::: नि का ल प ञ :::
(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या)
(पारीत दिनांक २३/१२/२०२१)
- तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ व १४ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता हे बल्लारपूर कॉलरी येथे वरिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होते व ते दिनांक ३१/१०/२०१३ रोजी सेवानिवृत्त झाले. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष सोसायटीचे सभासद असल्याने त्यांना विरुध्द पक्ष हे दरवर्षी लाभांश देतात. सन २०१५-२०१६ मध्ये त्यांच्या लहान मुलीला क्षयरोग झाल्याने तिच्या औषधोपचाराकरिता तक्रारकर्त्यास पैशाची आवश्यकता होती त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष सोसायटीकडे दिनांक १७/१०/२०१६ रोजी लेखी अर्ज करुन लाभांशाची मागणी केली परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास लाभांशाची रक्कम दिली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुलीला वेळेवर औषधोपचार न मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागले. तक्रारकर्त्याची मुलगी ही अभियंताच्या अंतिम वर्षाला शिकत होती व ती भविष्यात इंजिनिअर होऊन तिने आपल्या आईवडिलांना त्यांचे उर्वरित जिवन चांगल्या पध्दतीने व्यथित करण्यास मदत केली असती.विरुध्द पक्ष यांनी हेतुपूरस्सर लाभांश न दिल्याने तक्रारकर्त्याचे मुलीला औषधोपचारा अभावी प्राण गमवावा लागला व त्यामुळे तक्रारकर्त्याची कधीही भरुन न निघणारी हानी झाली तसेच मानसिक ञास व आर्थिक नुकसान झाले. तक्रारकर्त्याने दिनांक ०६/०९/२०१७ रोजी विरुध्द पक्ष यांना अधिवक्ता श्री वैरागडे यांचे मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्ष यांनी त्याची दखल घेतली नाही, ही विरुध्द पक्ष यांची सेवेतील न्युनता दर्शविते त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, तक्रारकर्त्याचे मुलीला प्राण गमवावे लागल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीकरिता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास रुपये १८,००,०००/- तसेच लाभांशाची रक्कम रुपये ६,९५०/- व त्यावर १८ टक्के व्याज, तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये १,००,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
- तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आले. विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यावर ते आयोगासमक्ष हजर होऊन त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष संस्थेचा सभासद आहे. संस्थेला नफा झाल्यास सभासदांना त्यांचे जमा भागाचे रकमेवर संस्थेने आमसभेत मंजूर केलेल्या दराने लाभांश दिला जातो. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून कर्ज घेतलेले होते. निवृत्तीच्यावेळी त्यांचेकडून रुपये १,४१,४४७/- थकबाकी होती व ती त्यांना निवृत्तीपूर्वी परतफेड करायची होती. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास पञ पाठवून थकीत रकमेची मागणी केली.याशिवाय सहकारी संस्थेचे सहा. निबंधक, सहकारी संस्था, बल्लारपूर यांनी देखील तक्रारकर्त्यास थकीत रकमेचा भरणा करण्यास सुचित केले परंतु तक्रारकर्त्याने त्याची पूर्तता केली नाही.तक्रारकर्ता यांचेकडून कर्जाची थकबाकी एकूण रुपये १,५२,४३२/- घेणे आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने कर्ज न भरताच रुपये ६,९५०/- लाभांशाच्या रकमेची केलेली मागणी अयोग्य आहे. तक्रारकर्ता यांनी संस्थेच्या कर्जाची रक्कम व्याजासह परत न करता मुलीचे आजारपणाची खोटी बाब पुढे करुन विरुध्द पक्ष यांचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ आणि तक्रार, दस्तावेज आणि शपथपञ यातील मजकुरालाच त्यांचे लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी पुरसिस, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर, शपथपञ तसेच लेखी युक्तिवाद, तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमिमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे
१. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतम होय
सेवा दिली आहे कायॽ
२. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्रमांक १ बाबतः-
- तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष संस्थेचा सभासद असून ते संस्थेचे भागधारक आहे व संस्थेमध्ये त्यांची रक्कम जमा आहे याबाबत उभयपक्षांमध्ये वाद नाही. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याला २०१५-२०१६ ला विरुध्द पक्ष यांनी लाभांश न दिल्याबाबत वाद आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडे त्यांची मुलगी नामे कविता हि अभियंता च्या अंतिम वर्षाला होती व क्षयरोग झाल्याने तिच्या औषधोपचाराकरिता सन २०१५-२०१६ च्या लाभांशाची मागणी केली. त्याबाबत
दस्तावेज निशानी क्रमांक ५ वर दस्त क्रमांक ३ आणि ४ वर दाखल आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी लाभांश दिला नाही. त्यावेळी मुलीच्या औषधोपचाराकरिता पैशाची गरज होती व औषधोपचारा अभावी तिचा दिनांक २६/०१/२०१७ रोजी मृत्यु झाला. त्याबाबत मृत्यु प्रमाणपञ दस्त क्रमांक ७ व मार्कलिष्ट दस्त क्रं. ६ वर दाखल आहे.
Maharashtra Co-operative Societies, 1960 चे कलम 2(11) नुसार डिव्हीडंड ची व्याख्या खालिलप्रमाणे.....
"Dividend" means the amount paid, out of the profits of a society, to a member in proportion to the shares held by him;
विरुध्द पक्ष यांनी त्यांचेकडे जमा असलेल्या भागाच्या रकमेवरील लाभांश तक्रारकर्त्याला दिला नाही आणि त्याच्या कर्ज खात्यात सुध्दा वळती न करता तसाच (Suspension Account मध्ये) ठेवला. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्यांच्या मुलीच्या औषधोपचाराकरिता वारंवार लाभांश ची मागणी करुनही न देणे व त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुलीचा औषधोपचाराअभावी मृत्यु झाला आहे, ही विरुध्द पक्ष यांची सेवेतील ञुटी आहे, या निकर्षाप्रत आयोग आल्याने तक्रारकर्त्याला झालेले दुख व मानसिक ञासापोटी, विरूध्द पक्ष यांचे कडून नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च मिळण्यास पाञ आहेत. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः-
- मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत
आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक १९/३ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये-३०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रुपये-१०,०००/- द्यावेत.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
(किर्ती वैद्य (गाडगीळ)) (कल्पना जांगडे (कुटे)) (अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर