तक्रारकर्ता ः- स्वतः
विरूध्द पक्ष क्र. 1,2 व 3 ः- स्वतः
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- कु. सरीता ब. रायपुरे, सदस्या, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 14/08/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्त्याने पाठविलेला मनीऑर्डर न मिळाल्याने, मनीऑर्डरची रक्कम मिळण्याकरीता प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हे मुक्काम सोनारटोला पो. सावली ता. देवरी जि.गोंदिया येथील रहिवासी आहेत. तक्रारकर्ता श्री. अंबीलाल बुधराम उईके यांनी दि. दि. 11/07/2016 शाखा डाकपाल सावली मार्फत श्री.कोकाटे क्लासेस 133 झोन, विल्ला, मानिकपुर वसई रोड, जि. पालघर यांना रू. 2,500/-, एवढया रकमेचा मनीऑर्डर केला. परंतू तो मनीऑर्डर कोकाटे क्लासेसला मिळाले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 04/08/2016 रोजी उपडाकपाल, आमगांव एस.ओ. यांना शाखा डाकपाल सावली तर्फे तक्रार अर्ज दिला. तसेच प्रवर अधिक्षक,ग्रामीण संभाग डाकघर नागपूर यांना सुध्दा मनीऑर्डर संबधात तक्रार अर्ज दिला. परंतू विरूध्दपक्ष क्र 1,2 व 3 कडून कोणतीही अंतिम कार्यवाही झाली नाही. विरूध्द पक्षाची हि कृती तक्रारकर्त्याला सेवा देण्यात त्रृटी करण्यात आली या कारणास्तव तक्रारकर्त्याने मूळ रक्कम व कमिशन – 2,500 + 125 = 2,625/-, रूपये व्याजासह मिळण्यासाठी तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रू. 5,000/-, आणि तक्रारीचा खर्च रू. 2,000/-, मिळण्यासाठी दि. 04/07/2017 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्यायमंचाने दि.15/06/2018 रोजी दाखल करून घेतल्यानंतर, विरूध्द पक्ष यांना मंचातर्फे नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर, विरूध्द पक्ष क्र 1 ते 3 यांनी मंचात हजर होऊन त्यांचा लेखीजबाब दाखल केला.
4. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखीजबाब दि. 20/08/2018 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखीजबाबात म्हटले आहे की, तक्रारकर्ता दि. 11/07/2016 ला शाखा डाकघर सावली येथे आहे आणि त्यांनी श्री.कोकाटे क्लासेस 133 झोन, विल्ला, मानिकपुर वसई रोड, जि. पालघर या नावानी मनीऑर्डर करून दिला व तो मनीऑर्डर उपडाकघर आमगांव येथे दि. 11/07/2016 ला पाठविला असे विरूध्द पक्ष क्र 1 ने आपल्या लेखीजबाबात म्हटले आहे.
5. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखीजबाब दि. 20/08/2018 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखीजबाबात म्हटले आहे की, श्री. विजयकुमार तुळशीराम बागडे हे दि. 02/03/2018 रोजी उपडाकघर येथे उपडाकपाल (ऑफिस अरेजमेंट) या पदावर कार्यरत होते. श्री. अंबीलाल उईके यांनी केलेल्या मनीऑर्डरच्या तक्रारीप्रमाणे प्रत्येक शाखा डाकघराने केलेल्या कार्याची Re-booking उपडाकघरामार्फत करण्यात येत असते. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने केलेले मनीऑर्डर प्रथमतः शाखा डाकघर सावली येथे स्विकारले गेले व नंतर ते दि. 13/07/2016 ला आमगांव एस.ओ. ला पोहचले तेव्हा त्या मनीऑर्डर Re- booking करण्यात आले. त्याचा एम.ओ. नंबर – 9429 रू. 2,500/-,प्रति श्री.कोकाटे क्लासेस 133 झोन, विल्ला, मानिकपुर वसई रोड, जि. पालघर या नावाने होते व ते मनीऑर्डर त्याचदिवशी गोंदिया रेल्वे डाक सर्व्हिस या कार्यालयात पाठविण्यात आले. आमगांव डाकघर येथे कार्यरत कार्यालयीन कर्मचा-याने नियमाप्रमाणे अगदी बरोबर आपले काम पार पाडले आणि त्याचे पुरावे लेखीजबाबासोबत जोडलेले आहे. एवढेच आमचा लेखीजबाब आहे.
6. विरूध्द पक्ष क्र 3 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखीजबाब दि. 20/08/2018 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखीजबाबात म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने सावली शाखा डाकघर येथून मनीऑर्डर केला होता आणि तो मनीऑर्डर नियमाप्रमाणे उपडाकघर आमगांव येथे प्राप्त झाल्यानंतर तो मनीऑर्डर एम.ओ नं. 9429 हा दि. 13/07/2016 ला तक्रारकर्त्याने दिलेल्या पत्यावर पाठविण्यात आला. परंतू तो श्री.कोकाटे क्लासेसला मिळाल नाही. तेव्हा तक्रारकर्त्याने तक्रार केली. त्यावेळी आमगाव उपडाकघर यांनी तक्रारकर्त्याला दि. 08/11/2016 च्या पत्राद्वारे कळविले की, तुम्ही श्री.कोकाटे क्लासेसचा योग्य तो पत्ता दया. जेणेकरून आम्ही ते मनीऑर्डर पाठवू. परंतू तक्रारकर्त्याने पत्राचे उत्तर दिले नाही किंवा पूर्ण पत्ता सुध्दा दिला नाही. तर तक्रारकर्त्याने दोन वर्षानंतर ग्राहक तक्रार निवारण मंच गोंदिया येथे तक्रार दाखल केली. परंतू यात विरूध्द पक्षाची काहीही चुक नाही. कारण तक्रारकर्त्याने Payee योग्य पत्ता दिला असता तर, आम्ही डुप्लीकेट मनीऑर्डर पाठविला असता. As per the Clause 220 Post office guide rule part - 1 नूसार मनीऑर्डर पाठविण्यासाठी कोणताही विलंब झाला असल्यास त्यासाठी पोस्ट ऑफिस कार्यालय जबाबदार नाही आणि हि अट तक्रारकर्त्याला मान्य होती. त्यामुळे विरूध्द पक्षाने सेवा देण्यात कोणत्याही प्रकारची त्रृटी केली नाही असे त्यांनी आपल्या लेखीजबाबात म्हटले आहे.
7. तक्रारकर्त्याने स्वतः मंचात हजर राहून त्यांचा लेखीयुक्तीवाद दाखल केला आणि मौखीक युक्तीवाद सुध्दा केला आणि त्यात त्यांनी म्हटले की दि. 11/07/2016 ला शाखा डाकपाल सावली तर्फे श्री. कोकाटे क्लासेस यांना रू. 2,500/-एवढया रकमेचा मनीऑर्डर केला. परंतू तो मनीऑर्डर त्यांच्याकडे आजपर्यंत पोहचला नाही. किंवा या संबधात डाक कार्यालयातुन कोणतही अंतिम कार्यावही झाली नाही. यामध्ये विरूध्द पक्षाची पूर्णपणे चुक आहे करीता तक्रारकर्त्याला मनीऑर्डरची पूर्ण रक्कम रू. 2,500/-,च्या दुप्पट रू. 5,000/-,मिळावे तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रू.10,000/-,आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/-,असा युक्तीवाद तक्रारकर्त्याने केला.
8. विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 त्यांनी त्यांचा मौखीक युक्तीवाद केला. तक्रारकर्त्याला आम्ही पत्राद्वारे कळविले की, तुम्ही श्री.कोकाटे क्लासेसचा योग्य तो पत्ता दया. तरी सुध्दा पत्ता दिला नाही. परंतू आम्ही डुप्लीकेट मनीऑर्डर पाठविला आणि श्री. महादेव टी. कोकाटे यांनी मनीऑर्डर रू. 2,500/-,एवढी रक्कम दि. 11/08/2018 ला मिळाली याची कबुली त्यांनी दि. 07/06/2019 ला स्वतः सही करून लिहून दिले. मनीऑर्डर मिळाल्याबाबतचा Doc. No - 4809293216 दि. 11/08/2018 ला मनीऑर्डर मिळाल्याची Daily Transactions Report मध्ये नमूद आहे आणि त्यासंबधीत कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे विरूध्द पक्षाने सेवा देण्यात कोणतीही कसुर केली नाही. करीता यातुन आमची मुक्तता करण्यात यावी असा युक्तीवाद केला.
9. तक्रारकर्त्याची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं-1,2 व 3 यांचे तर्फे लेखी उत्तर व पुराव्याचे शपथपत्र यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. दोन्ही उभयपक्षकाराचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
10. तक्रारकर्ता यांनी दि. 11/07/2016 ला शाखा डाकपाल सावली मार्फत श्री.कोकाटे क्लासेसला रू. 2,500/-,एवढया रकमेचा मनीऑर्डर केला. परंतू तो मनीऑर्डर आजपर्यंत मिळालेला नाही. यावरून हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने मनीऑर्डर करून त्याची जबाबदारी पूर्ण केली परंतू विरूध्द पक्षाने मात्र तक्रारकतर्याला योग्य ती सेवा दिली नाही. कारण तक्रारकर्त्याने दि. 11/07/2016 ला मनीऑर्डर केला तो मनीऑर्डर श्री.कोकाटे क्लासेसला दि. 11/08/2018 मिळाला यावरून हे लक्षात येते की, सदर मनीऑर्डर दोन वर्षानंतर मिळाला याचा अर्थ विरूध्द पक्षाने आपली जबाबदारी योग्यरित्या केली नाही तर ते आपल्या कामाविषयी बेजबाबदार आहे. विरूद पक्षाने म्हटले की, योग्य तो पत्ता नव्हता. परंतू शेवटी त्याच पत्यावरती Payee ला विलंबाने मनीऑर्डर मिळाला याचा अर्थ विरूध्द पक्ष त्यांची जबाबदारी वेळेच्या आत पूर्ण करू शकले नाही आणि मनीऑर्डर समजा समोरच्या व्यक्तीला मिळाला नाही तर तो मनीऑर्डर 21 दिवसाच्या आत परत येतो. परंतू तो परत आला नाही. यावरून मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने पाठविलेला मनीऑर्डर वेळेवर न मिळाल्याने तक्रारकर्त्याला जो मानसिक व शारिरिक त्रास झाला तो कधीच भरून निघणार नाही. करीता विरूध्द पक्ष पूर्णपणे जबाबदार आहे असे या मंचात मत आहे.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 ला यांनी तक्रारकर्त्याची मनीऑर्डरची रक्कम, रू. 2,500/- रू. 11/8/2018 कोकाटे क्लासेसला मिळाले आहे. करिता कोणताही आदेश नाही.
(03) विरुध्दपक्ष क्र 1,2 व 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाबाबत रू. 2,000/-, (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) दयावे व तक्रारीचा खर्च म्हणून रू.2,000/-, (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) दयावे.
(4) विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 3 यांनी 30 दिवसांत पालन न केल्यास, द.सा.द.शे 9 टक्के व्याज देय राहिल.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.