न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडून वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेला सॅमसंग कंपनीचा रेफ्रिजरेटर मॉडेल नं.RS 55K 500A02C Batch No. OS 8 N4 ABKB00261 दि. 15/4/2019 रोजी रक्कम रु.90,000/- या किंमतीस खरेदी केला. सदर रेफ्रिजरेटरसाठी वि.प.क्र.4 यांनी एक वर्षाची वॉरंटी/गॅरंटी दिली होती. परंतु खरेदीपासून पाचच दिवसात सदर रेफ्रिजरेटरमध्ये उत्पादित दोष निर्माण होवून सदर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले पदार्थ 2-3 तासांतच खराब होवू लागले होते. याबाबत तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे तक्रार दिली असता त्यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रार नोंदविणेस सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी वि.प.क्र.2 यांचेकडे दि. 21/4/2019 रोजी तक्रार नोंदविली. त्यावर वि.प.क्र.2 तर्फे तंत्रज्ञ यांनी रेफ्रिजरेटरची पाहणी करुन तक्रारदार यांना, तुम्ही चुकीच्या पध्दतीने पदार्थ व भाजीपाला ठेवत आहात, त्यामुळे ते खराब होत आहेत, असा निष्कर्ष काढून तक्रारदारांना दोषी ठरविले. त्यानंतरही पदाथ खराब होण्याची प्रक्रिया बंद न झालेने तक्रारदार यांनी पुन्हा वि.प.क्र.2 यांना कळविले व त्यांचे तंत्रज्ञाच्या निर्देशानुसार रेफ्रिजरेटरमध्ये पदार्थ ठेवले परंतु तरीही पर्दाथ खराब होण्याचे थांबले नाहीत. वि.प.क्र.2 चे तंत्रज्ञ हे रेफ्रिजरेटरमध्ये दोष असलेची बाब मान्य करणेस तयार नव्हते. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदार यांना रेफ्रिजरेटरच्या विक्रीपश्चात सेवा देण्यात अक्षम्य कसुर केली आहे. सदर रेफ्रिजरेटरमध्ये वॉरंटी कालावधीतच उत्पादित दोष निर्माण झालेने तक्रारदार यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांना सदोष रेफ्रिजरेटर देवून सेवेत त्रुटी केल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास रेफ्रिजरेटरची किंमत रक्कम रु.90,000/-, सदर रकमेवर होणारे व्याज रु. 5,400/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत रेफ्रिजरेटर खरेदीचे बिल, वॉरंटी कार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 यांनी याकामी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. वि.प.क्र.3 यांनी रेफ्रिजरेटरसाठी एक वर्षाची गॅरंटी दिली होती हा मजकूर खोटा आहे. वि.प. यांनी सेवा देण्यात कोणतीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदाराने खरेदी केलेल्या रेफ्रिजरेटरमये कोणत्याही प्रकारचेदोष नसलेने तो बदलून देणे अथ्वा त्याच्या किंमतीचापरतावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वि.प.क्र.2 यांनी रेफ्रिजरेटरमधील प्रॉब्लेम हा सेटींग्जशी संबंधीत असल्याबाबत तक्रारदारयांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचे तंत्रज्ञ यांनी तत्तपरतेने रेफ्रिजरेटरची पाहणी केली असता त्यात कुलींगची अडचण त्यांचे निदर्शनास आली. वास्तविक नवीन रेफ्रिजरेटर ख्परेदी केलेनंतर कुलींगबाबत योग्य सेटींग करणे आवश्यक असते. संबंधीत तंत्रज्ञाने तक्रारदार यांना त्याचे सेटींग करुन दिले असता कूलींग व्यवस्थित होत असल्याची खात्री करुन घेतली. वि.प.क्र.2 यांचे तंत्रज्ञाने दोन वेळा भेट देवून रेफ्रिजरेटरच्या तापामानचे सेटींग करुन दिले तसे बाहेरील तापमानाशी सुसंगत अशी सेटींग करणेबाबतची माहिती तक्रारदार यांना समजावून सांगितली. सदरील रेफ्रिजरेटरमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही असे वि.प.क्र.1 यांचे कथन आहे. वॉरंटी कालावधी वस्तू दुरुस्त रुन देण्याची जबाबदारी सेवा देणार यंची असते ती बदलून देणे अथवा त्याचा परतावा देणे वॉरंटीच्या अटी व शर्तीत बसत नाही. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी न दिल्याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प.क्र.2 ते 3 हे नोटीस लागूनही याकामी हजर न झालेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.क्र.1 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प.क्र.1 यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. वि.प.क्र.1 हे सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स या नावाने सॅमसंग या ब्रँडची इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल मालाची उत्पादन करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. वि.प.क्र.3 हे विक्रेते आहत. तक्रारदार यांनी वि.प.क.3 यांचेकडून ता. 15/4/2019 रोजी सॅमसंग कंपनीचा रेफ्रिजरेटर मॉडेल क्र. RS 55K 500A02C Batch No. OS 8 N4 ABKB00261 रक्कम रु. 90,000/- या किंमतीस खरेदी केला. त्यानुसार वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून पुढील एक वर्षाचे कालावधीकरिता वॉरंटी/गॅरंटी दिलेली होती. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी सदरचे रेफ्रिजरेटरची खरेदी पावती तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. सदरची पावती वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, सदरचे पावतीवरील मोबदल्याचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडून खरेदी केले तारखेपासून 5 दिवसांतच म्हणजेच ता. 20/4/2019 रोजी सदर रेफ्रिजरेटरमध्ये उत्पादित दोष निर्माण होवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पदार्थ 2-3 तासांतच खराब होवू लागले. पालेभाज्या, फळे इ. कोमेजून सडू लागली. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे तक्रार नोंदविली असता वि.प.क्र.3 यांनी रेफ्रिजरेटरमध्ये चुकीच्या पध्दतीने पदार्थ व भाजीपाला ठेवत आहात, त्यामुळे ते खराब होत आहेत असा निष्कर्ष काढून तंत्रज्ञ यांनी केवळ वरवर पाहणी करुन तक्रारदारांना दोषी ठरविले. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून मोबदला स्वीकारुनदेखील सदोष रेफ्रिजरेटर देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी ता. 5/2/2021 रोजी दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्रोच अवलोकन करता पॅरॉ क्र.5 व 6 मध्ये
5. तदनंतरही सदर रेफ्रिजरेटर मधील पदार्थ खराब होण्याची प्रक्रिया बंद झालेली नव्हती. त्यामुळे मी पुन्हा दि. 07/05/2019 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे सदर रेफ्रिजरेटर बाबत तक्रार केली. त्यावेळीही सदर वि.प.क्र.2 तर्फे तंत्रज्ञ यांनी मला सदर रेफ्रिजरेटरमध्ये पदार्थ मागील बाजूस ठेवू नका, रेफ्रिजरेटरचे दरवाजाचे जवळ ठेवा असे सांगून माझे तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर मी रितसर वि.प.क्र.2 यांचेकडे दि. 07/06/2019 रोजी तक्रार नोंदविली. त्यावेळी सदर वि.प.क्र.2 यांचे तंत्रज्ञ यांनी सदर रेफ्रिजरेटरची पाहणी करुन सदर रेफ्रिजरेटरमधील सर्व पदार्थ रेफ्रिजरेटरचे ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार मी सदर रेफ्रिजरेटर मधील सर्व पदार्थ रेफ्रिजरेटरचे ड्रॉवर मध्ये ठेवले असता पदार्थ खराब होण्याचे थांबले नाहीत. वास्तविक सदर वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या सदर रेफ्रिजरेटरमध्येच दोष असलेची बाब सदर वि.प.क्र.2 चे तंत्रज्ञ मान्य करणेस तयार नव्हते.
6. अशाही परिस्थितीत सदर रेफ्रिजरेटर वापरत असताना सदर रेफ्रिजरेटरमध्ये पदार्थ कमालीचे खराब होवू लागले होते. त्यामुळे मला व माझे कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यानंतर मी अंतिमतः दि. 23/7/2019 रोजी वि.प.क्र. 2 यांचेकडे तक्रार नोंदविली असता सदर वि.प.क्र.2 यांचे तंत्रज्ञांनी पुन्हा सदर रेफ्रिजरेटरची पाहणी करुन सदर रेफ्रिजरेटर मध्ये कोणताही दोष नसलेचा बनाव केला व मला तुम्हीच खराब झालेल्या भाज्या सदर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता आहात, असे कथन करुन वि.प. यांनी स्वतःची जबाबदारी टाळली आहे.
सबब, तक्रारदारांचे सदरचे पुराव्याचे शपथपत्रावरुन तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे ता. 7/5/2019 व 7/6/2019 रोजी वेळोवेळी सदरचे रेफ्रिजरेटरचे अनुषंगाने तक्रारी केलेल्या होत्या व वि.प. यांचे सांगणेवरुन रेफ्रिजरेटरमधील पदार्थ योग्य त्या जागेवर ठेवलेले होते ही बाब शाबीत होते.
8. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांनी ता. 7/11/2019 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारांचे सदरचे रेफ्रिजरेटरचा प्रॉब्लेम हा सेटींग्जशी संबंधीत असल्याचे सांगून तंत्रज्ञ यांनी रेफ्रिजरेटरची तपासणी केली असता कूलींगची अडचण निदर्शनास आली. नवीन रेफ्रिजरेटर खरेदी केले नंतर कुलींगबाबत योग्य ते सेटींग करणे आवश्यक आहे. रेफ्रिजरेटरची पाहणी करणा-या तंत्रज्ञाने तक्रारदार यांना त्यांचे सेटींग्ज करुन दिले असता कुलींग व्यवस्थित होत असल्याची खात्री करुन घेतली. दोन वेळा वि.प. कंपनीचे तंत्रज्ञाने भेट देवून रेफ्रिजरेटरच्या तापमानाचे सेटींग करुन दिले तसेच बाहेरील तापमानाशी सुसंगत असे सेटींग्ज करणेबाबतची माहिती तक्रारदार यांना दिली. सबब, रेफ्रिजरेटरमध्ये कोणताही दोष नाही असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांनी ता. 1/3/2021 रोजी आयोगामध्ये ता. 7/6/2019, दि. 24/7/2019 रोजीचे कस्टमर सर्व्हिस रेकॉर्ड कार्ड दाखल केले आहे. सदर रेकॉर्ड कार्डवर Vegetable spoil and low cooling, cooling problem नमूद असून Repair – Set found normal working नमूद आहे अ.क्र.3 ला वि.प. यांनी तक्रारदार यांचे ठिकाणी वेळोवेळी जावून भेट दिल्याचे व्हिजीटींग कार्ड दाखल केले आहे. अ.क्र.4 ला ता. 23/7/2019 रोजीचे फ्रीजमीटर रिडींगबाबतचे Temperature Card (Monitoring) दाखल आहे. अ.क्र.5 ला फ्रीज मीटरचा फोटो दाखल केलेला असून As per the specifications, all temperature reading normal. Hence, no defect in unit असे सदर फोटोवर नमूद केले आहे. सबब, वि.प. यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांवरुन वि.प. यांचे म्हणणेनुसार वि.प. कंपनी यांचे तंत्रज्ञाने दोन वेळा सदर रेफ्रिजरेटरचे तापमानाचे सेटींग करुन दिले. तथापि वि.प. यांनीच त्यांचे म्हणणेमध्ये सदर रेफ्रिजरेटरमध्ये कुलींगची अडचणी निदर्शनास आली हे मान्य केलेले आहे. तसेच वि.प यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सदर रेफ्रिजरेटरचे कूलींग प्रॉब्लेम होते ही बाब कागदपत्रांवरुन सिध्द होते. वि.प. यांनी सदरकामी रेफ्रिजरेटर मीटरचे रिडींग दाखवत असलेबाबत व रेफ्रिजरेटर व्यवस्थित असलेचा कागद दाखल केलेला आहे. तथापि त्याअनुषंगाने सदरचा रेफ्रिजरेटर तपासलेचे तंत्रज्ञाचा कोणताही अहवाल दाखल केलेला नाही. वि.प. यांनी अ.क्र.5 ला दाखल केलेला Freeze meter reading कागदपत्रांवर कोणत्याही तंत्रज्ञाची सही अथवा शिक्का नाही. सबब, वि.प. यांनी त्यांची कथने पुराव्यानिशी शाबीत केलेली नाहीत. परंतु तक्रारदार यांनी ता. 29/6/2021 रोजी सदरचे रेफ्रिजरेटरमधील खराब झालेल्या फळांचे फोटो आयोगात दाखल केले आहेत. सदचे फोटो वि.प. यांनी नाकारलेले नाहीत. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदारांचे रेफ्रिजरेटरमध्ये कुलींगचा प्रॉब्लेम होता ही बाब वि.प यांनी मान्य केलेली आहे. सदरचा प्रॉब्लेम हा आजपर्यंत तसाच आहे, ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्या खराब फळांचे फोटोवरुन शाबीत होते. सबब, वि.प यांनी तक्रारदार यांचेकडून सदर रेफ्रिजरेटरचे मोबदल्यापोटी रक्कम स्वीकारुन विक्री पश्चात तक्रारदार यांना सेवा न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
9. उपरोक्त मुद्दा क्र.2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सदर रेफ्रिजरेटरचे वॉरंटी कार्ड दाखल केले आहे. सदचे वॉरंटी कार्डवर वि.प. यांचा शिक्का आहे. सबब, तक्रारदार हे वि.प यांचेकडून त्याच किंमतीचा नवीन रेफ्रिजरेटर बदलून मिळणेस पात्र आहे. तथापि काही तांत्रिक कारणास्तव सदर रेफ्रिजरेटर बदलून देणे वि.प. यांना अशक्य असल्यास तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून संयुक्तिकरित्या सदर रेफ्रिजरेटरची खरेदी रक्कम रु. 90,000/- मिळणेस पात्र पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर ता. 15/4/2019 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
10. वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून संयुक्तिकरित्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वादातील रेफ्रिजरेटर किंमतीचा नवीन रेफ्रिजरेटर विनाविलंब बदलून द्यावा.
-
तांत्रिक कारणामुळे वि.प. क्र.1 ते 3 यांना सदोष रेफ्रिजरेटर बदलून देणे अशक्य असलेस वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांचेकडून स्वीकारलेली रक्कम रु.90,000/- तक्रारदार यांना अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 15/04/19 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. - तक्रारदार यांनी सदोष रेफ्रिजरेटर वि.प. यांना परत करावा.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयामधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
(सौ सविता प्र. भोसले) (सौ मनिषा सं. कुलकर्णी) अध्यक्षा (सौ रुपाली धै. घाटगे) सदस्या सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, कोल्हापूर | | | | |
|
|