तक्रारकर्तीतर्फे वकील ः- श्री. एस.व्ही. खान्तेड
विरूध्द पक्ष क्र. 1 तर्फे वकील ः- श्री. आय. के. होतचंदानी यांचे वतीने वकील श्री. दिपम बी. पोपट हजर
विरूध्द पक्ष क्र. क्र 2 व 3 ः- गैरहजर.
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 14/06/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे मृत्यू संबधात विमा दावा संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती श्री. मनोहर गणपत नाकाडे हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची मौजा तावसी, तालुका- अर्जुनी/मोरगांव जिल्हा- गोंदिया येथे गट क्रं-488/अ(107) व 488/ब(105) ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात व विरूध्द पक्ष क्र 3 हे सुध्दा दस्ताऐवज घेऊन विरूध्द पक्ष क्र 1 ला विमा दावा सादर करतात. परंतू सदरच्या तक्रारीत तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र 2 यांचेमार्फत दि. 19/06/2017 रोजी विरूध्द पक्ष क्र 1 कडे दावा सादर केला. तक्रारकर्तीने त्यांच्या वकीलामार्फत विरूध्द पक्षाला दि. 06/07/2018 नोटीस पाठवून विमा दाव्याबद्दल विचारणा केली असता, विरूध्द पक्ष क्र 3 यांनी नोटीसला उत्तर देऊन विरूध्द पक्ष क्र 1 यांनी त्याचा विमा दावा दोन कारणाने नाकारला आहे अशी माहिती दिली. पहिला कारण- मृतक श्री. मनोहर गणपत नाकाडे हे दि. 30/11/2016 रोजी शेतकरी नव्हते. दुसरा कारण- त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता.
तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत परिच्छेद क्र 5 व 6 मध्ये असे नमूद केले आहे की, तिच्या पतीच्या नावाने शेतजमिन असल्याकारणाने ते शेतकरी होते व त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना सुध्दा आहे. याशिवाय अपघाताच वेळी तिचे मयत पती वाहन चालवित नव्हते. हे सर्व असून सुध्दा विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तिचा विमा दावा नाकारल्याने तिचेवर भरपूर आर्थिक अडचणींना तोंड दयावे लागले आणि या मंचापुढे सदर तक्रार दाखल करावी लागले. म्हणून त्यांनी विनंती केली आहे की, ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-2,00,000/-द.सा.द.शे 12 टक्के अपघाताच्या दिनाकापासून दयावे. शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 10,000/-,व मंचाला वाटेल तेवढा तक्रारीचा खर्च दयावा.
3. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी या मंचापुढे आपला लेखीजबाब दाखल करून, असे नमूद केले आहे की, तक्रारकर्तीने पूर्ण दस्ताऐवज दाखल केलेले नसल्याने तसेच ते शेतकरी आहे हे दाखविण्याकरीता त्यांच्याकडे शेतजमिन आहे तसे कागदपत्र त्यांना पुरविलेला नाही, त्यांच्याकडे वैध परवाना नाही. तसेच तक्रारकर्ती हि ‘लाभार्थी’/ग्राहक व त्यांच्यामध्ये ‘ग्राहक वाद’ आहे हे त्यांना मान्य नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. विरूध्द पक्ष क्र 2 तालुका कृषी अधिकारी यांनी आपला लेखीजबाब या मंचात दाखल करून त्यांना काही म्हणायचे नाही. त्यांनी हे मान्य केले की, त्यांच्या कार्यालयात विमा प्रस्ताव सादर केला होता. तसेच तक्रारकर्तीने फेरफार 6 ‘ड’ मूळ प्रत दाखल केले होते. त्यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केल्यानंतर कार्यालयाने प्रस्तावाची छाननी करून प्रस्ताव पुढील कायर्वाहीसाठी मा. जिल्हा कृषी अधिकारी गोंदिया यांच्याकडे सादर केलेला आहे. अर्जदारकडून प्रस्ताव स्विकारणे व ते पुढील कार्यवाहीकरीता वरीष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करणे एवढेच या कार्यालयाचे काम आहे.
विरूध्द पक्ष क्र 3 यांनी सुध्दा आपला लेखीजबाब या मंचात दाखल करून मान्य केले आहे की, विमा दावा मिळविण्याकरीता इंन्श्युरंन्स ब्रोकर म्हणून निवड केलेली आहे. ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीनेआपला विमा संबधीत संपूर्ण कागदपत्रे विरूध्द पक्ष क्र 2 कडे सादर केल्यानंतर विरूध्द पक्ष क्र 2 हे त्यांच्याकडे विमा दावा स्विकृतीसाठी पाठवयाचे. त्यांनतर विरूध्द पक्ष क्र 3 हे सर्व विमा दावा संपूर्ण कागदपत्रासहित विरूध्द पक्ष क्र 1 कडे त्यांचे आदेशाकरीता पाठवायचे. सदरच्या तक्रारीत तक्रारकर्तीने दाखल केलेले सर्व दस्ताऐवज विरूध्द पक्ष क्र 2 कडून सादर केल्याने ते सर्व कागदपत्र त्यांनी विरूध्द पक्ष क्र 1 कडे, पाठवायचे तेच त्यांचे काम असून, त्यांनी त्यांचे काम पूर्णपणे पार पाडले आहे. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 यांनी दि. 04/05/2018 च्या पत्राद्वारे मृतक श्री. मनोहर गणपत नाकाडे यांचा नाव फेरफार 6 ‘ड’ मध्ये दि. 30/11/2016 च्या अगोदर नव्हते. तसेच त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता असे कारण दाखवून विमा दावा फेटाळला आहे. त्यांनी त्यांचे काम काटेकोरपणाने पूर्ण केलेले असून विमा दावा फेटाळण्यात त्यांचा काहीही संबध नाही.
4. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, त्यासोबत जोडलेले कागदपत्रे तसेच शपथपत्रावरती पुरावा व लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांनी सुध्दा आपआपला लेखीजबाब दाखल केलेला आहे. त्यांचा साक्षपुरावा व लेखीयुक्तीवाद या मंचाने अवलोकन केले. तक्रारकर्तीतर्फे अधिवकता श्री. एस. व्ही. खान्तेड तसेच विरूध्द पक्ष क्र 1 त्यांचे जेष्ठ वकील श्री. आय.के. होतचंदानी यांचे वतीने वकील श्री. दिपम बी. पोपट यांनी तोंडीयुक्तीवाद केला. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 गैरहजर. तक्रारकर्तीचे अधिवक्ता विरूध्द पक्ष क्र 1 च्या अधिवक्तांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच या मंचाने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाच्या आधारे खालील मुद्दे कायम करून आपला निःष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदवित आहोत.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्तीला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ती सिध्द करते काय? | होय. |
2. | तक्रारकर्ती हि विमा दावा मिळण्यास तसेच नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
:- निःष्कर्ष -:
5. मुद्दा क्र. 1 व 2 ः-
तक्रारकर्तीचे अधिवक्ताने या मंचाचे लक्ष दस्त क्र. 4, फेरफाराची नोंदवहीच्या उतारा-यामध्ये मयत श्री. मनोहर गणपत नाकाडे यांनी रू. 17,000/-,देऊन गट क्रं-488/अ(107) व 488/ब(105) ही शेत जमीन श्री. पांडुरंग नाकाडे यांच्याकडून सन- 1989 मध्ये विकत घेतले. तसेच दस्त क्र. 5 आणि 6 यामध्ये सुध्दा मनोहर गणपत नाकाडे याचा नाव असून, दस्त क्र 7 मध्ये त्यांच्या मृत्युनंतर त्याचा वारस यांना त्यांचे नाव शेतजमिनीवर चढविण्यात यावा या संबधाने फेर फार नोंदवही नमूना ‘6’ वरून हे स्पष्ट होत आहे की, मृत्युपूर्वी मयत श्री. मनोहर गणपत नाकाडे हे गट नंबर/सर्व्हे नंबर/14/1, 105, 107 चे खातेदार होते. म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 यांनी मयत श्री. मनोहर गणपत नाकाडे हे शेतकरी नव्हते असा घेतलेला आक्षेप फेटाळण्यात येत आहे.
तक्रारकर्तीचे अधिवक्ताने दस्त क्र. 9 यावर मंचाचे लक्ष वेधले त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की, मृतक श्री. मनोहर गणपत नाकाडे यांना वैध वाहन परवाना एम.एच. -31/12441/98 दि. 28/01/1998 ला जारी केलेला असून दि. 13/01/2018 पर्यंत वैध आहे. यावरून त्यांच्याकडे वैध परवाना होता म्हणून विरूध्द पक्ष क्र 1 यांनी परवान्याबद्दल घेतलेला दुसरा आक्षेप सुध्दा फेटाळण्यात येतो.
याव्यतिरीक्त दस्त क्र 8 पहिली खबर अनूसार दि. 22/03/2017 रोजी वडसा ते नवेगावबांध जाणा-या तावसी समोरील टि. पाईंट जवळ ट्रक क्र. सी.जी – 04, जे.वी. 7026 च्या चालकाने आमारेा समोर जोरदार धडक दिल्याने दोन्ही मृतक नावे- 1) मनोहर गणपत नाकाडे 2) श्री. विजय पाडुरंग डोंगरवार मरणास कारणीभूत झाल्याने व ट्रक चालकाने अपघाताची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेल्याने त्यांचे विरूध्द भांदवि कलम 289, 304 ‘अ’ सहकलम 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, विरूध्द पक्षाने जे वैध परवान्याची मागणी केली आहे ती कायदेशीर नसल्यामूळे तसेच चुकीची असून त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा खोटे कारण दाखवून नामंजूर केल्याने त्यांनी ग्रा.सं.कायदयानूसार सेवा पुरविण्यात कसुर केला आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे हे स्पष्ट दिसून येते. म्हणून हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहे.
6. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/-दिनांक-19/07/2017(दावा दाखल केल्याच्या 30 दिवसानंतर) पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(2) तालुका कृषी अधिकारी, गेांदिया, जिल्हा गोंदिया व विरूध्द पक्ष क्र. (3) जायका इंन्शुरंन्स ब्रोक्रेज प्रा.लि. कंपनी यांचे काम फक्त विमा दावा करीता लागणारे कागदपत्र स्विकारून विरूध्द पक्ष क्र 1 कडे सादर करण्याचा असतो. त्यांनी आपले कर्तव्याचे पालन केले असून त्यांचे विरूध्दची तक्रार खारीज करणे योग्य व न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे.
7. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) दावा दाखल केल्याच्या 30 दिवसानंतर दिनांक-19/07/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्र 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष – (2) व (3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) यांना निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 ची 30 दिवसांत पालन न केल्यास, द.सा.द.शे 12 टक्के व्याज देय राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.