जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 1/2017.
तक्रार दाखल दिनांक : 02/01/2017.
तक्रार आदेश दिनांक : 27/03/2018. कालावधी : 01 वर्षे 02 महिने 25 दिवस
सूर्यकांत हरिभाऊ साळुंके, वय 45 वर्षे,
व्यवसाय : नोकरी व शेती, रा. मंगळवार पेठ,
खंडोबा मंदिरामागे, परंडा, ता. परंडा, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) प्रोप्रायटर, सह्याद्री अॅग्रो एजन्सीज्, एस.टी. स्टॅन्डजवळ,
भवानी पेठ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर.
(2) सरव्यवस्थापक, वेस्टर्न अॅग्री सिडस् लि.,
प्लॉट नं.802/11, वेस्टर्न हाऊस, जी.आई.डी.सी. (इन्जी.)
इस्टेट, सेक्टर-28, गांधीनगर (गुजरात). विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. सुदाम पं. देशमुख, अध्यक्ष
श्री. मुकुंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : देविदास वडगांवकर
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.व्ही. झिंगाडे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : वाय.एम. पठाण
आदेश
श्री. मुकुंद बी. सस्ते, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता याने खरेदी केलेल्या भुईमुग या पिकाचे बियाणे निकृष्ठ असल्याबाबत व त्याच्यामुळे त्याचे नुकसान झाल्याबाबतची तक्रार घेऊन तो या न्याय-मंचात आला आहे. सदरच्या नुकसानीस जबाबदार विरुध्द पक्ष क्र.1 सह्याद्री अॅग्रो एजन्सी, बार्शी व वि.प.2 वेस्टर्न अॅग्रो सिडस् लि., गांधी नगर, गुजरात हे असल्याबाबत त्याचे निवेदन आहे.
2. तक्रारकर्त्याची संक्षिप्त तक्रार अशी आहे की, त्याने वि.प. क्र.1 याचेकडून वि.प. क्र.2 याने उत्पादीत केलेले वेस्टर्न 51 या जातीचे भुईमूग बियाणे खरेदी केले. सदर खरेदी केलेले बियाणे ज्याचा लॉट नं.296 व प्रतिबॅग 10 कि.ग्रॅ. वजन असलेली पिशवी प्रत्येकी रु.1,400/- याप्रमाणे 6 पिशव्या वि.प. क्र.1 यांच्याकडून पावती क्र.502 ने खरेदी केल्या. तक्रारकर्ता पुढे असे म्हणतो की, दि.11/6/2016 रोजी खरेदी केलेले बियाणे त्याने दि.20/6/2016 रोजी योग्य ओलीवर पेरले. परंतु अपेक्षीत उगवण झाली नाही; म्हणून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज दिला व अशी समिती दि.16/8/2016 रोजी पाहणी करण्याकरिता आली. त्यावेळी वि.प. क्र.2 याचे प्रतिनिधी म्हणून वि.प.क्र.1 समक्ष हजर होते. सदर पाहणीमध्ये उगवण 21 टक्के एवढीच दिसून आली व अहवालात बियाणे सदोष असल्याचे नमूद आहे. त्यामुळे सदोष बियाण्याचा पुरवठा वि.प. क्र.1 व 2 ने केलेला आहे, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.
3. तक्रारकर्त्याने पेरणीपूर्वी केलेल्या मशागती, पेरणीनंतर केलेल्या फवारणीच्या अनुषंगाने झालेल्या खर्चाची रक्कम रु.50,000/- व मिळालेल्या अपु-या उत्पन्नाची नुकसान भरपाई अशी मिळून रु.9,48,000/-; तसेच बियाणे खरेदीची रक्कम रु.8,400/- या सर्व रकमा वि.प. कडून 18 टक्के व्याज दराने देण्याविषयी या न्याय-मंचात विनंती केली आहे.
4. या संदर्भात वि.प. क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विधिज्ञांमार्फत त्यांनी आपले लेखी म्हणणे या न्याय-मंचात दि.10/2/2017 रोजी दाखल केले. वि.प. क्र.1 चे म्हणणे संक्षिप्त स्वरुपात असे की, तक्रारकर्त्याने त्यांचेकडून बियाणे विकत घेतल्याबाबत मंजुरी दर्शवली असून तक्रारकर्ता हा जमीन गट नं.12/1 चा मालक आहे, याबाबत सुध्दा संमती दिलेली आहे. मात्र जमिनीची पेरणीपूर्व मशागत व पेरणीनंतरच्या मशागतीबाबत त्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्याबाबत त्याचे कोणत्याही स्वरुपाचे म्हणणे नाही. मात्र लॉट क्र.296 व एकूण पिशव्याचे रु.8,400/- या बाबी त्यांना मान्य आहेत. मात्र कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने दिलेला अहवाल अमान्य केलेला आहे व उत्पन्नाची आकडेवारी अमान्य केलेली आहे. याव्यतिरिक्त स्वतंत्र जबाब म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार बनावट असल्याबाबत नमूद केले आहे. तक्रारकर्त्याने सादर केलेला अहवाल हा कृषी संचालनालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणारा नसल्याचे नमूद केले आहे. तक्रारकर्त्याने पेरणी केल्यानंतर किती दिवसात बियाण्याचे उगवण त्याला असमाधानकारक वाटली, हे नमूद नाही. याच बरोबर याच लॉटमधील इतर कोणत्याही शेतक-याच्या तक्रारी कृषी विभाग किंवा उत्पादकाकडे प्राप्त नसून या एकाच शेतक-याची तक्रार दिसून येते. वि.प. ने या गोष्टीकडे निर्देश केला आहे की, अहवालातील अ.क्र.10-1 प्रमाणे पेरणी क्षेत्र हे 80 आर. व वापरलेले बियाणे 60 किलो प्रतिहेक्टर व त्याच अ.क्र.3 मध्ये शिफारशीप्रमाणे आवश्यक बियाणे 100 किलो प्रतिहेक्टर असे असताना प्रत्यक्षात वापरलेले बियाणे 60 कि.ग्रॅ. दर्शवलेले आहे. म्हणजे अहवालामध्ये स्पष्टता नाही. एकीकडे अहवाल 80 कि.ग्रॅ. पेरणी केल्याचे दर्शवत आहे. म्हणजेच उर्वरीत 20 कि.ग्रॅ. बियाणे तक्रारकर्त्याने वापरले व ते कोणत्या कंपनीचे वापरले याबाबत स्पष्टीकरण नाही व त्याबाबत समितीच्या अहवालामध्ये स्पष्टता नाही. तक्रारकर्त्याने पेरणीपासून तब्बल 57 दिवसांनी बियाण्याची उगवणशक्ती कमी झाली, असा अहवाल कोणत्या शास्त्रीय कारणावर व कायद्याच्या आधारावर दिला, हे स्पष्ट केले नाही. व तक्रारकर्त्याच्या राजकीय दबावाला बळी पडून तक्रार निवारण समितीने दोषपूर्ण अहवाल तयार केला. याच बरोबर तक्रारकर्त्याने सदर बियाणे विश्लेषण करण्यासाठी तो प्रयोगशाळेकडे पाठवला नाही. या सर्व बाबी तक्रार निवारण समितीचे व तक्रारकर्त्याचे संगनमत असल्याबाबत दिसून येतात, असे म्हणणे दिले आहे. तक्रारकर्त्याने बियाणे खरेदी हे दि.11/6/2016 व पेरणी दि.20/6/2016 रोजी केलेली आहे. क्षेत्र पाहणी दि.16/8/2016 रोजी केलेली आहे. म्हणजेच 27 दिवसांनी केलेली आहे. म्हणजेच सदर पाहणी पिकाच्या फलधारणा अवस्थेत केली गेली. वास्तविक पाहता सदर पिकाची उगवणक्षमता ही 15 ते 20 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे, असे नमूद केले आहे. तक्रारकर्त्याची पेरणी ही चुकीच्या पध्दतीने; तसेच अतिरिक्त रासायनिक खताच्या फवारणीमुळे सुध्दा रोपे जळू शकतात. त्याच वेळेला पेरणी करतेवेळी तापमान हे 19 से.ग्रे. पेक्षा अधिक असावे. त्यापेक्षा कमी तापमानात उगवण उशिरा व कमी होते, असे सांगून पिकाची उगवणक्षमता ही रँडम पध्दतीने घेतली जाते; त्याची सरासरी दिली जाते, या बाबींचे तक्रार निवारण समितीने पालन केल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने त्याच्यातर्फे पुरावा म्हणून धनाजी आप्पाराव मंडलीक यांचे प्रतिज्ञापत्र, तसेच सुरज हनुमंत ताकभाते यांचे तहसीलदार, बार्शी यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र सादर केले असून ते बियाण्याच्या दर्जाबाबत समाधानी असल्याचे नमूद केले आहे. या प्रतिज्ञकांनी खरेदी केलेले बील क्र.578 व 775 यांच्या सत्यप्रती जबाबासोबत दाखल केल्या आहेत. तक्रारकर्त्याच्या उपस्थितीत क्षेत्र पाहणी केलेल्या फोटो प्रिंट वि.प. ने दाखल केल्या असून सदर फोटोमध्ये सदर शेतामध्ये तुरी व मका यासोबत आंतरपीक म्हणून भुईमुगाची पेरणी केलेली आहे व सदरची पेरणी ही तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरने केलेली आहे. याच सोबत वि.प. ने त्यांचा इतर कृषी वस्तु विक्री करणा-या व्यवसायिकाबरोबर झालेला पत्रव्यवहार जो की, वि.प. 1 ने उत्पादीत केलेल्या लॉट नं.296 संदर्भात असून त्याची कागदपत्रे सादर केली आहेत.
5. वि.प. क्र.2 ने त्यांचा लेखी जबाब दाखल केला असून तो संक्षिप्त स्वरुपात असा की, वि.प. क्र.2 ने सर्वसाधारणपणे वि.प. क्र.1 च्या लेखी उत्तरास मान्यता दिलेली असून त्याव्यतिरिक्त जगामध्ये आजपर्यंत कोणालाही कोणत्याही हंगामात 2 एकरमध्ये 120 क्विंटल उत्पन्न झाले नाही, असे नमूद केले आहे. वि.प. क्र.2 ने बियाणे कायद्यातील काही तरतुदी विषद केल्या असून त्यांनीही स्वतंत्रपणे किसन रामलिंग बारबोले, रा. शेलगांव, ता. बार्शी व सूर्यकांत दत्तात्रय भोळ, रा. देगांव, ता. बार्शी व अशोक वलगुडे, रा. पानगांव, ता. बार्शी यांचे तहसीलदारसमोर केलेले समाधानकारक उत्पन्नाबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे व संबंधीत बिलेही सोबत जोडली आहेत. वि.प. क्र.2 यांनी या व्यतिरिक्त आझाद चौक, अकलूज यांनी याच जातीच्या व याच लॉट नंबरच्या बियाण्याच्या 1090 बॅगचा पुरवठा केल्यापैकी एकाही बॅगची तक्रार न आल्याबाबत पत्र सादर केले आहे. वि.प. यांनी जबाबासोबत सिड टेस्टींग लॉबेरेटरी गांधीनगर, गुजरात यांचा लॉटच्या गुणवत्तेसंदर्भात अहवाल सादर केला आहे व जर समजा तक्रारकर्त्याचे उत्पन्न कमी आले असेल तर त्याच्या कृतीने तो स्वत: जबाबदार असल्याबाबत व बियाण्याची गुणवत्ता जबाबदार नसल्याबाबत निवेदन केले आहे.
6. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्त्याची तक्रार या जिल्हा मंचापुढे निर्णयीत करण्यास
या जिल्हामंचाला प्रादेशिक अधिकाकक्षा आहे काय ? होय.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दोषयुक्त भुईमुग बियाणे
विक्री केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
3. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
7. मुद्दा क्र. 1 :- मुद्दा क्र.1 चे उत्तर होकरार्थी देताना हे न्याय-मंच ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 चा आधार घेत असून कलम 11 मध्ये अ, ब व क असे उपकलम असून त्यातील उपकलम ‘क’ मध्ये वादोत्पत्तीचे कारण पूर्णत: किंवा अंशत: उत्पन्न झाले तर त्या ठिकाणी तक्रार दाखल करता येईल, असे म्हटले आहे. या ठिकाणी तक्रारकर्ता हा उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून त्याने पेरणी केलेले बियाणे हे त्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे पिठापुरी, ता. परंडा येथील जमीन गट नं. 12/1 मध्ये पेरल्याबाबत नमूद आहे. तक्रार निवारण समितीने क्षेत्र पाहणी केली तेव्हा हेच बियाणे या क्षेत्रावर पेरल्याबाबत त्याने नमूद केले आहे. तसेच वि.प. क्र.2 चा प्रतिनिधी म्हणून वि.प. क्र.1 हजर होता व त्याने किमान 60 किलो करिता तरी तक्रारकर्त्याने सदरचे बियाणे या क्षेत्रामध्ये पेरल्याबाबत नकार दिलेला नाही. हे खरे की, वि.प. क्र.1 व 2 हे व्यवसाय बार्शी तालुक्यात करीत असून यासाठी सोलापूर जिल्हा हे कार्यक्षेत्र आहे. तथापि बियाण्यातील दोषाच्या संदर्भात विचार करताना बियाणे सदोष आहे किंवा निर्दोष आहे किंवा बियाण्याची उगवणक्षमता उच्चतम आहे किंवा अपेक्षेनुसार नाही, हे ठरविताना हे बियाणे जमिनीत पेरल्याशिवाय कळणेच शक्य नाही. यासाठी लॅबोरेटरीचा अहवाल हा उपलब्ध असतो; परंतु प्रत्यक्ष पेरणीनंतर झालेली परिस्थिती ही त्या अहवालात कळू शकत नाही. कारण तो विक्रीपूर्व उत्पादीत बियाण्याचा अहवाल असतो. म्हणून बियाण्यास सदोष किंवा निर्दोष ठरविताना ते ज्या क्षेत्रात पेरले ते क्षेत्र हे वादोत्पत्तीचे कारण ठरु शकते, असे या न्याय-मंचाचे मत आहे. कारण दोषयुक्त वस्तू असे निर्णय ठरविताना इतर वस्तू व बियाणे यांच्यामधील दोष निर्णीत करण्यासाठी परिस्थितीसापेक्ष मोठा फरक आहे. त्यामुळे कलम 11(सी) चा आधार घेऊन या न्याय-मंचास कार्यक्षेत्र आहे, असेच म्हणावे लागेल. म्हणून मुद्दा क्र.1 ला होकारार्थी उत्तर.
8. मुद्दा क्र.2 व 3 :- या मुद्दयाचे उत्तर देताना तक्रारकर्त्याने दाखल केलेला पुरावा म्हणजे ज्यामध्ये 7/12, बियाणे खरेदी केलेली पावती, तक्रार समितीचा क्षेत्रीय अहवाल, वि.प. क्र. 1 व 2 ने केलेली जाहिरात या बाबी त्याच्या तक्रारीच्या समर्थनार्थ दिलेल्या आहेत. सदर पुराव्याची छाननी केली असता गट क्र.12/1 मध्ये तक्रारकर्त्याच्या 7/12 मध्ये वर्ष 2015-2016 करिता भुईमुगाचे क्षेत्र 2 एकर अजल सिंचीत क्षेत्रामध्ये नोंदीत दिसते. दाखल केलेली सह्याद्री अॅग्रो एजन्सीज् यांच्याकडील पावती ज्यामध्ये तुर व भुईमुगाची एकत्रित खरेदीची पावती दिसून येते व सोबत जोडलेल्या अहवालानुसार सिंचनाची सुविधा विहीर, बोअरवेल व सीना नदीवरील पाईपलाईन असे दर्शवलेले आहे. लागवड क्षेत्र 80 आर. आहे. पेरणीची पध्दती अंतरपीक असल्याबाबत नमूद आहे. पेरणीची शिफारस केलेला कालावधी व हंगाम उन्हाळी हंगाम 15 जानेवारीनंतर असे नमूद आहे. त्याच सोबत प्रत्यक्ष विक्री व पेरणी दि.11/6/2016 व 20/6/2016 असे नमूद आहे. अंतिमत: उगवणशक्तीचे प्रमाण 21 टक्के व सदर कमी उगवणशक्तीच्या प्रमाणासाठी बियाण्यातील दोष असे स्पष्टीकरण नमूद आहे. बियाण्याचा वापर हा 60 किलो असा दर्शवला असून विक्रेत्याच्या साक्षीच्या सदरामध्ये वि.प. क्र.1 ची स्वाक्षरी व शिक्का दिसून येतो. समितीचे निरीक्षण व निष्कर्षामध्ये बियाणे दोषाबाबत नमूद केलेले आहे. याच्यासोबत वि.प. ने दाखल केलेल्या पुराव्यामध्ये संबंधीत शेतक-यांनी दाखल केलेली शपथपत्रे असून त्याची सत्यता तक्रारकर्त्याने नाकारलेली नाही. त्यामुळे ती वाचण्यात आली. तसेच दाखल केलेला प्रयोगशाळेचा अहवाल हाही तक्रारक्र्त्याने सत्यतेबाबत शंका उपस्थित न केल्यामुळे स्वीकारण्यात आला. वि.प. क्र.2 ने दाखल केलेली शपथपत्रे ही तक्रारकर्त्याने सत्यतेबाबत शंका उपस्थित न केल्यामुळे स्वीकारण्यात आली.
9. दोन्ही पक्षांचे परस्परविरोधी पुरावे व त्यांचा प्रकरणातील गुणवत्तेच्या दृष्टीने होत असलेला सुयोग्य वापर करताना जेवढ्या मुद्दयावर तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचे एकमत नाही, तेवढ्याच संदर्भात त्यांचे परीक्षण करता येणे शक्य आहे. ज्यामध्ये तक्रारकर्त्याने हे सांगितले आहे की, दि.20/6/2016 रोजी चांगला पाऊस झाल्यामुळे भुईमुगाचे बियाणे खरेदीनंतर लगेचच पेरले. तसेच प्रतिबॅग 120 क्विंटल उत्पन्न झाले असते, याबाबी पडताळता समितीचा अहवाल मात्र सदर बियाणे हे उन्हाळी हंगामातील शिफारस केलेले बियाणे असल्याचे नमूद करतो. 7/12 वर तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसारच अजल सिंचीत क्षेत्र हे 80 आर. आहे. मात्र समितीच्या अहवालात पाणी पुरवठ्याच्या अनेक सुविधा असल्याचे नमूद करतो. दाखल केलेला अहवाल ज्यावर पाहणीचा दिनांक 16/8/2016 नमूद आहे. परंतु अंतिम अहवालाच्या वेळेस परंडा पंचायत समितीमार्फत पाठविल्या गेलेल्या पत्रावर दिनांक नमूद नाही. या तांत्रिक बाबीसह समितीने निष्कर्षामध्ये पेरणी केलेले बियाणे 60 कि.ग्रॅ. हे प्रतिहेक्टर आहे की प्रतिएकर आहे, हे नमूद केले नाही. मात्र शिफारशीप्रमाणे आवश्यक बियाणे हे 100 कि.ग्रॅ. प्रतिहेक्टर असल्याबाबत नमूद केले आहे. प्रत्यक्षात वापरलेले बियाणे 80 कि.ग्रॅ. प्रतिहेक्टर असे सांगितलेले आहे. म्हणजेच शिफारशीनुसार तक्रारकर्त्याने बियाणे वापरलेले नाही. सदरचा अहवाल हा स्पष्ट अहवाल नसून असंदिग्ध असून व तज्ञ व्यक्तीने दिलेला अहवाल असावा, असे वाटत नाही. वास्तविक तक्रार निवारण समिती ही या क्षेत्रातील सर्व कृषी तज्ञाची समिती असून या समितीने अत्यंत स्पष्ट अहवाल देणे आवश्यक असताना अहवालातील प्रत्येक कॉलममधील माहिती सुसस्पट भरणे गरजेचे असताना अत्यंत घाईगडबडीने निष्काळजीपणे सदरचा अहवाल तयार केलेला दिसून येतो. त्यामुळे अशा चुकीच्या पध्दतीने तयार केल्या गेलेल्या अहवालाचा वापर पुरावा म्हणून करताना वि.प. ने घेतलेल्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या उलट वि.प. ने पुरावा म्हणून दिलेले शपथपत्रे ही त्याच लॉटच्यासंदर्भातील असून त्याचे खरेदी बिले व योग्य त्या सक्षम अधिका-यापुढे केले असल्याबाबत निवेदन नाकारणे या न्याय-मंचास शक्य नाही.
10. हे खरे की, समितीने सदोष बियाणे असे नमूद केले आहे. परंतु वि.प. च्या आक्षेपानुसार अधिकचे 20 किलो बियाणे दुस-या कोणत्या तरी जातीचे असू शकते व तो ही बाब लपवत असणे शक्य आहे. त्याच बरोबर तक्रारकर्त्याने पेरणी केलेल्या बियाण्याच्या लॉटचा नंबर, टॅग व तपासणीकरिता काही शिल्लक बियाणे या बाबी न्याय-मंचाकडे सुपूर्त करणे आवश्यक होते. त्या तक्रारीसोबत दिसून येत नाहीत. दाखल केलेले बियाणे तपासणी करणे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1)(सी) नुसार न्याय-मंचाचे काम आहे. परंतु असे बियाणे नसल्यामुळे वि.प. ने दाखल केलेला प्रयोगशाळेचा अहवाल स्वीकारण्याशिवाय या न्याय-मंचास गत्यंतर नाही. म्हणून वि.प. ने सदोष बियाण्याचा पुरवठा केला व त्याच मुळे तक्रारकर्तचे नुकसान झाले, ही बाब सिध्द करण्यास तक्रारकर्ता अपयशी ठरला, असे या न्याय-मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने आपली तक्रार सिध्द करण्याचे दायित्व या कायद्यानेच तक्रारकर्त्यावर दिलेले आहे. तरी सुध्दा वि.प. ने त्याच्या अखत्यारीत असलेल्या व त्याला शक्य असलेल्या सर्व बाबी समोर आणून तक्रारकर्त्याचे पुराव्याचे खंडन केले आहे. त्यामुळे सदरची तक्रार रद्द करण्यात येत.
11. तक्रारकर्त्याची तक्रार सिध्द न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने नुकसान भरपाईबाबत दिलेले पुरावे, आकडे या बाबीकडे न्याय-मंच लक्ष देऊ शकत नाही व त्यावर कोणत्याही स्वरुपाचे भाष्य करणे टाळत आहे. म्हणून मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी देऊन शेवटी आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. मुकुंद बी. सस्ते) (श्री. सुदाम पं. देशमुख)
सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
आदेश घोषीत केल्याची तारीख : 27/03/2018.
आदेश टंकलेखन केल्याची तारीख : 21/03/2018.
आदेशावर स्वाक्षरी केल्याची तारीख : 27/03/2018.