न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दि. 09/07/2012 रोजी एकूण रक्कम रु. 1,90,000/- साडेपाच वर्षे कालावधीसाठी गुंतविली होती. वि.प. यांनी सदर रक्कम दि. 09/01/2018 रोजी एकूण रक्कम रु. 3,80,000/- परत करणेबाबत करार केला होता. सदर रकमेचा तपशील पुढीलप्रमाणे -
- इन्व्हाईस क्र. DO60010888 रक्कम रु. 35,000/-
- इन्व्हाईस क्र. DO60010886 रक्कम रु. 30,000/-
- इन्व्हाईस क्र. DO60010887 रक्कम रु. 30,000/-
- इन्व्हाईस क्र. DO60010884 रक्कम रु. 30,000/-
- इन्व्हाईस क्र. DO60010885 रक्कम रु. 35,000/-
- इन्व्हाईस क्र. DO60010883 रक्कम रु. 30,000/-
सदर गुंतवणूक वि.प.क्र.2 (क्षेत्रीय अधिकारी, आरंभ डेअरी प्रा.लि.) यांनी कोल्हापूर येथे तक्रारदाराचे घरी येवून स्वीकारली आहे. मुदत संपलेनंतर रक्कम घेणेबाबत तक्रारदार यांनी वि.प. यांच्याशी संपर्क साधणेचा प्रयत्न केला असता, वि.प. यांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, वर ठेवींची रक्कम तक्रारदारांना देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा तसेच कोर्ट खर्च व विलंब व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांचेकडे रक्कम अदा केल्याचे इन्व्हॉईस दाखल केले आहे. तसेच कागदयादीसोबत बँक पासबुकाच्या झेरॉक्सप्रती दाखल केल्या आहेत.
3. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झालेले नाहीत. सबब, वि.प.क्र.1 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश करण्यात आला.
4. वि.प.क्र.2 यांनी याकामी हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प.क्र.2 यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदाराचे घरी जावून कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची रक्कम परत करणेची कोणतीही जबाबदारी वि.प.क्र.2 यांची नाही. वि.प.क्र.2 हे कधीही वि.प.क्र.1 यांचेकडे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नोकरीस नव्हते. वि.प.क्र.2 हे या तक्रारअर्जात नमूद पत्त्यावर कायमचे रहिवासी आहेत. या पत्त्यावर तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेशी कधीही संपर्क साधलेला नाही. तक्रारदार यांनी चुकीच्या पध्दतीने वि.प.क्र.2 यांना याकामी सामील केलेले असलेने त्यांना या प्रकरणातून वगळावे अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे.
5. वि.प.क्र.2 यांना वारंवार संधी देवूनही याकामी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र तसेच वि.प. क्र.2 यांचे म्हणणे यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे ठेवींची व्याजासहीत होणारी रक्कम व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम वि.प. यांचेकडून मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
विवेचन –
मुद्दा क्र. 1 –
7. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीसोबत त्यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे रकमा जमा केल्याबाबतचे इन्व्हॉइसेस दाखल केले आहेत. तसेच बँक पासबुकाच्या प्रतीही दाखल केल्या आहेत. सदर इनव्हॉइसेसचे व बँक पासबुकांचे अवलोकन केले असता, त्यावर वि.प.क्र.1 संस्थेचे नांव नमूद आहे. तसेच सदर पावत्यांवर संस्थेच्या पदाधिका-यांच्या सहया आहेत. वरील सर्व बाबींवरुन तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 संस्थेत ठेवी ठेवलेल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदाराचे कथनानुसार वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 यांचेवतीने तक्रारदारांच्या घरी येवून रकमा स्वीकारलेल्या आहेत. सदरची बाब वि.प.क्र.2 यांनी जरी त्यांचे म्हणणमध्ये नाकारली असली तरी त्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. त्याकारणाने ठेव स्वरुपात गुंतवलेल्या रकमेचा विचार करता, तक्रारदार हे वि.प.क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडे वर नमूद रकमेची मागणी केली असता वि.प. यांनी सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली. ठेवीदाराने मागणी केल्यानंतर किंवा ठेवींची मुदत संपल्यानंतर ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेव रक्कम व्याजासह परत मिळण्याचा तक्रारदाराचा अधिकार आहे. वि.प.क्र.1 यांनी याकामी हजर होवून तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन नाकारलेले नाही. सबब, वि.प.क्र.1 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. ठेवींची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांची ठेव रक्कम व्याजासहीत परत करणेची जबाबदारी वि.प. यांची होती. परंतु वि.प. यांनी तक्रारदारांची रक्कम परत केलेली नाही. वि.प.क्र.2 यांनी जरी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नाकारलेली असली तरी सदर कथनाचे पुष्ठयर्थ त्यांनी कोणतेही शपथपत्र दाखल केलेले नाही अथवा इतर कोणताही स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेल्या कथनांवर विश्वासार्हता ठेवणे हे न्यायोचित वाटते. सबब, सदरची कायदेशीर देय असणारी रक्कम तक्रारदार यांना अदा न करुन वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
9. सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 व वि.प.क्र.2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या वर नमूद ठेव पावत्यांवरील मुदतीनंतर व्याजासह देय झालेली दामदुप्पट रक्कम मिळणेस पात्र आहेत. तसेच ठेवींची मुदत संपलेनंतर सदर ठेवींचे मूळ रकमेवर सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
सबब, याकामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना न्यायनिर्णय कलम 1 मध्ये नमूद केलेल्या ठेव पावत्यांवरील दामदुप्पट रक्कम अदा करावी व सदर ठेवींचे मूळ रकमेवर ठेवींची मुदत संपले तारखेपासून ते सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- अदा करावी.
- जर वरील ठेवींपोटी काही रक्कम वि.प. यांनी यापूर्वी तक्रारदारास अदा केली असेल तर ती वळती करुन घेण्याचा वि.प. यांचा हक्क सुरक्षित ठेवण्यात येतो.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींनुसार वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
(सौ सविता प्र. भोसले) (सौ रुपाली धै. घाटगे) अध्यक्षा (मनिषा सं. कुलकर्णी) सदस्या सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, कोल्हापूर |