न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीचे हॉटेल असून सदर हॉटेलचा विमा तक्रारदारांनी वि.प. विमा कंपनीकडे उतरविला असून त्याचा पॉलिसी क्र. 170691821111001417 असा आहे व कालावधी दि. 12/10/2018 ते 11/10/2019 असा आहे. त्यामध्ये त्यांनी बिल्डींगसाठी रु.3 लाख आणि स्टॉक इन प्रोसेससाठी रु. 3 लाख इतक्या रकमेचा विमा उतरविला होता. दि. 05/08/2019 रोजी महापूर आल्याने तक्रारदाराचे हॉटेलमधील संपूर्ण स्टॉकचे नुकसान झाले तसेच बिल्डींगचे रंगाचे व शेड व कंपाऊंड यांचे नुकसान झाले. सदरची बाब वि.प. यांना कळविलेनंतर त्यांनी सर्व्हेअरमार्फत नुकसानीची पाहणी केली. तक्रारदारांचे स्टॉकचे रु.2,75,000/- चे व बिल्डींगचे रु. 1,25,000/- असे एकूण रु. 4 लाखाचे नुकसान झाले होते. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम दाखल केला. परंतु वि.प. यांनी क्लेम फाईल क्लोज केल्याचे तक्रारदारांना दि. 25/12/2019 रोजी कळविले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास विमा कंपनीकडून रक्कम रु.2,75,000/- मिळावेत व त्यावर 12 टक्के दराने व्याज, नुकसान भरपाईपोटी रु. 25,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, बँक ऑफ इंडियाकडे दिलेल्या स्टॉक स्टेटमेंटच्या प्रती, क्लेम नामंजूरीचे पत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. यांना नोटीस ता. 6/10/2020 रोजी लागू झालेचा पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट तक्रारदारांनी हजर केला आहे. सदरच्या नोटीस लागू होवूनही वि.प. हे आयेागात वारंवार पुकारता गैरहजर असलेने सदरचे वि.प. यांचेविरुध्द ता. 28/01/2021 रोजी एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. सदर कामी तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन तक्रारदारांची ता. 13/10/2021 रोजी पुरावा संपलेची पुरसीस आयोगात दाखल केलेली आहे. तथापि वि.प. यांनी तदनंतर ता. 1/12/2021 रोजी हजर होवून सदरकामी सर्व्हे रिपोर्ट तसेच ता. 23/2/2022 रोजी पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. प्रस्तुतकामी वि.प. यांचेविरुदध् ता. 28/01/2021 रोजी एकतर्फा आदेश पारीत झालेले आहेत. गा्रहक संरक्षण कायदा 2019 प्रमाणे सदरचा एकतर्फा आदेश रद्द करणेचा अधिकार या आयोगास नसलेने प्रस्तुतचे वि.प. यांनी तक्रारदारांचा पुरावा संपलेनंतर दाखल केलेली कागदपत्रे व पुरावा शपथपत्र सदरकामी वाचून पाहून दफतरी दाखल करता येणार नाहीत अथवा ग्राहय धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार गुणदोषांवर न्यायनि र्णीत करण्यात येते.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांचे मालकीचे केदार हॉटेल असून सदर हॉटेलचा विमा वि.प. कंपनीकडे ता. 12/10/2018 ते 11/10/2019 या कालावधीत उतरविलेला होता. विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सदरची पॉलिसी नं. 170691821111001417 आहे. तक्रारदार हे सदरचे हॉटेलचे उत्पन्नावर उपजिविका करतात असे तक्रारदाराने सदरचे तक्रारीत पुराव्याचे शपथपत्रावर कथन केले आहे. वि.प. यांनी सदरची पॉलिसी आयेागात हजर होवून नाकारलेली नाही. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयेाग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 –
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. ता. 05/08/2019 रोजी महापूर आल्याने महापुरामध्ये सदर हॉटेलमध्ये पाणी शिरले. पाण्याची उंची 10 ते 11 फूट इतकी होती व सदर पाणी बरेच दिवस राहिल्याने हॉटेलमधील संपूर्ण स्टॉकचे नुकसान झाले. बिल्डींगच्या रंगाचे व बिल्डींगला लागून असलेल्या रोड व कंपाऊंडचे नुकसान झाले. ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनामा करुन झालेल्या नुकसानीबाबत वि.प. विमा कंपनीस कळविले असता, वि.प. कंपनीतर्फे सर्व्हेअर यांनी नुकसानीची पाहणी केली. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनी यांना सर्व कागदपत्रे सादर करुन सदरचे क्लेमची मागणी केली असता वि.प. विमा कंपनी यांनी ता. 25/12/2019 रोजी तक्रारदारांचा क्लेम क्लोज केला. सबब, वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांचेकडून विमा हप्ता स्वीकारुन देखील तक्रारदारांना विमा क्लेमची रक्कम न देवून व तक्रारदारांची विमा क्लेम फाईल क्लोज करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी अ.क्र.1 ला वि.प. विमा कंपनीने इन्शुरन्स पॉलिसी दाखल केलेली आहे. अ.क्र.3 ला वि.प. विमा कंपनी यांनी दि. 25/12/2019 रोजी तक्रारदारांना पाठविलेले पत्र दाखल केले आहे. सदरचे पत्राचे अवलोकन करता वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांना ता. 19/10/2019, 21/10/19, 15/11/19 आणि अंतिम 13/12/19 रोजी मेल केलेले असून तक्रारदारांकडून सदरचे मिळकतीच्या अनुषंगाने कागदपत्रांची मागणी केलेली आहे. सदरची कागदपत्रे तक्रारदारांनी वि.प. कंपनीस दिलेली नसलेने सदरचा क्लेम नो क्लेम झालेचे तक्रारदारांना कळविले आहे. तथापि प्रस्तुतकामी तक्रारदारांचे ता. 23/3/2021 रोजीचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदारांनी वि.प. विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म भरुन दिला. त्यावेळी लागणारी सर्व कागदपत्रे सादर केलेली आहेत. तसेच वि.प. विमा कंपनीचे मागणीप्रमाणे तक्रारदार हे स्टॉक बाबत बँक ऑफ इंडियाला दर महिन्याला कळवित होते. त्या कारणाने ता. 09/02/2019 ते 02/08/2019 पर्यंत असणारे स्टॉकची माहिती व बँकेला सादर केलेली कागदपत्रे वि.प. विमा कंपनीस सादर केल्याचे कथन केले आहे. सदर स्टॉकचे नुकसानीबाबत बँकेला कळविलेली माहिती/स्टेटमेंट तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रातील अ.क्र.2 ते 14 ला दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी बँक ऑफ इंडिया यांना पाठविलेल्या स्टेटमेंटचे अवलोकन करता सदरचे स्टेटमेंट दि. 02/08/19, 5/07/19 व 3/06/19 रोजीची दिसून येतात तसेच सदरचे स्टेटमेंट Total value एकूण स्टॉकची रक्कम नमूद असून त्यावर तक्रारदारांची सही व शिक्का आहे. सबब, सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदारांचा स्टॉक हा ता. 05/08/2019 रोजी महापूर येण्यापूर्वी तक्रारदारांचे मिळकतीमध्ये होता. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. सबब, तक्रारदारांनी वि.प. विमा कंपनीस तक्रारदारांकडे उपलब्ध असणारी कागदपत्रे विमा क्लेम सोबत दाखल करुन देखील वि.प. यांनी विमा पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता तक्रारदारांचा क्लेम नो क्लेम या शे-यानिशी नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी आयोगामध्ये महापुराचे पाण्यामुळे झालेल्या स्टॉकचे नुकसानीपोटी रक्कम रु.2,75,000/- तसेच बिल्डींगचा रंग व पत्रे असलेले शेड व कंपाऊंड यांचे नुकसानीपोटी रु.1,25,000/- अशी एकूण रक्कम रु.4,00,000/- ची मागणी केली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदरांचे पॉलिसीचे अवलोकन करता
Super Structure - Rs. 3,00,000/-
Stock and Stock in process - Rs. 3,00,000/-
अशी एकूण sum assured रु. 6,00,000/- पॉलिसी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे उतरविलेली आहे. तक्रारदारांनी बिल्डींगचा रंग व पत्रे असलेले शेड व कंपाऊंड यांचे नुकसानीपोटी रु.1,25,000/- ची मागणी केली आहे. तथापि त्याअनुषंगाने पंचनामा अथवा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तथापि तक्रारदारांनी प्रस्तुतकामी सदरचे मिळकतीमध्ये महापुरावेळी स्टॉक असलेचे अनुषंगाने कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्याचे नुकसान भरपर्इापोटी रक्कम र.2,75,000/- ची मागणी केली आहे. सदरची रक्कम वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,75,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 25/09/2020 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
8. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना विमाक्लेमची रक्कम रु.2,75,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 25/09/20 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|