::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 27/11/2018)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. विरूध्द पक्ष क्र.2 ही टी.व्ही., एल.ई.डी. फ्रिज उत्पादक कंपनी असून वि.प.क्र.1 हे वि.प.क्र.2 यांचे अधिकृत विक्रेता तर वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.2 यांचे अधिकृत दुरूस्ती केंद्र आहे. तक्रारकर्त्याने बजाज फिनसर्व्ह यांच्याकडून अर्थसहाय्य घेवून दि.1/9/2017 रोजी वि.प.क्र.2 चा निर्मीत एल.जी.कंपनीचा मॉडेल नं.43, एल.जे.522 ही सिरियल ना.706 पिएलएक्सए 010554 एल ई डी 43 इंच वि.प.क्र.1 कडून रू.40,000/- ला विकत घेतला. वि.प.नी सदर एल ई डी चा हमी कालावधी 2 वर्ष दिला आहे. तक्रारकर्त्याने सदर एल.ई.डी.करिता बजाज फिनसर्व कंपनीकडे रू.10,000/- डाऊन पेमेंट केले असून उर्वरीत रक्कम दरमहा रू.2,232/- प्रमाणे 14 किस्तीमध्यें भरावयाची आहे. सदर एल.ई.डी. दिनांक 3/5/2018 रोजी अचानक बंद पडल्यानंतर तक्रारकर्त्याने तशी सुचना वि.प.क्र.1 यांना दिली तेंव्हा वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.3 यांचेकडे तक्रार देण्यास सुचीत केल्यामुळे तक्रारकर्त्याने टोल फ्री क्रमांकावर सदर एल.ई.डी. बंद पडल्याची तक्रार दिल्यानंतर दि.4/5/2018 रोजी वि.प.क्र.3 यांचे मेकॅनीक यांनी तक्रारकर्त्याचे घरी येऊन एलईडीची तपासणी केली व तक्रारकर्त्यास दिनांक 5/5/2018 रोजी सर्व्हीस सेंटरवर बोलविले. तक्रारकर्त्यास दिनांक 5/5/2018 रोजी वि.प.क्र.3 यांचेकडे सर्व्हीस सेंटरवर गेले असता त्यांनी सदर एल.ई.डी. च्या दुरूस्तीचा खर्च अंदाजे रू.20,000/- ते रू.25,000/- येणार असल्याचे सदर रक्कम जमा केल्यानंतरच एल.ई.डी. दुरूस्त करून देऊ असे सांगितले. तक्रारकर्त्याने सदर एल.ई.डी.हा वॉरंटी कालावधीमध्ये असल्याचे सांगितले असता त्यांनी वि.प.कडे विचारणा करण्यांस सांगितले. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 कडे जाऊन उपरोक्त एल.ई.डी.च्या दोषाबद्दल सांगितले. वि.प.क्र.1 यांचे व्यवस्थापक श्री.राजीव व्यास यांनी वि.प.क्र.2 कंपनीशी बोलून आपणांस नवीन एल.ई.डी. देतो असे आश्वासन देऊन स्वतःचा 9850110429 हा मोबाईल नंबर देऊन 4 ते 5 दिवसांनी परत फोन करून येण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने श्री.व्यास यांना फोन केला असता कंपनीतून नवीन एलईडी यायचा आहे असे सांगितले. तक्रारकर्त्याला शंका आल्याने त्याने दि.5/6/2018 रोजी वि.प.क्र.1 यांचेकडे जाऊन विचारणा केली असता वि.प.क्र.1 यांनी सदर एल.ई.डी. दुरूस्त करून किंवा नवीन एल.ई.डी. बदलवून देण्यांस नकार देऊन तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याने तक्रारकर्त्याने दिनांक13/6/2018 रोजी वि.प.क्र.1 ते 3 यांना अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठविला. वि.प.क्र.1 यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दा त्यांनी त्याची पुर्तता केली नाही. वि.प.क्र.3 यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदारांविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याचा एल.जी.कंपनीचा उपरोक्त एल.ई.डी. स्वखर्चाने दुरूस्त करून चालू स्थितीत द्यावा अथवा सदर एल.ई.डी. दुरूस्त करणे शक्य नसल्यास त्याच मॉडेलचा दुसरा टि.व्ही.किंवा मोबदला रक्कम रू.40,000/- 12 टक्केव्याजासह तसेच मानसीक व आर्थीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.40,000/- व तक्रारीचा खर्च रू.10,000/- गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आले. वि.प.क्र.1 व 2 यांना पंजिकृत डाकेने पोचपावतीसह नोटीस पाठविला असता सदर लिफाफा, त्यावर “Refused Returned to Sender” अशा शे-यासह परत आल्याने मचाने नि.क्र.1 वर त्यांचेविरूध्द दि.20/8/2018 रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत केला तसेच वि.प.क्र.2 यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दा ते प्रकरणात उपस्थीत न झाल्याने मंचाने त्याचेविरूध्द नि.क्र.1 वर दिनांक 26/9/2018 रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत केला.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्ताऐवज,शपथपत्र, तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता यांचे कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा
दिली आहे काय ? : होय
3) आदेश काय ? : अंशतः मंजूर.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
5. विरूध्द पक्ष क्र.2 ही टी.व्ही., एल.ई.डी. फ्रिज उत्पादक कंपनी असून वि.प.क्र.1 हे वि.प.क्र.2 यांचे अधिकृत विक्रेता तर वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.2 यांचे अधिकृत दुरूस्ती केंद्र आहे.
तक्रारकर्त्याने दि.1/9/2017 रोजी वि.प.क्र.2 चा निर्मीत एल.जी.कंपनीचा मॉडेल नं.43, एल.जे.522 ही सिरियल नं.706 पिएलएक्सए 010554 एल ई डी 43 इंच टि.व्ही. बजाज फिनसर्व्ह कंपनी यांचेकडून अर्थसहाय्य घेऊन वि.प.क्र.1 कडून रू.40,000/- ला विकत घेतला हे नि.क्र.4 वर दाखल दस्त क्र.1 पावतीवरून सिध्द होते. यावरून तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. तक्रारअर्ज व तक्रारीत दाखल पावती, वॉरंटीकार्ड इत्यादी दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारअर्जामध्ये उपरोक्त एल.ई.डी. दिनांक 3/5/2018 रोजी अचानक बंद झाल्याने तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांना सुचीत केल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प.क्र.3 यांचेकडे टोल फ्री क्रमांक 1800315999 वर तक्रार दिली. त्यानंतर दि.4/5/2018 रोजी वि.प.क्र.3 यांचे मेकॅनीक यांनी तक्रारकर्त्याचे घरी येऊन एलईडीची तपासणी केल्यानंतर तक्रारकर्त्यास सर्व्हीस सेंटरवर येण्यांस सांगितले. तक्रारकर्ता दिनांक 5/5/2018 रोजी वि.प.क्र.3 यांचेकडे गेले असता त्यांनी सदर एल.ई.डी. च्या दुरूस्तीकरीता अंदाजे रू.20,000/- ते रू.25,000/- खर्च येणार असल्याचे सांगून सदर रक्कम जमा केल्यानंतरच एल.ई.डी. दुरूस्त करून देऊ असे सांगितले असे कथन केले आहे. तसेच तक्रारकर्त्याने सदर टी.व्ही.बंद आहे या आपल्या कथनापुष्टयर्थ साक्षीदार शैलेश एंटरप्राइझेसचे मालक श्री.शैलेश मेश्राम यांचे शपथपत्रसुध्दा दिले. सदर शपथपत्रामध्ये एल.ई.डी. हा वॉरंटी कालावधीमध्ये असल्यामुळे उघडून तपासणी केलेली नाही तर केवळ बाहेरून पाहणी केली. सदर टी.व्ही. हा सुरू होत नव्हता. टी.व्ही.च्या मदरबोर्ड व पॅनेलमध्ये दोष असल्यामुळे टी.व्ही.सुरू होत नाही असे नमूद आहे. यावरून सदर टी.व्ही. हा बंद आहे. याशिवाय तक्रारकर्त्याने वि.प.क्र.3 यांचेकडे टोल फ्री क्रमांक 1800315999 वर तक्रार दिल्यानंतर दि.4/5/2018 रोजी वि.प.क्र.3 यांचे मेकॅनीक यांनी तक्रारकर्त्याचे घरी येऊन एलईडीची तपासणी केल्यानंतर त्यांनी सदर एल.ई.डी. च्या दुरूस्तीकरीता अंदाजे रू.20,000/- ते रू.25,000/- खर्च येईल व सदर रक्कम जमा केल्यानंतरच एल.ई.डी. दुरूस्त करून देऊ असे सांगितले हे विरूध्द पक्षांनी तक्रारीत उपस्थीत राहून नाकारलेले नाही. त्यामुळे सदर टी.व्ही. बंद आहे हे व विरूध्द पक्ष क्र.3 यांचे मेकॅनिकने निरीक्षण केल्यानंतर खर्च सांगितला हे तक्रारकर्त्याचे कथन ग्राहय धरण्यायोग्य आहे. सदर एल.ई.डी.हा दिनांक 1/9/2017 रोजी खरेदी केला असून त्याचा हमी कालावधी हा 2 वर्षे वॉरंटीकार्ड मध्ये नमूद आहे. सदर टी.व्ही.मध्ये दिनांक् 3/5/2018 रोजी म्हणजे वॉरंटी कालावधीमध्ये दोष निर्माण झाल्याने तो बंद आहे व सदर टी.व्ही.हा वॉरंटी कालावधीमध्ये नादुरूस्त होवूनही वि.पक्षांनी तो दुरूस्त करून न दिल्यामळे तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली असून त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर टी.व्हीचा लाभ घेता न येवून त्याला त्रास सहन करावा लागला आहे या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्र.1, 2 व 3 कडून सदर टी.व्ही.दुरूस्त करून मिळण्यांस तसेच यथोचीत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे त्याप्रमाणे नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. सीसी/18/106 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्त्यास ग्राहक
संरक्षण अधिनियमा अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर
केल्याची बाब जाहीर करण्यांत येते.
(3) तक्रारकर्त्याने त्याच्याकडील विवादीत वि.प.क्र.2 चा निर्मीत एल.जी.कंपनीचा
मॉडेल नं.43, एल.जे.522 ही सिरियल नं.706 पिएलएक्सए 010554, 43 इंच
एल ई डी हा वि.प.क्र.3 कडे सुपूर्द करावा व वि.प.क्र.1व 2 यांनी वैयक्तिक
व संयुक्तीकपणे सदर टी.व्ही.तक्रारकर्त्यास विनामुल्य दुरूस्त करून सुस्थितीत
करून द्यावा.
(4) वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारकर्त्यास मानसीक
त्रासापोटी नुकसान भरपाई दाखल रू.5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.3000/-
द्यावेत.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 27/11/2018
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.