नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि. 31-03-2016)
1) वि. प. इंटेक्स टेक्नॉलॉजिस्ट(इंडिया) लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) यातील वि.प. नं. 1 हे मोबाईल हॅन्डसेटचे विक्रेते असून वि.प. नं. 2 हे हॅन्डसेट उत्पादित कंपनीचे पुणे येथील शाखा कार्यालय आहे. तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नावे “इंटेक्स अॅक्वॉ आय 14” या कंपनीचा वि.प. नं. 1 यांचेकडून दि. 21-03-2015 रोजी इंटेक्स कंपनीचा हॅन्डसेट रक्कम रु. 6,000/- बील नं.1572 ने खरेदी केला असून त्याचा आय.एम.ई.आय. नं. 911383350255327 असा आहे. सदर हॅन्डसेटला एक वर्षाची वॉरंटी होती.
3) सदर मोबाईल हॅन्डसेट खरेदी केलेनंतर एक महिन्याचे आतच दि. 21-04-2015 रोजी मोबाईलमध्ये सिमकार्ड दाखवत नसलेचे व मोबाईलची बॅटरी व्यवस्थित चालत नसलेची तक्रार वि.प. यांचेकडे केली. वि.प. यांनी तात्पुरता दोष असलेचे सांगून जुजबी दुरुस्ती करुन हॅन्डसेट तक्रारदारांना दिला.
4) त्यानंतर तक्रारदार यांनी मोबाईल व्यवस्थित चालत नसलेबाबत व त्याचे की पॅड, डिस्प्ले व बॅटरी व आतील मेकॅनिझममध्ये वारंवार दोष निर्माण होऊन हॅन्डसेट व्यवस्थित चालत नसलेबाबत दि. 7-09-2015 रोजी तक्रार केली असता वि.प. नं. 1 यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी ठेवून घेऊन दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठविलेचे सांगितले. त्यावेळी कंपनीकडून नवीन मोबाईल असल्याचे खोटे सांगून तक्रारदार यांना पुन्हा जुना नादुरुस्त मोबाईल हॅन्डसेट विक्री केल्याची माहिती तक्रारदार यांना समजले.
5) तक्रारदारांनी खरेदी केलेल्या मोबाईल हॅन्डसेटची वॉरंटी दि. 20-03-2016 रोजीपर्यंत आहे. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांना जुना मोबाईल हॅन्डसेट नवीन असल्याचे भासवून तक्रारदाराची फसवणूक केलेने तक्रारदार वि.प. नं. 1 कडे दुसरा नवीन मोबईल हॅन्डसेट द्यावा म्हणून सांगितले असता वि.प. नं. 1 यांनी “सदर मोबाईल हॅन्डसेट कंपनीची एजन्सी आम्ही सोडून दिलेली असून आता आमच्या त्यांच्याशी काहीही संबंध नाही तुम्ही कोठे तक्रार करणार असला तर करा” असे उध्दट उत्तर देऊन हॅन्डसेट बदलून देणेस नकार दिला.
6) तक्रादारांनी दि. 16-11-2015 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून नवीन मोबाईल हॅन्डसेट देणेबाबत, नुकसान भरपाई रक्कम रु. 25,000/- ची मागणी केली असता त्याची वि.प. नं. 1 यांनी काहीही दखल घेतली नाही. वि.प. नं. 2 यांनी हॅन्डसेट दुरुस्ती करुन घेऊन आपला अभिप्राय वि.प. नं. 1 यांना कळविला आहे. वि.प. नं. 2 यांना पाठविलेली नोटीस “नॉट क्लेम्ड” शे-यासह परत आली आहे.
7) वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांना जुना मोबाईल हॅन्डसेट विक्री करुन फसवणुक करुन विक्री पश्चात योग्य सेवा दिलेली नाही. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांना नवीन मोबाईल द्यावा. मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रार अर्ज खर्च मिळावा अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
8) तक्रारदारांनी तक्रारीसोबत वि.प. नं. 1 यांची खरेदी केलेल्या मोबाईल हॅन्डसेटची पावती दि. 21-03-2015, हॅन्डसेट प्रथम दुरुस्तीला दिलेची पावती, व सर्व्हिसिंग सेंटर मधुन मोबाईल रिपेअरीचा रिपोर्टस, सर्व्हिंसिंग सेंटरचा अहवाल, तक्रारदारांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, व नोटीस स्विकारलेबाबत पोहच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे. दि. 22-03-2016 रोजी शपथपत्र दाखल करुन जादा पुरावा देणेचा नसलेबाबत पुरसीस दाखल केली.
9) वि.प. नं. 1 यांना मंचाचे नोटीसा बजावणी होऊन वि.प. हजर नसलेने त्यांचेविरुध्द दि. 22-03-2016 रोजी ‘एकतर्फा’ आदेश पारीत केले. तसेच वि.प. नं. 2 यांना मंचाची नोटीस बजावून ते गैरहजर राहिले त्यांनी म्हणणे दाखल केले नसलेने त्यांचे विरुध्द दि. 22-03-2016 रोजी ‘नो-से’ आदेश पारीत केले. तक्रारदार तर्फे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांचा तक्रार अर्ज गुणदोषांवर न्यायनिर्णित करणेत येतो.
10) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे व तक्रारदारांचे वकिलांचा युक्तीवाद यांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदार यांना दोषयुक्त
मोबाईल हॅन्डसेट दिला काय ? होय
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्यात
येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा –
11) तक्रारदार यांचे वकिलांनी युक्तीवाद केला. तक्रारदार यांनी वि.प. नं. 1 यांची खरेदी केलेल्या मोबाईल हॅन्डसेटची पावती दि. 21-03-2015, हॅन्डसेट प्रथम दुरुस्तीला दिलेची पावती, व सर्व्हिसिंग सेंटर मधुन मोबाईल रिपेअरीचा रिपोर्टस, सर्व्हिंसिंग सेंटरचा अहवाल, तक्रारदारांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, व नोटीस स्विकारलेबाबत पोहच पावती इत्यादी दाखल केले.
12) तक्रारदार यांनी आपल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नावे “इंटेक्स अॅक्वॉ आय 14” या कंपनीचा वि.प. नं. 1 यांचेकडून दि. 21-03-2015 रोजी रक्कम रु. 6,000/- बील नं.1572 ने खरेदी केला असून हॅन्डसेटला एक वर्षाची वॉरंटी होती.
13) तक्रारदाराचे तक्रारीनुसार मोबाईल हॅन्डसेट खरेदीनंतर एक महिन्याचे मोबाईलमध्ये सिमकार्ड दाखवत नव्हते, मोबाईलची बॅटरी व्यवस्थित चालत नव्हती. वि.प. नं. 1 यांनी तात्पुरता दोष असलेचे सांगून जुजबी दुरुस्ती करुन हॅन्डसेट तक्रारदाराला दिला. त्यानंतरही मोबाईल व्यवस्थित चालत नसलेबाबत व त्याचे की पॅड, डिस्प्ले व बॅटरी व आतील मॅकॅनिझममध्ये वारंवार दोष निर्माण झालेमुळे पुन्हा दि. 7-09-2015 रोजी तक्रार केली. त्यावेळी वि.प. नं. 1 यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी ठेवून घेऊन दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठविलेचे सांगितले. त्यावेळी कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन म्हणून दिलेला मोबाईल हा या पुर्वी दुस-या कोणास विक्री केलेला नादुरुस्त असा जुना नादुरुस्त मोबाईल हॅन्डसेट वि.प. नं. 1 यांनी विक्री केल्याची माहिती तक्रारदारास समजले.
14) तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या मोबाईल खरेदीचे बिल/टॅक्स इन्व्हाईसवरुन तक्रारदारांनी मोबाईल हॅन्डसेट टॅक्स इन्व्हाईस बील नं. 1572 दि. 21-03-2015 रोजी खरेदी केलेचे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेले मोबाईलचे वि.प. यांचे सर्व्हिस सेंटर मधून मिळालेल्या अ.क्र. 3 व 4 कडील रिपोर्टचे अवलोकन केले असता “Below model warranty shown 11-08-2014, but as per POP shown 21-03-2015 so pls revert with correction and revsert Attached POP & CRM, screen shot “ आणि Sr. No. 911383350255327 , Mcode 2199-1062-0, M Name MOBILE GSM AQUA 1214(BLACK) DUAL SIM, Primary Sale Date - 04-08-2014, Secondary Sale Date : - Tertiary Date 11-08-2014 , DOA SMS Date “ असे नमूद आहे. त्यावरुन तक्रारदारांनी खरेदी केलेला हॅन्डसेट हा वि.प. नं. 1 यांनी मोबाईल हा या पुर्वी दुस-या कोणास विक्री केलेचे स्पष्ट होते. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांना जुना हॅन्डसेट नवीन म्हणून दिलेला आहे. तसेच वि.प. कंपनीचे सर्व्हिस सेंटरचे रिपोर्टसवरुनही तक्रारदारांनी नवीन म्हणून खरेदी केलेला हॅन्डसेट दि. 11-08-2014 रोजी वि.प. नं. 1 यांनी जुना हॅन्डसेट नवीन म्हणून विकला आहे.
15) मोबाईल हॅन्डसेटची वॉरंटी दि. 20-03-2016 रोजीपर्यंत आहे. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांना जुना मोबाईल हॅन्डसेट नवीन असल्याचे भासवून तक्रारदारास फसवणूक करणेचे उद्देशाने विक्री केला. व तक्रारदार नवीन हॅन्डसेट बदलून गेले असता वि.प. नं. 1 यांनी “सदर मोबाईल हॅन्डसेट कंपनीची एजन्सी आम्ही सोडून दिलेली असून आता आमच्या त्यांच्याशी काहीही संबंध नाही ” अशी उध्दट उत्तरे देऊन तक्रारदारास हॅन्डसेट बदलून दिला नाही. जुना मोबाईल हॅन्डसेट नवीन म्हणून विक्री करणे ही वि.प.नं. 1 यांची कृती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे.
16) तक्रार अर्जामध्ये असे नमूद केले आहे की, सदर मोबाईल दुरुस्तीसाठी देऊनही वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना योग्य प्रतिसाद दिलेला नाही. माल विक्री कायद्याचे कलम, 16 प्रमाणे खरेदीदाराने खरेदी केलेली वस्तु त्याच्या उपयोगी आलीच पाहिजे असे ध्वनित आश्वासन व्यापारी क्षेत्रातील रुढीप्रमाणे विक्री करारात असते.
17) कोणत्याही उत्पादनाची उत्पादीत कंपनीने कोणत्याही उत्पादनाची विक्रीपश्चात असणारी सेवा देण्याची जबाबदारी प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रक्ट (Privity of Contract) या तत्वानुसार उत्पादित कंपनी व त्याचे विक्रेत्याची असते. तसेच सदरची जबाबदारी ही केवळ उत्पादन विक्री करण्यापुरती मर्यादित नसून विक्रीपश्चात सेवा देणेची असते. वि.प. नं. 1 हे आपली जबाबदारी जाणीवपूर्वक टाळण्याच्या प्रयत्नात आहेत.
18) तक्रारदारांनी तक्रारीत दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे मोबाईलमध्ये की पॅड, डिस्प्ले व बॅटरी व आतील मॅकॅनिझममध्ये वारंवार दोष निर्माण झालेमुळे झाला असतानाही सदरच्या सदोष मोबाईलबाबत वि.प. नं. 1 व 2 यांना कळवून देखील तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद न देऊन, अथवा हॅन्डसेट दुरुस्ती करुन न देऊन, अथवा त्याच मॉडेलचा नवीन हॅन्डसेट बदलून दिला नाही. तक्रारदारांचे तक्रारीनंतर नादुरुस्त मोबाईल हॅन्डसेट दुरुस्ती करुन दिलेला नाही. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांना जुना हॅन्डसेट नवीन म्हणून विक्री केला आहे. तसेच तक्रारदारांचे मागणीनुसार तक्रारदारांना नविन मोबाईल हॅन्डसेट न देऊन वि.प. नं. 1 व 2 यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे.
19) मंचाचे मते वि. प. नं. 1 व 2 हे तक्रारदारास ग्राहक सरंक्षण कायदा कलम 14 (1) (क) प्रमाणे मायक्रोमॅक्स कंपनीचा “इंटेक्स अॅक्वॉ आय 14” या मॉडेलचा नवीन मोबाईल हॅन्डसेट द्यावा, किंवा ते शक्य नसलेस मोबाईलची किंमत रक्कम रु. 6,000/- (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) द.सा.द.शे. 9 % तक्रार दाखल दि. 6-01-2016 रोजीपासून व्याजासह रक्कम देणेस जबाबदार आहेत.
20) तक्रारदार यांचा मोबाईल वि.प. कडे दुरुस्त करण्यास दिला असता, तो मुदतीत दुरुस्त करुन देणे बंधनकारक होते कारण वॉरंटीच्या मुदतीत असतानाही वि.प. यांनी तक्रारदारास योग्य विक्रीपश्चात सेवा न देणे ही वि.प. सेवेतील त्रुटी आहे. तसेच वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/-(रुपये दोन हजार फक्त) द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
21) न्यायाचे दृष्टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना मायक्रोमॅक्स कंपनीचा “इंटेक्स अॅक्वॉ आय 14” या मॉडेलचा नवीन हॅन्डसेट द्यावा. अथवा ते शक्य नसल्यास हॅन्डसेटची किंमत रक्कम रु. 6,000/- (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) द.सा.द.शे. 9 % तक्रार दाखल दि. 6-10-2015 रोजीपासून व्याजासह द्यावेत.
3) वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.