तक्रार दाखल ता.02/03/2017
तक्रार निकाल ता.11/05/2017
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. वि.प.हे व्यवसायाने बिल्डर व डेव्हलपर आहेत. तक्रारदाराने वि.प.हे “निलांचल बिल्ट विथ थॉट” या नावाने विकसीत करत असलेल्या पुणे येथील मिळकतीमध्ये फ्लॅट नं.305, तिसरा मजल्यावरील बुक केलेला होता. त्यामुळे तक्रारदार व वि.प. यांचेत ग्राहक व सेवा देणार असे नाते आहे. तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून सदर फ्लॅट बुकींगचेवेळी वि.प.यांना तक्रारदाराने रक्कम रु.62,531/-, दि.07.12.2015 रोजीचे बॅंक ऑफ महाराष्ट्र कडील चेक नं.060664 ने व रक्कम रु.17,25,000/- चेक नं.060664 ने दिलेले होते व आहेत. सदरचे चेक वटवून वि.प.यांना रक्कम मिळालेली आहे. याबाबत वि.प.ने दि.11.12.2015 रोजी रक्कम मिळणेबाबत पावती दिलेली आहे. तदनंतर तक्रारदार व वि.प.यांचे दरम्यान सदर विकसन इमारतीचा प्लॅन संदर्भात नापसंती निर्माण झालेने व तक्रारदाराला वि.प.यांचा प्लॅन पसंत नसलेने सदर व्यवहार तक्रारदार व वि.प.यांचे समजूतीने व संमतीने सदरचा व्यवहार-बुकींग रद्द करणेचे व त्यापोटी वि.प.यांनी स्विकारलेली रक्कम वि.प.ने तक्रारदाराला परत देणेचे ठरले व तक्रारदार व वि.प.यांचे दरम्यान ठरलेप्रमाणे तक्रारदार यांनी सदर फ्लॅटचे बुकींग रद्द केलेचे दि.21.12.2015 रोजीचे ई-मेलने वि.प.यांना कळविले आहे. तसेच तक्रारदार यांनी वि.प.यांना दि.02.01.2016 व दि.10.02.2016 रोजीच्या ई-मेलने व्यवहार रद्द करुन वि.प.यांना अदा केलेली रक्कम परत मागणी केलेली होती. परंतु वि.प.ने दि.11.02.2016 रोजीच्या मेलद्वारे सदरचा व्यवहार रद्द केला असून तक्रारदारांची रक्कम तक्रारदाराचे बँक खातेवर रक्कम जमा करत आहे असे कळविले. परंतु वि.प.यांनी ठरलेप्रमाणे तक्रारदाराने वि.प.यांना बुकींगपोटी अदा केलेली रक्कम अदा केली नाही. तक्रारदाराने बुकींग रद्द केल्यानंतर 15 दिवसांच्या आत देणेचे मान्य व कबूल केले होते. परंतु तक्रारदाराने वि.प.यांना वेळोवेळी प्रस्तुत रक्कमेची मागणी करुनही आजअखेर वि.प.यांनी तक्रारदाराची देय रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने वि.प.यांना दि.23.02.2016 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली होती व रकमेची मागणी केली. प्रस्तुत नोटीसला वि.प.यांनी दि.21.03.2016 रोजी वकीलांमार्फत उत्तर पाठवून प्रस्तुत रक्कम देणेचे मान्य करुन सदर रक्कम दि.31.03.2016 रोजी अखेर देणेचे ठरले होते असा खोटा मजकूर घालून पाठविलेली आहे. सदरची वि.प.यांची कृती पूर्णत: चुकीची व बेकायदेशीर असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करनारी आहे. सबब, तक्रारदाराला वि.प.ने सदोष सेवा पुरविली आहे. सबब, वि.प.विरुध्द सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मे.कोर्टात दाखल केलेला आहे.
3. प्रस्तुत कामी, तक्रारदाराने वि.प.यांचेकडून रक्कम रु.17,87,531/- दि.07.12.2015 रोजी पासून द.सा.द.शे.18टक्के प्रमाणे व्याजासह वसुल होऊन मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- वि.प.कडून वसुल होऊन मिळावी, अर्जाचा खर्च रक्कम रु.25,000/- वि.प.कडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने प्रस्तुत कामी केली आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प.यांनी अॅफीडेव्हीट, कागद यादीसोबत बुकींग फॉर्म, पेमेंट शेडयुल, मेलप्रत, वि.प.कडे रक्कम जमा केले बाबतच्या पावत्यां, मेलप्रत, परवानगीचा अर्ज, तसेच प्रस्तुत कामी मुळ तक्रार अर्जासोबत दाखल केले अॅफीडेव्हीट व कागदपत्रे हाच तक्रारदाराचा पुरावा व लेखी तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा म्हणून दिलेली पुरशिस, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
5. प्रस्तुत कामी वि.प.यांना नोटीस लागू झालेली पोहोच पावती या कामी दाखल आहे. वि.प.यांना नोटीस लागू होऊनही वि.प. या कामी हजर झालेले नाहीत. सबब, वि.प.विरुध्द एकतर्फा आदेश या कामी निशाणी क्र.1 वर पारीत झालेला आहे. त्यामुळे वि.प.ने या कामी म्हणणे/कैफियत दाखल केलेली नाही अथवा तक्रारदाराचे तक्रार अर्जावरील कोणतेही कथन वि.प.ने खोडून काढलेले नाही. सबब, वि.प.विरुध्द प्रस्तुत अर्ज एकतर्फा चालवणेत आला.
6. वर नमुद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.यांचेकडून फ्लॅट बुकींगची रक्कम व नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
7. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण वि.प.हे “निलांचल बिल्ट विथ थॉट” या नावाने विकसीत करत असलेल्या पुणे येथील मिळकतीमध्ये फ्लॅट नं.305-तिसरा मजला बुक केलेला होता व आहे. प्रस्तुत बुकींगसाठी तक्रारदाराने वि.प.यांना रक्कम रु.62,531/- चा दि.712/2015 रोजीचा बँक ऑफ महाराष्ट्रकडील चेक नं.060664 व रक्कम रु.17,25,000/- चा चेक नं.060663 वि.प.यांना अदा केले होते. प्रस्तुत चेक वटवून वि.प.यांनी रक्कम स्विकारलेली आहे. याबाबतची पावत्या वि.प.ने तक्रारदाराला दिलेली कागद यादीसोबत दाखल आहेत. तसेच बुकींग फॉर्म, पेमेंट शेडयुल व मेलच्या प्रतीं या कामी तक्रारदाराने दाखल केलेल्या आहेत. परंतु वि.प.यांनी प्रस्तुत तक्रार अर्जाची नोटीस लागू होऊनही प्रस्तुत कामी हजर झालेले नाहीत तसेच म्हणणे दिलेले नाही व तक्रारदाराने तक्रार अर्जातील कोणतेही कथन वि.प.यांनी खोडून काढलेले नाही. सबब, वि.प.यांचे विरुध्द निशाणी क्र.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. त्यामुळे वि.प.विरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज एकतर्फा चालवणेत आला. सबब, या कामी तक्रार अर्ज तसेच तक्रारदाराने पुराव्यासाठी दाखल केले सर्व कागदपत्रे यांचेवर विश्वासार्हता ठेवुन तक्रारदार हे वि.प.चे ग्राहक असून वि.प.सेवा पुरवठादार आहेत. तसेच वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिलेली आहे हे स्पष्ट होते. कारण वि.प.यांनी तक्रारदार यांचेकडून वरी नमुद केलेप्रमाणे रक्कम स्विकारुनही वि.प.ने तक्रारदाराला सदरचा इमारतीचा प्लॅन पसंद नसलेने सदरचा व्यवहार तक्रारदार व वि.प. यांचे समजूतीने व संमतीने सदरचा व्यवहार व बुकींग रद्द करणेचे व त्यापोटी वि.प.ने तक्रारदारकडून स्विकारलेली रक्कम वि.प.ने तक्रारदाराला परत देणेचे ठरले होते. तसेच प्रस्तुत फ्लॅटचे बुकींग रद्द केलेचे तक्रारदाराने वि.प.ला दि.21.12.2015 रोजीचे ई-मेलने कळविले आहे. प्रस्तुत ई-मेल या कामी दाखल आहे. तसेच प्रस्तुत बाबतीत दि.02.01.2016 व दि.10.02.2016 रोजीच्या ई-मेलने प्रस्तुत व्यवहार रद्द झालेचे व रक्कम परत अदा करणेबाबत तक्रारदाराने वि.प.यांना कळविलेले आहे. परंतु वि.प.यांनी तक्रारदार यांना तक्रारदाराचे बँक खात्यावर प्रस्तुत रक्कम जमा करत आहे असे दि.11.02.2016 चे ई-मेलद्वारे कळविले. परंतू वि.प.यांनी ठरलेप्रमाणे तक्रारदारकडून नमूद फ्लॅटचे बुकींगपोटी स्विकारलेली रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही. बुकींग रद्द केलेनंतर 15 दिवसांच्या आत रक्कम तक्रारदाराचे खातेवर जमा करतो असे वि.प.ने मान्य व कबूल केले होते. परंतु तरीही तक्रारदाराने वेळोवेळी सदर रक्कमेची मागणी वि.प.कडे करुनही वि.प.यांनी तक्रारदाराची देय रक्कम अदा केलेली नाही. सबब, तक्रारदाराने वि.प.यांना दि.23.02.2016 रोजी नोटीस पाठवली प्रस्तुत नोटीसला वि.प.ने दि.21.03.2016 रोजी वकीलांमार्फत उत्तरी नोटीस देऊन दि.31.03.2016 अखेर पूर्ण रक्कम तक्रारदाराला देणेचे ठरले आहे असा खोटा मजकूर घालून पाठविली आहे.
8. सदर बाबतीत वि.प.ने सदरची विधाने खोडून काढलेली नाहीत. सबब, वि.प.ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे ही बाब निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे.
9. सबब, प्रसतुत कामी तक्रारदार हे वि.प.यांचेकडून वर नमुद फ्लॅटचे बुकींगकरीता, तक्रारदाराने वि.प.कडे जमा केलेली रक्कम रु.17,87,531/- (अक्षरी रक्कम रुपये सतरा लाख सत्याऐंशी हजार पाचशे एकतीस मात्र) वसुल होऊन मिळणेस तसेच प्रस्तुत रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के व्याज तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंधरा हजार मात्र) व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.यांनी तक्रारदार यांना वादातीत फ्लॅटची बुकींगसाठीची तक्रारदाराने वि.प.कडे जमा केलेली रक्कम रु.17,87,531/- (अक्षरी रक्कम रुपये सतरा लाख सत्याऐंशी हजार पाचशे एकतीस मात्र) अदा करावी. प्रस्तुत रक्कमेवर अर्ज स्विकृत तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के व्याज वि.प. ने तक्रारदाराला अदा करावेत.
3 मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंधरा हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) वि.प.यांनी तक्रारदाराला अदा करावेत.
4 वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.ने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.