श्री. सतीश सप्रे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे पतीपत्नी आहेत. वि.प.क्र. 1 व 2 हे बांधकाम साहित्य विकण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्यांनी घराजवळ असलेल्या वि.प.कडून बिल्डींग मटेरीयल खरेदी करण्याकरीता रक्कम दिली होती परंतू वि.प.ने तेवढया रकमेचे बांधकाम साहित्य न पुरविल्याने आणि दिलेली रक्कम परत न केल्याने, तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी वि.प.ला सिमेंट आणि लोहा खरेदी करण्याकरीता दि.30.09.2021 रोजी रु.80,000/- रोख रक्कम व रु.6,40,000/- एन ए एफ टीद्वारे अशी एकूण रक्कम रु.7,20,000/- वेळोवेळी दिली. परंतू वि.प.ने तक्रारकर्त्याला रु.4,79,103/- चे बिल्डींग मटेरीयल पुरविले व उर्वरित रक्कम रु.2,40,897/- चे बिल्डींग मटेरीयल पुरविले नाही. वारंवार मागणी करुनही वि.प.ने बिल्डींग मटेरीयल न पुरविल्याने तक्रारकर्त्यांनी रकमेची मागणी केली असता वि.प.ने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. वि.प.विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. तसेच कायदेशीर नोटीसची बजावणी केली असता वि.प.ने नोटीस घेण्यास नकार दिला. वि.प.ने बांधकाम साहित्य न पुरविल्याने तक्रारकर्त्यांना घराचे बांधकाम पूर्ण करता आले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन तक्रारकर्त्यांना उर्वरित रक्कम व्याजासह परत करावी, मानसिक, शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर प्रकरणाची नोटीस आयोगामार्फत वि.प.क्र. 1 व 2 यांना पाठविली असता ‘’घेण्यास नकार’’ या शे-यासह परत आली व वि.प. क्र. 1 व 2 आयोगासमोर हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.22.08.2022 रोजी पारित करण्यात आला.
4. सदर प्रकरण तोंडी युक्तीवादाकरीता आल्यावर तक्रारर्त्याने पुरसिस दाखल करुन तक्रारीतील कथन, अभिलेखावर दाखल दस्तऐवज व त्यांचा लेखी युक्तीवाद हाच त्यांचा तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा असे सांगितले. आयोगाने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता वि.प.चा ग्राहक आहे काय ? होय.
2. तक्रारकर्त्याची तक्रार विहित कालमर्यादेत आहे काय ? होय.
3. वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय? होय.
4. तक्रारकर्ता काय आदेश मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र. 1 – तक्रारकर्त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये वि.प.ला नि. क्र. 2 वर त्यांने रु.4,90,000/- दिल्याच्या एन ई एफ टी च्या प्रती सादर केलेल्या आहेत. एन ई एफ टी द्वारे वि.प.ला वेळोवेळी रु.6,40,000/- एन ई एफ टी द्वारे वि.प.ला वेळोवेळी दिल्याचे व वि.प.ने काही प्रमाणात बांधकाम साहित्य पुरविल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. यावरुन तक्रारकर्त्यांनी वि.प.कडून सिमेंट व लोखंड खरेदी केल्याचे दिसून येते. वि.प.ने आयोगासमोर हजर होऊन सदर बाब नाकारली नसल्याने ती सत्य समजण्यास आयोगाला हरकत वाटत नाही. यावरुन तक्रारकर्ता हा ग्राहक असून वि.प. सेवा पुरवठादार ठरतो असे आयोगाचे मत आहे आणि म्हणून मुद्दा क्र. 1 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
6. मुद्दा क्र. 2 – तक्रारकर्त्यांचा बांधकाम साहित्य घेण्याचा व्यवहार हा सन 2021 मध्ये झालेला आहे आणि तक्रारकर्त्यांनी सन 2022 मध्ये तक्रार दाखल केलेली असल्याने सदर तक्रार ही आयोगाचे मुदतीत आहे. तसेच तक्रारकर्त्यांची एकूण मागणी पाहता सदर तक्रार ही आयोगाचे आर्थिक अधिकारीतेत असल्याचे आयोगाचे मत आहे, म्हणून मुद्दा क्र. 2 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
7. मुद्दा क्र. 3 – तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या एन ई एफ टी च्या प्रतीवरुन व पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन तक्रारकर्त्यास घर बांधण्याकरीता लोखंड आणि सिमेंट लागणार होते आणि त्याकरीता त्याने वि.प.ला एन ई एफ टी द्वारे रक्कम दिल्याचे दाखल दस्तऐवजांवरुन दिसून येते. तसेच रोख रक्कम रु.80,000/- दिल्याबाबत अभिलेखावर कुठलाही पुरावा सादर केला नाही. वि.प.ने तक्रारकर्त्याला रु.4,79,103/- किमतीचे बांधकाम साहित्य पुरविल्याची बाब तक्रारीत नमूद केली आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वि.प.ने दिलेल्या रकमेनुसार लोखंड आणि सिमेंट पुरविले नाही व वि.प.ने रु.2,40,897/- किमतीचे साहित्य न पुरविल्याची बाब नमूद केली आहे. अभिलेखाचे अवलोकन केले असता वि.प.ने तक्रारकर्त्याला एकाच वेळेस बांधकाम साहित्य न पुरविल्याने तक्रारकर्त्यांना वारंवार मजुरी आणि भाडे यांचा वेगळा खर्च सहन करावा लागल्याचे पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत उल्लेख केला आहे. तक्रारकर्त्याने वि.प.ला रु.7,20,000/- दिले असे जरी कथन केले असले तरी दाखल पावत्यांवरुन तक्रारकर्त्याने वि.प.ला एकूण रु.4,90,000/- दिल्याचे दिसून येते व वि.प.ने तक्रारकर्त्याला रु.4,79,103/- चे साहित्य पुरविल्याचे कथन तक्रारकर्त्याच्या तक्रारीमध्ये दिसून येते. त्यामुळे वि.प.कडे उर्वरित रक्कम रु.10,897/- घेणे असल्याचे स्पष्ट होते. वि.प.ने आयोगासमोर हजर होऊन कागदपत्रासह सदर बाब नाकारलेली नसल्याने आयोगास ती सत्य समजण्यास हरकत वाटत नाही. वि.प.ने तक्रारकर्त्याकडून रक्कम स्विकारुनसुध्दा बांधकाम साहित्य न पुरवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे आणि म्हणून तक्रारकर्त्यांची तक्रार ही दाद मिळण्यास पात्र ठरते असे आयोगाचे मत आहे.
8. वि.प.ला आयोगामार्फत तक्रारीची नोटीस पाठविल्यावरही वि.प.ने तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन तक्रार नाकारलेली नाही. यावरुन वि.प.ला तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य असल्याचे स्पष्ट होते. वि.प.ने बांधकाम साहित्याबाबत रक्कम स्विकारुन तक्रारकर्त्यांना वेळेवर साहित्य न पोहोचवून सेवेत उणिव ठेवलेली आहे, म्हणून मुद्दा क्र. 3 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
9. मुद्दा क्र. 4 – तक्रारकर्त्यांना वि.प.ने स्विकारलेल्या रकमेइतके बांधकाम साहित्य पुरविले नसल्याने सदर रक्कम व्याजासह परत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. तसेच बांधकाम साहित्य वेळेत पुरविले नसल्याने घराचे बांधकामास झालेला विलंब, वारंवार तुकडयामध्ये पाठविलेल्या साहित्याची भाडे, मजुरी, बांधकाम उपकरणांचे भाडे यांचा खर्च तक्रारकर्त्यांना सोसावा लागला, करिता तक्रारकर्त्यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. या त्रासाची भरपाई मिळण्यास तक्रारकर्ते पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्यांना कायदेशीर नोटीसची बजावणी करुन आयोगासमोर तक्रार करावी लागली, याबाबत तक्रारकर्ता तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे.
उपरोक्त निष्कर्षांवरुन व दाखल दस्तऐवजांवरुन आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून, वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम रु.10,897/- तक्रार दाखल दि.06.06.2022 पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह 45 दिवसाचे आत परत करावी.
2) वि.प.ने तक्रारकर्त्याला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईदाखल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.
3) वि.प.ने आदेशाचे पालन आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
4) आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.