Dated the 17 May 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.प्र.अध्यक्षा
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे फर्निचरच्या दुकानातून ऑक्टोंबर-2013 रोजी सोफासेट व इतर फर्निचर रक्कम रु.47,000/- इतक्या किंमतीचे विकत घेतले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना यासंदर्भात पावती दिली आहे.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे ऑर्डर दिलेल्या फर्निचरची वैशिष्टे खालील प्रमाणे होती.
अ) इंग्रजी एल आकाराच्या कॉर्नर असलेल्या 24 इंचाची खुर्ची तसेच कॉर्नर मोठया आकाराचा एक मोठा सोफासेट.
ब) मोठया आकाराचा 72 इंचाचा सोफा (लॉन्चर)
क) खुर्च्यांना फीनिशिंग असेल
ड) एकूण आठ कुशन्स ज्या चार मोठया एक सोनेरी रंगाची लहान व इतर मोठया व
पिवळया रंग संगतीच्या इतर एकूण आठ खुर्च्या,
इ) सोफ्याचे पाय टिकूवुडचे असतील
ई) चांगल्या दर्जाच्या चेन्स असतील
उ) सदर सोफ्यात वापरण्यात येणारे फोम 40 डेन्सीटीचे असतील
ऊ) सर्व फर्निचर हे सागवान फ्रेममध्ये असेल
3. वरील प्रमाणे वैशिष्ठ असलेला सोफासेट तक्रारदार यांनी पसंत केला होता. तथापि सामनेवाले यांनी ता.27.10.2013 रोजी डिलेव्हरी दिलेले फर्निचर दोषपुर्ण असुन तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये खालील प्रमाणे दोष आढळून आले.
अ) डिलिव्हरीच्या वेळी सामनेवाले यांनी अपुर्ण सेट दिला, आठ कुशन्स पैंकी फक्त चार
कुशन्स दिले.
ब) चार कुशन्सच्या आकारात फरक आहेत.
क) फर्निचरचे पाय टिकवुडचे नसुन स्टील व पत्र्याचे होते.
ड) संपुर्ण सोफासेटमध्ये लेव्हल नसुन मध्ये अंतर रहात होते.
इ) सोफासेटमध्ये एकूण तीन हात असुन दोन हातात फक्त हवेचा फुगवटा भरला आहे व
त्यात प्लायवुडचे मटेरियल भरले आहे.
ई) सोफासेटमधील उषांना दोन वेगवेगळया प्रकारची कापडे असुन त्यातील वरील बाजुस
तक्रारदार यांनी पसंत केलेल्या रंगाचे कापड असुन मागील बाजुस अन्य रंगाचा कपडा
वापरला आहे.
उ) सामनेवाले यांनी 24 इंची खुर्च्या ऐवजी 23 इंची खुर्ची विना फीनिशिंग दिली आहे.
ऊ) निकृष्ठ दर्जाच्या चेन्सचा वापर केला असुन त्यातील दोन चेन्स तुटलेल्या आढळतात.
ए) निकृष्ठ दर्जाच्या साहित्याचा वापर आहे तसेच अन्य बारीक सारीक दोषपुर्ण
सोफासेटची डिलेव्हरी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिली आहे.
4. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना फर्निचरमध्ये वरील प्रमाणे दोष असल्याबाबत फोनवर कळविले, तसेच ता.13.12.2013 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवली, सामनेवाले यांनी दोषयुक्त फर्निचर परत घेऊन फर्निचरची किंमत रु.47,000/- देण्याची बाब तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कळविली. तथापि, सामनेवाले यांनी दर नोटीसीस उत्तर दिले नाही. तसेच त्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सबब तक्रारदार यांना सामनेवाले यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण मंचात दाखल करावे लागले आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रारी व सोबत दाखल केलेले कागदपत्रे, हाच त्यांचा लेखी युक्तीवाद व तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. सबब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
6. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही गैरहजर असल्याने त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आलेला आहे. सबब सामनेवाले यांचेतर्फे प्रस्तुत प्रकरणात कोणताही आक्षेप दाखल नाही. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे.
7. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.47,000/- किंमतीचे फर्निचर विकत घेतल्याबाबतच्या पावतीची प्रत मंचात दाखल आहे. तसेच तक्रारदार यांनी वकीलांमार्फत सामनेवाले यांना पाठवलेल्या ता.13.12.2013 रोजीच्या कायदेशीर नोटीसीची प्रत मंचात दाखल आहे. सामनेवाले यांचेतर्फे सदर नोटीसीस उत्तर दिलेले नाही. सामनेवाले प्रस्तुत प्रकरणातही गैरहजर आहेत. सबब तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेला मजकूर ग्राहय धरणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.
8. तक्रारदार यांनी सदर फर्निचर सामनेवाले यांचेकडून त्यांची मुलगी अनुजा गावनर हिच्या नांवे घेतले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुरसिस नुसार सदर फर्निचर कुटूंबाच्या वापरासाठी घेतले आहे. तक्रारदार यांनी फर्निचरची रक्कम सामनेवाले यांना अदा केली असुन फर्निचर कुटूंबाच्या वापरा करीता घेतल्याने तक्रारदार यांना प्रस्तुत प्रकरण दाखल करण्याचा अधिकार आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर सदर फर्निचर कुटूंबाच्या उपयोगासाठी घेतले असल्याने प्रस्तुत तक्रार तांत्रिक मुदयावर फेटाळणे उचित नाही असे मंचास वाटते.
9. तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणात वादग्रस्त फर्निचरच्या फोटोच्या प्रती मंचात दाखल केल्या आहेत. सदर फोटोवरुन तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे फर्निचरमधील दोष आढळून येतात.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-750/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी रक्कम रु.47,000/- स्विकारुन तक्रारदार यांना दोषयुक्त फर्निचरची
विक्री करुन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना फर्निचरची किमंत रक्कम
रु.47,000/- (अक्षरी रुपये सत्तेचाळीस हजार) ता.30.06.2016 पर्यंत अदा करावी.
विहीत मुदतीत अदा न केल्यास ता.01.07.2016 पासुन संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत
दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याज दरासह दयावी.
4. तक्रारदार यांना आदेश देण्यात येतो की, सामनेवाले यांनी आदेश क्रमांक-3 ची पुर्तता
केल्यानंतर सामनेवाले यांना तक्रारीत नमुद केलेले फर्निचर परत दयावे.
5. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.3,000/- (अक्षरी
रुपये तीन हजार) ता.30.06.2015 पर्यंत दयावी. सदर रक्कम विहीत मुदतीत अदा न
केल्यास ता.01.07.2016 पर्यंत संपुर्ण रक्कम दरसाल दर शेकडा 9 टक्के दराने अदा
करावी.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.17.05.2016
जरवा/