आदेश पारित द्वारा मा. सदस्या कु. सरिता बी. रायपुरे
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा मुरदाडा, तालुका जिल्हा गोंदीया येथील रहिवाशी असून त्याची तेथे 6.50 एकर शेती आहे. सदर शेतीला सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून तक्रारकर्त्याने शेतीत बोरवेल केले व बोरवेल चालविण्याकरिता विद्युत पंप घेण्याकरिता विरूध्द पक्षाचे खाजगी मेकॅनिक चैनलाल गजानन बावने राह. मुरदाडा यांचेसोबत विरूध्द पक्षाच्या दुकानात जाऊन उत्तम दर्जाच्या विद्युत पंपची मागणी केली. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मॅस्कॉट कंपनीचा विद्युत पंप उत्तम दर्जाचा असून गॅरन्टेड असल्याचे सांगून मॅस्कॉट कंपनीचा विद्युत पंप विकला व सदर विद्युत पंपामध्ये काही बिघाड झाल्यास तो दुरूस्त करून देण्याची जबाबदारी विरूध्द पक्षाची असेल असे तक्रारकर्त्याला सांगितले. जर सदर विद्युत पंपात काहीही सुधारणा झाली नाही तर त्या विद्युत पंपाऐवजी दुसरा मोटार विद्युत पंप बदलवून देण्यांत येईल असेही विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सांगितले.
3. विरूध्द पक्षाच्या बोलण्यावर विश्चास ठेवून तक्रारकर्त्याने दिनांक 28/12/2015 रोजी विरूध्द पक्षाकडून 4 एच.पी. 8 सटयुब रू.22,500/- व 100 फुटाचे दोन केबल रू. 1,800/- आणि 2 एन कॉलम पाईप रू.1,500/- अशी एकूण रू. 25,800/- ची खरेदी केली. त्यावेळी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला रू.10,000/- रोख दिले आणि उर्वरित रक्कम काही दिवसांनी देतो असे म्हटल्यामुळे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कच्चे बिल दिले व सदर विद्युत पंप तक्रारकर्त्याला हस्तांतरित केला. त्यानंतर काही दिवसांनी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला रू.5,000/- दिले.
4. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून सदर विद्युत पंप खरेदी करून आणल्यानंतर बोरवेलला लावला व शेतीला पाणी देणे सुरू केले. परंतु एप्रिल महिन्यांत सदर विद्युत पंप जळाला. विद्युत पंप जळाल्याबाबतची माहिती तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला दूरध्वनीद्वारे कळविली असता विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सांगितले की, ‘त्यांचा खाजगी मेकॅनिक तुमच्या गांवी राहतो, त्याच्याजवळ जाऊन आपण आपली /सदर मोटर दुरूस्त करून घ्या’. त्यावर तक्रारकर्त्याने सदर विद्युत मोटर विरूध्द पक्षाच्या दुकानात आणून मेकॅनिकद्वारे दुरूस्त करून घेतली. त्यावेळी तक्रारकर्त्याच्या शेतात असलेल्या धानाच्या पिकाकरिता पाण्याची नितांत गरज असल्यामुळे तक्रारकर्त्याने दुरूस्त केलेला पंप आपल्या बोरवेलला लावला. परंतु दुरूस्त केलेला सदर विद्युत पंप पंधरा दिवसानंतर पुन्हा जळाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याबाबतची सूचना विरूध्द पक्षाला दिली असता विरूध्द पक्षाने श्री. चैनलाल गजानन बावने या मेकॅनिकला दाखविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने मेकॅनिकला सदर विद्युत पंप दाखविला. मेकॅनिकने विद्युत पंपाची तपासणी केली व सदर विद्युत पंप दुरूस्त होऊ शकत नाही असे तक्रारकर्त्याला सांगितले. ही माहिती तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला दिली असता विरूध्द पक्षाने ही जबाबदारी माझी नाही असे उत्तर देऊन आपली जबाबदारी टाळली. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला सदर विद्युत पंप दुरूस्त करून देण्याची किंवा त्याऐवजी नवीन विद्युत पंप देण्याची विनंती केली मात्र विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकले नाही. विरूध्द पक्षाच्या बेजबाबदारपणामुळे व शेतीला पाणी न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याच्या शेतामधील पिकाचे संपूर्ण नुकसान झाले व त्यामुळे तक्रारकर्त्याला जवळपास रू.3,00,000/- ची हानी सोसावी लागली.
5. सदर विद्युत पंप एक वर्ष गॅरन्टीचा होता परंतु तो तीन-चार महिन्यांमध्येच जळाला व विरूध्द पक्षाने त्याची दुरूस्तीही करून दिली नाही किंवा बदलूनही दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांचे वकील श्री. एस. बी. सुलाखे , राह. मुरदाडा यांच्यामार्फत विरूध्द पक्षाला दिनांक 03/11/2016 रोजी रजिस्टर्ड नोटीस पाठविली व विद्युत पंप बदलवून देण्याची किंवा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला दिलेली रक्कम रू.15,000/- परत करण्याची तसेच आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी मान्य न करता कायदेशीर नोटीसला खोटे उत्तर दिले.
6. तक्रारकर्त्याने शेती पिकविण्याकरिता सदर विद्युत पंप खरेदी केला मात्र विद्युत पंप जळाल्यामुळे तक्रारकर्ता त्याच्या शेतीला पाणी देऊ शकला नाही. परिणामी तक्रारकर्त्याला धान पिकाचे रू.3,00,000/- चे आर्थिक नुकसान सोसावे लागले. तसेच विद्युत पंप जळाल्यामुळे तक्रारकर्ता रबी पीक देखील घेण्यास असमर्थ असून तक्रारकर्त्याजवळ नवीन विद्युत पंप खरेदी करण्याकरिता पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्ता हा अडचणीत आलेला आहे. विरूध्द पक्षाने अटी व शर्तींचा भंग केलेला असून तक्रारकर्त्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास विरूध्द पक्ष जबाबदार आहे.
7. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सदर विद्युत पंप हा उत्तम दर्जाचा व गॅरन्टेड असल्याचे सांगून कमी दर्जाचा विद्युत पंप देऊन तक्रारकर्त्याची फसवणूक केलेली आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला सदर विद्युत पंप जळाल्याची माहिती देऊन तो दुरूस्त करून देण्याची अथवा नवीन विद्युत पंप देण्याची किंवा विद्युत पंपाकरिता तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. परंतु विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विनंतीची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे विरूध्द पक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करून सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
(1) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मॅस्कॉट कंपनीचा विद्युत पंप बदलून द्यावा किंवा सदर विद्युत पंपाची मूळ रक्कम रू.25,500/- परत करावी.
(2) तक्रारकर्त्याचे झालेले आर्थिक नुकसान रू.3,00,000/- भरपाई म्हणून द्यावे व मानसिक, शारिरिक त्रासापोटी रू25,000/- नुकसानभरपाई व प्रकरण खर्च रू.10,000/- विरूध्द पक्षाने द्यावे.
8. तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विद्युत पंप खरेदीच्या बिलाची प्रत, रजिस्टर्ड नोटीसच्या पावतीची प्रत, विरूध्द पक्षाला पाठविलेल्या नोटीसची प्रत, पोष्टाच्या पोचपावत्या, विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नोटीसला दिलेल्या उत्तराची प्रत इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
9. सदर प्रकरणाची नोटीस विरूध्द पक्षावर बजावण्यात आली असता विरूध्द पक्षाने त्यांचे परिच्छेदनिहाय उत्तर दाखल करून त्यात तक्रारकर्त्याचे संपूर्ण म्हणणे खोडून काढले.
विशेष कथनामध्ये विरूध्द पक्षाचे म्हणणे असे आहे की, विरूध्द पक्षाचे दुकान कुडवा नाका, गोंदीया येथे असून तक्रारकर्ता हा दिनांक 28/12/2015 रोजी विरूध्द पक्षाच्या दुकानात आला व मोटार पंप खरेदी करावयाचा असल्याचे सांगितले. त्यावरून विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मॅस्कॉट कंपनीचा विद्युत मोटार पंप दाखविला असता तक्रारकर्त्याला तो पसंत पडला. तक्रारकर्त्याच्या पसंतीनुसार विरूध्द पक्षाने मॅस्कॉट कंपनीचा विद्युत मोटार पंप व इतर सामान मिळून रू.25,800/- चे सामान तक्रारकर्त्याला दिले. सदर सामान खरेदी करतेवेळी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला रू. 10,000/- दिले व उर्वरित रक्कम रू.16,500/- काही दिवसांनी आणून देणार अशी विनंती केली. काही दिवसांनी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला रू.5,000/- आणून दिले व दिनांक 21/03/2016 रोजी रू.1,675/- चे सामान पुन्हा खरेदी केले. परंतु त्याबाबतचा कोणताही सबळ पुरावा विरूध्द पक्षाने दाखल केलेला नाही.
त्यानंतर विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे जाऊन उर्वरित रकमेची मागणी केली असता ‘आज देतो, उद्या देतो’ असे म्हणून तक्रारकर्ता रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला. त्याचप्रमाणे एके दिवशी तक्रारकर्ता विरूध्द पक्षाच्या दुकानात आला व उर्मटपणे विरूध्द पक्षासोबत वर्तन केले. विरूध्द पक्षाने कधीही आपला मेकॅनिक तक्रारकर्त्याकडे पाठविला नसून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला उर्वरित रक्कम रू. 13,175/- आजपर्यंत दिलेली नाही. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला त्रास देण्याच्या उद्देशाने तसेच उर्वरित रक्कम हडपण्याच्या दुष्ट हेतूने सदरची खोटी, बनावट व कपोलकल्पित तक्रार दाखल केली असून ती खर्चासह खारीज करण्यांत यावी व तक्रारकर्त्याकडून विरूध्द पक्षाला झालेल्या मानसिक त्रासापोटी रू.50,000/- व प्रकरण खर्च रू.25,000/- सह पंप खरेदीची उर्वरित रक्कम रू.13,175/- 18% व्याजासह परत करण्यांत यावी अशी विनंती केली आहे.
10. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरुन मंचाने खालीलप्रमाणे मुद्दे विचारार्थ घेतले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा -
11. मुद्दा क्र. 1 बाबत – विरूध्द पक्षाने त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही खोटी व कपोलकल्पित असून विरूध्द पक्षाला खोट्या प्रकरणामध्ये फसविल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्याने खोटे व बनावटी कागदपत्र दाखल केलेले असून ते विरूध्द पक्षाला अमान्य आहेत. विरूध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबामध्ये म्हटले आहे की, विरूध्द पक्ष तक्रारकर्त्याकडे वारंवार गेले व उर्वरित रकमेची मागणी केली, परंतु तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम रू.13,175/- विरूध्द पक्षाला परत केले नाही. तथापि विरूध्द पक्षाचे हे म्हणणे ग्राहक मंचास मान्य नाही, कारण विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून उर्वरित रक्कम परत घेण्यासाठी वसुली दावा (Recovery Suit) दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करावयास पाहिजे होता. परंतु विरूध्द पक्षाने तसे केल्याचे दिसून येत नाही.
तसेच तक्रारकर्त्याने दिनांक 28/123/2015 रोजी विरूध्द पक्षाच्या दुकानातून मोटार पंप खरेदी केल्यानंतर त्यांत बिघाड निर्माण झाला. त्यामुळे सदर मोटार पंप बदलवून द्यावा किंवा रक्कम परत करावी अशी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला विनंती केली. परंतु विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला नोटीस पाठविली. त्या नोटीसला सुध्दा विरूध्द पक्षाने उलट उत्तर दिले. विरूध्द पक्षाची मोटार पंप बदलून न देण्याची किंवा रक्कम परत न करण्याची कृती ही सेवेतील न्यूनता दर्शविते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
12. मुद्दा क्र. 2 बाबत – विरूध्द पक्षाने त्यांच्या लेखी जबाबामध्ये म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने खोटे व बनावटी कागदपत्र दाखल केलेले आहेत. परंतु ग्राहक मंचास ते योग्य वाटत नाही, कारण विरूध्द पक्षाने स्वतः त्याच्या विशेष कथनामध्ये मान्य केले आहे की, त्यांचे मोटार पंप विकण्याचे दुकान कुडवा नाका, गोंदीया येथे आहे व तक्रारकर्ता हा दिनांक 28/12/2015 रोजी विरूध्द पक्षाच्या दुकानात आला व मोटार पंप खरेदी करावयाचा आहे असे म्हटले. त्यानुसार विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मास्कोट कंपनीचा विद्युत मोटार पंप दाखविला. सदर विद्युत पंप तक्रारकर्त्याला पसंत पडल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर पंप तसेच इतर सामान मिळून एकूण रू.25,800/- चे साहित्य खरेदी केले. सदर साहित्य खरेदी करतेवेळेस तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला रू.10,000/- दिले. त्याबाबतचे बिल सदरहू प्रकरणामध्ये पृष्ठ क्रमांक 1 वर दाखल केलेले असून त्यावर “Goods once sold will not be taken back” (एकदा विकलेला माल परत घेतल्या जाणार नाही) ही अट नमूद केलेली आहे. सदर अट ही महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार बिलावर लिहिता येत नाही व ही अट ग्राहकाच्या विरूध्द आहे.
ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 14 नुसार एखाद्या वस्तूमध्ये दोष निर्माण झाल्यास/आढळल्यास तो दोष दूर करणे किंवा दोष दुरूस्त होत नसल्यास त्याच वर्णनाची कोणताही दोष नसलेली नवीन वस्तू देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विद्युत मोटार पंप एकतर दुरूस्त करून द्यावयास पाहिजे होता किंवा तो दुरूस्त होणे अशक्य असल्यास त्याऐवजी त्याच वर्णनाचा त्याच बनावटीचा दुसरा नवीन व दोष नसलेला विद्युत मोटार पंप द्यावयास पाहिजे होता असे ग्राहक मंचाचे मत आहे.
तक्रारकर्त्याने सदर तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्याने सदर विद्युत मोटार पंप हा शेती पिकविण्याकरिता खरेदी केलेला होता व सदर शेतीमध्ये धानाचे पीक लावले होते. परंतु सदर विद्युत मोटार पंप जळाल्यामुळे धान पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे धान पिकाचे रू.3,00,000/- चे आर्थिक नुकसान झाले असून खरीप पिकालाही पाणी देता आले नाही. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे ग्राहक मंचास योग्य वाटत नाही कारण तक्रारकर्त्याने त्याच्या शेतातील धान पिकाचे रू.3,00,000/- चे आर्थिक नुकसान झाल्याबाबतचा कोणताही सबळ पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची रू.3,00,000/- ची मागणी मान्य करता येत नाही.
तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये त्याला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू.25,000/- नुकसानभरपाई व प्रकरण खर्च रू.10,000/- विरूध्द पक्षाकडून मिळावेत अशी विनंती केली आहे. मात्र ग्राहक मंचास तक्रारकर्त्याची मागणी ही अवाजवी वाटत असल्याने शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.2,000/- देणे उचित ठरेल असे मंचाचे मत आहे.
वरील कारणामुळे मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
13. मुद्दा क्र. 3 बाबत – मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाकडून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार झाला असल्याने तक्रारकर्ता मागणीप्रमाणे अंशतः दाद मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नमूद केला आहे.
वरील निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-अंतिम आदेश-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 खालील तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
1) विरूध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला मास्कोट कंपनीचा नादुरूस्त विद्युत मोटार पंप विनामूल्य दुरूस्त करून द्यावा.
2) विरूध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, सदर विद्युत मोटार पंप दुरूस्त होत नसल्यास त्याच कंपनीचा व त्याच मेकचा दुसरा नवीन दोष नसलेला विद्युत मोटार पंप त्यांनी तक्रारकर्त्याला द्यावा किंवा
मोटार पंप खरेदी करतेवेळेस त्यांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम म्हणजेच रू.15,000/- त्यांनी तक्रारकर्त्याला द. सा. द. शे. 9% व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 24/01/2017 पासून परत करावी आणि तक्रारकर्त्याने त्याचेकडील मास्कोट कंपनीचा सदोष विद्युत मोटार पंप विरूध्द पक्षाला परत करावा.
3) विरूध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी वरील रकमेशिवाय मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.5,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4) विरूध्द पक्षाने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी. उपरोक्त आदेश क्रमांक 2 व 3 चे पालन 30 दिवसांचे आंत न केल्यास द. सा. द. शे. 12% व्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र राहील.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यांत यावी.
6) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.