न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीची मोटरसायकल नं. एमएच-08/एडब्ल्यू-9791 असून तिचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविला आहे. सदर विमा पॉलिसीचा क्र. 110522123750016265 असा असून कालावधी दि. 27/01/2021 ते 26/01/2022 असा होता व आहे. दि. 22/6/2021 रोजी चिपळूण येथे अतिवृष्टी झालेने व पुराचे पाणी शहरामध्ये शिरलेने तक्रारदाराची मोटार सायकल सदर पुराचे पाण्यात बुडून तिचे संपूर्णपणे नुकसान झाले. सदर नुकसानीची माहिती तक्रारदारांनी वि.प. यांना दिली. वि.प. यांनी तक्रारदारांना दुरुस्तीचे अंदाजपत्रक देणेस सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी त्यांचे वाहन दुरुस्तीसाठी सोडले व दुरुस्तीचे अंदाजपत्रक वि.प. यांना दिले. सदर अंदाजपत्रकानुसार सदर वाहनाचे दुरुस्तीसाठी रक्कम रु.1,40,513/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर वाहनाचे आय.डी.व्ही. रक्कम रु.1,80,500/- इतकी होती. सदर वाहनाचा दुरुस्ती खर्च हा आय.डी.व्ही. रक्कम रु.1,80,500/- च्या 75 टक्के पेक्षा जास्त असलेने सदरचे वाहन हे टोटल लॉस झाले आहे. म्हणून वि.प. यांनी तक्रारदारास रु. 1,80,500/- द्यावयास पाहिजे होते परंतु वि.प. कंपनीने सदरची रक्कम दिलेली नाही. परंतु वि.प. कंपनीने तक्रारदाराचे क्लेमची फाईल बंद करत असलेचे तक्रारदारांना कळविले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 1,80,500/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.40,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 8 कडे अनुक्रमे क्लेम फाईल क्लोज केलेचे पत्र, विमा पॉलिसी, वाहनाचे आर.सी. बुक, दुरुस्तीचे अंदाजपत्रक, सर्व्हिस ऑपरेशन हेड यांचे पत्र, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली पत्रे, वटमुखत्यारपत्र, वाहनाचे रिस्टोरेशन मॅन्युअल व पूरग्रस्त वाहनाचे फोटो वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद पुरसीस दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) वि.प. कंपनीने तक्रारदारास दि. 18/10/2021 रोजी पत्र पाठवून तक्रारदाराचे विमा प्रस्तावाचा पूर्वविचार करत असलेचे कळविले. तक्रारदार मागणी करतात, त्याप्रमाणे तक्रारदाराचे वाहन हे टोटल लॉस करुन त्याची टॅक्स वजा करुन रक्कम देय होणेसाठी तक्रारदारांनी त्यांचे वाहनाचे रजिस्ट्रेशन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द करुन तसा दाखला वि.प. कंपनीकडे देणे जरुर आहे. त्याबाबत वि.प. कंपनीने तक्रारदारांना दि. 4/09/2021, 14/09/2021, 30/09/21, 14/10/2021, व शेवटी दि. 18/10/2021 चे पत्र पाठवून तसेच ई-मेलवर पत्र पाठवून तसेच वेळोवेळी फोन करुन वाहनाचे नोंदणी दाखला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द करुन तसा दाखला सादर करणेबाबत कळविले. तथापि तक्रारदारांनी सदरची पूर्तता केली नाही. त्यामुळे वि.प. यांनी तक्रारदारांचे विमा प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तक्रारदार हे चुकीच्या मार्गाने विमा प्रस्ताव मंजूर करु पहात आहेत. सबब, तक्रारदारांना वाहनाची नोंदणी रद्द केलेबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दाखला सादर करणेबाबत आदेश व्हावा, तदनंतर वि.प. विमा कंपनी हे पॉलिसीचे अटी व शर्तीस आधीन राहून विमा प्रस्तावाबाबत निर्णय घेत आहेत. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे मालकीची मोटरसायकल नं. एमएच-08/एडब्ल्यू-9791 असून तिचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविला आहे. सदर विमा पॉलिसीचा क्र. 110522123750016265 असा असून कालावधी दि. 27/01/2021 ते 26/01/2022 असा होता व आहे. सदरची बाब वि.प. यांनी मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदाराचे वाहनाचे पुराच्या पाण्यात बुडून संपूर्ण नुकसान झाले ही बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. विमा पॉलिसीनुसार सदर वाहनाची आय.डी.व्ही. रक्कम रु.1,80,500/- इतकी आहे. सदर वाहनाचे दुरुस्तीचे अंदाजपत्रक संबंधीत डिलरने दिले असून सदर अंदाजपत्रकानुसार सदर वाहनाचे दुरुस्तीसाठी रक्कम रु.1,40,513/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर वाहनाचा दुरुस्ती खर्च हा आय.डी.व्ही. रक्कम रु.1,80,500/- च्या 75 टक्के पेक्षा जास्त असलेने सदरचे वाहन हे टोटल लॉस झाले आहे. सदरची 75 टक्के रक्कम ही रु. 1,35,375/- होते. म्हणजेच दुरुस्तीचा खर्च हा आय.डी.व्ही. रक्कम रु.1,80,500/- च्या 75 टक्के पेक्षा जास्त असलेचे दिसून येते. याचा अर्थ तक्रारदाराचे वाहन हे टोटल लॉस झाले आहे ही बाब शाबीत होते.
8. तक्रारदारांनी याकामी खालील मा.वरिष्ठ न्यायालयांचे खालील निवाडे दाखल केले आहेत.
- I 2021 CPJ 22 (NC)
Sanjay JainVs.Reliance General Insurance Co.Ltd.
When aggregate value of repair is more than 75% of IDV, then said vehicle is treated to be total loss.
- III 2020 CPJ 317 (NC)
ICICI Lombard General Insurance Co.Ltd.
Vs
Mayur Batra & Anr.
वरील निवाडयातील दंडकाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारास वाहनाची आय.डी.व्ही. रक्कम रु.1,80,500/- मंजूर करणे उचित ठरेल असे या आयोगाचे मत आहे.
9. सबब, तक्रारदार हे वि.प.कडून रक्कम रु. 1,80,500/- विमाक्लेमपोटी मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 1,80,500/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.