न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प.क्र.1 हे Reliance resQ या नावाने वार्षिक मोबदला स्वीकारुन डिजिटल सर्व्हिस देण्याचे कार्य करीत असतात. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.3 या कंपनीने निर्माण केलेल्या उत्पादनाचे अधिकृत विक्रेते म्हणून इचलकरंजी येथे व्यवसाय करीत आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती वापराकरिता दि. 8/5/2014 रोजी सॅमसंग कंपनीचा 3 डी एल.ई.डी. रक्कम रु.1,20,000/- या किंमतीस खरेदी केला असून त्याचा बॅच नं. 23493ZEF200031 व मॉडेल नं. UA46F7500 असा आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून सदर एल.ई.डी.साठी Extended warranty घेण्याचे मान्य करुन त्यानुसार वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.7,039/- स्वीकारुन दि. 22/7/16 ते 21/7/17 या कालावधीकरिता Extended warranty देण्याचे मान्य केले होते. तदनंतर वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.7,391/- स्वीकारुन दि. 22/7/17 ते दि. 21/7/18 या कालावधीसाठी वॉरंटी देण्यात आलेली आहे. सदर प्रथम Extended warranty दरम्यान दि. 20/2/17 रोजी सदर एल.ई.डी. मध्ये चित्र सुस्पष्ट न दिसणे, आवाज अचानक बंद होणे, टी.व्ही. थोडा वेळ चालून बंद पडणे इ. दोष निर्माण झालेले होते. त्याबाबत तक्रारदार वि.प.क्र.1 यांचेकडे तक्रार दाखल केलेली आहे. सदर दोष हा Extended warranty चे कालावधीतील असलेने त्याची निर्गत करणेची सर्व जबाबदारी वि.प.क्र.1 यांची होती. परंतु वि.प.क्र.1 यांनी सदरचा एल.ई.डी. स्वतःचे ताब्यात घेवून त्याची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. अशा प्रकारे वि.प.क्र.1 यांनी सेवेत कसूर केलेली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराचा एल.ई.डी. टी.व्ही. विनाखर्च दोषमुक्त करुन द्यावा, नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,20,000/-, व्याजापोटी रक्कम रु.79,200/-, टी.व्ही. वि.प.क्र.1 कडे नेणेसाठी झालेला वाहतूक खर्च रु. 2,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे. तसेच तक्रारदाराने वैकल्पिकरित्या सदोष टी.व्ही. बदलून नवीन टी.व्ही. देणेचा आदेश वि.प.क्र.1 यांना व्हावा अशी मागणी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 5 कडे अनुक्रमे वि.प. यांचे बिल, वि.प.क्र.1 यांचा रिक्वेस्ट प्लॅन, वि.प.क्र.1 यांनी दिलेली बिले, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व म्हणणे हेच पुरावा शपथपत्र समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली आहे. वि.प.क्र.2 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) वि.प.क्र.1 यांचे वि.प.क्र.3 यांचेबरोबर टाय-अप असून वि.प.क्र.3 यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनास मोबदला स्वीकारुन Extended warranty देण्याचे कार्य करतात.
ii) तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून Extended warranty ची सेवा घेतलेची कोणतीही माहिती वि.प.क्र.2 यांना नाही. वि.प.क्र.2 यांचा डिलर म्हणून या बाबींशी संबंध नाही. वि.प.क्र.1 व तक्रारदार यांचे व्यवहाराशी वि.प.क्र.2 यांचा काहीही संबंध नाही.
iii) तक्रारदाराची तक्रार ही वि.प.क्र.1 यांचेकडून घेतलेल्या Extended warranty कालावधीतील आहे. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीची निर्गत करणेची जबाबदारी ही केवळ वि.प.क्र.1 यांची आहे. त्याचेशी वि.प.क्र.2 चा काहीही संबंध नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प.क्र.2 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वि.प.क्र.1 व 3 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर राहिले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.1 व 3 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.क्र.1 ते 3 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून दोषरहित टी.व्ही. किंवा टी.व्ही. ची किंमत परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारअर्जाचा खर्च मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 4 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण वि.प.क्र.1 हे Reliance resQ या नावाने वार्षिक मोबदला स्वीकारुन डिजिटल सर्व्हिस देण्याचे कार्य करीत असतात. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.3 या कंपनीने निर्माण केलेल्या उत्पादनाचे अधिकृत विक्रेते म्हणून इचलकरंजी येथे व्यवसाय करीत आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती वापराकरिता दि. 8/5/2014 रोजी सॅमसंग कंपनीचा 3 डी एल.ई.डी. रक्कम रु.1,20,000/- या किंमतीस खरेदी केला असून त्याचा बॅच नं. 23493ZEF200031 व मॉडेल नं. UA46F7500 असा आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून सदर एल.ई.डी.साठी Extended warranty मोबदला देवून घेतली आहे. सदर एल.ई.डी. टी.व्ही. खरेदी केल्याचे बिल तसेच Extended warranty घेतल्याचे बिल तक्रारदार यांनी याकामी दाखल केले आहे. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 ते 3 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये, त्यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून घेतलेल्या प्रथम Extended warranty दरम्यान दि. 20/2/17 रोजी सदर एल.ई.डी. मध्ये चित्र सुस्पष्ट न दिसणे, आवाज अचानक बंद होणे, टी.व्ही. थोडा वेळ चालून बंद पडणे इ. दोष निर्माण झालेले होते. त्याबाबत तक्रारदार वि.प.क्र.1 यांचेकडे तक्रार दाखल केलेली आहे. सदर दोष हा Extended warranty चे कालावधीतील असलेने त्याची निर्गत करणेची सर्व जबाबदारी वि.प.क्र.1 यांची होती. परंतु वि.प.क्र.1 यांनी सदरचा एल.ई.डी. स्वतःचे ताब्यात घेवून त्याची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. अशा प्रकारे वि.प.क्र.1 यांनी सेवेत कसूर केलेली आहे, असे कथन केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून मोबदला देवून घेतलेल्या Extended warranty ची बिले दाखल केली आहे. सदर बिलांचे अवलोकन केले असता वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांना Extended warranty देण्याचे मान्य व कबूल केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी त्यांचे टी.व्ही.मध्ये दोष निर्माण झाल्यानंतर वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांचा टी.व्ही. दुरुस्तीसाठी ताब्यात घेतला परंतु तो दुरुस्त करुन तक्रारदार यांना दिलेला नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. वि.प.क्र.1 व 3 यांनी याकामी हजर होवून व आपले म्हणणे व योग्य तो पुरावा दाखल करुन तक्रारदाराचे कथन नाकारलेले नाही. त्यामुळे वि.प.क्र.1 व 3 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे. त्यामुळे वि.प. क्र.1 व 3 यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. वि.प. क्र.2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराने घेतलेल्या Extended warranty शी वि.प.क्र.2 चा काहीही संबंध नाही असे कथन केले आहे. परंतु वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारास वादातील टी.व्ही. ची विक्री केलेली आहे व सदरचा टी.व्ही. योग्य प्रकारे चालत नसेल तर वि.प.क्र.1 व 3 यांचेकडे त्याबाबत पाठपुरावा करणेची जबाबदारी ही वि.प.क्र.2 यांची आहे. सदरची जबाबदारी वि.प.क्र.2 यांनी पार पाडलेली नाही हे याकामी दिसून येते. वरील सर्व बाबी विचारात घेता वि.प. क्र.1 ते 3 यांनी Extended warranty चे कालावधीत तक्रारदाराचे टी.व्ही. ची दुरुस्ती करुन दिलेली नाही ही बाब स्पष्ट व सिध्द झाली आहे. सबब, तक्रारदाराने आपली तक्रार पूर्णतया शाबीत केलेली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प.क्र.1 व 3 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असा या आयोगाचा निष्कर्ष आहे.
9. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराचा एल.ई.डी. टी.व्ही. विनाखर्च दोषमुक्त करुन द्यावा अथवा वैकल्पिकरित्या सदरचा सदोष टी.व्ही. बदलून नवीन टी.व्ही. देणेचा आदेश वि.प.क्र.1 यांना व्हावा अशी मागणी केली आहे. वादातील सदोष टी.व्ही. हा वि.प.क्र.1 यांचे ताब्यात आहे. सबब, वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराचा टी.व्ही. हा दुरुस्त करुन दोषरहित टी.व्ही. तक्रारदाराचे ताब्यात द्यावा असा आदेश करणे न्यायोचित ठरेल असे या आयोगाचे मत आहे. जर वादातील टी.व्ही.दुरुस्त करुन दोषरहित टी.व्ही. देणे वि.प.क्र.1 ते 3 यांना शक्य नसेल तर त्याच कंपनीचा व मॉडेलचा टी.व्ही. वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास द्यावा असा आदेश करणे न्यायोचित ठरेल असे या आयोगाचे मत आहे. तसेच जुना टी.व्ही. बदलून नवीन टी.व्ही. तक्रारदाराला अदा करणे वि.प. यांना अशक्य असलेस वि.प.क्र.1 व 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व वि.प.क्र.2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदाराला वादातील टी.व्ही. ची किंमत रक्कम रु.1,20,000/- अदा करावेत तसेच सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज वि.प.क्र.1 व 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व वि.प.क्र.2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदाराला अदा करावे. तसेच वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केल्याने तक्रारदार हे टी.व्ही. च्या सुविधेचा लाभ घेवू शकलेले नाहीत ही बाब स्पष्ट आहे. सबब, तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प.क्र.1 व 3 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व वि.प.क्र.2 यांचेकडून संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व वि.प.क्र.2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वादातील सॅमसंग कंपनीचा 3 डी एल.ई.डी. टी.व्ही. योग्य ती दुरुस्ती करुन दोषरहित स्थितीत परत करावा.
अथवा
जर वादातील टी.व्ही.दुरुस्त करुन दोषरहित टी.व्ही. देणे वि.प.क्र.1 ते 3 यांना शक्य नसेल तर दोषयुक्त टी.व्ही. स्वतःकडे ठेवून त्याच कंपनीचा व मॉडेलचा टी.व्ही. वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास द्यावा.
3) हे शक्य नसल्यास वि.प.क्र.1 व 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व वि.प.क्र.2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदाराला वादातील टी.व्ही. ची किंमत रक्कम रु.1,20,000/- अदा करावी व सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज वि.प.क्र.1 व 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व वि.प.क्र.2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदाराला अदा करावे.
4) वि.प.क्र.1 व 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व वि.प.क्र.2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 ते 3 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील तरतुदीनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.