आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती क्रमांक 1 चे पती आणि क्रमांक 2 ते 4 चे वडील बटुकभाई ऊर्फ बटूकलाल पोपटलाल देसाई हे विरूध्द पक्ष पंजाब नॅशनल बँक, शाखा गोंदीया येथे स्पेशल असिस्टंट ऑफीसर म्हणून नोकरीस होते. त्यांच्याविरूध्द असिस्टंट मॅनेजर, पंजाब नॅशनल बँक, गोंदीया यांच्या फिर्यादीवरून भा. दं. वि. चे कलम 409, 420, 201, 467, 468, 471 अन्वये अपराध क्रमांक 169/96 नोंदविण्यांत आला होता. बटूकभाई दिनांक 27/12/2012 रोजी मरण पावले आणि त्यांच्याविरूध्द वरील अपराध क्रमांकावरून सुरू असलेली फौजदारी केस क्रमांक 325/97 मुख्य न्यायदंडाधिकारी, गोंदीया यांनी दिनांक 07/02/2013 च्या आदेशान्वये काढून टाकली.
3. तक्रारकर्ती क्रमांक 1 श्रीमती शारदादेवी आणि तिचे पती बटूकलाल यांच्या संयुक्त नांवाने विरूध्द पक्ष बँकेत दोन लॉकर क्रमांक 180 आणि 501 होते. बटूकलाल यांच्याविरूध्द चौकशीचे वेळी पोलीसांनी अनुक्रमे दिनांक 10.06.1996 आणि 18.06.1996 रोजी बँक अधिकारी आणि बटूकभाई यांच्या समक्ष सदर लॉकरची तपासणी करून पंचनामा केला होता. परंतु कोर्टाच्या कोणत्याही आदेशाने सदर लॉकर सील केले नव्हते किंवा जप्त केले नव्हते. तेव्हापासून तक्रारकर्ता क्रमांक 1 किंवा बटूकलाल यांनी लॉकर उघडले नव्हते.
तपासणीचे वेळी सदर लॉकर क्रमांक 180 मध्ये रू.42,600/- किंमतीचे खालील दागिने होते.
अ) 4 सोन्याच्या बांगड्या वजन 60 ग्रॅम – 23 कॅरेट
ब) 1 सोन्याचा नेकलेस वजन 36 ग्रॅम – 22 कॅरेट
लॉकर क्रमांक 501 मध्ये रू.55,555/- किंमतीचे खालील दागिने होते.
अ) 1 सेट ज्यांत सोन्याचा नेकलेस, 2 कानातील रिंग, 1 अंगठी
एकूण 38 ग्रॅम – 22 कॅरेट
ब) 1 सेट ज्यांत सोन्याचा नेकलेस, 2 कानातील रिंग, 1 अंगठी
एकूण 37.500 ग्रॅम – 22 कॅरेट
क) 4 सोन्याच्या बांगड्या – 60 ग्रॅम – 23 कॅरेट
ड) रू. 7,037/- नगदी
4. डिसेंबर 2015 मध्ये तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 विरूध्द पक्षाच्या गोंदीया शाखेत गेले असता त्यांना विरूध्द पक्षाने लॉकर तोडलेले दिसून आले. त्याबाबत विचारणा केली असता विरूध्द पक्षाने काहीही सांगण्यास नकार दिला. सदर कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. तक्रारकर्त्यांनी दिनांक 02/02/2016 रोजी वकिलामार्फत विरूध्द पक्षाला नोटीस पाठवून लॉकरमधील दागिन्यांची मागणी केली परंतु विरूध्द पक्षाने त्यास प्रतिसाद दिला नाही म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. वरील लॉकर मधील दागिने आणि रोख रक्कम तक्रारकर्त्यांना परत करण्याचा विरूध्द पक्षास आदेश व्हावा.
2. शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रू.40,000/- मिळावा.
5. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, पोष्टाची पावती व पोचपावती, दिनांक 10.06.1996 चा लॉकर पंचनामा, सराफाने दिनांक 10.06.1996 रोजी दिलेले प्रमाणपत्र, दिनांक 18.06.1996 चा लॉकर पंचनामा, सराफाने दिनांक 18.06.1996 रोजी दिलेले प्रमाणपत्र, चार्जशीट, आम मुखत्यार पत्र तसेच दिनांक 08/11/2016 रोजीच्या यादीसोबत तक्रारकर्ती क्रमांक 1 चे दिनांक 17.05.2013 चे पत्र, पोष्टाची पावती व पोचपावती तसेच दिनांक 08/07/2014 रोजी तक्रारकर्ती क्र. 1 ने विरूध्द पक्ष बँकेला दिलेले पत्र इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
6. विरूध्द पक्ष यांनी लेखी जबाब दाखल केला असून त्यांत तक्रारकर्ती क्रमांक 1 व तिचे पती बटूकभाई यांचे संयुक्त नांवे विरूध्द पक्षाकडे लॉकर क्रमांक 180 व 501 असल्याचे तसेच बटूकभाई विरूध्द तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे फौजदारी केस झाल्याचे आणि चौकशी दरम्यान पोलीसांनी सदर लॉकरची तपासणी केल्याचे विरूध्द पक्षाने मान्य केले आहे. मात्र तपासणीमध्ये तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दागिने आढळून आले होते व पोलीसांनी दागिन्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र मिळविले होते हे नाकबूल केले आहे. तपासणी नंतर बटूकभाई किंवा तक्रारकर्ती क्रमांक 1 ने सदर लॉकर आजपर्यंत उघडले नसल्याचे देखील नाकबूल केले आहे.
तक्रारकर्तीने डिसेंबर 2015 मध्ये विरूध्द पक्ष बॅकेच्या गोंदीया शाखेत भेट दिल्याचे व तिला विरूध्द पक्षाने तक्रारीत नमूद लॉकर तोडल्याचे आढळून आले आणि तक्रारकर्तीने त्याबाबत विचारणा केली असता विरूध्द पक्षाने काहीही सांगण्यास नकार दिल्याचे नाकबूल केले आहे. तसेच तक्रारीस कधीही कारण घडल्याचे देखील विरूध्द पक्षाने नाकबूल केले आहे.
विशेष कथनात त्यांनी म्हटले आहे की, बटूकलालने विरूध्द पक्ष बँकेच्या नोकरीत असतांना रू.27,15,422.00 ची अफरातफर (Misappropriation) केल्याने त्याचेविरूध्द बँकेने दिलेल्या फिर्यादीवरून त्याला अटक झाली होती आणि न्यायालयात पोलीसांनी फौजदारी केस दाखल केली होती. दिनांक 10.06.1996 रोजी पोलीसांनी विरूध्द पक्ष बँकेला पत्र देऊन लॉकर क्रमांक 180 चे व्यवहार थांबविण्यास कळविले होते.
सदर लॉकर उघडण्यासाठी कोणीही अधिकृत व्यक्ती बँकेत आली नव्हती. बटूकभाईचा जावई असल्याचे सांगणारा एक व्यक्ती बँकेत आला होता परंतु त्यास लॉकर उघडण्याचा अधिकार नसल्याने लॉकर उघडू देण्यांत आले नाही. बटूकभाई यांनी लॉकरला स्वतःचे कुलूप लावले आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडले नसून खोटी तक्रार दाखल केली असल्याने ती खारीज करावी अशी विरूध्द पक्षाने विनंती केली आहे.
7. विरूध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ पोलीस स्टेशन, गोंदीया शहर यांचे दिनांक 10/06/1996 रोजीचे लॉकर बंद करण्याबाबत विरूध्द पक्ष बँकेला दिलेले पत्र दाखल केले आहे.
8. तक्रारकर्ते व विरुध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता क्र. 1 ते 4 मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहेत काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
-// कारणमिमांसा //-
9. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्ता क्रमांक 1 चे पती व तक्रारकर्ता क्रमाक 2 ते 4 चे वडील बटूकलाल देसाई आणि तक्रारकर्ता क्रमांक 1 श्रीमती शारदादेवी यांचे संयुक्त नांवाने विरूध्द पक्ष पंजाब नॅशनल बँक, शाखा गोंदीया येथे लॉकर क्रमांक 180 आणि 501 असल्याबाबत वाद नाही. तक्रारकर्तीचे पती बटूकभाई यांनी बँकेत नोकरीस असतांना अफरातफर केली म्हणून त्यांचेविरूध्द पोलीस स्टेशन गोंदीया येथे भा. दं. वि. चे कलम 409, 420, 201, 467, 468, 471 अन्वये अपराध क्रमांक 169/96 नोंदविण्यांत आला होता व चौकशीमध्ये पोलीसांनी वरील लॉकर्सची तपासणी केल्यानंतर लॉकर चेकिंग पंचनामा तयार केला होता त्याच्या प्रती तक्रारकर्त्यांनी दस्त क्रमांक 4 ते 6 वर दाखल केल्या आहेत. लॉकर क्रमांक 180 मध्ये आढळलेली मालमत्ता बँकेतील पैशाची अफरातफर करून मिळविली असण्याची शक्यता असल्याने पोलीसांच्या परवानगीशिवाय सदर लॉकर उघडण्यास परवानगी देऊ नये असे पत्र गोंदीया शहर पोलीसांनी विरूध्द पक्ष बँकेला दिनांक 10/06/1996 रोजी दिले होते त्याची प्रत विरूध्द पक्षाने दिनांक 18/08/2016 च्या यादीसोबत दाखल केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर पोलीसांनी बटूकलाल विरूध्द प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, गोंदीया यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले व त्यावरून फौजदारी प्रकरण क्रमांक 325/97 सुरू झाले. सदर फौजदारी केस प्रलंबित असतांना आरोपी बटूकलाल मरण पावल्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी, गोंदीया यांनी दिनांक 07/02/2013 च्या आदेशाप्रमाणे बटूकलाल विरूध्दची फौजदारी केस काढून टाकली. दोषारोप पत्र व त्यावरील आदेशाची प्रत तक्रारकर्त्यांनी दस्त क्रमांक 7 वर दाखल केली आहे.
त्यानंतर तक्रारकर्ती क्रमांक 1 ने दिनांक 17/05/2013 रोजी विरूध्द पक्षाला पत्र देऊन लॉकर क्रमांक 180 आणि 501 ची चाबी हरविली आहे, नवीन चाबी बनविण्यासाठी कार्यवाही करावी अशी विनंती केली. तसेच याबाबत दिनांक 08.07.2014 रोजी दिलेल्या पत्रात देखील डुप्लीकेट चाबीबाबत माहिती द्यावी अशी विनंती केली आहे. सदर पत्राच्या प्रती तक्रारकर्त्यांनी दिनांक 08.11.2016 च्या यादीसोबत दाखल केल्या असून विरूध्द पक्षाने त्या नाकारलेल्या नाहीत. सदर बाबींचा तक्रारकर्त्यांनी तक्रारीत हेतूपुरस्सर उल्लेख केलेला नाही. जर तक्रारकर्त्यांकडे लॉकरच्या किल्ल्याच नव्हत्या तर त्या लॉकर उघडण्यासाठी विरूध्द पक्ष बँकेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असले तरी लॉकर ग्राहकाची चाबी हरविली असेल तर नवीन चाबी तयार करण्याची प्रक्रिया काय? त्यासाठी किती खर्च जमा करावा लागेल याची योग्य माहिती देण्याची जबाबदारी विरूध्द पक्षाची आहे. मात्र त्यांनी ती पार पाडली नाही ही सेवेतील न्यूनता आहे.
मयत बटूकलाल व तक्रारकर्ती क्रमांक 1 श्रीमती शारदादेवी यांचे संयुक्त नांवाने लॉकर असल्याचे विरूध्द पक्षाने नाकारलेले नाही. बटूकलाल दिनांक 27/12/2012 रोजी मरण पावल्याचे देखील विरूध्द पक्षाने नाकारलेले नाही. बटूकलाल विरूध्दची फौजदारी केस क्रमांक 325/97 देखील त्याच्या मृत्यूमुळे न्यायालयाने काढून टाकलेली आहे. त्यामुळे सदर लॉकर क्रमांक 180 व 501 संबंधाने लॉकर वापरास प्रतिबंध करण्याचे कोणतेही कारण शिल्लक नसल्याने विरूध्द पक्षाने लॉकर मालक म्हणून संयुक्त नांव असलेल्या तक्रारकर्ती क्रमांक 1 ला लॉकर उघडण्यासाठी व नवीन चाब्या बनविण्यासाठी येणारा खर्च कळवावा व तिच्याकडून असा खर्च मिळाल्यावर नवीन चाब्या तयार करून नियमाप्रमाणे तक्रारकर्ती क्रमांक 1 ला हस्तांतरित कराव्या आणि लॉकर भाडे इत्यादी वसूल करून लॉकर उघडण्यास परवानगी द्यावी. जर बटूकलाल बरोबर तक्रारकर्ती क्रमांक 1 च्या संयुक्त नांवाने लॉकर नसेल तर बँकेच्या नियमाप्रमाणे आवश्यक अन्य दस्तावेज (Letter of Administration, Succession Certificate इत्यादी) प्राप्त करून तक्रारकर्ती क्रमांक 1 ला लॉकर उघडण्याची परवानगी द्यावी. वरील कारणांमुळे मुद्दा क्रमांक 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अंतिम आदेश –
1. तक्रारकर्त्यांची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल करण्यांत आलेली तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरूध्द पक्षास आदेश देण्यांत येतो की, तक्रारकर्ती क्रमांक 1 ला लॉकर उघडण्यासाठी व नवीन चाब्या बनविण्यासाठी येणारा खर्च कळवावा व तिच्याकडून असा खर्च मिळाल्यावर नवीन चाब्या तयार करून नियमाप्रमाणे तक्रारकर्ती क्रमांक 1 ला हस्तांतरित कराव्या आणि लॉकर भाडे इत्यादी वसूल करून लॉकर उघडण्यास परवानगी द्यावी.
3. जर बटूकलाल बरोबर तक्रारकर्ती क्रमांक 1 च्या संयुक्त नांवाने लॉकर नसेल तर बँकेच्या नियमाप्रमाणे आवश्यक अन्य दस्तावेज (Letter of Administration Succession Certificate इत्यादी) प्राप्त करून तक्रारकर्ती क्रमांक 1 ला लॉकर उघडण्याची परवानगी द्यावी.
4. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यांना परत करावी.