::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा.श्रीमती कल्पना कि.जांगडे (कुटे), सदस्या )
(पारीत दिनांक :- 6/02/2020)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हे मयत फिरोज खान यांचे वारस आहेत. मय्यत फिरोज खान मुस्ताक खान यांचे मालकीचा लेलॅंड कंपनीचा ट्रक ज्याचा क्र. एम. एच.34एबी-4655, होता. सदर वाहन विरूध्द पक्ष विमा कं. यांचेकडे विमा पॉलिसी क्र. 1705252334000604 अन्वये दिनांक 31/ 05/2015 ते दिनांक 30/05/2016 या कालावधीकरीता विमाकृत केले होती. सदर वाहनाची पॉलिसी हि कॉम्प्रेसीव्ह पॉलिसी होती. दिनाक 04/11/2015 रोजी मयत मुस्ताक खान हा आपल्या क्लिनरसह उपरोक्त वाहनामध्ये सोयाबीन घेऊन जात असताना दि. 04/11/2015 ते 05/11/2015 च्या मध्यरात्री फिरोज खान व त्याचे क्लीनर सलीम या दोघांचा मृतदेह पुलाखाली सापडले.दोघांचा मृत्यू हा घातपात आहे किंवा अपघात आहे हे अद्याप पोलिसांना कळलेले नाही. विरुध्द पक्ष उपरोक्त पॉलिसीप्रमाणे वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व येईल अशी इजा झाल्यास लाभार्थी यांना नुकसानभरपाई रक्कम रु. 2,00,000/- देण्यात येणार असे कबूल केले आहे . त्यामुळे तक्रारकर्त्याने वकिलामार्फत वी.प. कं.यांना नोटीस पाठवून मयत मुलगा फिरोज खान याच्या मृत्युसंबधी कळविले होते परंतु वि. प. यांनी त्यावर काहीही उत्तर वा कार्यवाही केलेली नाही. वी. प. यांनी मयत फिरोज खान यांचा वाहन चालवीत असतांना त्याचा अनैसर्गिक मृत्यू झाला असताना सुद्धा नुकसान भरपाई ची रक्कम रु. 2,00,000/- पॉलिसीनुसार न देऊन तक्रारकर्त्यांप्रती सेवेत न्यूनता केली .
सबब तक्रारकर्त्यांनी मंचासमक्ष गैरअर्जदाराविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, वी. प. कं. यांनी विमा पॉलीसीनुसार गाडी मालकाच्या मृत्यूप्रसंगी द्यावयाची विमादावा रक्कम रू.2,00,000/- तसेच त्यावर अपघात झाल्याचे तारखेपासून रक्कम अदा होइपर्यन्त द.सा. द. शे. 18 टक्के व्याज विरूध्द पक्षाने लाभार्थी म्हणून तक्रारकर्त्यांना द्यावी तसेच मानसीक व शारिरीक त्रास तसेच आर्थीक नुकसानापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रार खर्च रु. 10,000/- विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना द्यावी असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्यांची तक्रार स्विकृत करुन वि.प. विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्षाने हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्यांच्या तक्रारीतील कथन नाकबूल करून आपल्या हक्काला बाधा न पोहचता विशेष कथनामध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्यांनी खोटी व बनावट तक्रार दाखल केली आहे. वि.प. यांनी विमाकृत वाहनांच्या दिलेल्या पॉलीसीमध्ये व्यक्तीगत अपघाताचा प्रिमियम घेतला असून त्यामध्ये सदर वाहनाचा अपघात होणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या पहिली खबर या दस्तावेजामध्ये अपघातासंबंधी गुन्हा नोंदवला नाही. तक्रारकर्त्याचा मुलाचा अपघात नसून त्याचा खून झाला आहे. व त्याचा म्रत्यु दि.4/11/2015 ते 5/11/2015 च्या मध्यरात्री झालेला आहे. तक्रारकर्त्यांच्या मुलाचा मृत्यू हा अपघात नसल्याने तक्रारकर्त्यांची तक्रार पॉलीसीच्या अटी व शर्तीमध्ये मोडत नाही आणि सदर पॉलीसी अन्वये फक्त वैयक्तिक अपघाताचे प्रिमियम घेतले असुन तक्रारकर्त्याचा मुलाचा मृत्यू हा अपघाताने झालेला नसल्याने सदर पॉलीसीमध्ये अंतर्भूत नाही. तसेच सदर पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार कोणताही अपघात झाल्यास मृतकाच्या वारसांनी सात दिवसाच्या आत विमा कंपनीकडे माहिती देऊन क्लेम फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्यांनी आजपर्यंत कोणताही क्लेम फॉर्म भरुन वि.प. यांना दिला नाही व अपघातासंबधी माहिती दिली नाही. तक्रारकर्त्यांनी, वि.प. यांचेकडे मुदतीत विमादावा दाखल केलेला नाही सबब तक्रारकर्त्यांची सदर तक्रार खोटी असल्याने उपरोक्त कारणास्तव ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
4. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तसेच लेखी युक्तीवाद आणि विरूध्द पक्षाचे लेखी उत्तर, दस्तावेज तसेच लेखी उ्त्तरालाच वि.प.यांचे पुरावा शपथपत्र समजण्यात यावे अशी नि.क्र.15 वर पुरसीस दाखल, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1 प्रस्तुत तक्रार चालविण्याचे मंचास अधिकारक्षेत्र आहे काय? : नाही
2 आदेश काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. तक्रारकर्त्यांची तक्रार ,वि. प. यांचे लेखी कथन तसेच तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते कि तक्रारकर्त्यांचा मुलगा मयत फिरोज खान मुस्ताक खान यांचे मालकीचा लेलॅंड कं.चा ट्रक ज्याचा क्र. एम. एच.34एबी-4655 हा होता. सदर वाहन विरूध्द पक्ष विमा कं. यांचेकडे विमा पॉलिसी क्र. 1705252334000604 अन्वये दिनांक 31/ 05/2015 ते दिनांक 30/05/2016 या कालावधीकरीता विमाकृत होते. दिनाक 04/11/2015 रोजी मयत मुस्ताक खान हा आपल्या क्लिनरसह उपरोक्त वाहनामध्ये सोयाबीन घेऊन जात असतांना दि. 04/11/2015 ते 05/11/2015 च्या मध्यरात्री फिरोज खान व त्याचे क्लीनर सलीम या दोघांचा मृतदेह पुलाखाली सापडले. तक्रारकर्ता हे मयत फिरोजखान यांचे वारस/लाभार्थी असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्त्यांनी लाभार्थी म्हणून उपरोक्त पॉलीसी अंतर्गत वाहनाचा मालक मयत फिरोजखान याच्या मृत्यूनंतर विमा दाव्याच्या रक्कमेकरीता वि.पक्षाना वकिलामार्फत नोटीस पाठविली व त्यानंतर सदर विमा दावा रक्कम मिळण्याकरिता प्रस्तुत प्रकरण मंचासमोर दाखल केले. परंतु मयत फिरोजखान हा सदर वाहनाचा मालक होताववि.प. यांनी सदर पॉलीसी अंतर्गत वैयक्तिक अपघाताचे प्रिमियम घेतले असुन सदर पॉलीसी ही वैयक्तिक अपघात विमा दाव्या संदर्भात आहे .तक्रारकर्त्यांनी मय्यत फिरोजखान याच्या मृत्यूनंतर सदर पॉलीसी अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्याची मागणी केली आहे. मात्र सदर विवादाच्या निवारणाकरिता वेगळे प्राधिकरण/न्यायासन आहे. त्यामुळे मंचाच्या मते सदर तक्रार ही मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने तक्रारकर्त्यांसस योग्यत्या प्राधिकरण वा न्यायासनासमोर तक्रार दाखल करण्याची मुभा देऊन सदर तक्रार अधिकारक्षेत्राअभावी खारीज करण्यात येते. सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं.1 च्या विवेचनावरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
1) तक्रारकर्त्यांची तक्रार क्र. 168/17 खारीज करण्यात येते ,असे असले तरी प्रस्तुत विवाद योग्य अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायासनासमोर दाखल करण्याची मुभा राहील.
2) उभय पक्षांनी आप आपला तक्रारखर्च सोसावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष