(आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री. एन. व्ही. बनसोड) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 (क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त व प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया, तुमसर) यांच्या विरूध्द दाखल करून मंचास मागणी केली की, सप्टेंबर 2009 पर्यंतच्या पेन्शनची थकित रक्कम रू. 8,848/- ही 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रू. 5,000/-, नोटीसचा खर्च रू. 600/- आणि दाव्याचा खर्च रू. 3,000/- मिळावा अशीही मागणी केली आहे.
तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्ता हा युनिव्हर्सल फेरो अलाईज अॅन्ड केमिकल लिमिटेड, तुमसर येथे काम करीत होता व विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे मासिक पगारातून कपातीच्या रकमा जमा होत होत्या. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्यास ई.पी.एस. 1995 ह्या योजनेअंतर्गत लाभ देण्याचे मान्य केले होते. विरूध्द पक्ष 1 यांचेकडून तक्रारकर्त्यास सदस्यत्व क्रमांक एम.एच./8663/993 मिळाले होते. तक्रारकर्त्याची नियुक्ती सेवा संपल्यामुळे मासिक पेन्शन लाभ व थकबाकीकरिता तक्रारकर्त्याने अर्ज केल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांचेद्वारा तक्रारकर्त्यास पी.पी.ओ. नंबर एम.एच./नाग/76337 दिनांक 17/09/2009 रोजी देण्यात आल्याचे कळविण्यात आले.
3. तक्रारकर्त्याने पेन्शनच्या लाभासंदर्भातील रकमा जमा होण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया, तुमसर येथे खाते क्रमांक 11365499036 उघडले. तक्रारकर्त्यानुसार त्याला पेन्शन एरिअर्सचे रू. 8,848/- विरूध्द पक्ष 1 यांच्यातर्फे मिळणार होते. परंतु ते मिळाले नाही. रक्कम मिळण्याकरिता विरूध्द पक्ष यांच्याकडे विचारणा केली, परंतु दाद मिळाली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सुध्दा सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने वकिलामार्फत नोटीस देखील पाठविली होती. परंतु त्यास उत्तर प्राप्त झाले नाही. सदर तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्रात येते.
तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 8 ते 15 वर विरूध्द पक्ष 1 चे दिनांक 17/09/2009 चे पत्र, तक्रारकर्त्याची दिनांक 15/03/2010 ची नोटीस व त्याच्या पोचपावत्या तसेच बँक खात्याची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. 4. मंचाने तक्रार दाखल करून विरूध्द पक्ष यांना नोटीस बजावली. विरूध्द पक्ष 1 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांचे लेखी उत्तरातील म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः-
5. विरूध्द पक्ष 1 यांनी, तक्रारकर्त्याने त्याच्या मालकाकडून झालेल्या प्रॉव्हीडन्ट फन्डमध्ये कपात व सहभागाबाबत आणि विरूध्द पक्ष 1 चे कार्यालयात केलेल्या जमासंबंधी केलेले परिच्छेद क्र. 1 ते 6 मधील कथन पूर्णपणे खोटे व निराधार असून ते अमान्य केले. तक्रारकर्त्याचे मालक युनिव्हर्सल फेरो अलाईज अॅन्ड केमिकल लिमिटेड कंपनीची स्वतःची एक प्रॉव्हीडन्ट फन्ड ट्रस्ट मुंबई येथे आहे आणि कंपनीच्या सर्व कर्मचा-यांचे प्रॉव्हीडन्ट फन्ड व पेन्शनचे अकाउंट हे ई.पी.एफ.ओ. मुंबई येथील कार्यालयाद्वारे चालविल्या जाते. परंतु तक्रारकर्त्याचा वरील पी. एफ. अकाउंट नंबर आर. ओ. मुंबई येथून नागपूर येथे विरूध्द पक्ष 1 कडे स्थानांतरित करण्यात आला. त्यामुळे प्रॉव्हीडन्ट फंडसंबंधी विरूध्द पक्ष 1 यांचा काही एक संबंध नाही. विरूध्द पक्ष 1 यांना मुंबई कार्यालयाकडून तक्रारकर्त्याची केस मिळताच त्वरित कार्यवाही करून वर नमूद केल्याप्रमाणे दिनांक 17/09/2009 चा पी. पी. ओ. तयार करण्यात आला. त्यानुसार रू. 8,848/- मासिक सेवानिवृत्ती वेतनाची थकबाकी अदा करण्यात आली आणि दरमहा रू. 783/- प्रमाणे दिनांक 22/10/2008 पासून सेवा निवृत्ती वेतन देण्यात आले. त्यानुसार विरूध्द पक्ष 2 कडे थकित मासिक सेवा निवृत्ती वेतन रू. 8,848/- व त्यानंतर मासिक पेन्शन रू. 783/- वेळोवेळी पाठविण्यात आलेली आहे. विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 17/09/2009 च्या पत्रान्वये तक्रारकर्त्यास कळविल्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीच्या परिच्छेद 3 व 4 मध्ये बाबी नमूद केल्या. त्यानंतर सुध्दा तक्रारकर्त्यास मासिक निवृत्ती वेतन बरोबर मिळत आहे. तक्रारकर्त्यास काही व्यथा असेल तर ती विरूध्द पक्ष 2 व तक्रारकर्ता यांच्यामध्ये आहे आणि विरूध्द पक्ष 1 यांना विनाकारण प्रस्तुत तक्रारीमध्ये ओढण्यात आले असून विरूध्द पक्ष 1 यांची सेवेत कोणतीही त्रुटी नाही.
6. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरासोबत अनुक्रमे पृष्ठ क्र. 25 ते 27 वर दिनांक 17/08/2009 चे मुंबई कार्यालयातून नागपूर कार्यालयात प्रकरण स्थानांतरणाबाबतचे पत्र, विरूध्द पक्ष 1 यांचे दिनांक 17/09/2009 चे पत्र आणि दिनांक 16/10/2009 चे weekly statement of arrears reconciliation of bank accounts दाखल केलेले आहे. 7. मंचाने पाठविलेली नोटीस विरूध्द पक्ष 2 यांना प्राप्त होऊनही विरूध्द पक्ष 2 हे सतत गैरहजर आहेत.
8. युक्तिवादाच्या वेळेस तक्रारकर्ता व त्याचे वकील गैरहजर तसेच विरूध्द पक्ष 2 सुध्दा गैरहजर. मंचाने, विरूध्द पक्ष 1 च्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीत दाखल संपूर्ण कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. कारणमिमांसा व निष्कर्ष 9. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 25 वर दाखल केलेल्या दस्तऐवजावरून स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचे पेन्शन प्रकरण हे सहाय्यक भविष्य निधी आयुक्त, मुंबई यांच्याकडून क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त यांच्याकडे दिनांक 17/08/2009 रोजी स्थानांतरित करण्यात आले. विरूध्द पक्ष 1 यांनी स्थानांतरणानंतर अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 26 वरील दिनांक 17/09/2009 चे आदेशानुसार तक्रारकर्त्याची मासिक पेन्शन रू. 783/- निर्धारित केली व सप्टेंबर 2009 पर्यंत रू. 8,848/- पेन्शन एरिअर्स निर्धारित केले व ती रक्कम दरमहा विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे असलेल्या तक्रारकर्त्याचे बचत खाते क्रमांक 11365499036 मध्ये जमा करीत असल्याबाबत तक्रारकर्त्यास सूचना दिली. विरूध्द पक्ष् 1 यांनी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 27 वर दाखल केलेल्या Reconciliation of Bank Accounts नुसार दिनांक 16/10/2009 ला तक्रारकर्त्याच्या खात्यात रू. 8,848/- जमा करण्याकरिता विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे पाठविण्यात आलेले आहेत. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या बचत खात्याच्या नोंदीनुसार सुध्दा दिनांक 04/12/2009 ला रू. 11,365.70 जमा असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याचे सदर खाते हे निव्वळ पेन्शनची थकबाकी व मासिक पेन्शनच्या रकमा जमा होण्याकरिताच असल्यामुळे रू. 8,848/- व त्यानंतरची मासिक पेन्शनची रक्कम ही रू. 11,365.70 मध्ये अंतर्भूत आहे असे स्पष्टपणे दिसते. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 05/12/2009 व 30/12/2009 ला रू. 7,000/- व रू. 2,000/- याप्रमाणे एकूण रू. 9,000/- ची खात्यातून उचल केलेली आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या स्टेटमेंट ऑफ अकाउंट वरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 2 कडे खाते उघडल्यापासून दिनांक 04/12/2009 पर्यंतचे स्टेटमेंट ऑफ अकाउंट मंचासमोर दाखल केलेले नाही व जमा झालेल्या एरिअर्सबाबत वस्तुस्थिती संदिग्ध ठेवण्याचा प्रयत्न केला.
10. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या रकमा विरूध्द पक्ष 1 ने विरूध्द पक्ष क्र. 2 कडे पाठविल्याप्रमाणे त्याच्या खात्यात रू. 8,848/- व त्यानंतर मासिक पेन्शनचे रू. 783/- दरमहा नियमितपणे जमा होत आहेत. त्यामुळे सुध्दा तक्रारकर्त्याने वस्तुस्थिती मंचापासून लपवून मंचासमोर तक्रार दाखल केलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. दिनांक 25/01/2011 ला तक्रार दाखल केल्यानंतर आजपर्यंत मागील 08 तारखांना तक्रारकर्ता व त्याचे वकील सतत गैरहजर आहेत. यावरून सुध्दा हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने खात्यात रक्कम जमा झाल्याची वस्तुस्थिती लपवून व मंचासमोर विरूध्द पक्ष 1 यांचेसोबत गैरसमज उत्पन्न करून संदिग्ध व खोडसाळ स्वरूपाची तक्रार दाखल केलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्याने विनाखर्चिक व शीघ्र निकाली निघणा-या ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीचा पूर्णतः गैरफायदा घेतला आहे. विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 17/08/2009 ला मुंबई कार्यालयाचे पत्र प्राप्त होताच एक महिन्याच्या अवधीत म्हणजे दिनांक 17/09/2009 ला प्रकरण तत्परतेने निकाली काढले व त्यानंतर तक्रारकर्त्याने रकमेची उचल केली. असे असतांना देखील तक्रारकर्त्याने वस्तुस्थिती मंचापासून लपवून तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे सदर तक्रार खोटी व खोडसाळ स्वरूपाची असल्यामुळे तसेच विरूध्द पक्ष यांच्या सेवेत कोणत्याही स्वरूपाची त्रुटी नसल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 26 अन्वये रू. 2,000/- दंडासह तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. मंचाचा वेळ विनाकारण व्यर्थ घालविल्यामुळे आणि विरूध्द पक्ष 1 यांना तक्रारीत गोवल्यामुळे तक्रारकर्त्याने दंड रकमेपैकी रू. 1,000/- मंचाच्या Legal Aid Fund मध्ये जमा करावे आणि रू. 1,000/- विरूध्द पक्ष 1 यांना द्यावे असे मंचाचे मत आहे. करिता खालील आदेश. आदेश
तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
1. तक्रारकर्त्यास आदेश देण्यात येतो की, त्याने खोटी व खोडसाळ स्वरूपाची तक्रार मंचासमोर दाखल केल्यामुळे दंडित रक्कम रू. 2,000/- पैकी रू. 1,000/- मंचाच्या Legal Aid Fund मध्ये जमा करावे आणि रू. 1,000/- विरूध्द पक्ष 1 यांना द्यावे. 2. तक्रारकर्त्याने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
| | HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |