तक्रारदार : वकील श्री.वाय.एम.जाधव हजर.
सामनेवाले क्र.1 : प्रतिनिधी श्री.कमलेश भारवानी हजर.
सामनेवाले क्र.2. : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.2 हे भ्रमणध्वनी संचाचे उत्पादक आहेत. तर सा.वाले क्र.1 हे विक्रेते आहेत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांनी उत्पादित केलेला भ्रमणध्वनी संच सा.वाले क्र.1 यांच्याकडून दिनांक 22.2.2009 रोजी रु.14,328/- येवढया किंमतीस विकत घेतला व त्या बद्दल सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना पावती दिली.
2. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे भ्रमणध्वनी संच विकत घेतल्यापासून त्यामध्ये दोष निर्माण झाला. तक्रारदारांनी तो भ्रमणध्वनी संच सा.वाले क्र.1 यांना दाखविला व सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना सा.वाले क्र.2 उत्पादकाचे सुविधा केंद्रामधून तो दुरुस्ती करुन घेण्यास सांगीतले. त्या प्रमाणे तक्रारदारांनी तो भ्रमणध्वनी संच सा.वाले क्र.2 यांचे सुविधा केंद्रामध्ये दुरुस्तीकामी जमा केला. तक्रारदारांचे कथना प्रमाणे सा.वाले क्र.2 यांच्या सुविधा केंद्राने तो भ्रमणध्वनी संच तक्रारदारांना दुरुस्त करुन दिल्याचे सांगीतले. परंतु त्यामध्ये पूर्वी असलेला दोष कायमच होता. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे तक्रार केली. परंतु सा.वाले यांनी भ्रमणध्वनी संचातील दोष दुरुस्त करुन दिले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी वकीलामार्फत सा.वाले यांना नोटीस दिली, व भ्रमणध्वनी संच बदलून मागीतला. त्या मागणीची सा.वाले यांनी पुर्तता केलेली नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 2.1.2010 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांचेकडून भ्रमणध्वनी संचाची किंमत रु.14,328/- 9 टक्के व्याजासह वसुल होऊन मिळावी तसेच रु.66,500/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
3. सा.वाले क्र.2 यांना मंचाचे वतीने नोटीस बजावल्यानंतर सा.वाले क्र.2 यांचे वकील निषा दुबे दिनांक 15.4.2011 रोजी मंचासमक्ष हजर झाले. त्यांना तक्रारीची नोटीस, तक्रार तसेच तक्रारीतील कागपत्रांच्या प्रती पुरविण्यात आल्या. त्यानंतरही सा.वाले क्र.2 यांच्या वकीलांनी हजर होऊन कैफीयत दाखल केलेली नाही. या सर्व घटना दिनांक 15.4.2011, 22.6.2011 व दिनांक 27.7.2011 च्या रोजनाम्यामध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत. अंतीमतः दिनांक 10.10.2011 रोजी सा.वाले क्र.2 यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
4. सा.वाले क्र.1 यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, भ्रमणध्वनी संच सा.वाले क्र.2 यांनी उत्पादित केलेला आहे व त्यामध्ये काही दोष असल्यास सा.वाले क्र.2 हेच जबाबदार आहेत.
5. त्यानंतर तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार, सा.वाले क्र.1 यांची कैफीयत, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, व कागदपत्रे, यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना सदोष भ्रमणध्वनी संच विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अशतः मंजूर |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याच्या शपथपत्रासोबत भ्रमणध्वनी संचाची मुळची पावती जोडली आहे. त्यातील मजकूरावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांनी उत्पादित केलेला भ्रमणध्वनी संच सा.वाले क्र.1 यांचे कडून रु.14,328/- येवढया किंमतीस विकत घेतला. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रासोबत जॉबकार्ड निांक 24.3.2009 ची प्रत जोडली आहे. त्यातील नोंदी असे दर्शवितात की, भ्रमणध्वनी संचामध्ये दोष आढळून आल्याने तक्रारदारांनी तो भ्रमणध्वनी संच सा.वाले क्र.2 यांच्या सुविधा केंद्राकडे जमा केला. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रासोबत वकीलातर्फे दिलेल्या नोटीसीची प्रत दिनांक 21.4.2007 दाखल केलेली आहे. त्यातील नोंदीवरुन असे दिसते की, सा.वाले क्र.2 यांच्या सुविधा केंद्राने तक्रारदारांना असे सांगीतले की, भ्रमणध्वनी संचामध्ये बरेच दोष आहेत. तक्रारदारानी आपल्या तोंडी युक्तीवादाचे दरम्यान हे कबुल केले की, भ्रमणध्वनी संच सद्या त्यांचेकडे असून दुरुस्त केल्यानंतरही त्यात पूर्वीचेच दोष कायम आहेत, व तक्रारदार तो भ्रमणध्वनी संचाचा वापर करु शकत नाही.
8. सा.वाले क्र.2 यांनी हजर होऊन तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनास नकार दिलेला नाही. या प्रमाणे तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन अबाधित रहाते. त्या व्यतिरिक्त तक्रारदारांनी तक्रारीतील कथना सोबत जोडलेल्या कागदपत्रावरुन पुष्टी मिळते. सबब उपलब्ध पुराव्यावरुन असे सिध्द होते की, सा.वाले क्र.1 व 2 यांनी सदोष भ्रमणध्वनी संच तक्रारदारांना विक्री केला. त्यातही भ्रमणध्वनी संचामध्ये दोष असल्याची बाब दिसल्यानंतर देखील सा.वाले क्र.2 यांनी तो भ्रमणध्वनी संच पूर्णतः तक्रारदारांना पूर्णतः दुरुस्त करुन दिला नाही. सहाजिकच तक्रारदारांनी रु.14,328/- येवढी भरमसाठ रक्कम खर्च करुन देखील त्या रक्कमेचा फायदा घेऊ शकले नाहीत. या उलट तक्रारदारांना मानसिक त्रास व कुचंबणा सहन करावी लागली. येवढेच नव्हेतर तक्रारदारांना वकीलामार्फत सा.वाले यांना नोटीस द्यावी लागली व तक्रार दाखल करावी लागली.
9. सा.वाले क्र.2 हे भ्रमणध्वनी संचाचे उत्पादक असल्याने व त्यांच्या दुरुस्ती केंद्राने दुरुस्तीकामी तक्रारदारांचा भ्रमणध्वनी संच स्विकारला असल्याने अंतीम आदेश फक्त सा.वाले क्र.2 यांचे विरुध्द करण्यात येतो.
10. तक्रारदारांचे तक्रारीतील कथन विचारात घेता सा.वाले क्र.2 यांनी भ्रमणध्वनी संच दुरुस्त करुन द्यावा असा आदेश देणे योग्य व परीणामकारक ठरणार नाही. या उलट त्या मधून गुंतागुंत व नविन वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनी संचाची किंमत व्याजासह परत करावी असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 2/2010 सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द अंशतः
मंजूर करण्यात येते व सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्द रद्द करण्यात
येते.
2. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना सदोष भ्रमणध्वनी संच विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनी संचाची किंमत रु.14,328/- दिनांक 22.2.2009 पासून त्यावर 9 टक्के व्याजसह परत करावी असा आदेश सामनेवाले क्र.2 यांना देण्यात येतो.
4. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.2 यांच्या सुविधा केंद्रामध्ये मुळचा भ्रमणध्वनी संच जमा करावा व त्याची पावती घ्यावी व त्यानंतर वरील आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.2 यांनी करावी.
5. या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रास, कुचंबणा, गैरसोय व तक्रारीचा खर्च या बद्दल नुकसान भरपाई असे एकंदर रु.10,000/- अदा करावेत असाही आदेश सामनेवाले क्र.2 यांना देण्यात येतो.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.