न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार हे स्वयंरोजगारासाठी “एस. प्लास्टीक्स” या नावाने व्यवसाय करतात व ते तक्रारदारांच्या उपजिविकेचे साधन आहे. त्यांना व्यवसायासाठी इंजेक्शन मोल्डींग मशिन आवश्यक असलेने त्यांनी वि.प. यांचेकडे मोल्डींग मशिन मॉडेल नं.RR-90 Ton Horizontal Srew Type एक नग देणेविषयी ता. 11/4/2016 रोजी ऑर्डर दिली. तक्रारदारांनी वि.प. यांचे मागणीप्रमाणे प्रथम ता. 07/06/2016 रोजी रक्कम रु. 3,00,000/- इतकी रक्कम दिली व उर्वरीत रक्कम दि.19/7/2016 रोजीचे इन्व्हॉईस क्र. RR/16-17/S-007 ने अदा केली. त्यानुसार वि.प. यांनी तक्रारदाराचे पत्त्यावर मशिन पोहोच केले. परंतु सदरचे मशिन हे सुरुवातीपासून दोषपूर्ण होते. त्यातील महत्वाच्या VDP पंपाची अलाईनमेंट योग्य नसलेचे आढळून आले. त्याचप्रमाणे इजेक्टर सिलेंडर हा भाग ही योग्य नव्हता असे आढळून आले. सदरची बाब वि.प. यांचे निदर्शनास आणली असता वि.प. यांनी VDP पंप बदलून देणेस नकार दिला. म्हणून तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे स्वयंरोजगारासाठी “एस. प्लास्टीक्स” या नावाने व्यवसाय करतात व ते तक्रारदारांच्या उपजिविकेचे साधन आहे. त्यांना व्यवसायासाठी इंजेक्शन मोल्डींग मशिन आवश्यक असलेने त्यांनी वि.प. यांचेकडे मोल्डींग मशिन मॉडेल नं.RR-90 Ton Horizontal Srew Type एक नग देणेविषयी ता. 11/4/2016 रोजी ऑर्डर दिली. त्या मशिनची किंमत रु. 13,21,875/- इतकी होती. तक्रारदारांनी वि.प. यांचे मागणीप्रमाणे प्रथम ता. 07/06/2016 रोजी रक्कम रु. 3,00,000/- इतकी रक्कम दिली व उर्वरीत रक्कम दि.19/7/2016 रोजीचे इन्व्हॉईस क्र. RR/16-17/S-007 ने अदा केली. त्यानुसार वि.प. यांनी तक्रारदाराचे पत्त्यावर मशिन पोहोच केले. परंतु सदरचे मशिन हे सुरुवातीपासून दोषपूर्ण होते. त्यातील महत्वाच्या VDP पंपाची अलाईनमेंट योग्य नसलेचे आढळून आले. त्याचप्रमाणे इजेक्टर सिलेंडर हा भाग ही योग्य नव्हता असे आढळून आले. सदरची बाब वि.प. यांचे निदर्शनास आणली असता वि.प. यांनी VDP पंप बदलून देणेस नकार दिला. म्हणून तक्रारदारांनी सदरचा पंप हा अन्य विक्रेत्याकडून विकत घेतला. त्यासाठी रु. 80,000/- इतका खर्च आला. सदरचे मशिन हे वारंवार नादुरुस्त होत होते व वि.प. यांनी ते अनेकवार दुरुस्त करुन दिले. वि.प. यांनी सदर मशिनची संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग गॅरंटी दिली होती. मात्र दि. 20/12/2017 रोजी वि.प. यांनी तक्रारदाराकडून सर्व्हिस चार्ज रु. 8,260/- घेतला. नवीन सिलेंडर देताना योग्य ते सिल वि.प. यांनी पुरविले नाही. तक्रारदाराकडून वि.प. ने नेलेले कॅडल व 2 कपलींग परत करणेची विनंती केली असता वि.प. यांनी त्याची दखल घेतली नाही. वि.प. ने तक्रारदारांना दिलले मशिन व त्याचे पार्ट हे दोषपूर्ण असून संपूर्णपणे योग्य मशिन देणेची जबाबदारी वि.प. यांची होती. वि.प. यांनी मशिनमधील त्रुटींचे निराकरण करुन न दिलेने तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली परंतु त्यास वि.प. यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सबब, तक्रारदारांनी खरेदी केलेले मशिन परत घेवून जाणेबाबत व तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली रक्कम रु.13,21,875/- परत करणेबाबत आदेश व्हावेत, तक्रारदारांनी VDP पंपच्या व तदनुषंगिक खर्चापोटी रु. 90,000/-, व्यावसायिक नुकसानीपोटी रु. 4,00,000/- व आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. यांनी दिलेला प्रोफॉर्मा, तक्रारदारांनी रक्कम अदा केल्याबाबतच्या पावत्या, वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेले टॅक्स इन्व्हॉईस, तक्रारदारांनी वि.प यांना दिलेली पत्रे, नोटीस, नोटीसची पोहोच
इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
4. वि.प. यांना नोटीस लागू झालेनंतर आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, वास्तविक अलाईनमेंट योग्य पध्दतीने केली नसल्यास मशिन सुरुच झाले नसते अथवा सुरु झालेस त्याचेतील दोष दोन दिवसांमध्ये दिसून आले असते. तक्रारदाराची VDP पंपाच्या अलाईनमेंटबाबतची तक्रार ही मशिन विक्री केलेनंतर एक वर्षानतर उद्भवली आहे. मशिनची वॉरंटी ही एक वर्षापर्यंत होती. इंजेक्टर सिलेंडरसहीत संपूर्ण मशिनला येाग्य कुलींग टॉवर वापरणे गरजेचे होते. परंतु तक्रारदाराने चांगल्या प्रतिचा कुलींग टॉवर वापरला नाही. सिलेंडरमधील सील हे तक्रारदार यांच्या चुकीमुळे खराब होत होते. तरीदेखील वि.प यांनी ते स्वखर्चाने बदलून दिले आहे. वॉरंटी कालावधीनंतर उद्भवलेली दुरुस्ती करुन देणेची जबाबदारी वि.प. यांचेवर येत नाही. सदरचा VDP पंप उत्पादित कंपनी युकेन यांचेकडे पाठविली असता त्यानी सदरचा पंप 5.7 सेकंद या सायकल टाईमवर चालविला असल्याने सदर पंपाचे कार्टेज व शाफ्ट खराब झालेचे निदर्शनास आले. तक्रारदारांनी चुकीच्या पध्दतीने मशिन चालविल्याने VDP पंप खराब झाला आहे. वि.प. यांनी घेतलेले चार्जेस हे वॉरंटी कालावधीनंतर उद्भवलेल्या तक्रारीकरिता घेतलेले आहेत. तक्रारदारांनी मशिनसोबतचे कॅडल व 1 कपलिंग दुरुस्तीसाठी दिले होते. तक्रारदार हे VDP पंप परत घेवून गेले परंतु सदरचे पार्ट तसेच ठेवून गेले. त्याबाबत वि.प. यांनी तक्रारदारांना सदरचे पार्ट घेवून जाणेबाबत सांगितले. परंतु तक्रारदारांनी ते नेलेले नाहीत. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
5. वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र व दाखल केलेले म्हणणेच हाच लेखी युक्तिवाद समजणेत यावा अशी पुरसीस दाखल केली आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार हे स्वयंरोजगारासाठी “एस.प्लास्टीक्स” या नावाने व्यवसाय करतात. वि.प. यांचा आर.आर. अॅटोमेशन या नावाने व्यवसाय असून तक्रारदार यांचे व्यवसायासाठी त्यांना इंजेक्शन मोल्डींग मशीन आवश्यक असलेने त्यांनी वि.प यांचेकडून इंजेक्शन मोल्डींग मशीन मॉडेल नं.RR-90 Ton Horizontal Srew Type ची मागणी दि. 11/4/2016 रोजी केली व सदर मशीनची किंमत रु. 13,21,875/- इतकी होती व त्यानुसार तक्रारदार यांनी प्रथम दि. 07/06/2016 रोजी रक्कम रु. 3,00,000/- व उर्वरीत रक्कम दि. 19/07/2016 रोजीचे इनव्हॉईस नं. RR/16-17/S-007 ने अदा केली असलेचे चलन तसेच इनव्हाईस तक्रारअर्जासोबतचे यादीसोबत दाखल केले आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदाराने वि.प. यांचेकडून इंजेक्शन मोल्डींग मशीन घेतले याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. सदर मशिनची होणारी एकूण रक्कम रु. 13,21,875/- इतकी होती. त्याबाबतचे टॅक्स इन्व्हॉईस कम चलन तक्रारदाराने तक्रारअर्जाचे कागदयादीसोबत दाखल केले आहे तसेच दि. 07/06/2016 चे R.No. 004 ने व चेक नं. 510417 ने रक्कम रु. 3,00,000/- तसेच दि. 20/7/2016 R.No. 005 रक्कम रु. 10,00,000/- RTGS/NEFT dated 15/07/16 तसेच रक्कम रु. 17,000/- चेक नं. 510425 dated on 19/09/2016 अशा रकमा दिलेचे कागदयादीसोबत अनुक्रमे अ.क्र.2, 3 व 4 वर दाखल आहे.
9. तथापि वर नमूद मशीन हे सुरुवातीपासूनच सदोष होते. तक्रारदारास त्यातील महत्वाच्या VDP पंपाची अलाईनमेंट योग्य नसलेचे आढळून आले. तसेच सिलेंडर हा भागही योग्य नव्हता. मात्र VDP पंप बदलून देणेस वि.प. यांनी असमर्थतता दर्शविली तसेच इंजेक्टर सिलेंडरही वि.प. यानी प्रथम दुरुस्त करुन दिले मात्र मशिन काम व्यवस्थित करीत नसलेने तक्रारदार यांचा व्यवसाय वारंवार खंडीत होत होता. तक्रारदारांनी मशिनचे काम हे कितीदा करुन घेतले आहे, याबाबत आर.आर. अॅटोमेशनला दि. 6/3/2017 रोजी पत्रही पाठविलेले आहे. यावरुन केवळ 6 महिन्यातच मशिनचे परिस्थितीची पूर्ण कल्पना येते. सदरची वारंवार होणार दुरुस्ती ही तक्रारदार यांचे मशिनचे वॉरंटी पिरिडमध्येच आहे व तक्रारदार यांनी सदरचे पत्रामध्ये वॉरंटी पूर्ण झालेनंतर वारंवार हाच प्रॉब्लेम आला तर कामाचे पैसे घेणार काय ? व तसे कळवावे या संदर्भातही विचारणाही केली आहे. तसेच दि. 17/11/2017 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांना दिले पत्रावरुन मशीनचे VDP पंपाचा शाफ्ट तसेच मेटलचे कपलिंग खराब झालेची बाब युकेनच्या आर.जे. हायड्रॉलेक्सने कळविले आहे व त्यासंर्भातील टेस्ट रिपोर्ट त्यांचेकडून घेणेसाठीही वि.प. यांना कळविलेचे स्पष्ट होते.
10. तथापि वि.प. यांनी हजर होवूनही सदरचा “टेस्ट रिपोर्ट” या आयोगासमोर दाखल केलेचे दिसत नाही. तसेच वि.प. यांचे कथनानुसार VDP पंपाचे अलाईनमेंटची तक्रार ही मशिन घेतलेनंतर एक वर्षांनी उद्भलेली आहे. मात्र या संदर्भातील तक्रारदार यांनी ईमेलद्वारे केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत दि. 08/09/2018 चे कागद यादीने अ.क्र.1 ला दाखल केलेली आहे. यावरुन तक्रारदाराने मशिन हे दि. 7/6/2016 रोजी घेतले व सदरचा पत्रव्यवहार हा दि. 12/01/2017 चा असलेचे दिसून येते म्हणजेच वॉरंटी कालावधीत मशीन नादुरुस्त असलेची बाब शाबीत होते. सबब, वि.प. यांनी घेतलेला हा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे. तसेच सदरचा पंप हा 5.7 या सायकल टाईमवर चालविला असल्याकारणाने सदर पंपाचे कार्टेज व शाफ्ट खराब झालेचे निदर्शनास आले असे वि.प. यांचे कथन आहे. वि.प. यांचे कथनाप्रमाणे जरी वादाकरिता सदर पंप 10 सेकंद टाइमींगवर चालविणे आवश्यक होते असे असले तरी आयोगासमोर तसे “इन्स्ट्रक्शन मॅन्युअल” दाखल नाही. सबब, सदरची बाब पुराव्यानिशी वि.प यांनी शाबीत करुन शकले नसलेने हा आक्षेपसुध्दा हे आयोग फेटाळून लावत आहे. तक्रारदार व वि.प. यांनी दखल केलेल्या पुराव्यांचा विचार करता सदरचे वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेले मशिन हे सदोष (उत्पादित दोष) असणारे होते या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारअर्जात नमूद मशीन हे वारंवार नादुरुस्त होत होते याबाबत वि.प. यांचा आक्षेप नाही तथापि वॉरंटीचे कालावधीचा विचार करता ते वॉरंटीमध्ये होते ही बाब तकारदार यांनी दाखल कागदपत्रांद्वारे शाबीत केली आहे. जर मशिन घेतल्यापासून सहा महिन्यातच मशिनचे VDP पंप यासारख्या महत्वाच्या भागाचे काम व्यवस्थित न होणे, ऑईल सिलचे तुकडे मशिनमध्ये वारंवार येत राहणे ही सर्व वस्तुस्थितीही या आयोगास नाकारता येत नाही व सदरची वस्तुस्थिती ही मशीन खरेदी केलेपासून 1 वर्षाचे आतच सुरु झालेचे तक्रारदार यांनी दाखल केले “आर.आर.ऑटामेशन” यांना दिलेल्या पत्रावरुन दिसून येते. दि. 6/3/2017 च्या पत्रांवरुन किती लोकांनी सदरचे मशिनची दुरुस्ती केली ही वस्तुस्थिती स्वयंस्पष्टच होते. सबब, यावरुन सदरचे मशिन हे उत्पादित दोष असणारेच होते यावर हे आयोग ठाम आहे. यासाठी दुस-या कोणत्याही रिपोर्टची आवश्यकता नाही असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब, असे उत्पादित दोष असणारे मशिन तक्रारदारास देवून वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवात्रुटी दिली आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. याकरिता तक्रारदार यांनी केलेली मागणी अंशतः मान्य करणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
11. सबब, हे आयेाग तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून खरेदी केलेले मशिन परत घेवून जाणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. तक्रारदार यांना वि.प. कंपनीकडे सदरची रक्कम रु.13,21,875/- भरलेची बाब आयोगाने या पूर्वीच स्पष्ट केलेली आहे. सबब, सदरची रक्कम रु. 13,21,875/- तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात तसेच तक्रारदार यांनी सदरची रक्कम तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने देणेचे आदेश करणेत येतात. तक्रारदार यांनी जरी सदरचे मशिनमधील बदलाव्या लागलेल्या VDP पंपाच्या व तदनुषंगिक खर्चापोटी रक्कम रु. 90,000/- मागितले असले तरी सुध्दा सदरचे रकमेबाबत कोणताही पुरावा या आयोगासमोर नाही. मात्र दुरुस्ती झाली याबद्दल उभय पक्षांमध्ये दुमत नाही. सबब, त्याकरिता रक्कम रु.25,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार यांनी मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम रु. 4,00,000/- तसेच अर्जाचा खर्च रु. 20,000/- हा या आयोगास संयुक्तीक वाटत नसलेने त्याकरिता अनुक्रमे रक्कम रु. 20,000/- व रु. 3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना खरेदी दिलेले इंजेक्शन मोल्डींग मशिन मॉडेल नं.RR-90 Ton Horizontal Srew Type परत घेवून जाणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. तसेच सदरचे मशिनकरिता तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली रक्कमरु. 13,21,875/- ही तक्रारदार यांना परत करणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. सदर रकमेवर वि.प. यांनी तक्रारदार यांना तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. वि.प. यांनी तक्रारदार यांना VDP पंपाचे व अनुषंगिक खर्चापोटी रक्कम रु. 25,000/- अदा करावेत.
4. वि.प. यांनी तक्रारदार यांना आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
8. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.