// कारणमिमांसा //-
5. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष कंपनीकडून विमा पॉलिसी घेतली होती यात काही वाद नाही. सदर पॉलिसीची पडताळणी करतांना असे दिसले की, सदर पॉलिसी ही ‘युनिट लिंक’ पॉलिसी आहे. सदर पॉलिसी ही ‘युनिट लिंक’, पॉलिसी असली तरी त्या पॉलिसीमध्ये मृत्यू विमा समाविष्ट होता. म्हणून सदर पॉलिसी फक्त व्यापारी लाभ मिळण्याकरीता घेण्यांत आली होती असे गृहीत धरता येत नाही. सदर पॉलिसीचे विमामुल्य रु.4,80,000/- होते. सबब तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ‘ग्राहक’, आहे हे सिध्द होते, म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत आले आहे.
6. मुद्दा क्र.2 बाबतः- सदर तक्रार दि.15.05.2014 रोजी मंचासमक्ष दाखल करण्यांत आलेली आहे. दि.08.07.2013 रोजी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास पत्र लिहून त्या पत्रानुसार असे आश्वासन दिले होते की, तक्रारकर्त्याने पॉलिसी संबंधाने केलेली तक्रार लवकरच निकाली काढण्यांत येईल असे आश्वासन दिलेले होते. त्यामुळे तक्रार दाखल करण्यांस प्रथम कारण दि.08.07.2013 रोजी घडले व सदर तक्रार 2 वर्षांच्या आंत दाखल करण्यांत आली असे मंचाचे मत ठरले आहे. म्हणून सदरची तक्रार मुदतीचे आंत दाखल करण्यांत आल्याचे सिध्द झाले. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत येतो.
7. मुद्दा क्र.3 बाबतः- विरुध्द पक्षाने तकारकर्त्यास पॉलिसी रद्द करुन रु.66,187/- चा धनादेश दिल्यानंतर व तो धनादेश देतांना पॉलिसीच्या रकमेमधून रु.42,899.17 कापण्यांत आले होते या संबंधाने विवरण किंवा खुलासा दिलेला नव्हता. विरुध्द पक्षांनी त्यांच्या उत्तरासोबत दाखल केलेल्या दस्तावेजांची पडताळणी केली असता दि.13.07.2013 ला विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास पॉलिसीचे जे मुल्य खंडीत केले, त्यानंतर किती रक्कम झाली याबाबत पत्राव्दारे कळविण्यांत आले होते. परंतु सदर पत्र तक्रारकर्त्यास पोष्ट करण्यांत आले होते याबाबत कोणताही पुरावा विरुध्द पक्षांनी दाखल केलेल नाही. तसेच तक्रारकर्त्यास परत धनादेश न देऊन विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती निश्चितच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे सिध्द होते. तक्रारकर्त्याची स्वाक्षरी व त्याचा तपशिल मिळत नाही, याबाबत विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास पत्रदव्दारे सुचना दिलेली होती किंवा नाही व ते पत्र तक्रारकर्त्यास पोष्टाव्दारे पाठविले होते याबाबत याबाबत विरुध्द पक्षांनी कोणताही दस्त दाखल केलेला नाही. त्याअर्थी विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास त्याच्या पॉलिसीच्या खंडीत मुल्याचे विवरण वेळोवेळी दिले नाही व धनादेशाचा अवधी वाढवुन दिला नाही हे सिध्द होते. सबब विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते.
8. मुद्दा क्र.4 बाबतः- मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास विम्याची रक्कम रु.66,186/- दि.22.11.2012 पासुन रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.8% व्याजासह परत करावी.
3. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा.
4. वरील आदेशाची अंमलबजावधी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा वैयक्तिकपणे आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
5. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.