::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 13/11/2019)
1. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अन्वये त्याचे पॉवर ऑफ अटनीमार्फत दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्तीने दिनांक 10/2/2018 रोजी विरूध्द पक्षाच्या चंद्रपूर येथील प्रतिनिधीकडून परफेक्टो प्रेशर कुकर रू.12,900/- ला विकत घेतला व सदर किमतीचे रकमेचा युनियन बॅंक ऑफ इंडिया वर काढलेला क्र.015608 चा धनादेश विरूध्द पक्ष कंपनीचे नांवे दिला. मात्र तक्रारकर्तीला कुकरचे दिनांक 31/3/2018 चे बिल कुरीयरद्वारे दिनांक 12/9/2018 रोजी प्राप्त झाले. मात्र जी.एस.टी. अंतर्भूत असलेले वैध बिल तसेच गॅरेन्टी कार्ड विरूध्द पक्षाने दिले नाही. याबाबत तक्रारकर्तीने दिनांक 18/7/2018रोजी विरूध्द पक्षाचे नागपूर शाखा तसेच मुख्य शाखेला रीतसर लेखी तक्रार केली.
3. सदर कुकर विकत घेतल्यापासूनच खराब निघाला व तक्रारकर्तीने तशी तोंडी तक्रार वि.प.च्या स्थानिक प्रतिनिधीकडे नोंदविली असता त्यांनी वि.प.चे नागपूर शाखेला कुकर बदलवून देण्याबाबत कळविले,परंतु वि.प.ने अद्याप कुकर बदलवून दिलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 18/7/2018 रोजी विरूध्द पक्षाचे नागपूर शाखा तसेच मुख्य शाखेला लेखी तक्रार केली. यावर वि.प.च्या नागपूर शाखेच्या व्यवस्थापक सौ.अर्चना बडोले यांनी तक्रारकर्तीस नागपूर येथे कुकर घेऊन या जेणेकरून तो तपासून त्यात काय बिघाड आहे हे पहाता येईल असे सांगितले. तक्रारकर्तीने कुकर चंद्रपूर येथे विकत घेतला होता त्यावेळी तिला अनेक आश्वासने दिली गेली होती परंतु त्यानंतर प्रत्यक्ष सर्व्हीस देतांना वि.प.कडून अरेरावीची भाषा वापरली गेली. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 23/8/2018 रोजी वि.प.ला नोटीस पाठवून कुकर बदलवून देण्याची मागणी केली, परंतु वि.प.ने दखल घेतली नाही. सबब तक्रारकर्तीने मंचासमक्ष विरूध्द पक्षाविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला कुकरच्या किंमतीच्या रकमेऐवजी नवीन कुकर द्यावा तसेच तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रास तसेच तक्रार खर्चापोटी द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे रू.10,000/- विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
4. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आला. विरूध्द पक्षाने हजर होवून लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात, तक्रारकर्तीने सदर प्रेशर कुकर हिलॉक्स इंटरनॅशनल प्रा.लि.कंपनीकडून विकत घेतला असून सदर कंपनी ही आवश्यक पक्षकार असूनही तक्रारकर्तीने कंपनीला प्रकरणात पक्षकार केलेले नसल्यामुळे तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. कंपनीच्या करारनाम्याप्रमाणे प्रेशरकुकरबाबत कोणताही वाद उद्भवल्यांस तो चालविण्याचा अधिकार केवळ बंगलोर येथील न्यायालयांना राहील असे नमूद आहे. सबब या मंचाला सदर वाद चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही या कारणास्तवही तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे.
5. वि.प.ने आपल्या लेखी उत्तरात विशेष कथनात नमूद केले की, वि.प.ही प्रतिष्ठीत कंपनी असून अनेक वर्षांपासून स्टेनलेस स्टील उत्पादने निर्मीत करून भारतभर विकण्याचा व्यवसाय करीत आहे. तक्रारकर्तीने दिनांक 10/2/2018 रोजी विरूध्द पक्षाच्या चंद्रपूर येथील प्रतिनिधी पल्लवी पी. केदारपवार यांचेमार्फत परफेक्टो प्रेशर कुकर रू.12,900/- ला विकत घेण्याचा ऑर्डर देऊन त्या किंमतीचे रकमेचा कंपनीचे नांवाने युनियन बॅंक ऑफ इंडिया वर काढलेला क्र.015608 चा धनादेश प्रतिनिधीजवळ दिला. त्यावेळी त्यावर स्वतःचा पत्ता जी-1, हरिओम प्लाझा, नागपूर असा नोंदविला होता. धनादेशाची रक्कम जमा झाल्यानंतर वि.प.चे प्रतिनिधीने दिनांक 31/3/2018 रोजी नागपूर येथे येऊन कुकर तसेच आवश्यक दस्तावेज घेतले, परंतु त्यावेळी ते टॅक्स इन्व्हॉईसची प्रत घेण्यांस विसरले. प्रतिनिधीने सदर कुकर तक्रारकर्तीला चंद्रपूर येथील पत्त्यावर पोचता करून दुरध्वनीद्वारे सदर बिल हे तक्रारकर्तीच्या चंद्रपूर येथील पत्त्यावर पाठविण्यांस सांगितले. व त्याप्रमाणे कुरीयरने सदर बिल तक्रारकर्तीस पाठविण्यात आले. कुकरची डिलीव्हरी दिल्यानंतर 4 महिन्यांनी तक्रारकर्तीचे पती श्री.भालचंद्र पेटकर यांनी दिनांक 18/7/2018 रोजी सदर कुकरमध्ये दोष असल्यामुळे नवीन कुकर देण्याचे तसेच गॅरन्टी कार्ड व जीएसटीसह बिल देण्याची मागणी केली. त्यावर वि.प. यांनी ताबडतोब तक्रारकर्ती व वि.प.चे प्रतिनिधी यांना दुरध्वनीद्वारे सदर कुकर नागपूर येथे घेऊन येण्याबाबत सुचीत करून कुकरची तपासणी करून तो दुरूस्तीयोग्य आहे की बदलून देणे आवश्यक आहे याबाबत निर्णय घेता येईल असे कळविले. मात्र तक्रारकर्तीने पुर्तता केली नाही. यानंतर तक्रारकर्तीचे पतीने दिनांक 23/8/2018 रोजी विरूध्द पक्षांस नोटीस पाठविली. यावर विरूध्द पक्षाने त्यांचे प्रतिनिधीस दुरध्वनीद्वारे, नागपूर शाखेच्या सिमा इखार व निता ठाकरे यांना नवीन कुकरसह पाठविले असून सदर दोषयुक्त कुकरची तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे नवीन कुकर बदली करून देण्यांचे सुचीत केले आहे असे कळविले. मात्र विरूध्द पक्षाचे प्रतिनिधी श्री. केदारपवार यांनी सहकार्य न केल्यामुळे तसेच तक्रारकर्तीचा पत्तादेखील न दिल्यामुळे उपरोक्त सिमा इखार व निता ठाकरे यांना कुकरसह नागपूरला परत जावे लागले. सदर प्रतिनिधी ला नागपूर शाखेच्या व्यवस्थापक श्रीमती बडोले यांचेबाबत व्यक्तीगत राग असल्यामुळे त्यांचेकडून चुकीची कारवाई करण्यांत आली असून विरूध्द पक्षांस सहकार्य न करण्याबाबत तक्रारकर्तीस प्रेरीत करीत आहेत. मात्र विरूध्द पक्ष हे प्रेशर कुकरमध्ये खरोखर दोष असल्यास तो बदलून देण्यांस आजही तयार आहेत. सबब सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तसेच विरूध्द पक्षाचे लेखी म्हणणे, शपथपत्र तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद आणी तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती विरूध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? : होय
2) मंचास प्रस्तूत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे काय ? होय
3) विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
4) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
7. तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाच्या चंद्रपूर येथील प्रतिनिधी श्रीमती पल्लवी केदारपवार यांचेमार्फत विरूध्द पक्ष कंपनीचा परफेक्टो प्रेशर कुकर रू.12,900/- ला विकत घेतला याबाबत तक्रारकर्तीने नि.क्र.2 वर विरूध्द पक्षाने दिलेला टॅक्स इन्वॉईस दिनांक 31/3/2018 प्रकरणात दाखल केला आहे. तसेच सदर बाब विरूध्द पक्षांसदेखील मान्य असल्याने तक्रारकर्ती ही विरूध्द पक्षाची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
8. तक्रारकर्तीने उपरोक्त कुकरकरीता विरूध्द पक्ष यांचे चंद्रपूर येथील प्रतिनिधीमार्फत ऑर्डर दिला असून सदर कुकरची डिलीव्हरीदेखील तिला चंद्रपूर येथे या मंचाचे अधिकारक्षेत्रात प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तक्रार दाखल करण्याचे कारण हे अंशतःचंद्रपूर येथे घडलेले आहे. विरूध्द पक्ष यांनी, सदर व्यवहारात, कोणताही वाद उद्भवल्यास सदर वादाचे निराकरण हे बंगलोर येथील कोर्टात रहातील अशी घातलेली अट ही न्यायासनाचे कार्यक्षेत्र मर्यादीत करुन बंधनकारक करता येत नाही.त्यामुळे सदर अट ही ग्राहय धरणे योग्य नाही. शिवाय तक्रारकर्तीने कुकर निर्माता कंपनीला त्यांचे नागपूर शाखा व्यवस्थापकामार्फत पक्षकार केलेले असल्यामुळे याबाबत विरूध्द पक्षाने घेतलेल्या आक्षेपात तथ्य उरत नाही. सबब विद्यमान मंचास प्रस्तूत तक्रार चालविण्याचे पूर्ण अधिकार असून तक्रारीत आवश्यक पक्षकार अंतर्भूत करण्यांत आलेले आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
9. तक्रारकर्तीने वि.प.च्या स्थानिक प्रतिनिधीकडे सदोष कुकरबाबत तक्रार नोंदविली असता त्यांनी वि.प.चे नागपूर शाखेला कुकर बदलवून देण्याबाबत कळविले होते. यानंतर दिनांक 18/7/2018 रोजी विरूध्द पक्षांस सदोष कुकरबाबत नोटीस पाठविली असता विरूध्द पक्षाने त्यांचे नागपूर शाखेच्या सिमा इखार व निता ठाकरे यांना नवीन कुकरसह पाठविले असून सदर दोषयुक्त कुकरची तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे नवीन कुकर बदली करून देण्यांचे सुचीत केले आहे असे कळविले होते असे विरूध्द पक्षाने त्यांचे लेखी उत्तरात मान्य केले आहे. यावरून विरूध्द पक्षाचे चंद्रपूर येथील प्रतिनिधी यांना कुकरमधील दोषाबाबत कल्पना होती हे सिध्द होते. शिवाय विरूध्द पक्ष हे प्रेशर कुकर बदलून देण्यांस आजही तयार आहेत असे विरूध्द पक्षाने लेखी उत्तरात नमूद केले असून तोंडी युक्तिवादादरम्यानसुध्दा त्याचा पुनरूच्चार केलेला आहे. मात्र विरूध्द पक्ष तसेच त्यांचे स्थानीक प्रतिनिधी यांचेतील समन्वयाअभावी तक्रारकर्तीला तिचा सदोष कुकर बदलवून नवीन कुकर मिळू शकला नाही हे स्पष्ट आहे यात तक्रारकर्तीची काहीही चुक नाही यावरून विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीप्रती न्युनता पूर्ण सेवा दिल्याचे सिद्ध होते. त्यामुळे तक्रारकर्ती, विरूध्द पक्ष यांचेकडून तिचे कडे असलेला उपरोक्त सदोष कुकर बदलवून नवीन कुकर मिळण्यांस तसेच झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
10. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र.160/2018 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीकडील सदोष परफेक्टो कुकर बदलवून
त्याऐवजी त्याच मॉडेलचा नवीन कुकर द्यावा.
(3) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसीक
त्रासापोटी नुकसान भरपाई दाखल रू.2,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रू.1,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.