न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. वि.प.क्र. 1 ते 3 हे सयाजी हॉटेल लि. मध्ये अनुक्रमे व्यवस्थापकीय संचालक, जनरल मॅनेजर, प्रादेशिक विक्री नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी हॉटेल सयाजी कोल्हापूर बरोबर अटी शर्तींची काही निश्चिती हॉटेल सयाजी कोल्हापूर यांचेकडून ईमेलद्वारे दि. 17/4/2017 रोजी दिली. मात्र प्रत्यक्षात त्याप्रमाणे हॉटेल सयाजी यांनी सेवेत त्रुटी ठेवल्याने व्यवस्थापनाद्वारे तक्रारदार व पाहुण्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल तसेच ग्राहक सेवा, कमतरता त्रुटी व असुविधेबाबत तसेच आर्थिक नुकसानीबाबत व तक्रारदार यांना झालेल्या मानहानीमुळे व शारिरिक, मानसिक त्रासाबाबत प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे सध्या सेवानिवृत्ती वेतनधारक आहेत. वि.प.क्र.1 हा व्यवस्थापकीय संचालक व सयाजी हॉटेलचा मुख्य कार्यकारी अधिकारी असून याव्यतिरिक्त ते सयाजी या ब्रँड नावाने संपूर्ण भारतात आरामदायी हॉटेलचे व्यवस्थापन चालविण्याचा व्यवसाय करतात. वि.प.क्र.2 हे जनरल मॅनेजर म्हणून सयाजी हॉटेलमध्ये दैनंदिन कार्य आणि ग्राहकांचे आदरातिथ्य प्रशासन चालवितात. वि.प.क्र.3 हा प्रादेशिक विक्री नियंत्रक म्हणून सयाजी हॉटेलचा सेवानियंत्रक व ग्राहकांसाठी निवासी खोल्यांचे आरक्षण देखील करतो व हे सर्व तो मुंबईच्या प्रादेशिक कार्यालयातून करत असतो.
3. तक्रारदार यांनी सयाजी हॉटेलच्या कोल्हापूरच्या सेवेसंबंधीत अधिकृत संकेतस्थळावरुन (वेबसाईट) अशी माहिती मिळाविली होती की, “सयाजी हॉटेल दोन्ही प्रकारचे उत्तम वैश्विक म्हणजेच कोल्हापूरी प्रेमळपणा व सयाजी सेवा एकत्र आणतात. या हॉटेलला त्यांनी पुरवित असलेल्या आदरातिथ्य, सेवा सुविधा तसेच वास्तू इ. सुविधा दक्षिण महाराष्ट्रात पुरवित असल्याबद्दल माहिती आहे. सयाजी हॉटेल कोल्हापूरच्या वास्तूत ग्राहकांस अगदी महाराजाप्रमाणे वागविण्यात येते. या उपलब्ध माहितीअन्वये तक्रारदार यांनी सयाजी हॉटेल कोल्हापूर हे त्यांच्या मुलाच्या लग्नसोहळयासंबंधीत योग्य स्थळ असलेने त्या संदर्भात बोलणी करण्याचे ठरविले. तक्रारदारांच्या मुलाचा लग्नसोहळा हा दि. 3 जून 2017 ला पार पडला. मात्र तत्पूर्वी तक्रारदार यांनी वि.प. क्र.3 यांचे सोबत टेलिफोनवर चर्चा करुन लग्नासाठी येणा-या पाहुण्यांसाठी निवासी व्यवस्था आणि त्यासंदर्भात काही खोल्या आरक्षित करण्याची विनंती र्इमेलद्वारे दि. 25/3/2017 ला केली.
4. वरील ईमेल संपर्काच्या संबंधावरुन आरक्षण निश्चिती क्र. 23331 हा 27 मार्च 2017 ला निर्धारित केला गेला. मात्र तक्रारदारांचया निदर्शनास असे आले की, यापूर्वी पाठविलेल्या ईमेलद्वारे मान्य केलेल्या करारासंबंधी प्रत्यक्ष आरक्षणासंदर्भातील कळविलेल्या माहितीमध्ये विसंगती आहे. तसेच रक्कम रु.25,000/- ची आगाऊ रक्कम पुण्यातून एका बँकेद्वारे अदा करताना तक्रारदार यांनी ईमेलद्वारे दि. 15 एप्रिल 2017 रोजी पुनश्च अंतिम अटी शर्तींची निश्चिती प्राप्त करण्याची गरज होती व तसे दि. 17 एप्रिल 2017 रोजी ईमेलद्वारे प्राप्त करण्यात आली. वि.प.क्र.3 यांनी दि. 1 जून 2017 रोजी इमेलद्वारे दिलेल्या खात्रीवरुन सेवासुविधा पुरविणेबाबत जी माहिती तक्रारदाराला कळविली, त्यावर अवलंबून तक्रारदार यांनी एकूण रक्कम रु.1,20,000/- ची पूर्ण देय रक्कम अंतिमतः भाडयापोटी सर्व रक्कम ही 20 वातानूकुलीत कार्यकारी खोल्यांकरिता दि. 2 जून 2017 रोजी प्रत्यक्ष खोल्यांचा ताबा घेण्यापूर्वी अदा केली होती. तक्रारदार यांनी पाहुण्यांसह दि. 2 जून 2017 ला दुपारी 3.15 वा. हॉटेल सयाजी कोल्हापूर येथे आरक्षित खोल्या चेकइन केल्यापासून ते दि.3 जून 2017 ला दु. 2.30 वा. तक्रारदार हे त्यांचे पाहुण्यांना आरक्षित खोल्यांचेबाबत चेकआऊट करताना आदरातिथ्य तसेच असहकार तसेच व्यवस्थापनामध्ये समन्वय नसलेचे व असमाधानकारक सेवा सुविधा निदर्शनास आल्याचे सातत्याने जाणवले. तसेच लेखी कळविल्यानुसार देण्यात येणा-या मूलभूत सोयी सुविधा जसे की, अतिरिक्त बेड, आरक्षित खोल्यातील पाहुण्यांना मोफत नाष्टा इ. वेळेवर पुरविण्यात आल्या नाहीत तर याउलट अतिरिक्त भाडेआकारणी, अवाजवी विलंब, सुमार दर्जाची सेवा, समन्वयाचा अभाव तसेच जोडप्यांना स्प्लीट बेड उपलब्ध करणे व अतिरिक्त बेड उपलब्ध न करणे इ. गैरसोयी सुविधांमुळे तक्रारदार यांचे कधीही न भरुन येणारे असे अतोनात मानसिक व आर्थिक नुकसान झाले आहे.
5. सदरचे हॉटेलमध्ये एकच रिसेप्शनीस्ट असून ती सर्व व्यवस्था पहात होती व विलंबामुळे काही पाहुण्यांना आठव्या मजल्यावर देखील जाण्यास भाग पाडले गेले व सदरची सूचना ही जवळजवळ 20 मिनिटांनी दिली गेली. या कारणाने पाहुण्यांना प्रत्यक्ष खोलीचा ताबा मिळेपर्यंत ताटकळत रहावे लागले व गैरसोय झाली. तक्रारदार यांनी सयाजी हॉटेलला पूर्वनिर्देशित पाहुण्यांची यादी वेळेआधी दिलेली असताना देखील प्रदीर्घ प्रवास करुन आलेल्या पाहुण्यांना अपु-या मनुष्यबळामुळे सुमारे 45 मिनिटे खोल्यांचा ताबा मिळविण्यासाठी घालवावी लागली. तसेच सदरचे व्यवस्थापनाद्वारे जोडप्यांना वाटप करण्यात आलेल्या खोलीमध्ये डबल ऐवजी स्वतंत्र बेड उपलब्ध करुन देण्यात आले होते. तसेच आरक्षित खोल्या सोयीच्या दृष्टीकोनातून एका मजल्यावर उपलब्ध होणे अपेक्षित असताना देखील नियोजनातील समन्वयाअभावी वेगवेगळया ठिकाणी खोल्या उपलब्ध झाल्या. सबब, संकेतस्थळावरील सेवेचे वर्णन व करारानुसार उपलब्ध करावयाच्या ग्राहक सुविधा यामध्ये बरीचशी तफावत तक्रारदार यांचे निदर्शनास आली. याबरोबरच दि. 2 जून 2017 रोजी तक्रारदारांच्या पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट केलेल्या 10 खोल्यांकरिता अतिरिक्त बेडची व्यवस्था ही दि. 2 जून 2017 रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत उपलब्ध केलेली नव्हती, केवळ 4-5 खोल्यांमध्येच अतिरिक्त बेड पुरविण्यात आलेले होते. थकलेल्या अवस्थेत असलेमुळे पाहुणे मंडळींना अतिरिक्त बेडचीही मागणी करता आली नाही. 10 खोल्यांऐवजी 11 खोल्यांमध्ये अतिरिक्त बेडच्या समावेश केलेचे व्यवस्थापानाने दर्शवून एका खोलीच्या जादा पैशाची मागणी केली. वरील सर्व कारणास्तव तक्रारदार यांना सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले. याकरिता तक्रारदार यांनी नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- तसेच तक्रारदार यांच्या प्रतिष्ठेची झालेली मानहानी व अब्रुनुकसानीबद्दल रक्कम रु. 15 लाख व शारिरिक तसेच मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु. 3 लाख व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 25,000/- ची मागणी केलेली आहे.
6. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत निवासी खोल्या उपलब्धी ईमेल, भाडे व सुविधा तपशील ईमेल, तक्रारदाराचे आरक्षण, आरक्षण कन्फरमेशन पत्र, आरक्षण अग्रीम रक्कम, अग्रीम रक्कम प्राप्त, पावती, तक्रारअर्ज ईमेल, कॉल रेकॉर्ड, लिगल नोटीस, नोटीसची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
7. वि.प. यांना आयोगाची नोटीस लागू होवून त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दखल केले. वि.प. यांचे कथनानुसार, त्यांना तक्रारअर्जातील मजकूर मान्य व कबूल नाही. वि.प.क्र.2 व 3 म्हणून ज्या व्यक्तींची नावे नोंद केली आहेत, त्या व्यक्ती सध्या सेवेत नाहीत. तथापि, संबंधीत हुद्दयावरील व्यक्ती याकामी हजर झाल्या आहेत. सदरचा तक्रारअर्ज ईमेलमधील मजकूराशी संबंधीत आहे. सदरचे ईमेलमधील मजकूर हा पुराव्याचा भाग असल्यामुळे त्याबद्दल स्वतंत्र भाष्य केलेले नाही. प्रस्तुत वि.प. यांनी तक्रारदार व त्यांच्या पाहुण्यांना अत्यंत आतिथ्यशील सेवा दिलेली आहे. सबब, वि.प. यांनी पुरविलेल्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता नाही. हॉटेलच्या सातव्या मजल्यावर योग्य पलंग व्यवस्था नव्हती तसेच सदर मजल्यावर एकच रिसेप्शनीस्ट सर्व व्यवस्था पहात होती हे कथन चुकीचे आहे. नियोजनातील समन्वयामध्ये अभाव होता हेही म्हणणे खोटे व चुकीचे आहे. तसेच खोल्यांतील जादा बेडबाबत माहिती तक्रारदार यांनी कधीही वेळेत पुरविली नव्हती, त्यामुळे ज्या खोलीतील ग्राहकांनी जादा बेडची मागणी केली होती, त्यांना मागणी नुसार जादा बेड देण्यात आले होते. जादा बेडबाबतची मागणी संबंधीत वेळी कोणत्याही व्यवस्थापनाकडे केलेली नव्हती. मागणी केलेल्या सर्वच्या सर्व ग्राहकांना जादा बेडपुरवठा करण्यात आला होता. तसेच याबाबत एका जादा बेडचा वाद अर्जदार यांनी बिलाची रक्कम भागविताना उत्पन्न केला. तथापि केवळ ग्राहकांशी संबंध राखण्याच्या हेतूने रक्कम निश्चित करण्यात आली. तक्रारदार व वि.प. यांच्या दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे जे पाहुणे संबंधीत वेळेत न्याहरीसाठी उपस्थित झाले होते, त्यांना न्याहरी देण्यात आली. मात्र खोलीत राहिलेल्या पाहुण्यांची संख्या व न्याहरीसाठी आलेल्या एकूण पाहुण्यांची संख्या यामध्ये तफावत होती. ही तफावत तक्रारदार यांना दाखवून दिल्यानंतरच त्यांनी काही पाहुण्यांसाठी पेड ब्रेकफास्ट घेतलेला आहे. या न्याहरी वाटपामध्ये कोणतीही त्रुटी अथवा कमतरता राहिलेली नाही. वस्तुतः तक्रारदार यांनी बिलाची रक्कम भागविताना काही न कबूल केलेल्या सुविधांबाबत विप. यांचेशी वाद उपस्थित केला तसेच रक्कम निश्चित करताना देखील विनाकारण प्रत्यक्ष राहिलेले पाहुणे यांची संख्या चुकीची असल्याचा वाद उपस्थित केला व अंतिमतः बिल रकमेबाबत वाद उपस्थित करुन बिल देण्यामध्ये दुमत केले. सबब, सदरचा सर्व मजकूर खोटा व चुकीचा आहे. तक्रारदार यांनी मागितलेल्या मागणी संदर्भात या वि.प यांनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही अथवा सेवेमध्ये कमतरता ठेवलेली नाही या कारणास्तव कोणतीही रक्कम देणे लागत नाही. तक्रारदार यांनी त्यांचा लग्नसमारंभ अत्यंत योग्य प्रकारे करुन घेतलेला आहे. वास्तविक बिल रकमेबद्दल अथवा सेवेतील त्रुटीबाबत त्यांची तक्रार होती तर अशी तक्रार रक्कम भागविण्यापूर्वी करणे गरजेचे होते. तक्रारदार यांची तक्रारअर्जातील विनंती विचारात घेता बिलाच्या रकमेबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. तसेच तक्रारदार यांच्या सारख्या प्रतिष्ठित व कार्यक्षम अधिकारी विवाह समारंभाचे ठिकाण निश्चित करणेपूर्वी त्याची पाहणी केलेखेरीज रहात नाहीत. तक्रारदार यांनीही सदरची पाहणी करुनच वि.प. यांचेबरोबर सर्व व्यवहार निश्चित केला होता. मात्र कार्यक्रम पश्चात तक्रारदार यांनी अत्यंत मोघम स्वरुपाच्या तक्रारी देवून चुकीच्या काणास्तव मोठया रकमेची मागणी केली असल्याने सदरचा तक्रारअर्ज खर्चासह रद्द करणेत यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
8. वि.प. यांनी या संदर्भात पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
9. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | नाही. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | नाही. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
10. तक्रारदाराने वि.प. यांचेकडे कोल्हापूरचे हॉटेल सयाजीचे आरक्षण केले होते व आहे याबाबत उभय पक्षामध्ये दुमत नाही. सदरचे संदर्भात तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत दि. 12 मार्च 2017 तसेच दि.25 मार्च 2017 तसेच दि.2 जून 2017 असे ईमेल तक्रारअर्जासोबत दाखल केलेले आहेत. तक्रारदार यांचा दि. 24 मार्च 2017 चे ईमेलवरुन 20 डबल रुम्सचे तक्रारदार यांचे आरक्षण हॉटेल सयाजीमध्ये झालेची बाब या आयोगाचे निदर्शनास येते. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
11. तक्रारदार यांनी हॉटेल सयाजीचे आरक्षण (बुकींग) हे दाखल केले ईमेलवरुन स्पष्ट होते व याबाबत उभय पक्षांमध्ये वादाचा मुद्दा नाही. तक्रारदार यांनी दाखल केले तक्रारअर्जामध्ये खालील तक्रारी कथन केल्या आहेत. जसे की, तक्रारदार यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा दि. 3 जून 2017 रोजी होणार असलेने वि.प. क्र.3 यांचेकडे विवाहापूर्वी टेलिफोनवर चर्चा करुन लग्नासाठी येणा-या पाहुण्यांसाठी निवासी व्यवस्था व त्या संदर्भात काही खोल्या आरक्षित करणेची विनंती केली होती. या संदर्भातील दि. 25 मार्च 2017 चा ईमेल याकामी दाखल आहे. तसेच ईमेल संपर्काच्या संदर्भावरुन आरक्षण निश्चिती क्रमांक 23331 हा दि. 27 मार्च 2017 ला निर्धारित केलेचे निदर्शनास येते. यापूर्वी पाठविलेल्या ईमेलद्वारे मान्य केलेल्या करारासंबंधीत प्रत्यक्ष आरक्षणासंदर्भातील कळविलेल्या माहितीमध्ये विसंगती आहे असे कथन तक्रारदर यांनी केलेले आहे. मात्र रक्कम रु.25,000/- ही पूण्यातील एका बँकेद्वारे अदा केलेचा दि. 15 एप्रिल 2017 चा ईमेल दाखल आहे. मात्र जरी तक्रारदार यांना जर अशा प्रकारची विसंगती कळून आली होती तर त्यांनी सदरच्या वस्तुस्थितीची शहानिशा करणे जरुरी होते. मात्र अशी शहानिशा न करताच तक्रारदार यांनी विसंगती असलेचे निदर्शनास येवूनही रक्कम रु.25,000/- देवू केलेचे दिसून येते. सदरची विसंगतीचा ऊहापोह वि.प. यांचेशी करणे जरुरीचे होते. मात्र तक्रारदार यांनी त्यावेळी कोणतीही कार्यवाही न करता सदरची वर नमूद रक्कम वि.प. यांना देवू केलेली आहे. जर तक्रारदार यांनी सदरची विसंगती असलेचे वि.प. यांना कळविले असते तर कदाचित तक्रारदार म्हणतात, त्याप्रमाणे सदरची परिस्थिती निर्माणच झाली नसती.
12. ईमेलद्वारे दि. 1 जून 2017 रोजी दिलेल्या खात्रीवरुन किमान प्रमाण दर्जाच्या सेवासुविधा तक्रारदार यांना पुरविलेल्या आहेत व त्यावरच अवलंबून व दिलेल्या खात्रीवर अवलंबून तक्रारदार यांनी तदनंतरही रक्कम रु.1,20,000/- ची पूर्ण देय रक्कम ही अंतिमतः भाडयापोटी 20 वातानुकुलीत कार्यकारी खोल्यांकरिता दिलेली होती व आहे. मात्र सदरची बाब ही वि.प. यांनीही मान्य केली आहे. याबाबत वि.प. याचा कोणताही उजर नाही. तथापि दि.2 जून 2017 ला दु. 3.15 वा. हॉटेल सयाजी कोल्हापूरमध्ये आरक्षित खोल्या चेकइन केल्या पासून ते दि.3 जून 2017 ला 2.30 वा. तक्रारदार व तक्रारदार यांचे पाहुणे यांना आरक्षित खोल्यांचे बाबत चेकआऊट करताना अर्जात नमूद केलेप्रमाणे व्यवस्थापनामध्ये समन्वय नसल्याचे निदर्शनास आले होते. मात्र याच दिवशी तक्रादार व त्यांचे पाहुणे पुण्याहून आले होते, त्यांना सातव्या मजल्यावर नेले व सातव्या व आठव्या मजल्यावरील खोल्या देण्यात आल्या होत्या. तथापि, तक्रारदार यांनी जरी वीस वातानुकूलीत कार्यकारी खोल्यांकरिता मागणी केली असली तरी तक्रारदार यांनीच दाखल कागदयादी अनुक्रमांक 1 वर दाखल केले ईमेलचा विचार करता सदर रुमचे वर्णन हे एक्झीक्युटीव्ह रुम असे आहे, मात्र वि.प. यांचे कथनानुसार सदरच्या रुम्स या ग्रँड रुम्स की, ज्याचे आकारमान जास्त मोठे आहे व ज्याठिकाणी “किंग साईज” बेड उपलब्ध आहेत अशा ठिकाणी पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. वास्तविक पाहता ही व्यवस्था करताना ग्रँड रुमचा दर हा एक्झीक्युटीव्ह रुमपेक्षाही जास्त आहे. मात्र सदरची बाबही वि.प. यांनी हेतूतः दुर्लक्षित केली आहे व ग्रँड रुम देवून तक्रारदार यांना त्यांच्या मागणीपेक्षाही जादा दर्जाच्या रुम्स वि.प. यांनी पुरविलेल्या आहेत असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. तसेच वि.प. यांचे कथनानुसार काही ठिकाणी 2 स्वतंत्र पलंग (स्प्लीट बेड) तर काही ठिकाणी एकत्रीत मोठा पलंग (किंग साईज बेड) उपलब्ध असतो. मात्र तक्रारदार यांचे नुसार सदरची स्प्लीट बेड अथवा किंग साईज बेड ही सुविधा नाही ही बाब चुकीची आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी एकाच मजल्यावर सर्वच खोल्या एकाच प्रकारच्या पलंग व्यवस्थेत न बनविता दोन्ही प्रकारची पलंग व्यवस्था एकाच मजल्यावर पुरविली आहे. तक्रारदार यांच्या विनंतीस मान देणेच्या हेतूनेच वि.प. यांनी किंगसाईज बेड तक्रारदार यांना देवू केलेले होते. सबब, तक्रारदार यांनी घेतलेला हा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे व सदरची बाबही तक्रारदार यांनी नाकारलेली नाही. किंगसाईज बेड पुरविलेचे तक्रारदार यांनी मान्य केले आहे. निश्चितच तक्रारदार यांचे सोयीकरिताच वि.प. यांनी सदरचे सातव्या मजल्यावर व्यवस्था केलेचे या आयोगाचे निदर्शनास येते व तक्रारदार यांनी सदरचे खोलीचा ताबा मिळेपर्यंत तक्रारदार तसेच त्यांचे पाहुण्यांना वीस मिनिटे ते पाऊण तास ताटकळत बसावे लागले असे ही कथन तक्रारदार यांनी केले आहे. मात्र अशा उच्च दर्जाचे हॉटेलमध्ये आरक्षण मिळविणेच्या प्रक्रियेलासुध्दा सर्व प्रकारची कागदपत्रे अथवा अन्य बाबींची पूर्तता होईपर्यंत सदरचा वेळ लागतच असतो असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. तसेच वि.प.चा तक्रारदार यांना त्रास देणेचा कोणताही उद्देश तक्रारदार यांचे दाखल तक्रारीवरुन तसेच वि.प. यांनी दाखल केले म्हणणेवरुन तसेच युक्तिवादावरुन या आयोगाचे निदर्शनास येत नाही.
13. तक्रारदार यांनी तक्रारअर्जात कथन केलेप्रमाणे पाहुण्यांची कोणतीही यादी पुराव्याचे कामी दाखल केलेली नाही. जर तक्रारदार यांनी सदरची पाहुण्यांची यादी तसेच स्पेसिफिक कोणत्याही रुममध्ये अथवा किती रुममध्ये जादा असणारे बेड घालावयाचे आहेत, हे वि.प. यांना कळविले असते, तर कदाचित एवढा वेळ थांबण्याची वेळ तक्रारदार व त्यांच्या पाहुण्यांवर आली नसती असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. तक्रारअर्जात कथन केलेप्रमाणे कोणतीही बाब तक्रारदार यांनी पुरावा देवून शाबीत केलेली नाही. मात्र वि.प. यांनी दाखल केले म्हणणे तसेच युक्तिवाद यावरुन वि.प. यांचा तक्रारदार यांना बुध्दीपुरस्सर त्रास देणेचा कोणताही हेतू दिसून येत नाही. सबब, या कारणास्तव प्रस्तुतचा तक्रारअर्ज नांमंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.