कामगारांना पाठविले. परंतु सदर कामगारांना देखील सदर मशिनमधील दोष काढता आला नाही. त्यानंतर वि.प. यांचे सांगणेनुसार तक्राररदारांनी मशिनचा हिटर स्वखर्चाने बदलला. म्हणून वि.प. यांनी दि. 4/3/2019 रोजी सदरचे मशिन दुरुस्तीसाठी पुणे येथे नेले. त्याचा खर्च तकारदारांकडून घेतला. त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी मशिन दुरुस्त झाले आहे म्हणून परत पाठवून दिले. म्हणून तक्रारदारांनी मशिन सुरु केले. परंतु त्यावेळी देखील पूर्वीचे दोष आढळून आले. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदारास सदोष मशिन दिले आहे हे स्पष्ट होते. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना सदरचे मशिन परत घेवून आपण दिलेल्या रकमेची मागणी केली. त्यावेळी सदरचे मशिनची किंमत कमी झाली आहे असे सांगून वि.प. यांनी रक्कम रु. 4 लाखला खरेदी करण्याचे ठरविले. त्यानंतर वि.प. यांनी सदर मशिनचा ताबा घेवून सदरची रक्कम तीन महिन्यामध्ये देण्याचे मान्य करुन तसा करार दि. 26/7/2019 रोजी करुन दिला. परंतु सदरची रक्कम वेळेत दिली नाही. वारंवार संपर्क साधूनही वि.प. यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदारांनी वि.प यांना दि. 26/9/2020 रोजी नोटीस पाठविली. परंतु त्यास कोणताही प्रतिसाद वि.प. यांनी दिला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास रक्कम रु.4,00,000/- व सदर रकमेवर होणारे व्याज रु. 80,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. यांनी दिलेले बिल, तक्रारदार यांचे बँकेखातेचे पासबुक, वि.प. यांनी लिहून दिलेले करारपत्र, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोहोच, मशिन दुरुस्तीचे फोटो व त्याबाबतची माहिती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
4. वि.प. क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द “एकतर्फा आदेश” करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार यांनी आपल्या उदरनिवार्हाकरिता सुर्योदय इंडस्ट्रीज या नावाने आपला व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले व सदरचे व्यवसायाकरिता लागणारी मशिनरी पी.व्ही.सी. पाईप बेंडींग मशिन व त्यास आवश्यक असणारे अॅक्सेसरीज वि.प यांचेकडून विकत घेतले. सदर मशिनची किंमत रक्कम रु. 5,70,000/- इतकी होती व आहे व त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रक्कम रु.1,00,000/- वि.प.क्र.1 यांचे नावे व उर्वरीत रक्कम दि. 3/09/2018 रोजी रक्कम रु.1,00,000/- व रक्कम रु.4,70,000/- इंडसइंड बँक, शाखा चोकाक यांच्याकडील सेव्हिंग्ज अकाऊंटवर जमा केलेचे कागदपत्रे याकामी दाखल केले आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
7. तक्रारदार यांना नोटीस आदेश होवूनही ते याकामी हजर राहिले नसलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून पी.व्ही.सी. पाईप बेंडींग मशिन व त्यास आवश्यक असणारे अॅक्सेसरीज विकत घेतले व मशिनची किंमत रक्कम रु.5,70,000/- इतकी सांगितलेने तक्रारदार यांनी वि.प. यांचे कथनानुसार रक्कम रु.1,00,000/- वि.प.क्र.1 यांचे नावे व वि.प.क्र.2 यांचे नावे रक्कम रु. 50,000/- दि. 24/9/2018 रोजी, दि. 9/10/2018 रोजी रु.1,50,000/- NEFT ने, दि. 6/11/2018 रोजी NEFT ने रु.2,50,000/- तसेच दि. 16/11/2018 रोजी रक्कम रु. 20,000/- असे एकूण रक्कम रु.5,70,000/- वि.प. यांना वेळोवेळी दिलेचे तक्रारदार यांनी दाखल केले इंडसइंड बँक खातेवरुन निदर्शनास येते. तसेच तक्रारदार यांनी सदर मशिन दुरुस्तीचे काही फोटोग्राफ्स याकामी दाखल केले आहेत. यावरुन सदरचे मशिन हे नादुरुस्त होते याचीही कल्पना या आयोगास येत आहे. सबब, मशिन नादुरुस्त आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. वि.प. यांना नोटीस लागू होवूनही ते आयोगासमोर हजर नाहीत. याचाच अर्थ असा की, त्यांना सदरच्या तक्रारअर्जातील तक्रार मान्य आहे.
8. तक्रारदार यांनी दाखल केले कागदपत्रांमध्ये अ.क्र.3 वर वि.प. व तक्रारदार यांचे दरम्यान झालेले करारपत्र दाखल केले आहे. यामध्ये सदरचे मशिनरीवर करावे लागणारे काम हे तक्रारदारास जमत नसलेने तक्रारदार हे वि.प. यांना मशिन विकत असलेचे नमूद आहे. तसेच सदरची मशिनरी तक्रारदार यांचेकडून वि.प. हे रक्कम रु. 4,00,000/- ला विकत घेत असलेचेही नमूद आहे. सदरची मशिनरी दि. 27/07/2019 ला वि.प. यांना पाठविलेचेही नमूद आहे व सदरची रक्कम मशिन मिळालेपासून 3 महिन्यांत म्हणजेच दि. 28/10/2019 रोजी अखेर देत असलेचे वि.प. यांनी मान्य केले आहे. मात्र तरीसुध्दा वि.प. यांना वारंवार मागणी करुनही सदरची करारपत्राप्रमाणे निर्धारित केलेली रक्कम वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना परत केलेली नाही व तसा कोणताही पुरावा वि.प. यांनी हजर होवून या आयोगासमोर दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी या संदर्भात वि.प यांना केलेले कॉल्सची लॉग डिटेल्स याकामी दाखल केले आहेत. यावरुन कराराची मुदत संपलेनतर म्हणजेच दि. 28/10/2019 नंतरचे सदरचे कॉल्स दिसून येतात. मात्र सदरची रक्कम रु. 4,00,00/- दिलेचे दिसून येत नाही व पुराव्याचे शपथपत्राद्वारेही तक्रारदार यांनी सदरची करारपत्राप्रमाणेची रक्कम दिली नसलेचे कथन केले आहे. सबब, अशी रक्कम न देवून वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवात्रुटी दिलेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, तक्रारदार यांनी मागितलेल्या मागण्याही अंशतः मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. या संदर्भात तक्रारदार यांनी काही वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिर्णयही दाखल केले आहेत.
V.Kishan Rao
Vs.
Nikhil Super Speciality Hospital & Anr.
There cannot be mechanical or straitjacket approach that each and every case must be referred to expert for evidence.
जरी प्रथमदर्शनी सदरचे मशीन हे सदोष असलेचे या आयोगास दिसत असले तरीसुध्दा त्याबरोबरच करारपत्राप्रमाणे पूर्तता करणेची सर्वस्वी जबाबदारी ही वि.प. यांची होती व आहे. मशीन सदोष असलेनेच वि.प. हे तक्रारदार यांचेकडून स्वतःचेच मशीन पुन्हा विकत घेत आहेत व तसे करारपत्रही याकामी दाखल आहे व ही वस्तुस्थितीही या आयोगास नाकारता येत नाही. जरी तक्रारदार यांनी वर नमूद मा. वरिष्ठ न्यायालयांचा न्यायनिर्णय याकामी दाखल केला असला तरी सदरचे तक्रारअर्जातील मागणी ही मशीनची नसून करारपत्राप्रमाणे वि.प. यांनी रक्कम परत करणेसाठी केली असलेने मशीनचे संदर्भातील तज्ञांचे अहवालाचा प्रश्नच येत याकामी येत नाही. अशा प्रकारे करारपत्राप्रमाणे होणारी रक्कम वि.प. यांनी तक्रारदारास न देवून वि.प. यांनी सेवात्रुटी केलेने तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास तसेच खर्चही झालेचे या आयोगास नाकारता येत नाही. याकरिता सदरचे करारपत्राप्रमाणे असणारी रक्कम रु. 4,00,000/- ही करारपत्राचे संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने देणेचे आदेश वि.प.क्र.1 व 2 यांना करणेत येतात. तक्रारदाराने नुकसान भरपाईपोटी मागितलेली रक्कम रु.20,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 5,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.4,00,000/- अदा करणेचे आदेश करणेत येतात. सदर रकमेवर वि.प. यांनी तक्रारदार यांना करारपत्राचे संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. वि.प. क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.