तक्रार दाखल तारीख – 25/1/17 तक्रार निकाली तारीख – 29/1/18 | | |
| | | | |
|
एकत्रित न्यायनिर्णय
व्दाराः- मा. सौ. मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुतच्या तक्रारी क्र.30/17 व 31/17 ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केल्या आहेत. सदरच्या तक्रारी स्वीकृत करुन जाबदार यांना नोटीस आदेश झाले. तक्रारदार यांनी घरगुती वापरासाठी जाबदार क्र.2 या गॅस संस्थेकडून बरेच वर्षापासून सदर गॅस सिलेंडरची जोडणी घेतलेली होती व आहे. सदरचे गॅस ग्राहक क्र. 602880 या क्रमांकाने अधिकृत नोंदणीकृत ग्राहक म्हणून नोंद करुन गॅस सिलेंडर वितरणाची सेवा देत आहेत व सदरची सेवा जाबदार क्र.1 वितरकामार्फत दिली जाते. त्यानुसार तक्रारदार यांना जाबदार क्र.1 व 2 यांनी एकूण दोन गॅस सिलेंडर योग्य ती अनामत रक्कम स्वीकारुन अदा केली आहेत. मात्र 2 जून 2016 रोजी गॅस शेगडी पेटवत असताना अचानक सदर गॅस सिलेंडरमधून गॅसगळती होवून सिलेंडरचे रेग्युलेटरला आग लागली व तक्रारदार यांचे घरातील प्रापंचिक साहित्याने पेट घेतला व तक्रारदार यांचे अतोनात नुकसान झाले. जाबदार क्र.1 यांनी, जाबदार क्र.1 व 2 तर्फे विमा कंपनीकडे ग्राहकांचे नुकसानीबाबत विमा पॉलिसी उतरविली असून त्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे मान्य व कबूल केले होते. वर नमूद गॅस सिलेंडर हे सदोष होते. सबब, जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोष गॅस सिलेंडरचे वितरण करुन तक्रारदार यांचे आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरलेले आहेत. तसेच जाबदार क्र.3 (आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.) या दोन विमा कंपन्यांकडे नुकसानीची मागणी करुनही त्यांनी तक्रारदार यांना सेवा देणेस कसूर केलेली आहे. सबब, सर्व जाबदार हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या सदरचे नुकसानीस जबाबदार असूनही सेवा न दिलेने तक्रारदारास सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले असे तक्रारदार यांचे कथन आहे.
तक्रारदार यांनी मंचासमोर ग्राहक तक्रारअर्ज क्र. 30/17 व 31/17 हे दोन्हीही तक्रारअर्ज जाबदार क्र.1 व 2 या एकाच वितरक व उत्पादकाविरुध्द आहेत. तथापि दोन्ही प्रकरणांत अनुक्रमे जाबदार क्र.3 या आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. यांचेकडे जाबदार क्र.1 व 2 यांनी विमा उतरविलेला आहे. सबब, तक्रारअर्जास कारण एकच असलेने (same cause of action) सदरचे दोन्हीही तक्रारअर्ज हे मंच एकत्रित निर्गत करीत आहे व तशी पुरसीसही तक्रारदार यांनी दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
जाबदार क्र.2 ही संपूर्ण भारत देशात घरगुती वापरासाठी स्वयपाकाचा गॅस सिलेंडरद्वारे वितरण करणारी शासनमान्य संस्था आहे. तसेच जाबदार क्र.1 हे जाबदार क्र.2 चे कोल्हापूर जिल्हयातील अधिकृत वितरक आहेत. जाबदार क्र.3 या विमा कंपनीकडे जाबदार क्र.2 यांनी त्यांचे ग्राहकांना दिले जाणारे गॅस वितरण सेवेबाबत विमा पॉलिसी उतरविलेली आहे. सदर पॉलिसीचा क्रमांक तक्रारअर्ज क.30/17 मध्ये 4008/116171665/00/000 असा आहे तर तक्रारअर्ज क्र.31/17 मध्ये 1605002615P116188632 असा आहे. तक्रारदारांनी जाबदार क्र.2 यांचेकडून ब-याच वर्षापासून घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी घेतलेली आहे. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांचेकडून घेतलेल्या गॅस सिलेंडरची दि. 2 जून 2016 रोजी योग्यरित्या जोडणी करुन गॅस शेगडी पेटवत असताना अचानक सदर सिलेंडरमधून गॅसगळती होवून तक्रारदाराचे घरातील प्रापंचिक साहित्याने पेट घेतले. त्यावेळी तक्रारदार व त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती त्वरित घरातून बाहेर पडल्याने जीवीतहानी झाली नाही. तदनंतर तक्रारदारांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावून घराला लागलेली आग आटोक्यात आणली. सदरचे आगीमुळे तक्रारदारांचे घरातील सर्व प्रापंचिक साहित्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर यांचे नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदारांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. सदर दुर्घटनेदिवशी तहसिलदार, करवीर यांचेमार्फत गावकामगार तलाठी, मौजे वाशी, ता. करवीर यांनी प्रत्यक्ष जागेचा व नुकसानीचा पंचासमक्ष पंचनामा केला. त्यावेळी जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराचे घरास भेट देवून आम्ही विमा कंपनीकडे विमा पॉलिसी उतरविली असून त्यानुसार नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन तक्रारदारांना दिले. तदनंतर जाबदार क्र.2 यांचे सर्व्हेअरने घराचे नुकसानीची पाहणी केली व त्याचे मूल्याकन रु.1,50,000/- इतके केले. तदनंतर तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळणेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जाबदार क्र.1 यांचेकडे केलेली होती. परंतु जाबदारांनी कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही म्हणून तक्रारदारांनी वकीलामार्फत दि.17/10/16 रोजी जाबदारांना नोटीस पाठविली. सदरची नोटीस जाबदारांना मिळूनही त्यांनी आजअखेर नुकसानीची रक्कम दिलेली नाही. अशा प्रकारे जाबदारांनी तक्रारदाराला द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. सबब, नुकसानीची रक्कम रु.1,50,000/, मानसिक त्रासापोटी रु.25,000/-, नोटीस खर्च रु.3,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशा मागण्या तक्रारदाराने केल्या आहेत.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट व कागदयादीसोबत गॅस ग्राहक कार्ड, घराचा असेसमेंट उतारा, आधार कार्ड, विमा पॉलिसीची प्रत, महानगरपालिका यांचेकडील अपघात अहवाल, पंचनामा, जबाब, घटनास्थळाचे फोटो, जाबदारांना पाठविलेली नोटीस व त्याच्या पोहोच पावत्या इ. एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू झालेनंतर ते या मंचासमोर हजर झाले. ग्राहक तक्रार क्र. 30/17 व 31/17 या दोन्ही तक्रारअर्जातील जाबदार क्र.1 व 2 अनुक्रमे वितरक व उत्पादक हे एकच असल्याने त्यांचे म्हणणे हे मंच एकत्रित देत आहेत.
जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. त्यांचे कथनानुसार, जाबदार क्र.1 यांनी कायमपणे गॅस ग्राहकांना चांगली सुस्थितीत जबाबदार सेवा दिलेली आहे. त्यामध्ये कोणतीही कुचराई केलेली नाही. ग्राहकांना सिलेंडर वितरीत करीत असताना जाबदार क्र.1 हे नवीन सिलेंडर तपासून, ताब्यात देत असते. सदरचा सिलेंडर लिकेज नाही याची खात्री करुन तो ग्राहकाने घेतलेला असतो. तक्रारदार यांनी सिलेंडरमधील लिकेजबाबत कोणतीही तक्रार जाबदार क्र.1 कडे केलेली नव्हती. त्यामुळे सिलेंडरमुळे लागलेल्या आगीस जाबदार क्र.1 हे जबाबदार नाहीत. तक्रारदाराने गॅसकार्डमधील सूचनांचे पालन केलेले नाही. तक्रारदार यांना जाबदार क्र.1 यांनी शेवटचे सिलेंडर हे एप्रिल 2016 मध्ये वितरीत केले होते व घटना घडल्याची तारीख ही 2/6/16 आहे. दरम्यानचे कालावधीत तक्रारदारांनी लिकेजबाबत कोणतीही तक्रार जाबदार क्र.1 कडे नोंदविलेली नव्हती. त्यामुळे जाबदारांनी पुरवठा केलेले सिलेंडर हे कधीही लिकेज नव्हते. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे संपूर्ण उद्योगधंद्याकरिता जाबदार क्र.3 यांचेकडे पॉलिसी उतरविली असलेमुळे जी काही योग्य व वाजवी नुकसान भरपाईची रक्कम कोर्ट ठरवेल, ती देण्याची जबाबदारी ही जाबदार क्र.3 वर टाकण्यात यावी. घडलेली घटना ही तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे, त्यामुळे तक्रारदारांना जाबदारांविरुध्द नुकसानभरपाई मागण्याचा हक्क नाही. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी जाबदार क्र.1 ने केली आहे.
5. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने अमान्य केली आहेत. त्यांचे कथनानुसार तक्रारदार व जाबदार क्र.2 यांचेमध्ये कोणताही करार अस्तित्वात नसल्याने सदरची तक्रार ही जाबदार क्र.2 विरुध्द चालण्यास पात्र नाही. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाही. जाबदार क्र.1 व 2 यांचेमधील नातेसंबंध हे principal to principal या प्रकारचे असलेने जाबदार क्र.2 विरुध्द तक्रार चालणेस पात्र नाही. जाबदार क्र.1 व 2 यांचेमध्ये झालेल्या करारातील कलम क्र.18 नुसार जाबदार क्र.2 चा डीलर ग्राहकाशी गॅस सिलेंडरबाबत जो काही व्यवहार करेल, त्यासाठी डिलर हा जाबदार क्र.2 साठी प्रिन्सीपल म्हणून काम पाहील, ना की एजंट म्हणून. त्यामुळे जाबदार क्र.1 च्या कोणत्याही प्रकारच्या सदोष सेवेसाठी जाबदार क्र.2 जबाबदार राहणार नाही. सदर कराराच्या कलम 19(ए) नुसार जाबदार क्र.1 च्या कृतीमुळे ग्राहकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेस ते भरुन देण्याची जबाबदारी ही केवळ जाबदार क्र.1 यांची असेल. सबब, तक्रारअर्ज जाबदार क्र.2 विरुध्द फेटाळण्यात यावा अशी मागणी जाबदार क्र.2 यांनी केली आहे.
6. तक्रारअर्ज क्र.30/17 मधील जाबदार क्र.3 आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील विमा पॉलिसीबाबतचे कथन मान्य केले आहे परंतु इतर सर्व कथने अमान्य केली आहेत. त्यांचे कथनानुसार तक्रारअर्जात नमूद केलेली पॉलिसी ही जाबदार क्र.3 ने जाबदार क्र.2 यांना दिलेली आहे, त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.3 चे प्रत्यक्ष ग्राहक नाहीत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. सदरचे पॉलिसीत तक्रारदाराचे घराचे व साहित्याचे नुकसानीसाठी कव्हर दिलेला नाही. सबब, जाबदार हे तक्रारदारास कोणतेही देणे लागत नाही. तक्रारदाराने याच कारणासाठी ग्राहक तक्रार क्र.31/17 दाखल केली आहे, त्यामुळे एकाच कारणासाठी दोन चुकीच्या भरपाई मिळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. दि.2/6/16 च्या घटनेनंतर जाबदारकडे कागदपत्रे व माहितीची पूर्तता झालेली नाही. क्लेमची माहिती वेळेत मिळालेस व सर्व पूर्तता झालेस पॉलिसीप्रमाणे देय असलेली रक्कम देण्यात येते. पॉलिसीच्या अटींचा भंग झालेस किंवा क्लेम पॉलीसीत कव्हर होत नसलेस त्यास जाबदार कंपनी जबाबदार नसते. तक्रारदाराची तक्रार ही प्रिमॅच्युअर आहे. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी जाबदार क्र.3 यांनी केली आहे.
7. तक्रारअर्ज क्र.31/17 मधील जाबदार क्र.3 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील विमा पॉलिसीबाबतचे कथन मान्य केले आहे परंतु इतर सर्व कथने अमान्य केली आहेत. त्यांचे कथनानुसार, जाबदार क्र.3 यांनी कोणतीही सेवात्रुटी न केल्याने तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही. या मंचाला सदरची तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही. तक्रारदार व जाबदार क्र.3 यांचेमध्ये कोणताही करार झालेला नसलेने तक्रारदारास सेवा देण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. जाबदार क्र.1 यांचेकडून तक्रारदाराचा विमाक्लेम प्राप्त झाल्यानंतर जाबदार क्र.3 यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता असे दिसून आले की, तक्रारदाराचे झालेले नुकसान हे विमा पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. विमा पॉलिसीचे अटीनुसार जर जाबदार क्र.1 चे कर्मचा-याने गॅस सिलेंडर ग्राहकाच्या घरी बसविताना काही नुकसान झालेस ते भरुन देण्याची जबाबदारी ही जाबदार क्र.3 यांची राहील. प्रस्तुत घटनेत, तक्रारदाराचे झालेले नुकसान हे कर्मचा-याने सिलेंडर बसविताना झालेले नसल्याने सदर नुकसानीची जबाबदारी जाबदार क्र.3 यांचेवर येत नाही. सबब, तक्रारअर्ज क्र.31/11 फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार क्र.3 यांनी केली आहे.
8. जाबदार क्र.1 यांनी, त्यांनी जाबदार क्र.3 बरोबर केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती दाखल केल्या आहेत तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले असून लेखी युक्तिवादही दाखल केला आहे. जाबदार क्र.2 यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणातील जाबदार क्र.3 विमा कंपन्यांनी आपापली पुराव्याची शपथपत्र व लेखी युक्तिवाद संबंधीत प्रकरणात दाखल केला आहे.
9. तक्रारदार यांची तक्रार व दाखल पुरावे, जाबदार क्र.1 ते 3 यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच युक्तिवाद यावरुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय |
2 | जाबदार क्र.1, 2 व 3 यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हा वर नमूद जाबदार यांचेकडून त्याने केलेल्या मागण्या मिळण्यास तो पात्र आहे काय ? | होय |
4 | तक्रारदार हा दोन्ही विमा कंपन्यांकडून स्वतंत्ररित्या नुकसान भरपाई मिळणेस जबाबदार आहे काय ? | होय |
5 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 –
10. तक्रारदाराने आपले घरगुती कारणासाठी जाबदार क्र.2 या गॅस संस्थेकडून बरेच वर्षापासून घरगुती गॅसची (सिलेंडरची) जोडणी घेतलेली आहे व त्याप्रमाणे ग्राहक क्र. 602880 या क्रमांकाने अधिकृत नोंदणीकृत ग्राहक म्हणून नोंद करुन जाबदार क्र.2 हे गॅस वितरणाची सेवा देत आहेत व सदरची सेवा ही जाबदार क्र.2 यांचे कोल्हापूर येथील वितरक, जाबदार क्र.1 यांचेमार्फत तक्रारदार यांना दिली जाते व त्यानुसार जाबदार क्र.1 व 2 यांनी योग्य ती अनामत रक्कम जमा करुन तक्रारदार यांना गॅस सिलेंडर अदा केलेले आहे व तसे जाबदार यांनीही मान्य केले आहे. तसेच जाबदार क्र.3 विमा कंपन्या, आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. यांचेकडे सदरचे गॅस कनेक्शनचे संदर्भात विमा उतरविला असलेने सदरचे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेची बाब या मंचास नाकारता येणार नाही. सबब, सदरचा तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(ड) खाली ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 5 एकत्रित
11. तक्रारदाराने जाबदार क्र.2 या शासनमान्य संस्थेमार्फत संपूर्ण देशात घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर वितरण केले जाते. जाबदार क्र.1 हे जाबदार क्र.2 यांचे कोल्हापूर जिल्हयातील वितरक आहेत व जाबदार क्र.1 व 2 हे सदर संस्थेमार्फत त्यांचे नोंदणीकृत ग्राहकांना सुरक्षित गॅस वितरण करणेची सेवा देणेचे काम करीत आहेत. तसेच जाबदार क्र.3 या आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. या विमा कंपन्यांमार्फत जाबदार क्र.2 यांनी त्यांचेमार्फत ग्राहकांना दिल्या जाणा-या गॅसवितरण सेवेबाबत विमा पॉलिसी उतरविली आहे. त्यांचा क्रमांक तक्रार क्र.30/17 मध्ये 4008/116171665/00/000 असा आहे तर तक्रारअर्ज क्र.31/7 मध्ये 1605002615P116188632 असा आहे. अशा प्रकारे जाबदार क्र.1 हे तक्रारदारास सेवा देणेचे काम करीत असतात.
12. दि. 2/6/16 रोजी गॅस रेग्युलेटरला सुस्थितीत योग्यरित्या जोडणी करुन गॅस शेगडी पेटवित असताना अचानक सदर गॅस सिलेंडरमधून गळती होवून सिलेंडरचे रेग्युलेटरला आग लागली व त्यामध्ये प्रापंचिक साहित्याचे बरेचसे नुकसान झाले व तक्रारदारांनी तदनंतर जाबदार यांना सदरचे घटनेविषयी कळवूनही त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देणेची पूर्तता केलेली नाही.
13. सदरचे प्रापंचिक नुकसान झालेबाबतची तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे अर्ज केलेला आहे. तसेच आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. मात्र तरीसुध्दा जाबदार यांनी नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदार यांना दिलेली नाही. तथापि, जाबदार यांचे कथनांचा विचार करता जाबदार क्र.1 यांनी तक्रारदार हा ग्राहक असलेचा बचाव वगळता बाकी सर्व तक्रारअर्जातील कथने परिच्छेदनिहाय नाकारलेली आहेत, जसे की, गॅस रेग्युलेटरला लागलेली आग, तसेच प्रत्यक्ष जागेचा व नुकसानीचा पंचनामा तसेच तक्रारदारास ग्राहक या नात्याने घटनेदिवशी दिलेली भेट व गॅस सिलेंडर सदोष होते, या सर्व बाबी नाकारलेल्या आहेत.
14. तथापि जरी वर नमूद बचाव जाबदार क्र.1 यांनी घेतला असला तरीसुध्दा तसे आपले तक्रारअर्जासोबत दाखल केलेला कोल्हापूर म्युनिसिपल फायर सर्व्हिस यांचा दि.2/6/16 चा रिपोर्ट यावरुन नुकसान झालेची वस्तुस्थिती या मंचास नाकारता येणार नाही. गावकामगार तलाठी यांनी केलेला पंचनामा, तसेच घरातील जळालेल्या अवस्थेतील फोटोही तक्रारदाराने दाखल केले आहेत. सबब, जाबदार क्र.1 यांनी घेतलेले सर्व आक्षेप हे मंच फेटाळत आहेत.
15. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे अतिरिक्त म्हणण्यात सदरचे सिलेंडर लिकेज नाही याची खात्री करुनच दिले जाते व तक्रारदार यांना शेवटचे सिलेंडर एप्रिल 2016 मध्ये वितरीत केले असून वितरणानंतर दि.2/6/16 रोजी सदरची घटना घडली आहे असा आक्षेप नोंदविला आहे.
तथापि, वर नमूद वस्तुस्थिती असली तरीसुध्दा वितरक ज्यावेळी सिलेंडरचे वितरण करतो, त्याचदिवशी अगर त्याच महिन्यात सदरचे सिलेंडर लावले जातेच असे नाही. जाबदार यांनी सिलेंडर वितरण एप्रिल 2016 मध्ये केले व घटना जून 2016 मध्ये घडली असली तरीसुध्दा तक्रारदाराने ते सिलेंडर वितरणानंतर महिन्यानंतरही लावले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब, सदरचाही आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे.
16. जाबदार क्र.2 हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी तक्रारदार हा जाबदार क्र.2 यांचा ग्राहकच नाही व जाबदार क्र.2 हे फक्त वितरकाद्वारे शुध्दीकरण व विपननाचे (Refining and marketing) काम करते. वितरक हे हिंदुस्थान पेट्रोलियम स्वतःच नेमते व वितरक हे कंपनीशी झालेल्या वितरणाबाबतच्या करारास अधीन राहून काम करते, असे जाबदार क्र.2 यांचे कथन आहे. सबब, तक्रारदार यांना नुकसान भरपाई देणेची जबाबदारी जाबदार क्र.1 यांचीच आहे असे कथन आहे.
जरी जाबदार क्र.2 हे, जाबदार क्र.1 जबाबदार आहेत असे कथन करीत असले तरीसुध्दा उत्पादक जाबदार क्र.2 हेच आहेत व उत्पादक या नात्याने सदरचे आपल्या ग्राहकास होणा-या नुकसानीची जबाबदारी ही निश्चितच उत्पादक या नात्याने जाबदार क.2 यांचीही आहे असे या मंचाचे ठाम मत आहे. जाबदार क्र.3 आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे त्यांचे संपूर्ण उद्योगधंद्याकरिता व सर्व प्रकारच्या जोखमीकरिता पॉलिसी क्र. 4008/116171665/00/000 या क्रमांकाची पॉलिसीही उतरविली आहे व तशी पॉलिसीही तक्रारदाराने दाखल केलली आहे व सदरची पॉलिसी ही इन्शुअर्ड जाबदार क्र.2 भारत पेट्रोलियम यांनीच उतरविली असलेची बाब निदर्शनास येते व त्यामधील Details of the Insurance या कॉलममधील सेक्शन I चे अंतर्गत Damages to property असा उल्लेख आला असून सेक्शन II मध्ये “C” Clause मध्ये Property damage maximum Rs.2 lakhs per event असे नमूद आहे. सबब, जाबदार क्र.2 यांनी घेतलेला तक्रारदार हा ग्राहकच नसलेचा आक्षेप तसेच तक्रारदाराचे कोणत्याही अपघाताचे संदर्भातील घटनेस आपण जबाबदार नसलेचा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे.
17. जाबदार क्र.1 हे आपले कथनाच्या कलम 24 मध्ये जाबदार क्र.2 भारत पेट्रोलियम यांनी ग्राहकाचे जोखमीचे संदर्भात पॉलिसी घेतली आहे असे कथन जरी केले असले तरीसुध्दा तक्रारदाराने ग्राहक तक्रारअर्ज क्र.31/17 चे कामी जाबदार क्र.1 ने (संकल्प सिध्दी) यांनी घेतलेली पॉलिसी क्र. 1605002615P116188632 दाखल केली आहे व सदरची पॉलिसी ही ग्राहकाचे जोखमीकरिताच घेतलेची बाब या मंचासमोर येते. सबब, जाबदार क्र.1 ने घेतलेला जाबदार क्र.2 यांनीच तक्रारदाराची जोखीम घेतलेचा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे. जाबदार क्र.2 बरोबरीने जाबदार क्र.1 वितरक हेही तक्रारदाराचे झाले नुकसानीस तितकेच जबाबदार आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदरचा अपघात हा गॅस सिलेंडरशी निगडीत असलेने रेग्युलेटरने पेट घेणेस निश्चितच सिलेंडरमधील गॅसगळती कारणीभूत असलेची बाब या मंचास नाकारता येत नाही व गॅस सिलेंडर हे सदोष असलेची बाब या मंचास नाकारता येत नाही. सबब, असे सदोष सिलेंडर देवून जाबदार क्र.1 वितरक व जाबदार क्र.2 यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, तक्रारदाराने मागितलेली नुकसानीची एकत्रित रक्कम रु.3,00,000/- व रु.1,50,000/- प्रत्येकी देणेस आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. या दोन्ही विमा कंपन्यांना जबाबदार धरणेत येते. ज्याअर्थी जाबदार क्र.1 (संकल्प सिध्दी) वितरक व जाबदार क्र.2 (उत्पादक) भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपन्यांचा अनुक्रमे आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. यांचेकडे विमा उतरविला आहे, त्याअर्थी सदरचे दोन्ही विमा कंपन्या प्रत्येक विमा पॉलिसी अन्वये होणारी रक्कम (नुकसानीची रक्कम) रु.1,50,000/- जाबदार क्र.1 व 2 यांनी जाबदार क्र.3 यांचेकडून वसूल करुन घेवून तक्रारदार यांना देणेचे आदेश करणेत येतात. जरी तक्रारदार यांनी दोन्ही तक्रारअर्ज एकत्रित चालवावेत अशी पुरसीस दिली असली तरीसुध्दा नुकसान भरपाईची म्हणजेच विमाक्लेमची रक्कम एकत्रित द्यावी असे कथन केलेले नाही. तसेच दोन्ही पॉलिसी स्वतंत्र असलेने त्यांच्या विमा हप्त्याची रक्कमही निश्चितच स्वतंत्र भरलेली आहे. सबब, तक्रारदार दोन्ही विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत यावर हे मंच ठाम आहे. यासंदर्भात तक्रारदाराने वरिष्ठ न्यायालयांचे काही न्यायनिर्णय दाखल केले आहेत. त्यांचे अवलोकन करता जाबदार क्र.1 व 2 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत असे निरिक्षण नोंदविले आहे व सदरचा न्यायनिवाडा हा याकामी लागू होत असलेने जाबदार क्र.1 व 2 यांनी सदरची (प्रत्येकी रक्कम रु.1,50,000/-) ही त्या त्या संलग्न विमा कंपनीकडून वसूल करुन घेवून तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश करणेत येतात व यास छेद देणारा असा कोणताही न्यायनिवाडा जाबदार यांनी या मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब, जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या तक्रारदार यांची नुकसान भरपाईची रक्कम प्रत्येकी रु.1,50,000/- ही तक्रारदार यांना अदा करावी तसेच सदरची रक्कम जाबदार क्र.1 व 2 यांनी जाबदार क्र.3 यांचेकडून वसूल करावी. प्रापंचिक साहित्याचे नुकसानीबरोबर निश्चितच तक्रारदारस मानसिक व शारिरिक त्रास झाला असला पाहिजे. सबब, जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास एकूण मानसिक व शारिरिक त्रासाची रक्कम रु.25,000/- देणेचे तसेच तक्रारअर्जाचा खर्च एकत्रित रक्कम रु.5,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
एकत्रित आदेश
1) तक्रारदारांचे तक्रारअर्ज क्र.30/17 व 31/17 अंशत: मंजूर करणेत येतात.
2) जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना त्यांचे पॉलिसी क्र.4008/116171665/00/000 व पॉलिसी क्र.1605002615P116188632 याप्रमाणे होणारी प्रत्येक विमा पॉलिसीची रक्कम रु.1,50,000/- प्रमाणे एकत्रित एकूण विमा रक्कम रु. 3,00,000/-, जाबदार क्र.3 विमा कंपनी (आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.) यांचेकडून वसूल करुन घेवून तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश करण्यात येतात व वर नमूद विमा रकमेवर तक्रार दाखल तारीख 16/01/17 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करणेचे आदेश करण्यात येतात.
3) जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- (रक्कम रुपये पंचवीस हजार मात्र) अदा करावेत.
4) जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार) अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता जाबदार क्र.1, 2 व 3 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे जाबदार विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.