न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयाचे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
ग्रामपंचायत हुपरी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावच्या हद्दीतील गट क्र.859 क्षेत्र 1 हे 32 आर आकार रु.12 रु.57 पैसे पुरे नंबरची जागा रहिवासी कारणाकरिता बिगरशेती झालेली असून त्यापैकी प्लॉट क्र. 25 चे क्षेत्र 270.21 चौ.मी. त्यामध्ये बांधण्यात आलेल्या वेगवेगळया आर.सी.सी. दुमजली इमारत पैकी ग्रामपंचायत मिळकत नं. 25/4 त्याचे क्षेत्रफळ 377.88 चौ.फूट म्हणजेच 35.11 चौ.मी. व त्यावरील आर.सी.सी. दुमजली इमारत, 735.56 चौ.फूट म्हणजेच एकूण बिल्टअप 68.36 चौ.मी. इतके बांधकाम असलेली मिळकत हा या तक्रारीचा वादविषय आहे. सदर मिळकत ही तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून त्यांच्या विधीवास्तू योग कन्स्ट्रक्शन या प्रोजेक्टमध्ये खरेदी केली आहे. सदर मिळकतीची खरेदी ही दि. 24/8/2015 रोजी रजि.दस्त क्र. 4998/2015 ने एकूण मोबदला रक्कम रु. 16,00,000/- ला दिलेली असून त्यांचेकडून सदर मिळकतीचा प्रत्यक्ष व खुला कब्जा घेतलेला आहे व तक्रारदार हे सदर मिळकतीचा मालक म्हणून उपभोग घेत आहेत. सदर मिळकतीचा वापर सुरु झालेनंतर साधारण 8 ते 9 महिन्यांत भिंतींना भेगा पडणे, त्यामधून वाळू, माती खाली पडणे, तसेच इमारतीचा गिलावा खाली पडणे व दरवाजे व खिडक्या यांच्या चौकटी देखील निखळणे असे प्रकार सुरु झाले. म्हणून तक्रारदारांनी सदरची बाब वि.प.क्र.1 व 2 यांनचे निदर्शनास आणून दिली परंतु वि.प.क्र.1 व 2 यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तदनंतर तक्रारदाराने सदर बांधकामाच्या दर्जाकरिता ऑडीट करुन घेतले आहे. तदनंतर वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना वि.प.क्र.3 यांचेकडून कर्ज घ्यावे असे सांगितले. त्यावेळी द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निश्चित झाले परंतु प्रत्यक्षात वि.प.क्र.3 यांनी द.सा.द.शे. 14 टक्के दराने व्याजाची आकारणी केली. अशा प्रकारे वि.प.क्र.1 ते 3 यांनी संगनमताने तक्रारदारांची फसवणूक केल्याची तक्रारदाराची खात्री झाली. म्हणून तक्रारदारांनी वि.प.क्र.1 ते 3 यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसीस वि.प. यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास एकूण खरेदीचा मोबदला रक्कम रु.16,00,000/- मिळावेत, वि.प.क्र.3 यांनी आकारलेली अतिरिक्त व्याजाची रक्कम रु. 24,688/-, मुद्रांक शुल्क व रजिस्ट्रेशन फीची रक्कम रु. 96,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/-, तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.55,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत खरेदीपत्र, स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट, ऑडीटचे केलेल्या चित्रणाची सी.डी., तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, नोटीसीच्या पोहोचपावत्या, ऑडीट खर्चाची पावती, व्हिडीओ चित्रीकरणाच्या खर्चाची पावती, वि.प.क्र.3 यांनी दिलेला खातेउतारा, वि.प.क्र.3 यांनी नोटीस स्वीकारलेची पोहोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र, साक्षीदार सुधीर हंजे यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी दि.07/11/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास स्वीकृतीपूर्व म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, सदरकामी मालकी हक्क, ताबा, खरेदीपत्राची वैधता, याबाबत सविस्तर व सखोल न्यायचौकशी आवश्यक असून यामध्ये पुराव्याच्या कायद्याच्या अनेक कसोटया तपासून तदनंतर न्यायनिर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतचे अधिकारक्षेत्र या आयोगास नाही. तक्रारदारांनी वि.प. यांचे अपरोक्ष पूर्वनोटीस न देता संबंधीत वस्तूचे ऑडीट करुन घेतले आहे. त्यामध्ये वि.प. यांना आपली बाजू मांडता आलेली नाही. यास्तव उत्पन्न झालेला रिपोर्ट हा तक्रारदाराने दिलेल्या फी स्वरुपी रकमेवर आधारित असलेने त्यास कायदेशीर महत्व देता येणार नाही. प्रस्तुत प्रकरणात संबंधीत प्रत्येक व्यक्तीची व घटकाची तपासणी झाली पाहिजे. हे न करता त्याच्या निर्णयाप्रत येणे म्हणजेच कोणत्याही तरी एका बाजूवर अन्याय होण्याची शक्यता आहे. तक्रारदार अप्रत्यक्षपणे संबंधीत खरेदीपत्र रद्द करुन मागतात. परंतु कायद्याप्रमाणे प्रस्तुत दाद दिवाणी कोर्टात मागणे आवश्यक आहे. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प.क्र.1 व 2 यांनी केली आहे.
4. वि.प.क्र.3 यांनी याकामी लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सदरची तक्रार ही कायद्याने तसेच वस्तुस्थितीप्रमाणे या आयोगासमोर चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे कर्जाची मागणी केल्यानंतर वि.प. यांनी रक्कम रु.12,00,000/- चे कर्ज तक्रारदारास मंजूर केले. सदर कर्जाच्या मोबदल्यात तक्रारदाराने पूर्ण वाचून समजून घेवून वि.प. कंपनीस आवश्यक कायदेशीर कागदपत्रे लिहून दिलेली आहेत. वि.प. यांनी तक्रारदारास 10 टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देणेबाबत कोणतेही बोलणे झालेले नव्हते. तक्रारदाराने वि.प. कंपनीस कर्जाचे करारपत्र, गहाणखत, डिमांड प्रॉमिसरी नोट, कर्ज मंजूरी पत्र इ. लिहून दिलेले आहे. त्यामध्ये कर्जाचा व्याजदर 14 टक्के नमूद आहे. वि.प. यांनी तक्रारदाराच्या नोटीसीला दि. 15/5/17 रोजी नोटीस उत्तर देवून तक्रारदाराचे नोटीसीतील सर्व मजकूर नाकारला आहे. सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी वि.प.क्र.3 यांनी केली आहे.
5. वि.प.क्र.3 यांनी कागदयादीसोबत कर्ज प्रकरणी केलेला अर्ज, कर्ज करारपत्र, इक्विटेबल मॉरगेजचा मेमो, सरफेसी अंतर्गत पाठविलेली नोटीस, पोस्टाकडील रिटर्न लिफाफा, नोटीस उत्तर, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
7. ग्रामपंचायत हुपरी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावच्या हद्दीतील गट क्र.859 क्षेत्र 1 हे 32 आर आकार रु.12 रु.57 पैसे पुरे नंबरची जागा रहिवासी कारणाकरिता बिगरशेती झालेली असून त्यापैकी प्लॉट क्र. 25 चे क्षेत्र 270.21 चौ.मी. त्यामध्ये बांधण्यात आलेल्या वेगवेगळया आर.सी.सी. दुमजली इमारत पैकी ग्रामपंचायत मिळकत नं. 25/4 त्याचे क्षेत्रफळ 377.88 चौ.फूट म्हणजेच 35.11 चौ.मी. व त्यावरील आर.सी.सी. दुमजली इमारत, 735.56 चौ.फूट म्हणजेच एकूण बिल्टअप 68.36 चौ.मी. इतके बांधकाम असलेली मिळकत हा या तक्रारीचा वादविषय आहे. सदरची मिळकत तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून त्यांच्या विधी वास्तू योग प्रोजेक्टमध्ये खरेदी केलेली आहे. सदरची मिळकत ता. 24/8/2015 रोजी रजि.दस्त क्र. 4998/2015 खरेदी झालेली असून सदरचे खरेदीपत्राची प्रत तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. सदरचे खरेदीसाठी तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 व 2 यांना एकूण मोबदला रक्कम रु. 16,00,000/- अदा केलेला असून सदरचे मिळकतीचा कब्जा तक्रारदार यांचेकडे आहे. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 व 2 तर्फे प्रस्तुत प्रकरण स्वीकृत होणेपूर्वीच म्हणणे दाखल झाले आहे. सदरचे म्हणणे आयोगाचे आदेशानुसार कायम ठेवण्यात आले आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचे म्हणणे यांचा विचार करता वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरचे खरेदीपत्र नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना खरेदीचा मोबदला दिलेला असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत, सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी सदरचे मिळकतीचा वापर सुरु झालेनंतर साधारण 8 ते 9 महिन्यात भिंतीत भेगा पडणे, त्यामधून वाळू, माती खाली पडणे, तसेच इमारतीचा गिलावा खाली पडणे व दरवाजे व खिडक्या यांच्या चौकटी देखील निखळणे असे प्रकार सुरु झाले. त्या कारणाने तक्रारदार यांनी बांधकाम दर्जाकरिता ऑडीट करुन घेतले. सदरचे ऑडीट अहवालावरुन तक्रारदार यांना स्वतःची फसवणूक झालेची खात्री झाली. तसेच वि.प.क्र.1 ते 3 यांनी 10 टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करुन देण्याचे निश्चित झाले असतानादेखील वि.प.क्र.3 यांनी 14 टक्के व्याजाची आकारणी केली. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना निकृष्ट दर्जाचे बांधकामाची मिळकत देवून व वि.प.क्र.3 यांनी सदर मिळकतीवर 14 टक्के गृहकर्जाचे व्याजाची आकारणी करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत Structural Audit Report दाखल केलेला आहे. तसेच त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारदारतर्फे साक्षीदार सुधीर सुर्यकांत हांजे यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सदरचे शपथपत्राचे अवलोकन करता, साक्षीदार सुधीर हांजे यांची Certified Construction Material Laboratory आहे. ते बांधकाम पदवीधारक इंजिनियर आहेत. सदरचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये
“मिळकतीला भेट दिल्यावर निव्वळ उघडया डोळयांनी पाहिल्यावरच माझे लक्षात आले की, सदर मिळकतीचे बांधकामाचा दर्जा योग्य नाही. कारण ब-याच ठिकाणाचा तक्रारदारांनी मला सांगितल्याप्रमाणे गिलावा निघून पडलेला होता. भिंतींना भेगा पडल्या होत्या. दरवाजा व खिडक्यांच्या चौकटी देखील अर्धवट निखळल्या अवस्थेत होत्या. तसेच बांधकामाबाहेरील छपरीमधून ब-याच रिकाम्या सळया बाहेर आलेल्या होत्या व त्या पूर्णपणे गंजल्या होत्या व हे सर्व पाहिल्यावर मी सदर मिळकतीच्या दर्जाकरिता स्ट्रक्चरल ऑडीट करुयात असे तक्रारदारांना सांगितले. त्याप्रमाणे माहे एप्रिल 2017 मध्ये मी व माझ्या सहका-यांनी मिळून सदर मिळकतीचा दर्जा तपासणेसाठी अनुक्रमे Rebound hammer test, Ultrasonic pulse velocity test and concrete core test करण्याचे ठरविले. तसेच सदर तपासण्या करताना व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे सुध्दा ठरविले. वरील तिन्ही प्रकारची तपासणी करताना तसेच नमुने घेताना माझे लक्षात आले की, बांधकामाचा दर्जा खराब व सुमार आहे. मिळकतीचे ऑडीट झालेवर मी तक्रारदारांना बांधकामाच्या दर्जाविषयीचा एकत्रित सविस्तर अहवाल दिला. तक्रारदाराचे युनिट नं. 25/4 चे NDT test of concrete by digital rebound Hammer as par is 1331(1) & (2) प्रमाणे ऑडीट करण्यात आले. म्हणजेच भारतीय मानक संस्थेने ठरविलेल्या व सुचित केलेल्या मान्यतेप्रमाणे सदरची चाचणीद्वारे बांधकामाचा दर्जा तपासण्यात आला आणि मला खालीलप्रमाणे रेटींग मिळालीत.
- GR – Floor coumn between hall & kitchen 12.50
- GR – Floor Beam between hall & Kitchen 16.50
- First Floor coumn between two bedroom 15.00
- GR – Floor staircase soffit Below 10.00
वर आलेला तपशील हा भारतीय मानक संस्थेने ठरवून दिलेल्या IS456-2000 प्रमाणे नाही. सदर संस्थेने सुचित केलेप्रमाणे सदर स्ट्रक्चरला कॉन्क्रीट कमीत कमी एम-20 ग्रेडचे असणे गरजेचे आहे. परंतु सदर मिळकतीचे मानक Below 10.00 to 16.50 दरम्यान आहे. म्हणजेच भारतीय मानक संस्थेने IS456-2000 मानक दिल्याप्रमाणे प्रस्तुत बांधकाम किमान दर्जा सुध्दा पार करीत नाही. म्हणजेच सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे.
त्यानंतर आम्ही Ultrasonic pulse velocity test ही IS Code 13311 (part 1) 1992 प्रमाणे आम्ही केली. भारतीय मानक संस्थेने ठरलेल्या व सुचित केलेल्या मान्यतेप्रमाणे सदरची चाचणीद्वारे बांधकामाचा दर्जा तपासण्यात आला आणि मला खालीलप्रमाणे रेटींग मिळालेत.
Sr.No. | Location | Method of Transmission | Path length in MM | Time in us | Pulse Velocity (Km/sec) | Concrete Quality grading |
1 | Beam btn hall and kitchen | Direct | 150 | 43.70 | 3.43 | Medium |
2 | Beam btn stair case and hall | Surface | 250 | 180 | 1.39 | Poor |
3 | 1st floor column | Surface | 250 | 135 | 1.85 | Poor |
सदर आलेल्या तपशीलाप्रमाणे बांधकामाचे कॉंक्रीटचे एकत्रीकरणपणा (Homogeneous) हा सर्वसाधारणपणे Poor to medium हे दर्जाचे आहे असे दिसून आले आहे. म्हणजेच सदरचे कॉंक्रीट हे एकजिनसी/एकजीव (Not Homogenous) नाही आहे.
त्यानंतर आम्ही Concrete core – compression test ही IS code 516-1959, correction factor as per sp 24-198 प्रमाणे आम्ही केली आहे. प्रत्यक्षात सदर मिळकती ही इतर मिळकत ही इतर मिळकतींना लागूनच आहेत. म्हणजेच एकमेकांच्या कॉमन भिंती असल्याकारणाने Concrete Core पूर्ण विधीवास्तू योग कनस्ट्रक्शन्स मधील काही इमारतीचा कोअर नमूना काढून घेवून लॅबमध्ये तपासणी केलेली आहे. लॅबमध्ये तपासणी करताना अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे आम्हांला रेटींग मिळाले. बांधकामाचा दर्जाच ठिसूळ आढळून आलेने कोअर टेस्ट त्याप्रमाणात घेता आल्या नाहीत. परंतु ज्या काही कॉंक्रीटीज घेतल्या गेल्या, त्याचे रिझल्ट M 7.5 N/MM2 to 12.50 N/MM2 या दरम्यानचा मिळाला. सदर बांधकामामध्ये कॉंक्रीटचा एकजीनसीपणा (Homogeneous) नसल्यामुळे फक्त लूज कॉंक्रीट छिद्रातून बाहेर निघाले. प्रत्यक्षात आम्ही चार नमुने तपासणीसाठी काढलेत. त्याची तपासणी केली असता, असे निदर्शनास आले की, कॉंक्रीटमध्ये भरपूर रेती आढळली. तसेच त्याची घनता सुध्दा सरासरी पेक्षा खाली मिळाली. म्हणजेच 2200-2250 KG/CUM तसेच कॉंक्रीट दर्जा M-10 श्रेणीचा आहे. सामान्यपणे भारतीय मानक संस्थेने कॉंक्रीट हे कमीत कमी M-20 श्रेणीचे असणे बंधनकारक आहे असे IS code 456-2000 मध्ये नमूद केलेले आहे. तरी सदर बांधकाम हे Rebound hammer test आणि core test या दोन्ही टेस्टवरुन तसेच भारतीय मानक संस्था (India Standard code) नी ठरवून दिलेल्या मान्यते व श्रेणीप्रमाणे नाही म्हणजेच सदरचे बांधकाम निकृष्ट आहे.
असे नमूद आहे. सदरचे मुद्याचे अनुषंगाने वि.प.क्र.1 व 2 यांचे म्हणणेचे अवलोकन करता तक्रारदाराने वि.प.क च्या अपरोक्ष त्यांना कसलीही पूर्व नोटीस न देता ऑडीट करुन घेतले आहे. त्याकारणाने अशा स्वरुपाचा कागद ग्राहक न्यायालयाचे कक्षेत कायद्याने येणार नाही असे कथन केलेले आहे. तथापि तक्रारदार यांचे लेखी युक्तिवादाचे अवलोकन करता सदर ऑडीट पूर्वी तक्रारदार यांनी वि.प. यांना बांधकामाची वस्तुस्थिती दाखविली होती. पण त्यावर वि.प. यांनी कोणतीही कृती केलेली नाही त्यामुळे तक्रारदार यांना सदर ऑडीट करुन घेणे भाग पडले तसेच प्रस्तुतकामी वि.प. यांनी संधी असताना देखील सदरचे साक्षीदारांचे अॅफिडेव्हीटला काऊंटर अॅफिडेव्हीट दाखल केलेले नाही. वि.प.क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत कामी पुरावा शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब, या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांनी दाखल केलेले सदरचे साक्षीदारांचे बांधकाम दर्जाचे बाबतचा ऑडीट रिपोर्ट मध्ये नमूद निष्कर्ष व अनुमान आयोगाला नाकारता येणार नाही. तक्रारदारांनी सदरच्या बांधकामाचे दर्जाचे ऑडीट रिपोर्ट साक्षीदारांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन सिध्द केलेले आहेत. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांचेकडून बांधकामाचा संपूर्ण मोबदला स्वीकारुन तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाचे बांधकाम देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करुन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि प्रत्यक्षात वि.प.क्र.3 यांचेकडून द.सा.द.शे. 14 टक्के दररने व्याज दर आकारणी करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असे कथन केले आहे. त्याअनुषंगाने वि.प.क्र.3 यांचे म्हणणेचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी ता. 5/8/2017 रोजीचे कर्जाचे करारपत्र, गहाणखत, डिमांड प्रॉमिसरी नोट व कर्जाचे मंजूरी पत्र इ. सही करुन वि.प.क्र.3 यांचे हक्कात दिलेले आहेत. तसेच वि.प.क्र.3 यांनी दाखल केलेले ता. 5/8/2017 रोजीचे कर्जाचे करारपत्राचे अवलोकन करता, आर्टीकल 2 यामधील नियम क्र. 2.2 (a) सदर करारपत्र ज्या तारखेला करण्यात आलेले आहे, त्या तारखेला असणारा व्याजाचा दर जो परिशिष्टामध्ये नमूद आहे, तो लागू असेल असे नमूद आहे. दाखल कर्ज करारपत्राचे अवलोकन करता सदरचे कर्जाचे करारप्रामध्ये व्याजाचा दर द.सा.द.शे.14 टक्के असून त्यावर तक्रारदारांची सही आहे. सबब, वादातील व्याजदराचा निर्णय होणेसाठी तक्रारदारांनी सबळ पुरावा आयोगात दाखल केलेला नसलेने वि.प.क्र.3 यांनी 14 टक्के व्याजदराची आकारणी चुकीचे पध्दतीने केली हे सिध्द होत नाही. सब, वि.प.क्र.3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली नाही.
10. वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाचे बांधकाम दिले जे सर्वसामान्य परिस्थितीसाठी निवासासाठी उपयुक्त नव्हते. त्याअनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेले श्री सुधीर हांजे यांचे शपथपत्रामध्ये “ इमारतीच्या सर्व भागातील दर्जा निकृष्ट आहे व या सर्व भागाची दुरुस्ती करणे यामध्ये नवीन बांधकामाच्या खर्चापेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बांधकाम पाहून नव्याने बांधकामकरणे योग्य ठरते ” असे नमूद आहे. तसेच तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये वि.प. यांना बांधकामाबाबत विनंती करुन देखील वि.प. यांनी दुर्लक्ष केलेचे कथन केले आहे. वि.प. यांची दुरुस्ती करुन देण्याची किंवा नव्याने बांधकाम करुन देणेची तयारी दिसून येत नसलेने तक्रारदार यांनी एकूण मोबदल्यासह सर्व खर्चाचा तपशील नमूद करुन सदर रकमेची मागणी वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळावी अशी आयोगात विनंती केलेली आहे. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना विकसन करुन दिलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहेत हे कागदपत्रांवरुन सिध्द होते. प्रस्तुत वाद मिळकत दि. 24/8/2015 पासून तक्रारदार यांचे ताब्यात आहे. सदरचे मिळकतीचे खरेदीपत्र तक्रारदार यांना वि.प.क्र.1 व 2 यांनी करुन दिलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना वाद मिळकतीमधील त्रुटी दूर करुन द्याव्यात अथवा नव्याने बांधकाम करुन द्यावे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
11. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विवेचनाचा विचार करता वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली केलेली आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाचे बांधकाम दिलेने सामान्य परिस्थितीमध्ये निवासासाठी उपयुक्त नव्हते. सबब, सदर नुकसान भरपाईपोटी तक्रारदार वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून रक्कम रु.50,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
12. उपरोक्त मुद्दा क्र.1 ते 3 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्या कारणाने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार या आयोगात दाखल करणे भाग पडले. त्याकारणाने, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना वादमिळकतीमधील सर्व त्रुटी दूर करुन द्याव्यात अथवा नव्याने बांधकाम त्वरित करुन द्यावे.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.50,000/- अदा करावी.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|