न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
जिल्हा व तुकडी कोल्हापूर पोटी तुकडी तहसिल हातकणंगले पैकी शिरोली पुलाची गावचे हद्दीतील जमीनी खालीलप्रमाणे -
अ) सर्व्हे नं. क्षेत्र आकार पैकी हिस्सा
हे.आर. रु. पै.
1) 178/10 00.21 3.75 2 आणे 8 पै
2) 178/11 00.35 4.25 5 आणे 4 पै
सदरची मिळकत ही तक्रारदाराचे मालकी वहिवाटीची आहे. वि.प.क्र.1 ही सहकारी संस्था असून वि.प.क्र.1 हे संस्थेचे सभापती, क्र.2 हे उपसभापती व क्र.3 ते 14 हे संचालक आहे. वि.प.क्र.15 हे सचिव आहे. वि.प. संस्थेचा उद्देश पंचगंगा नदीतून इलेक्ट्रीक मोटरीद्वारे पाणी उपसा करुन ते पाणी पाईपमधून संस्थेच्या सभासद व बिगर सभासद शेतक-यांना शेतीतील पिकासाठी पाणी पुररवठा करणे हा आहे. तक्रारदार हे वि.प.क्र.1 संस्थेचे ग्राहक व सभासद आहेत. तक्रारदार हे दावा मिळकतीकरिता वि.प.क्र.1 संस्थेचे पाणी ब-याच वर्षापासून घेत आले आहेत. असे असताना अचानकपणे कोणतीही कल्पना न देता वि.प. यांनी दि. 25/11/2011 रोजी तक्रारदाराचे मिळकतीस पाणी पुरवठा करणारी पाईप कट केली. त्यामुळे तक्रारदारांचे अंदाजे रु. 15,300/- नुकसन झाले. त्याकरिता तक्रारदारांनी दि. 01/02/2002 रोजी वकीलामार्फत वि.प. संस्थेस नोटीस पाठविले. परंतु त्यास वि.प. यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारदारांनी ग्राहक तक्रार केस क्र. 175/2002 दाखल केली. सदर तक्रारीचा निकाल तक्रारदाराचे बाजूने लागला. परंतु वि.प. यांनी त्याविरुध्द राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपिल दाखल केले. सदरचे अपिल हे गुणदोषावर फेटाळणेत आला व त्यानंतर 2004 साली तक्रारदारांचा पाणी पुरवठा सुरु झाला. तदनंतर जानेवारी 2021 चे अखेरीस तक्रारदार हे वि.प. यांचेकडे पाणीपट्टी भरण्यास गले असता त्यांनी पैसे भरुन घेणेस व पाणी देणेस नकार दिला. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 8/02/2021 रोजी नोटीस पाठविली. परंतु वि.प. यांनी त्यास चुकीचे उत्तर पाठवून संस्थेने ज्या लोकांची नावे 7/12 पत्रकी नमूद आहेत, त्यांनाच पाणी पुरवठा करणार असा ठराव केलेचे कळविले. दावा मिळकत रि.स.नं. 178/11 पैकी 00.11.66 आर ही जमीन तक्रारदारांचे वडीलांचे पश्चात कुळ नात्याने वहिवाटीस आहे. असे असतना सदर जमीनीचे मालक रंगराव गोविंद पाटील यांनी तहसिलदार हातकणंगले यांचे कोर्टात टेनन्सी अर्ज दाखल केला. सदरचे जमीन मालक यांनी तक्रारदारांकडून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया रावबून सदर मिळकतीचा कब्जा घेतलेला नाही. असे असताना वि.प. संस्थेने रंगराव पाटील यांचेशी संगनमत करुन सदर दावा जमीनीमधील पाणी पुरवठा बंद करुन तक्रारदाराचे नुकसान चालविले आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराचे दावा मिळकतीतील ऊस पिकास सत्वर पाणी पुरवठा सुरु करावा, सदर पाणी पुरवठा न केलेस सन 2021-22 या सालाकरिता व तेथून पुढे पाणी पुरवठा सुरु होईपर्यत दरसाल 18 टनाचे प्रत्येक टनास रु. 3,100/- प्रमाणे दरसाल रु.55,800/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत नोटीशीची स्थळप्रत, वि.प. यांनी नोटीसीस दिलेले उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र. 3, 11 व 13 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
4. वि.प.क्र.1, 2, 4 ते 10, 12, 14 व 15 हे याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द नो से आदेश करण्यणत आला.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1. | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार यांचा वाडवडिलार्जित शेती व्यवसाय असून त्याचे कुटुंबियांचे शेती उत्पन्न हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. वि.प.क्र.1 ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याप्रमाणे नोंदणीकृत सहकारी संस्था असून वि.प.क्र.1 हे संस्थेचे सभापती, क्र.2 हे उपसभापती व क्र.3 ते 14 हे संचालक आहे. वि.प.क्र.15 हे सचिव आहे. वि.प. संस्थेचा उद्देश पंचगंगा नदीतून इलेक्ट्रीक मोटरीद्वारे पाणी उपसा करुन ते पाणी पाईपमधून संस्थेच्या सभासद व बिगर सभासद शेतक-यांना शेतीतील पिकासाठी पाणी पुरवठा करणे हा आहे. तक्रारदार हे न्यायनिर्णय कलम (1) मध्ये नमूद दावा मिळकतीकरिता वि.प.क्र.1 संस्थेचे पाणी ब-याच वर्षापासून घेत आले आहेत व ते वि.प.क्र.1 संस्थेचे ग्राहक व सभासद आहेत. सदर प्रमाणे वि.प.क्र.1 सभासद व बिगर सभासदांना पाणी पुरवठा करुन त्या मोबदल्यात पाणी आकार रोखीने घेतात. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये तक्रारदार यांचेकडून दावा मिळकतीचा पाणी आकारापोटी वि.प.क्र.1 संस्थेने रक्कम रु.2,450/- भरुन घेवून तरी ता. 29/1/2020 पावती दिलेचे कथन केले आहे. सदरची बाब वि.प. यांनी आयोगात हजर होवून नाकारलेली नाही. सबब, या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. दावा रि.सं.न. 178 चे दक्षिणेस पूर्व-पश्चिम असा असून वि.प.क्र.1 संस्थेचे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन या रस्त्याचे दक्षिण बाजूचे पूर्व-पश्चिम अशी आहे. या पाईपलाईन मधून तक्रारदार यांनी स्वखर्चाने रस्त्यावरुन वि.प. संस्थेच्या सांगणेवरुन पाईप बसवून उत्तर बाजूस दावा रि.स.नं. 178/11 चे शेतातील पाटात घेतात व त्यामधून दावा रि.स.नं. 178/10 मधील पिकास पाणी देतात. सदर दावा मिळकतीमध्ये तक्रारदारांनी खोडवा ऊसाचे पिक जानेवारी 2021 मध्ये श्री दत्त सहकारी साखर कारखाना, आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या कारखान्यास पाठविला व त्यानंतर तक्रारदारांनी निडवा या तिस-या पिकाचे ऊस पिक ठेवले. त्याकरिता जानेवारी 2021 अखेरीस जावून पाणीपट्टी भरत असता सदरची रक्कम भरुन घेणेस वि.प. यांनी नकार दिला. ज्या लोकांची नावे 7/12 पत्रकी नमूद आहेत, त्यांनाच पाणी पुरवठा करणार असा ठराव असलेने सदरची पाणीपट्टी वि.प. यांनी तक्रारदारांचेकडून भरुन घेतली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचेकडून न्यायनिर्णय कलम (1) मध्ये नमूद वादमिळकतीची पाणीपट्टी भरुन न घेवून पाणी पुरवठा खंडीत करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारदारांचे दावा मिळकतीमधील ऊस पिकास सत्वर पूर्ववत पाण्याची जोडणी करुन पाणी पुरवठा सुरु करणेबाबत मूळ अर्जाचे अंतिम निकालापावेतो आज्ञार्थी आदेश होणेविषयी विनंती केली होती. त्यानुसार आयोगाने दि. 5/7/2021 रोजी तक्रारदार यांनी सदर आदेशापासून 8 दिवसांत पाणी बिलापैकी रक्कम रु.2,000/- वि.प. यांचेकडे अथवा आयोगात जमा करणेचे अटीवर आदेशापासून 2 दिवसांत खंडीत पाणीपुरवठा चालू करावा असा तूर्तातूर्त मनाई ताकीदीचा आदेश वि.प. यांना केलेला असून सदर आदेशाप्रमाणे तक्रारदारांनी रक्कम रु.2,000/- डी.डी.ने आयोगात जमा केलेली आहे.
8. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता अ.क्र.1 ला तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसीची प्रत दाखल केलेली आहे. अ.क्र.2 ला वि.प. यांनी वकीलामार्फत तक्रारदारांना सदरचे नोटीसीस पाठविलेल्या उत्तराची प्रत दाखल केलली आहे. सदरचे उत्तर नोटीसीचे अवलोकन करता
ता. 8/1/2021 रोजी व्यवस्थापक क्र. ठ नं.10
विषय – सभासद व बिगर सभासद यांना पाणी 7/12 उतारा घेवून देणेबाबत.
ठराव – आपले संस्थेच्या कमांड एरियामध्ये जे क्षेत्र आहे व कमांड एरिया बाहेरील क्षेत्रास संस्थेच्या पाणी शिलकेनुसार त्या सभासदांकडून त्याचे ज्या जमीनीत पाणी घेणार आहे, त्याचा 7/12 उतारा घेवून त्यामध्ये त्याचे नाव मालक किंवा कूळ कोष्टकी असलेस त्यांना पाणी देणेत यावे. त्याचे नाव नसलेस मालकाची संमती घेवून पाणी देणेत यावे.
सूचक – हिंदूराव शंकर कौदाडे
अ.नु. – उत्तम बाबूराव भोसले
ठराव सर्वानुमते मंजूर
असा ठराव केलेमुळे तुम्हांस ता. 05/02/2021 रोजी 7/12 उतारा घेवून त्यामध्ये तुमचे नांव मालक किंवा मूळ कोष्टकी असलेस पाणी देतो असे सांगितलेले होते व आहे. रंगराव गोविंद पाटील यांनी चुकीची माहिती पदाधिका-यांना दिलेली नव्हती व नाही असे सदर नोटीसीत नमूद केले आहे.
9. तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता, तक्रारदारांचे दावा मिळकतीत पाणी पुरवठा करणारी पाईप अचानकपणे कोणतीही कल्पना न देता ता. 25/11/2001 रोजी बेकायदेशीरपणे कट केली व दावा मिळकतीचा पाणी पुरवठा बंद केला. वि.प. यांनी पाईप कापून बेकायदेशीरपणे व मनमानी करुन पाणी पुरवठा बंद केलेने तक्रारदाराचे अंदाजे रु.15,300/- नुकसान झाले. तक्रारदारांनी ग्राहक केस नं. 175/2002 ची तक्रार दाखल करुन कट केलेली पाईप पूर्ववत जोडून पूर्ववत पाणीपुरवठा दावा जमीनीचा सुरु करणेकरिता व नुकसानी मिळणेकरिता दाखल केला होता. सदरचा तक्रारअर्ज ता. 30/8/2004 चे आदेशाने मंजूर करणेत येवून पाईपलाईन जोडणी करुन पाणीपुरवठा सुरु करणेबाबत नुकसान भरपाई खर्च अशी एकूण रक्कम रु.15,300/- देणेबाबत आदेश झाला. सदर निर्णयाविरुध्द वि.प.क्र.1 यांनी मा. राज्य ग्राहक आयोगाकडे अपिल क्र.1720/2004 दाखल केले. सदर अपिल गुणदोषांवर फेटाळणेत आले. त्यानंतर सन 2004 मध्ये तक्रारदारांचा पाणीपुरवठा सुरु केला. तथापि नुकसान भरपाईची रक्कम न भागविलेने तक्रारदारांनी वसुली अर्ज क्र. 68/2004 चे दाखल केला. तरीही वि.प.क्र.1 संस्थेने रक्कम भागविली नाही. अखेर वसुलीकरिता प्रकरण मे. तहसिलदार, हातकणंगले यांचेकडे पाठविणेत आले असून प्रलंबित आहे. सदरचे मा. आयोगातील ग्राहक तक्रारअर्ज क्र. 175/2002 चे निकालाची प्रत तसेच अपिल क्र. 1720/2004 ची प्रत तक्रारदारांनी सदरकामी दाखल केलेली आहे.
10. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये वि.प.संस्थेने ता. 8/12/2018 रोजी तक्रारदार हे 178 पै 11.50 आर क्षेत्रास 2018-19 पर्यंत दरसाल पाणी घेतात व त्याची पाणीपट्टी भरतात असा दाखला दिलेचे कथन केले आहे. सदरची बाब वि.प. यांनी आयोगामध्ये हजर राहून नाकारलेली नाही.
11. सबब, सदरचे नोटीसीवरुन संस्थेने ज्या लोकांची नावे 7/12 पत्रकी नमूद आहेत. त्यांनाच पाणीपुरवठा करणार असा ठराव केलेचे कळविलेचे दिसून येते. त्यानुसार तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता दावा मिळकतीपैकी रि.स.नं. 178/10 पैकी क्षेत्र 0029, 3.75 हे.आर. तक्रारदार यांचे मूळ वाडवडिलार्जित स्वतंत्र मालकी वहिवाटीची मिळकत आहे. तक्रारदार यांनी सदर मिळकतीचा 7/12 उतारा दाखल केलेला असून सदर 7/12 उता-यावर तक्रारदारांचे नाव नमूद आहे. तसेच तक्रारदारांनी रि.स.नं. 178/11 क्षेत्र 00.35 4.25 हे.आर. मिळकतीचा सन 1965-66, 1977 ते 78 ते सन 2007 अखेरचा 7/12 उतारा दाखल केलेला आहे. सदरचे उता-याचे अवलोकन करता सदर उता-यावर मूळ आणि खंड या रकान्याखाली परसू आप्पा मोरे यांचे नावाची नोंद आहे. सबब, सदरचे मिळकतीचे 7/12 पत्रकी इतर हक्कात तक्रारदारांचे वडिलांचे नावाची साधे कुळ म्हणून नांव नमूद असून सदरची मिळकत तक्रारदारांचे वडिलांचे पश्चात तक्रारदार यांचे कुळ या नात्याने वहिवाटीस असलेचे सिध्द होते. तक्रारदारांनी सदर दावा मिळकतीचे गट नं. 178/11 चे जमीन मालक रंगराव गोविंद पाटील यांनी मा. तसहिलदार हातकणंगले यांचे कोर्टात तक्रारदार हे कुळ नाहीत असे ठरवून मिळणेसाठी टेनन्सी अर्ज क्र. 9/2011 प्रत दाखल केलेली आहे. सदरचे अर्जाची प्रत तक्रारदार यांनी दाखल केलेली आहे. सदरचे अर्जामध्ये रंगराव पाटील यांचे वडील यांना सदर दावा मिळकत कसणेस वयोमानाने जमत नसलेने तक्रारदारांचे वडीलांना सदर जमीन कसून खाणेसाठी दिलेचे मान्य केले आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदारांचे वडील सन 1984 साली मयत झालेनंतर सदर मिळकत तक्रारदारांकडे कसणार म्हणून मागणेस गेले असता त्यांस तक्रारदारांनी नकार दिलेचे अर्जात नमूद आहे. तसेच सदर जमीन मालक व कुळांचे दरम्यान महसूल खात्यामध्ये पिक पाहण्यासंदर्भात याकामी मे. अप्पर आयुक्त सो पुणे यांच्या पर्यंत जावून फेरचौकशी होवून तक्रारदार व इतर हिस्सेदारांची त्याच्या उर्वरीत क्षेत्राकडील पिक पाहणी सदरनी नोंद करणेबाबत आदेश करणेत आले. ते आदेश कायम झालेचे तक्रारदारांनी सदरचे अर्जात नमूद केले आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा तसेच तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्रांचे अवलोकन करता जमीन मालक यांनी तक्रारदाराचेकडून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवून दावा मिळकत रि.स.नं. 178 पैकी 0.11.66 आर क्षेत्राचा कब्जा आजअखेर घेतलेला नाही. तसेच कुळकायदा कलम 43 अ प्रमाणे व शासकीय परिपत्रकाप्रमाणे सदर ऊसाची मिळकत खरेदी घेणेचा तक्रारदारांना कायदेशीर हक्क आहे. सबब, तक्रारदारांची 1अ दावा मिळकत मालकी नात्याची व 1ब दावा मिळकत कुळ नात्याची कायदेशीर वहिवाट असताना वि.प. यांनी केवळ जमीन मालक रंगराव गोविंद पाटील यांचे सांगणेवरुन तक्रारदारांचा दावा मिळकतीमधील जानेवारी 2021 मध्ये ऊस तुटून गेलेनंतर पाणीपुरवठा खंडीत करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
12. उपरोक्त मुद्दा क्र.2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार यांनी विनंती कलम 13(ब) मध्ये याउपरही पाणी पुरवठा न केलेस सन 2021-22 या सालाकरिता व तेथून पुढे पाणी पुरवठा सुरु होईपर्यत दरसाल 18 टनाचे प्रत्येक टनास रु. 3,100/- प्रमाणे दरसाल रु.55,800/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सदर तक्रारदाराने आयोगाचे निर्देशाप्रमाणे रक्कम रु. 20,000/- जमा करुनही वि.प. संस्थेने दावा जमीनीकरिता पाणी पुरवठा सुरु केला नसलेचे तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रावर कथन केले आहे. सबब, तक्रारदार हे तक्रारअर्जात मागणी केलेप्रमाणे सन 2020-2021 सालाकरिता व तेथुन पुढे पाणीपुरवठा सुरु होईपर्यंत दरसाल 18 टनाप्रमाणे प्रत्येक टनास रु.3,100/- प्रमाणे दरसाल रु. 55,800/- मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांचे तक्रार अर्ज कलम (1) मध्ये नमूद नमूद वाद मिळकतीमधील ऊस पिकास सत्वर पूर्ववत पाण्याची जोडणी करुन व जरुर ती दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरु करावा. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. यांना वाद मिळकतीची संपूर्ण पाणीपट्टी त्वरित अदा करावी.
- याउपरही वि.प. यांनी तक्रारदारास सत्वर पाणीपुरवठा सुरु न केलेस सन 2020-2021 या सालाकरिता व तेथुन पुढे पाणीपुरवठा सुरु होईपर्यंत दरसाल 18 टनाप्रमाणे प्रत्येक टनास रु.3,100/- प्रमाणे दरसाल रु. 55,800/- नुकसान भरपाई अदा करावी.
-
- वि.प.क्र.1 ते 15 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|