न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदार यांचे बॅंक ऑफ बडोदा, राजारामपुरी, शाखा कोल्हापूर या शाखेत सेव्हिंग्ज बँक खाते असून त्याचा खाते क्र.41870100004949 असा आहे. तसेच तक्रारदार यांनी पंजाब नॅशनल बँक, पीएनबी हाऊस, सर पी.एन.रोड, फोर्ट, मुंबई या बँकेत एक सेव्हिंग्ज खाते उघडले होते. सदरची दोन्ही खाती तक्रारदार हे नेहमी ऑपरेट करीत आहेत. तक्रारदार हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सेवेमधून प्रबंधक, राजभाषा या पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या बहुतांश रकमेपैकी जास्तीत जास्त रक्कम त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या वर नमूद खात्यात जमा केलेली आहे. त्यांच्या मुलीचे लग्नासाठी सदरची रक्कम उपयोगी पडेल या करिता त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या खात्याचा वैयक्तिक चेक, बँक आफ बडोदा, राजारामपुरी शाखेत त्यांचेच खातेत जमा केला. मात्र सदरच्या दोन्ही बँकामध्ये सहयोग नसलेने त्यांच्याच खात्यातील सदरची रक्कम जमा होवू शकली नाही व त्यांचे मुलीचे लग्न करुन देण्यात त्यांना खूप मोठया संकटांना तोंड द्यावे लागले. सबब, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी रिझर्व्ह बँकेतून प्रबंधक, राजभाषा या पदावरुन निवृत्त झालेनंतर सप्टेंबर 2016 पासून वर नमूद पत्त्यावर रहावयास आहेत व येथे आल्यानंतर व्यवहार करायला सोयीचे होईल म्हणून बँक ऑफ बडोदा राजारामपुरी शाखा या शाखेत सेव्हिंग्ज बँक खाते उघडलेले आहे. तसेच सदरचे खाते हे दि. 5 ऑक्टोबर 2016 रोजी उघडलेले आहे व मुंबई येथे नोकरी करीत असताना सोयीचे व्हावे म्हणून पंजाब नॅशनल बॅक, फोर्ट, मुंबई येथे सेव्हिंग्ज खाते उघडले होते. सदरचे खाते हे दि. 5 जुलै 2005 रोजी उघडलेले होते. सदरची दोन्हीही खाती ही तक्रारदार नेहमी ऑपरेट करीत असतात.
3. पंजाब नॅशनल बँकेत निवृत्ती वेतन तसेच वेगवेगळया कंपन्यांकडून मिळणारे लाभांश इ. पैसा सदरचे बँकेत जमा होता. तदनंतर दि. 12 मार्च 2018 रोजी तक्रारदार यांचे मुलीचे कोल्हापूरात लग्न असलेने व तदनंतर दि.16 मार्च 2018 रोजी मुंबईत स्वागत समारंभ असलेने घराजवळच्या बँकेत पैसे असावेत व देवघेव करायला सोयीचे जावे याकरिता त्यांनी त्यांचेच वर नमूद केलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या सेव्हिंग्ज खातेमध्ये दि. 26/2/2018 चा चेक नंबर 950740 रक्कम रु. 20 लाख हा बँक ऑफ बडोदा, राजारामपुरी शाखा यामध्ये जमा केला. सदरचे पीएनबी बँकेचे खातेमध्ये तक्रारदार यांचे रक्कम रु. 34,82,849/- इतकी रक्कम शिल्लक होती. मात्र दि. 27/2/2018 रोजी बँक ऑफ बडोदामधून तक्रारदार यांना फोन आला व सदरचा चेक पीएनबी बँकेकडून परत आला आहे व तो घेवून जावा असे सांगण्यात आले. हे ऐकल्यानंतर तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रास होवू लागला. सदरचा चेक हा प्रेझेंट वुईथ डॉक्युमेंट्स अशा शे-यानिशी परत आला व दि. 27 फेब्रुवारी 2018 रोजी तक्रारदार यांना परत दिला गेला. सदरची बाब ही अत्यंत चिंताग्रस्त होती. त्यामुळे तक्रारदारांना निद्रानाशाचा त्रासाचाही सामना करणे भाग पडले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तक्रारदार यांना त्यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांचेकडून पैसे उधार घेणे भाग पडले. सदरची रक्कम जवळजवळ रु.2 लाख इतकी होती. स्वतःची कोणतीही चूक नसताना व बँकेत पैसे शिल्लक असताना तक्रारदार यांचेवर ही वेळ आली. तक्रारदार यांनी या संदर्भात पीएनबी बँकेला एक पत्र लिहून स्पष्टीकरणही मागविले होते. पण आजतागायत त्यांनी त्यांना उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. यावरुनही सदर बँकेची कृती ही उद्दामपणाची व बेजबाबदारपणाची आहे हे स्पष्ट होते.
4. तदनंतर तक्रारदार यांनी बँकींग लोकपाल यांनाही मे 2018 मध्ये तक्रारअर्ज दिला. तेव्हा लोकपाल कार्यालयानेही पंजाब नॅशनल बँकेचा चेक हा प्रेझेंट वुईथ डॉक्युमेंट्स या शे-याने परत आला आहे ही सर्वस्वी चूक ही पीएनबी बँकेचीच आहे असे अप्रत्यक्ष मान्य केले. सबब, या दोन्ही बँकांनी आपापली ग्राहकसेवा तक्रारदारास देण्यात त्रुटी केलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे म्हणून तक्रारदारास सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले. याकरिता तक्रारदाराच्या मानसिक नुकसानीबद्दल रक्कम रु. 2 लाख तक्रारदार यांना अदा करण्याचो आदेश व्हावेत असे तक्रारदार यांचे कथन आहे.
5. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत पंजाब नॅशनल बँकेचा चेक, पंजाब नॅशनल बँकेचा चेक रिटर्न मेमो, तक्रारदाराने पंजाब नॅशनल बँकेला दिलेले पत्र, बँकींग ओम्बड्समन यांना तक्रारदारांनी दिलेले पत्र व माहिती अधिकाराअंतर्गत पत्र, बँकींग ओम्बड्समन यांनी दिलेले उत्तर, तक्रारदाराने बँक ऑफ बडोदाला दिलेले पत्र, बँक ऑफ बडोदा यांनी दिलेले उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र, साक्षीदारांची पुरावा शपथपत्रे व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. वि.प.क्र.1 व 2 यांना आयोगाची नोटीस लागू होवून त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दाखल केले. वि.प.क्र.1 यांचे कथनानुसार, सदरचा चेक हा प्रेझेंट वुथ डॉक्युमेंट्स या शे-यानिशी वि.प.क्र.2 बँक ऑफ बडोदा यांना परत पाठविलेला आहे. मात्र सदरचा चेक परत पाठविण्यामागे वि.प.क्र.1 यांचे कथन आहे की, The bank procedure is to safeguard the interest of our customer Shri Surendra Shankar Phadke and his money, before passing the cheque our pnb bank is used to call on phone or cell for genuineness of the cheque presented in clearing, but call could not be completed, hence, in the interest of customer and safety of his money safeguard the cheque has been returned. The duty of the customer to confirm on cell or phone that they have issued the cheque in clearing. सबब, तक्रारदार यांचा चेक बॅक ऑफ बडोदाला तक्रारदार यांचेच सुरक्षिततेसाठी परत पाठविण्यात आलेला होता.
7. वि.प.क्र.2 यांचे कथनानुसार वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रारदार यांनी खाते उघडलेले आहे व वर नमूद चेक हा वटणेसाठी सदरचे खातेमध्ये भरलेला होता. मात्र वि.प.क्र.1 बँकेकडील खातेवर किती रक्कम शिल्लक होती याची कोणतीही माहिती वि.प.क्र.2 यांना नव्हती व नाही व तसे असण्याचे कोणतेही कारण नाही. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये नमूद केलेप्रमाणे दि. 27/2/2018 रोजी सदरचा चेक अनादरीत होवून परत आलेचे वि.प.क्र.2 बँकेचे संबंधीत अधिकारी यांनी तक्रारदार यांना रितसर कळविले. सदरचा चेक व रिटर्न मेमो ताब्यात घेणेविषयी कळविले होते व आहे. वि.प.क्र.2 बँकेने तक्रारदारास आपल्या सेवेची तत्परताच दाखवून दिलेली आहे. तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केली नसल्याचे स्पष्ट आहे. तक्रारदार यांना स्वतःचे पैसे वेळेवर भागविता आले नाहीत किंवा कसे याबाबत आपणास कोणतीही माहिती नाही व यासाठी वि.प.क्र.2 यांची कोणतीही चूक नव्हती व नाही. सदरचे बँकेने सेवा देणेमध्ये कोणतीही कुचराई केलेली नव्हती. उलट तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे वि.प.क्र.1 बँकेविरुध्द बँकींग लोकपाल कार्यालयाकडे केलेले तक्रारीसंबंधी बँकींग लोकपाल कार्यालयाकडून दि. 27/6/2018 रोजी लेखी पत्र आले असून सदर पत्राची झेरॉक्स तक्रारदाराने याकामी दाखल केलेली आहे. सदरचे पत्रावरुन असे स्पष्ट दिसून येते की, वि.प.क्र.1 यांनी बँकींग लोकपालांना कळविलेप्रमाणे सदर चेकची रक्कम रु. 20 लाख ही मोठी असलेने वि.प.नं. 1 बँकेची फसवणूकीच्या धोक्यापासून संरक्षणासाठीचे अंतर्गत परिपत्रकाप्रमाणे (Fraud Risk Management Divisions Internal Circular ) खातेदाराकडून टेलिफोनवरुन कन्फरमेशन झालेनंतरच सदरचा चेक वटविणेत येतो. परंतु वि.प. क्र.1 बँकेकडील संबंधीत अधिका-याने तक्रारदाराचे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर केले टेलिफोन कॉलला तक्रारदाराकडून उत्तर न दिले गेलेने सदरचा चेक प्रेझेंट वुईथ डॉक्युमेंट या शे-यानिशी न वटता परत गेला आहे. वि.प.क्र.1 बँकेने सदरचा चेक वि.प.क्र.2 बँकेने पुन्हा वटण्यासाठी भरला नाही असे कथन केले होते. मात्र सदरचा विचार हा बुध्दीस न पटणारा आहे. वि.प.क्र.2 बँकेने सदरचा चेक वटणेसाठी पुढे पाठवू शकत नाही व तसे वि.प.क्र.2 बँकेवर बंधनकारक नाही. सदरचा चेक भरणे अथवा न भरणे याबाबतचा निर्णय हा तक्रारदार यांनी घ्यावायाचा असतो. त्याची वि.प. बँकेची कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब, वि.प.क्र.2 बँकेस दि. 19/12/2018 रोजी पत्र पाठवून विनाकारण व अवाजवी नुकसान भरपाई देण्याची मागणी तक्रारदार यांनी केलेली आहे. मात्र वि.प. क्र.2 बँकेने तक्रारदार यांना दि. 29/12/2018 रोजी पत्रान्वये संपूर्ण खुलासा केला आहे व तक्रारदारास देय असले सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. वि.प.क्र.2 ही राष्ट्रीयकृत बँक असून ती व तिचे कर्मचारी ग्राहकांना येाग्य सेवा देण्यासठी नेहमीच तत्पर असतात. सबब, वि.प.क्र.2 यांनाच नाहकपणे पक्षकार केलेने झालेले नुकसानीबद्दल रक्कम रु. 2,50,000/- इतकी नुकसान भरपाई तक्रारदाराकडून देणेत यावी असे कथन वि.प.क्र.2 यांनी केले आहे.
8. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. वि.प. क्र.1 यांनी |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
9. तक्रारदार यांचे बॅंक ऑफ बडोदा, राजारामपुरी, शाखा कोल्हापूर या शाखेत सेव्हिंग्ज बँक खाते असून त्याचा खाते क्र.41870100004949 असा आहे. तसेच पंजाब नॅशनल बँक, पीएनबी हाऊस, सर पी.एन.रोड, फोर्ट, मुंबई या बँकेत एक सेव्हिंग्ज खाते उघडले होते. सदरची दोन्ही खाती तक्रारदार हे नेहमी ऑपरेट करीत आहेत. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
10. तक्रारदार यांनी अर्जात नमूद चेक हा वि.प.क्र.1 बँकेचा चेक असून तो वि.प. क्र.2 बँकेमध्ये जमा केलेला होता. सदरचा चेक हा तक्रारदार यांनी बहुतांश रक्कम ही वि.प. क्र.1 बँकेच्या खात्यात जमा असलेने मुलीचे लग्नात उपयोगी पडणेसाठी सदरच्या बँकेतील रक्कम ही वि.प. क्र.2 बँकेत जमा करणेसठी वर नमूद चेक जमा केलेला होता. मात्र जरी वि.प.क्र.1 यांनी सदरचा चेक हा तक्रारदार यांचे सुरक्षिततेसाठीच तक्रारदार यांचेशी कन्फरमेशन झालेनंतरच चेक वटत असतो असे कथन दि. 25/3/2019 च्या पत्राद्वारे केलेले आहे व पूर्ण खात्री पटलेनंतरच रक्कम जादा असले कारणाने व तक्रारदार यांचेशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही संपर्क न झालेने सदरचा चेक बँक ऑफ बडोदाकडे परत पाठविलेला आहे व याबाबत वि.प. क्र.1 यांनी पंजाब नॅशनल बॅंक याची काहीही चूक नाही असे कथन केलेले आहे. मात्र वि.प.क्र.2 बँकेने सदरचा चेक हा ज्या शे-यानिशी म्हणजेच प्रेझेंट वुईथ डॉक्युमेंट्स या शे-याने परत आलेला आहे, तसाच तो तक्रारदार यांना परत केलेला आहे. या संदर्भात उभय पक्षांमध्ये वादाचा मुद्दा नाही व सदरचे सर्व कागदपत्रे जसे की, पंजाब नॅशनल बँकेचा चेक क्र. 950740 दि. 26/2/2018 रोजीचा तसेच पंजाब नॅशनल बँकेने चेक परत करताना दिलेल्या मेमोची प्रत इ. कागदपत्रे कागदयादीसोबत दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी या संदर्भात बँकींग लोकपाल यांनाही पत्र लिहिलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता, बँकींग लोकपाल यांनीही तक्रारदार यांना वि.प.क्र.1 बँकेची चूक आहे असे अप्रत्यक्षरित्या कथन केलले आहे व यावरुनच वि.प.क्र.1 ही बँक सदरचा तक्रारदार यांचा चेक वेळेवर न मिळणेस जबाबदार आहेत असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे.
11. या संदर्भातील तक्रारदार यांनी स्वतःच्या पुराव्याच्या शपथपत्राबरोबरच साक्षीदार काशीनाथ दिनकर वागलेकर रा. शाहू उद्यान रोड, गगावेश, कोल्हापूर यांचेही पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. याचाही विचार हे आयेाग करीत आहे. वि.प. क्र.1 बँकेने तक्रारदार यांना सदरची बाब अथवा व्यक्ती तीच असल्याबाबतचे तसेच रक्कम रु.20 लाख इतकी असलेचे कन्फरमेशन करणेसाठी मॅसेज अथवा मेल केला असता तर सदरची परिस्थिती तक्रारदार यांचेवर ओढविली नसती. मात्र फक्त मोबाईलवरुर संपर्क साधून व तो साधला गेला नसल्याचेही कथन करुन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांची रक्कम जादा असलेने त्यासंदर्भातील व्यक्ती अथवा रकमेचे कन्फरमेशन झालेखेरित चेक वटत नसलेचे केलेले कथन या आयोगास मान्य आहे. तथापि नुसताच फोनवरुन संपर्क साधला गेला नसलेने लगेच चेक परत पाठविणे हे या आयोगास संयुक्तिक वाटत नाही. सद्यपरिस्थितीचा विचार करता वि.प.क्र.1 बँकेने तक्रारदार यांना मेल अथवा व्हाट्सअॅपद्वारे जरी संपर्क साधला असता तरी तक्रारदार यांनी त्यासंदर्भातील कन्फरमेशन दिले असते मात्र वि.प.क्र.1 यांनी तसे केलेचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे मुलीचे लग्नाकरिता त्यांना हवी असणारी रक्कम ही त्यांचेच बँक आफ बडोदा (वि.प. क्र.2) यांचे खात्यात वेळेवर जमा झालेली नाही व याचा मानसिक व शारिरिक त्रास हा तक्रारदार यांना सहन करावा लागलेला आहे व वेळेत पैसेही मिळाले नाहीत ही सुध्दा तक्रारदार यांचे दृष्टीने गंभीर बाब आहे. वि.प. क्र.2 यांनी तक्रारदार यांना वेळेत सदरचा चेक परत केलेला आहे. सबब, वि.प.क्र.2 यांची या आयोगास कोणतीही सेवा त्रुटी दिसून येत नाही. मात्र वि.प.क्र.1 बँकेने तक्रारदार यांना सदरची सेवा वेळेत न देवून सेवा देण्यामध्ये त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे व तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर करण्याचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. तक्रारदार यांना वेळेत पैसे न जमा झाल्यामुळे तक्रारदार यांचे भाऊ तसेच इतर नातलग यांचेकडून पैसे जमा करणे भाग पडले. या सर्व कारणांकरिता तक्रारदार यांना रक्कम रु.50,000/- नुकसान भरपाईपोटी व मानसिक त्रासापोटी देण्याचे आदेश वि.प. क्र.1 बँकेस करण्यात येतात. वि.प. क्र.2 बाबत कोणतेही आदेश नाहीत. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
3. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
4. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
5. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
6. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.