मंचः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, : कुमारी. सरीता ब. रायपुरे, सदस्या,
श्री. नितीन मा. घरडे सदस्य,
निकालपत्रः- श्री. नितीन मा. घरडे सदस्य, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक- 24/06/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्रा.सं कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरूप असे आहे की, तक्रारकर्ता हे वडगांवमाली ता. मेहकर जि. बुलढाणा येथील रहिवाशी असून, खाजगी शिकवणीचे काम आमगांव येथील श्री. लक्ष्मणराम मानकर रिसामा येथे करीत होते व सध्या ते आमगांव येथे राहत आहे. दि. 15/05/2015 रोजी आमगांव येथे उपडाक घरातुन अर्जदाराचे शिक्षक मित्रांनी स्पीड पोस्टद्वारा अर्जदाराच्या राहत्या घरच्या पत्यावर म्हणजे वडगांवमाली ता. महेकर जि. बुलढाणा येथे कागदपत्र पाठविले होते. सदरचे कागदपत्र हे तक्रारकर्ता यांचे दि. 20/05/2015 रोजी नागपुर विदयापीठात ‘प्राध्यापक’ म्हणून नौकरीच्या मुलाखतीकरीता बोलविण्याबाबत मुलाखातीचे पत्र होते व त्या पत्रानूसार दि. 20/05/2015 रोजी तक्रारकर्त्याला नागपुरला जाऊन मुलाखतीला उपस्थित राहणे अनिवार्य होते. परंतू तक्रारकर्त्याच्या मित्राने जे स्पीड पोस्टच्याद्वारे पाठविलेले मुलाखत पत्र हे तक्रारकर्त्याला दि. 23/05/2015 ला प्राप्त झाले. साधारणतः सदरचे पत्र हे तीन दिवसाच्या अवधीमध्ये तक्रारकर्त्याला मिळणे अनिवार्य होते. त्यामुळे तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष यांच्या हलगर्जीपणामुळे व कागदपत्र उशिरा प्राप्त झाल्याने नोकरीपासून वंचित राहावे लागले. कारण तक्रारकर्ता हे दि. 20/05/2015 ला नागपुर येथे जाऊ शकले नाही. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतात की, विरूध्द पक्ष क्र. 6 व 7 यांना सदर बाबत विचारणा केली असता, असे लक्षात आले की, त्यांच्या खाजगी कारणाने जाणुनबुजून तक्रारकर्त्याशी अशा प्रकारचे कृत्य केले. तसेच तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 3 यांच्याकडे सुध्दा सदर बाबत विचारपुस करून व लेखी अर्ज करून, कारवाई करण्यास विनंती केली. पंरतू त्यांनी सुध्दा तक्रारकर्त्याच्या अर्जावर कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. सदरची कृती ही विरूध्द पक्षांची सेवेतील त्रृटी असून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करणारी कृती आहे. त्यामुळे सरतेशवेटी तक्रारकर्त्याने वकीलामार्फत दि. 28/10/2015 रोजी रजिष्ट्रर पोस्टाने नोटीस बजावली. परंतू सदरच्या नोटीसला सुध्दा विरूध्द पक्षाने कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. करीता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करून खालीलप्रामणे मागण्या केल्या आहेः-
(अ) विरूध्द पक्ष क्र 1 ते 7 यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केलेला आहे व सेवेत त्रृटी दिलेली आहे असे घोषीत करावे.
(आ) विरूध्द पक्ष क्र 1 ते 7 यांनी तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून रू. 5,00,000/-, व झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रू.25,000/-,व तक्रारीचा खर्च रू. 10,000/-, देण्याचे आदेशीत व्हावे.
02. विरूध्द पक्ष क्र 1 ते 7 यांना मंचाने नोटीस बजावली. सदरच्या नोटीसप्रमाणे विरूध्द पक्ष क्र 1 ते 4 व 6 ते 7 यांच्या मित्रांनी सदरच्या तक्रारीवर उत्तर सादर करून असे नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी दि. 15/05/2015 रोजी स्पीड पोस्ट पत्र क्र. EM283735895IN प्रमाणे स्पीड पोस्टची सेवा घेतलेली होती व सदरचे पत्र हे श्री.एल.एस.पेटकर यांच्या पत्यावरती पाठविण्यास सेवा घेतलेली होती. त्याप्रमाणे दि. 19/05/2015 रोजी जी.डी.एस डि.ए यांना डिलीव्हर्ड झाले व त्यानंतर सदरचे आर्टीकल हे दि. 22/05/2015 रोजी तक्रारकर्त्याच्या घरच्या पत्यावर गेले असता, दाराला कुलूप असल्याबाबचे निदर्शनास आले होते व त्यानंतर दुरध्वनी क्रमांकाद्वारे तक्रारकर्त्याला कळवून दुस-याच दिवशी सदरचे पत्र हे तक्रारकर्त्याच्या वडिलांच्या हाती देण्यात आले. त्यामुळे विरूध्द पक्ष यांच्याकडून सेवेत कोणतेही त्रृटी झालेली नाही.
3. तसेच विरूध्द पक्षाने आपल्या उत्तरात नमूद केले आहे की, तक्रारकर्ता यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, विरूध्द पक्ष क्र 6 व 7 यांचे तक्रारकर्त्यासोबत संबध योग्य नसल्या-असल्या कारणास्तव जाणुनबुजून तक्रारकर्त्याला पत्र पोहचविले नाही. परंतू याबाबतची कोणतीही पुर्व तक्रार यांनी विरूध्द पक्ष यांच्याकडे केलेली नव्हती. तसेच तक्रारकर्त्याने पाठविलेली कायदेशीर नोटीस याचे उत्तर सुध्दा विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पत्यावरती पाठविलेले होते. परंतू तक्रारकर्त्याच्या पत्यामध्ये चुक असल्याकारणास्तव ते परत आले. तसेच सदरचे पत्र पाठविण्याकरीता स्पीड पोस्टची सेवा हि तक्रारकर्त्याने स्वतः घेतलेली नाही. श्री. लक्ष्मणरामव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन आमगांव गोंदिया यांनी घेतलेल्या कारणास्तव तक्रारकर्ता हे ‘ग्राहक’ होत नाही. तसेच तक्रारकर्त्याला त्याचे पत्र मिळाल्याबाबत त्यांनी स्वतः आपल्या तक्रारीत कबुल केले आहे. त्यामुळे विरूध्द पक्षाने कोणत्याही प्रकारची सेवेत त्रृटी दिलेली नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष हे तक्रारकर्त्याला कोणतीही नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही. तक्रारकर्त्याची सदरची खेाटी तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
4. विरूध्द पक्ष क्र 5 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊन सुध्दा उपस्थित होऊन तक्रारीला उत्तर सादर केलेले नाही. करीता विरूध्द पक्ष क्र 5 विरूध्द मंचाने दि. 04/06/2019 रोजी एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत केला.
5. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर दस्ताऐवज यादीप्रमाणे 1 ते 15 दस्ताऐवज सादर केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने नोटीसची प्रत, माहिती अधिका-यामार्फत स्पीड पोस्टची सेवा किती वेळामध्ये मिळणे अनिवार्य आहे याबाबत पोस्टल डिपार्टमेंटचे नियमावली, विरूध्द पक्ष यांचेबरोबर केलेल्या पत्र व्यवहाराची प्रत इ. दस्ताऐवज दाखल केले. विरूध्द पक्षानी आपल्या दस्ताऐवजाबरोबर तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसचे उत्तराची प्रत, मा. राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिवाडयाची प्रत व स्पीड पोस्ट मॅनीफेस्ट दि. 15/05/2015 चा अहवाल व दि. 29/03/2017 रोजी सब पोस्टमास्तर आमगांव जि. गोदिया यांना पाठविलेल्या पत्राची प्रत इ. दस्ताऐवज दाखल केले. त्याच्या पोचपावत्या, पोस्टाच्या अहवालाची प्रत, मुलाखतीबाबत पाठविलेले पत्र, स्पीड पोस्टानी पाठविलेल्या पत्राचा दिनांकाप्रमाणे डिपार्टमेंटचा अहवाल इत्यादी दस्ताऐवज दाखल केले.
6. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांचे पुराव्याचे शपथपत्र तसेच विरूध्द पक्षकाराचे लेखीउत्तर, पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ‘ग्राहक’ होतो काय ? | होय |
2. | विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याशी सेवेत त्रृटी दिल्याचे दिसून येते काय? | होय |
3 | अंतीम आदेश | खालील आदेशाप्रमाणे |
कारण मिमांसा
7. मुद्दा क्र. 1 ः- तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीमध्ये दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता हि बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचे मित्र श्री. लक्ष्मणराव मानकर यांनी विरूध्द पक्षांकडून स्पीड पोस्टाने पत्र पाठविण्याची सेवा घेतलेली आहे व सदरचे पत्र हे तक्रारकर्त्याच्या राहत्या पत्यावर म्हणजे वडगांवमाली ता. मेहकर जि. बुलढाणा येथे पाठविलेले होते. ग्रा.सं.कायदा 1986 च्या कलम 2 (1) (डि) प्रमाणे ‘लाभार्थी’ सुध्दा ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडतो. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मित्राने विरूध्द पक्षाकडून सेवा घेऊन त्याचे शुल्क दिेलेले होते व तक्रारकर्त्याला पाठविलेले होते. त्याचे ‘लाभार्थी’ हे तक्रारकर्ता आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हे ‘ग्राहक’ संज्ञेत मोडतात. करीता मुद्दा क्र 1 चे उत्तर होकारार्थी नमूद केलेले आहे.
8. मुद्दा क्र. 2 ः- विरूध्द पक्षाने आपल्या उत्तरात हि बाब मान्य केले आहे की, दि. 15/05/2015 रोजी शिघ्र डाकने (स्पीड पोस्टाने) तक्रारकर्त्याला बुलढाणा येथे पत्र पाठविण्याचे सेवा घेतलेली होती. तसेच तक्रारकर्त्याने दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, निशाणी क्र. 1 वर दि. 28/10/2015 रोजी पाठविलेले पत्र उशिरा मिळाल्याबाबतची तक्रार विरूध्द पक्ष यांच्याकडे केल्याचे दिसून येते व तसेच निशाणी क्र. 9 वर तक्रारकर्ता यांनी डाकघर बुलढाण्याला लिखीत पत्र देऊन सूचना दिली होती की, त्यांचे नावे येणारे पत्र किंवा अन्य टपाल त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची आई, वडिल, भाऊ किंवा बहिण यांना देण्याची विनंती केली आहे. तसेच तक्रारकर्त्याने निशाणी क्र. 3 वर दाखल केलेले अपार्टमेंट ऑर्डर दि. 12/05/2015 ची प्रतचे योग्यअवलोकन केले असता असे दिसून येते की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर, युनिवर्सिटी नागपुर यांनी तक्रारकर्त्याला दि. 20/05/2015 रोजी बी.एड. ‘प्राध्यापक’ म्हणून नेमणुक झालेली असून मुलाखात व रूजू होण्याबाबतचे आहे व सदरचे पत्र हे तक्रारकर्त्याला दि. 22/05/2015 ला मिळाल्याबाबत विरूध्द पक्षाने आपल्या उत्तरात नमूद केलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने माहितीच्या अधिका-याने विरूध्द पक्षाकडून मागविलेली माहिती व कागदपत्रे, पुरावे अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्यामधील निशाणी क्र. 7 वर पोस्ट खात्याने पत्र किती वेळात पाठविले पाहिजे किंवा सेवा दिली पाहिजे याबाबत सर्व्हिस/ट्रॉनजेक्शन याचा अहवाल दाखल केलेला आहे. त्यामध्ये क्र 1.5 डिलीवरी ऑफ स्पिड पोस्ट आर्टिकल या रकान्यामध्ये ( SAME STATE (FOR CITIES OTHER THAN 87 CITIES & LOCAL MAIN) ‘SERVICE STANDERED’ या रकान्यामध्ये दोन ते चार दिवस असे नमूद आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याच्या मित्राने विरूध्द पक्षाकडून दि. 15/05/2015 रोजी शिघ्र डाकने सेवा घेतलेली होती व सदरची सेवा हि दोन ते चार दिवस म्हणजेच दि. 19/05/2015 पर्यंत देणे अनिवार्य होती. परंतू विरूध्द पक्षाने स्वतःच आपल्या उत्तरात कबुल केले आहे की, सदरचे पत्र हे दि. 22/05/2015 रोजी तक्रारकर्त्याला प्राप्त झाले. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, विरूध्द पक्षाने उशिराने पत्र दिले व सेवेत त्रृटी केली व तक्रारकर्त्याने निशाणी क्र. 13 वर भवभुती शिक्षण संस्था यांनी पाठविलेले प्राध्यापक म्हणून मुलाखती व रूजु होण्याकरीता दि. 20/05/2015 तारीख दिलेली होती व विरूध्द पक्षाच्या या हलगर्जीपणामुळे तक्रारकर्त्याला या नोकरीपासून वंचित व्हावे लागले हे स्पष्ट दिसून येते. करीता मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सेवेत त्रृटी दिलेली आहे. त्यामुळे तक्राकरर्ता हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
9. . उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे
::आदेश::
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरूध्द पक्ष क्र 1 ते 7 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता याला योग्य ती सेवा न पुरविल्यामूळे व तक्रारकर्त्याला नोकरीपासून मुकावे लागले. करीता नुकसान भरपाई रू. 25,000/-,अदा करावे.
3) विरूध्द पक्ष क्र 1 ते 7 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू. 10,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 10,000/-, देण्यात यावे.
5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1 ते 7 ) यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. तसे न केल्यास, विरूध्द पक्ष क्र 1 ते 7 यांनी आदेश क्र. 2 प्रमाणे रू. 25,000/-,वर द.सा.द.शे 6 टक्के दराने व्याज प्रत्यक्ष अदापावेतो तक्रारकर्त्यास दयावे.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
7) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.