नि. 14 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 127/2010 नोंदणी तारीख – 27/4/2010 निकाल तारीख – 23/9/2010 निकाल कालावधी – 146 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री अविनाश शिवाजी जगदाळे रा.बुध ता.खटाव जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री विक्रमादित्य विधाते) विरुध्द 1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण, डेक्कन चौक, लक्ष्मीनगर, फलटण ता. फलटण जि. सातारा तर्फे कु.विजया नामदेव खेडेकर, व्यवस्थापक 2. श्री शतनु दुर्योधन रणवरे (जाबदार संस्थेतर्फे) 3. श्री सुधाकर गजानन कांबळे, व्हा.चेअरमन (जाबदार संस्थेतर्फे) सर्व रा. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण, ता. फलटण जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये दि.28/3/2003 रोजी रिकरिंग खाते सुरु केले होते. सदरचे खात्यामध्ये दरमहा रु.1,000/- प्रमाणे त्यांनी सलग पाच वर्षे रक्कम जमा केलेली आहे. सदरचे खात्याची मुदत संपलेली आहे. मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली. तदनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना रक्कम रु.80,250/- चा खोटा व न वटणारा चेक दिला. सदरचे चेक न वटता परत आल्यामुळे अर्जदार यांनी जाबदार यांचेविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. अर्जदार यांनी जाबदार यांना दि. 25/3/2010 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु.1,09,567/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- ची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे नि. 7 ते 9 ला दाखल आहेत. जाबदार क्र.1 ते 3 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेले रिकरिंग खात्याचे पासबुक तसेच अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस पाहिली. 4. अर्जदारतर्फे वकील श्री विधाते यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. 5. अर्जदार यांच्या तक्रार अर्जातील कथनानुसार त्यांनी जाबदार यांचेकडे रिकरिंग खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेपोटी जाबदार यांनी अर्जदार यांना धनादेश दिला. परंतु सदरचा धनादेश वटला नाही व त्यामुळे धनादेशाची रक्कम अर्जदार यांना बँकेकडून मिळाली नाही. सबब सदरची रिकरिंग खात्यातील रक्कम व्याजासह मिळावी अशी अर्जदार यांची मागणी आहे. 6. निर्विवादीतपणे अर्जदारने रिकरिंग खात्यापोटी देय असलेल्या रकमेच्या मोबदल्यात जाबदारने धनादेश दिला आहे व अर्जदारने तो स्विकारला आहे. परंतु नंतर सदरचा धनादेश न वटल्याने धनादेशाची रक्कम अर्जदार यांना बँकेकडून मिळाली नाही. सबब निर्विवादीतपणे रिकरिंग खात्यापोटी देय असलेल्या रकमेपोटी अर्जदारला धनादेश मिळाला आहे हे स्पष्ट आहे व अर्जदारने त्यांचे तक्रारअर्जामध्ये स्पष्टपणे ते मान्य केले आहे. म्हणजे जाबदार यांनी सेवा देण्याचे काम पूर्ण केले आहे असे या मंचाचे मत आहे. निर्विवादीतपणे धनादेशाची रक्कम मिळाली नाही तरी अर्जदारचा वसुलीसाठीचा अधिकार शाबीत आहे हे स्पष्ट आहे. परंतु अर्जदारने ठेवीच्या मोबदल्यात धनादेश स्विकारला तेव्हाच अर्जदार व जाबदार यांच्यामधील व्यवहार संपला व त्याचबरोबर अर्जदार व जाबदार यांच्यामध्ये ग्राहक व सेवा देणारे नाते संपुष्टात आले. ग्राहक मंचात तक्रार दाखल करणेसाठी ग्राहक व सेवा देणारे असे नाते अस्तित्वात असणे गरजेचे आहे. निर्विवादीतपणे नंतर तो धनादेश वटला नाही तर त्यासाठी स्वतंत्र कायदयामध्ये तरतुद आहे व अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथनानुसार त्या कायदयानुसार अर्जदार यांनी योग्य त्या न्यायालयात जाबदार विरुध्द दादही मागितलेली आहे. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर चालण्यास पात्र नाही या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज निकाली काढणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 23/9/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| | Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |